बदराणुजन्य रोग : प्रजीव संघातील [⟶ प्रोटोझोआ ] बदराणू(कॉक्सिडिया) गणातील आयमेरियाआयझोस्पोरा वंशांच्या बदराणूंमुळे जनावरांमध्ये सांसर्गिक आंत्रशोथ (आतड्याला दाहयुक्त सूज येणे) होतो.

बहुसंख्य बदराणू परजीवी (दुसऱ्या जीवंवर जगणारे) आहेत मात्र सर्वच रोगकारक आहेत असे नाही. निरनिराळ्या जनावरांच्या आतड्याच्या अस्तरत्वचेच्या अधिस्तरातील (आतड्याच्या पोकळी लगत असलेल्या अस्तरत्वचेतील) कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) ते राहतात व वाढतात. त्यांच्या जीवनचक्रातील अवस्थांची वाढ होत असताना कोशिकांचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन रक्तक्षय झाल्याने जनावरे मरतात. बदराणूंच्या जीवनच्रातील युग्मकपुटी (फलित अंड्याच्या स्वरूपातील) अवस्था रोगी जनावरांच्या विष्ठेवाटे बाहेर पडतात. अनुकूल हवामानामध्ये त्यांची वाढ होते व युग्मकपुटीमध्ये बीजाणुपुट (बीज कण असलेले कोश) तयार होतात. या क्रियेला बीजाणुजनन (युग्मकाच्या एका कोशिकेपासून दोन अगर अनेक कोशिका विभाजनाने तयार होण्याची जननपध्दती ) म्हणतात. अशा बीजाणुपुट तयार झालेल्या युग्मकपुटींनी चरण्याची कुरणे, पाणी व खाद्य दुषित होते व त्या खाण्यात आल्यामुळे रोगसंसर्ग होते. जनावरांच्या पोटातील जठररसातील पाचक एंझाइमांच्या (जीव-रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांच्या) परिणामामुळे बीजाणुपुटावरील आवरण नाहीसे होऊन त्यातून बीजाणुज (फलित अंड्यापासून बीजाणू जननाने निर्माण झालेल्या बीजाणुपुटाच्या पुढील अवस्था) बाहेर पडतात व ते अधिस्तरातील कोशिकांमध्ये प्रवेश करतात. कोशिकांमध्ये बीजाणुज वाढून त्यांचे रूपांतर खंडप्रसूमध्ये (प्रजीवाच्या जीवनचक्रातील महत्वाच्या अलैंगिक अवस्थेमध्ये) होते. खंडप्रसूपासून अनेक खंडजीव (खंडप्रसूच्या केंद्रकाच्या – कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या गोलसर पुंजाच्या-विभाजनामुळे निर्माण झालेल्या अवस्था) उत्पन्न होतात व प्रत्येक खंडजीव अधिस्तरातील नवीन कोशिकेमध्ये शिरतो वा त्या जीवापासून पुन्हा खंडप्रसूंची दुसरी पिढी तयार होते. खंडप्रसूपासून पुन्हा खंडजीव अशा काही पिढ्यांनंतर जन्मलेल्या खंडजीवांचे गुरू- व लघु-युग्मक कोशिकांमध्ये (ज्यांपासून शुक्राण-पुं-जननकोशिका-व अंडाणू-स्त्री-जननकोशिका-यांसारख्या कोशिका तयार होतात अशा कोशिकांमध्ये) रूपांतर होते. यांतील लघुयुग्मक कोशिकेपासून अनेक लघुयुग्मक बाहेर पडतात. हे युग्मक म्हणजे नरातील शुक्राणू समान मानले जातात. हे लघुयुग्मक गुरूयुग्मकाच्या शोधात राहून त्यांचे फलन करतात व त्यापासून युग्मक (नर व मादी यांच्या जननकोशिकांशी समान असलेल्या कोशिकांच्या मीलनामुळे तयार होणारे पुढील पिढीचे एककोशिक जीव) तयार होतात. युग्मजाभोवती आवरण तयार होते व अशा रीतीने युग्मकपुटी तयार होऊन त्या जनावरांच्या विष्ठेवाटे बाहेर टाकल्या जातात आणि पुन्हा दुसऱ्या जनावरांना संसर्ग देतात. बदराणूंच्या जीवनचक्रातील सर्व अवस्था आतड्याच्या अस्तरत्वचेतील कोशिकांमधील पोषक द्रव्यांचा उपयोग करून होत असल्यामुळे त्या कोशिकांचा नाश होतो.

