बनिहाल: भारतातील जम्मू व काश्मीर राज्याच्या दोदा जिल्ह्यातील गाव. बनिहाल खिंडीमुळे हे विशेष प्रसिद्ध आहे. लोकसंख्या ७५३ (१९७१). हे अनंतनागच्या दक्षिणेस ३२ किमी. वर पीर पंजाल पर्वतरांगेत वसले आहे. बनिहाल म्हणजे काश्मीरी भाषेत ‘बर्फाचे वादळ’ होय. बनिहालला ‘गुंड’ असेही म्हणतात. बनिहाल खिंड २,८३२ मी. उंचीवर असून या खिंडीतील २,१५४ मी. उंचीवरील जवाहर बोगद्यातून जम्मू-श्रीनगर हा रस्ता जातो. या खिंडीची नाकेबंदी केल्यास जम्मू-काश्मीरचा उत्तर व दक्षिण भाग यांदरम्यान खुष्कीच्या मार्गाने होणारे दळणवळण तुटते व श्रीनगर आणि राज्याचा उत्तर भाग एकाकी पडतो. बनिहाल घाटावर पश्चिमेकडून हाजीपीर घाटामार्गे दडपणही आणता येते. त्यागुळे संरक्षणदृष्ट्या अखनूर, जम्मू, बनिहाल यांचा परिसर अत्यंत महत्वाचा मानला जातो.नोव्हेंबर ते मे या महिन्यात बर्फामुळे येथील मोटार वाहतूक काही काळ बंद असते.
भात हे येथील मुख्य पीक असून मेंढपाळीही चालते, याच्याजवळच स्लेटचे साठे आढळतात. निसर्गसौंदर्यांमुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते.
सावंत, प्र. रा.