बर्ट, सिरिल :(३ मार्च १८८३-१० ऑक्टोबर १९७१). प्रसिद्ध ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ. जन्म स्ट्रॅटफर्ड ऑन ॲव्हन येथे. प्रसिद्ध प्रयोदनवादी मासशास्त्रज्ञ ⇨विल्यम मॅक्डूगल (१८७१-१९३८) यांचे तसेच जर्मनीतील ⇨वुर्ट्सबर्ग प्रणालीचे प्रवर्तक ⇨ओस्वाल्ट क्यूल्पे (१८६२-१९१५) यांचेही ते शिष्य होते. ऑक्सफर्ड येथून पदवी संपादन केल्यावर ते जर्मनीत पुढील अध्ययनासाठी गेले. तेथे अनेक वर्षे अध्यापन-संशोधन करून १९०८ मध्ये ते ऑक्सफर्डला परतले. तेथे जॉन लॉक अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली. लिव्हरपूल व केंब्रिज विद्यापीठांतही काही वर्षे अध्यापन केल्यावर लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये १९२४ पासून प्रथन अधिव्याख्याते व नंतर १९३१ ते ५० पर्यंत प्राध्यापक म्हणून ते होते. १९५१ पासून ऑक्सफर्ड येथे ते उपयोजित मानसशास्त्राचे गुणश्री प्राध्यापक म्हणून होते. सु.४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी उपयोजित मानसशास्त्राचा हिरिरीने पुरस्कार केला. उपयोजित मानसशास्त्रातील शैक्षणिक मानसशास्त्र ह्या शाखेत तसेच प्राथमिक शाळांतील मुलांचे बुद्धीमापन, बालगुन्हेगारी, संख्याशास्त्र, इ. क्षेत्रांत लेखन-संशोधनद्वारा तसेच संघटनात्मक स्वरूपाचे भरीव कार्य त्यांनी केले. १९४२ मध्ये ते ‘ब्रिटिश सायकॉलॉजिकल सोसायटी’ चे अध्यक्ष झाले आणि १९४६ मध्ये त्यांनी मानसशास्त्रात केलेल्या महत्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना ‘सर’ (नाइटहुड) हा बहुमानाचा किताब मिळाला. लंडन येथे ते निधन पावले.
गणिती मानसशास्त्रातील म्हणजे मनोमितिशास्त्रातील फलन-विश्लेषण (फॅक्टर ॲनालिसिस) या संख्याशास्त्रीय पद्धतीत त्यांनी उपसादन (इटरेशन) रीतीची मोलाची भर घातली. हे त्यांचे संशोधनकार्य सर्वमान्य ठरले. ब्रिटिश जर्नल ऑफ सायकॉलॉजी या इंगलंडमधील नियतकालिकास सुप्रतिष्ठित करण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली. ब्रिटिश जर्नल ऑफ स्टॅटिस्टिकल सायकॉलॉजीचेही ते संपादक होते. लिव्हरपूल विद्यापीठात अध्यापन करत असताना मुलांच्या बुद्धिमापनावर त्यांनी मौलिक संशोधन केले.
त्यांची महत्त्वाची ग्रंथनिर्मिती अशी : मेंटल अँड स्कोलॅस्टिक टेस्ट्स (१९२१), द यंग डेलिन्क्वंट (१९२५), द मेझरमेंट ऑफ द मेंटल कपॅसिटिज (१९२७), द बॅकवर्ड चाइल्ड (१९३७), फॅक्टर्स ऑफ द माइंड (१९४०), कॉझेस अँड ट्रीटमेंट ऑफ बॅकवर्डनेस (१९५२) व सबनॉर्मल माइंड (१९५५).
बर्ट यांच्या निधनानंतर काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय संशोधनाबाबत, लेखनाबाबत व चारित्र्याबाबत गंभीर आक्षेप घेण्यात येऊन मोठे वादळ निर्माण झाले होते.
काळे, श्री. वा.