गायी, म्हशी, शेळ्यामेंढ्या, डुकरे,कुत्रीमांजरे तसेच ससे या प्राण्यांना बदराणूमुळे रोग होतात. मात्र जनावरांच्या प्रत्येक जातीतील रोगकारक बदराणू अलग जातीचे व विशिष्ट आहेत. विष्ठेवाटे फार मोठ्या प्रमाणावर बदरणूंच्या युग्मकपुटी बाहेर पडत असल्यामुळे लहान वयाची जनावरे चरण्यास सुरुवात करतात तेव्हाच त्यांना रोगसंसर्ग होतो. यांतील काही सौम्य स्वरूपात आजारी होतात व ती बरी होतात पण ही जनावरे रोगवाहक (प्रत्यक्ष आजारी न होता रोगकारक जीव शरीरात बाळगून असणारी व त्यांच्यापासून संसर्गाची भीती असणारी) बनतात. अशा जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकारक्षमता निर्माण होते म्हणूनच बहुतेक वयस्कर जनावरे बदराणुजन्य रोगामुळे सहसा आजारी झालेली दिसत नाहीत. बदराणूच्या ज्या विशिष्ट जातीमुळे जनावर आजारी होते व त्या विशिष्ट जातीविरुद्ध ही प्रतिकारक्षमता असते म्हणून एका जातीच्या बदराणूमुळे आजारी होऊन बरे झालेले जनावर दुसऱ्या रोगकारक बदराणूच्या जातीमुळे आजारी होणे शक्य असते.

गायीम्हशींमध्ये आयमेरिया वंशामधील १२ जातींचे बदराणू आढळून येत असले, तरी त्यांतील आयमेरिया झुर्नाय, आ. षोव्हिस आ. इलिप्सोइडॅलिस जातींचे बदराणू रोगकारक आहेत. दोन महिने ते दोन वर्षे वयांच्या वासरांमध्ये प्रामुख्याने तीव्र स्वरूपाचा आजार दिसून येतो. क्वचित वयस्क जनावर आजारी झाल्याचे दिसून येते. रोगसंसर्ग झाल्यापासून १६ ते ३० दिवसांनी रोगलक्षणे दिसू लागतात.आजाराची सुरूवात अतिसाराने होते. जनावर खाणे सोडते व रवंथही करीत नाही. शेण पातळ होते व त्यामध्ये श्लेष्मल (बुळबुळीत) पदार्थ, आतड्याच्या अस्तरत्वचेचे तुकडे व रक्त आढळून येते. रक्त काळपट असते व त्यामुळे शेणाचा रंगही काळसर होतो. क्वचित रक्ताच्या गुठळ्यांचे बारीक दोरीसारखे तुकडे किंवा लहान-मोठ्या गुठळ्या दिसून येतात. काही वेळा शेणाचा अंश अगदीच कमी प्रमाणात असून फक्त लालभडक रक्ताच्या गुठळ्याच दिसतात. वासरू कुंथते पण शेण बाहेर येत नाही मात्र एखादे वेळी गुदांत्राचा (आतड्याच्या शेवटच्या भागाचा ) भागच बाहेर येतो. रक्तस्त्रावामुळे रक्तक्षय होऊन जनावर खंगत जाते. हलकावे देत चालते व त्याला श्वासोच्छ्‌वास करणेही कठीण होते. अंधनाल (मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या आधी आतड्यापासून निघालेली बंद पिशवी), मोठे आतडे व गुदांत्र या भागांमध्ये बदराणू वाढत असतात. त्यामुळे या भागातील अधिस्तरातील कोशिकांच्या मोठ्या प्रमाणावर नाश झालेला दिसून येतो. रोगाचा जोर साधारणपणे एक आठवडा राहतो व या अवधीतच वासरे मरतात. त्यानंतर हळूहळू जुलाब कमी होऊन शेण घट्ट होऊ लागते. काही वेळा ती काही आठवडे आजारी राहून नंतर बरी होतात. मृत्यूचे प्रमाण २ ते १० % असते. लहान कुरणामध्ये जास्त जनावरे चरण्यास सोडलेल्या किंवा दाटीवाटीने गोठ्यात बांधलेल्या वासरांच्या कळपामध्ये रोगाचे प्रमाण अधिक असते. वयस्क व लहान वयाची जनावरे एकत्र व दाटीवाटीने ठेवल्यास -वयस्क जनावरांच्या विष्ठेतून रोगकारक बदराणूंच्या युग्मकपुटी बाहेर पडत असल्यामुळे – वासरांना रोग होण्याची अधिक शक्यता असते.

