बर्ग, पॉल :(३० जून १९२६-). अमेरिकन जीवनरसायन-शास्त्रज्ञ. १९८० सालच्या रसायनशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक विजेते व ‘आनुवंशिकीय अभियांत्रिकी’ या नवीन तंत्राचे एक आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म व शालेय शिक्षण ब्रुकलिन (न्यूयॉर्क) येथे झाले. १९४३-४६ या काळात त्यांनी लष्करात काम केले. लष्करी सेवेतून मुक्त झाल्यावर त्यांनी १९४८ मध्ये पेनसिल्व्हेनिया स्टेट विद्यपीठाची बी. एस्. व १९५२ मध्ये वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी (ओहायओ) विद्यापीठाची पीएच्.डी. ह्या पदव्या मिळविल्या. यानंतर त्यांनी कोपनहेगन इन्स्टिट्यूट ऑफ सायटोफिजिऑलॉजी या संस्थेत ⇨वसाम्लांच्या चयापचयांसंबंधी (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींसंबंधी) संशोधन केले. १९५५-५९ या काळात वॉशिंग्टन विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्राचे सहप्राध्यापक, १९५९-६९ या काळात प्राध्यापक व १९६९-७४ या काळात त्या विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९७० पासून स्टॅनफर्ड विद्यापीठात ते ‘विल्सन प्राध्यापक’ म्हणून काम करीत आहेत.

ॲसिटिल को-एंझाइम-ए या रसायनाचा चयापचयातील भाग महत्वाचा असतो, असे त्यांनी प्रयोगांती दाखवून दिले [⟶एंझाइमे]. सर्वसामान्य जीवांत प्रथिने कशी तयार होतात, याविषयी संशोधन करीत असताना त्यांचे लश्क्ष संवर्धकातील (कृत्रिम रीत्या पेशी वाढविण्यात येणाऱ्या माध्यमातील) प्राणिपेशी व त्यावर आक्रमण करणारे ⇨व्हायरस यांच्याकडे वेधले गेले व त्यांवर त्यांनी संशोधन करण्यास सुरूवात केली. दोन निरनिराळ्या प्रकारांचे (उदा., सूक्ष्मजंतूचा व व्हायरसचा) डीएनए [डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल ⟶न्यूक्लिइक अम्ले] रेणू एकत्र करून नवीन जोड-डीएनए रेणू तयार करण्याच्या व त्यापासून त्याच प्रकाराच्या जोड-डीएनए रेणूयुक्त पेशी निर्माण करण्यात त्यांना यश आले. अशा प्रकारे त्यांनी आनुवंशिकी अभियांत्रिकी हे नवीन तंत्र निर्माण करण्यास हातभार लावला [⟶ रेणवीय जीवविज्ञान]. डीएन ए हे आनुवंशिक गुणलक्षणांचे वाहक असून पेशीतील रासायनिक यंत्रणेवर त्यामार्फत कसे नियंत्रण ठेवले जाते, याविषयीच्या त्यांच्या संशोधनासाठी त्यांना १९८० चे रसायनशास्त्राचे अर्धे नोबेल पारितोषिक देण्यात आले. उरलेले अर्धे पारितोषिक ⇨फ्रेडरिक सँगर व वॉल्टर गिलबर्ट (हार्व्हर्ड विद्यापीठ) यांना विभागून देण्यात आले. बर्ग सध्या हीमोग्लोबिननिर्मितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या डीएनएचे विश्लेषण करण्यात गुंतले आहेत.

ॲसिटिल को-एंझाइम-ए बद्दलच्या संशोधनाबद्दल त्यांना इलि-लिली पारितोषिक (१९५९) व कॅलिफोर्निया सायंटिस्ट ऑफ द इयर (१९६३) हा बहुमान देण्यात आला. तसेच त्यांना व्ही. डी. मॅटिया पारितोषिक (१९७२), हेन्री जे. कायझर पारितोषिक (१९७२), सॅरासोटा मेडिकल पारितोषिक (१९७९), ॲल्बर्ट लास्कर मेडिकल रिसर्च पारितोषिक (१९८०) इ. सन्मान मिळालेले आहेत. अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे संशोधक फेलो, सॉल्फ इन्स्टिट्यूट फॉर बायॉलॉजिकल स्टडीजचे फेलो, तसेच यू. एस. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस इ. संस्थांचे ते सदस्य आहेत. त्यांचे जीवरसायनशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र ह्या विषयांतील ७० पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.

मिठारी, भू. चिं.