बर्गेन:नॉर्वेतील एक प्रमुख बंदर व हॉर्डालान काउंटीचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,११,८६१ (१९७८). हे नॉर्वेची राजधानी ऑस्लोच्या वायव्येस ३०६ किमी. वर नॉर्वेच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्ग यांनी हे देशातील प्रमुख शहरांशी जोडले आहे.
नॉर्वेतील हे एक प्राचीन शहर असून १०७० च्या सुमारास तिसरा ओलाफ याने ‘बोर्जव्हीन’ या नावाने ते प्रथम वसविले. थोड्या काळातच यास नॉर्वेचे प्रमुख राजकीय व व्यापारी शहर म्हणून महत्व प्राप्त झाले. हॅन्सिॲटिक लीगने (मध्ययुगीन जर्मन शहरांतील एक व्यापारी संघ) १३५० च्या सुमारास येथे आपले कार्यालय उघडले. तेव्हा पासून १५६० पर्यंत या संघाच्या प्रमुख चार बंदरामध्ये बर्गेनला स्थान मिळाले. या काळात शहराचा सर्वांगीण विकास घडून आला. सोळाव्या शतकात धर्मसुधारणा चळवळीच्या काळात येथील अनेक चर्च व मठ-वास्तू उद्ध्वस्त करण्यात आल्या. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी १९४० मध्ये हे शहर जिंकले होते. युद्धातील बाँब वर्षावामुळे त्याचे फार नुकसान झाले होते. १७०२, १८५५ आणि १९१६ मध्ये आगीमुळे शहराची फार मोठी हानी झाली. सध्या शहराच्या मध्यवर्ती भागाची आगीपासून संरक्षण होईल अशी रचना केली आहे.
बर्गेन हे नॉर्वेतील प्रमुख मासळी व्यापारकेंद्र असून सुकी मासळी, माशांचे तेल व हेरिंग, फिश रोए, इ. माशांच्या व्यापारासाठी विख्यात आहे. जहाजबांधणी हा येथील प्रमुख उद्योग असून त्याशिवाय सुती कापड, मद्ये, तंबाखूचे पदार्थ, चिनी मातीची भांडी, कागद, कातडी वस्तू, विद्युत् उपकरणे, पियानो इ. निर्मितिउद्योगही विकसित झाले आहेत.
एकोणिसाव्या शतकात बर्गेन हे नॉर्वेचे सांस्कृतिक केंद्र मानले जाई. एड्व्हार्त ग्रिग कवीचे, ओले बॉर्नेमान बूल या व्हयोलिन वादकाचे व लूद्व्ही हॉल्बर्ग या नाटककारीचे हे जन्मग्राम आहे, तर ⇨हेन्रिक इव्सेन या जगप्रसिद्ध नाटककाराचे काही काळ येथे वास्तव्य होते. येथे बर्गेन विद्यापीठ (स्था. १९४८), संगीत अकादमी, मरीन अकॅडमी, इ. उच्च शैक्षणिक संस्था आहेत.
नॅशनल थिएटर (स्था. १८५०) हे येथील एक जुने चित्रपटगृह होय. शहरात अनेक संग्रहालये, कलावीथी त्याचप्रमाणे अनेक नव्या-जुन्या वास्तूही आढळतात. त्यांपैकी बर्गेनहस किल्ला, रोझेक्रांट्स टॉवर तेराव्या शतकातील हॅकॉन हॉल इ. उल्लेखनीय आहेत. येथील बाराव्या शतकातील चर्च ऑफ सेंट मेरी हे प्रसिद्ध आहे. दरवर्षी अनेक पर्यटक येथे येतात. १९५३ पासून येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव (बर्गेन्स फेस्टिव्हल) साजरा करण्यात येतो.
गाढे, ना. स.