शेळ्या व मेंढ्यांमध्ये आयमेरिया वंशातील ९ जातींचे बदराणू आढळून आले असले, तरी आ. आरलॉइंगी या जातीच्या बदराणूमुळे विशेषतः मेंढ्यांमध्ये रोग आढळून येतो. वयस्क मेंढ्यांपेक्षा ६ ते १२ महिने वयाच्या – कधी कधी अंगावर पिणाऱ्या कोकरांमध्ये – तीव्र स्वरूपाचा रोग झाल्याचे आढळते. ग्रहणीपासून ते शेषांत्रापर्यंतच्या (लहान आतड्याच्या सुरूवातीपासून ते शेवटच्या ३/५ भागापर्यंतच्या) भागामध्ये हे बदराणू वाढतात व राहातात. त्यामुळे या भागातील कोशिकांचा नाश झालेला आढळतो. जुलाब व आमांश ही लक्षणे आढळतात. मृत्यूचे प्रमाण २ ते ३ % इतके अत्यल्प असले, तरी लोकर गळण्यामुळे काही वेळा बरेच नुकसान होते. शिवाय मांसोत्पादनासाठी पाळलेल्या मेंढ्या अनारोग्यामुळे लवकर लठ्ठ होत नाहीत. शेळ्यांमध्ये रोग सौम्य प्रमाणात होतो. रोगाचा जोर ८ ते १० दिवस राहतो.

आयझोस्पोरा वंशातील आ. बायजेमिना, आ. रिव्होल्टा, आ. फेलिस आणि आयमेरिया वंशातील आ. कॅनिस या जातीचे बदराणू कुत्री मांजरांमध्ये आढळून आले आहेत. या प्राण्यांमधील बदराणूंमुळे होणारे आजार सौम्य स्वरूपात होतात. अतिसार, उलटी वा क्वचित रक्तमिश्रित हगवण ही लक्षणे दिसतात. अशक्तपणा येऊन रोगामुळे क्वचित कुत्र्याच्या पिलांचा मृत्यू झाल्याचे आढळते.


डुकरामध्ये आयमेरिया वंशाच्या जातींपैकी चार व आयझोस्पोरा वंशाच्या आ. डेब्लीकी असे पाच जातींचे बदराणू आढळून येतात. यांपैकी आ. डेब्लीकीमुळे डुकरांच्या पिलामध्ये रोग होतो. सुरूवातीस बद्धकोष्ठ व मग अतिसार हे लक्षण दिसते. सर्वसामान्यपणे डुकरामधील बदराणुजन्य रोग अतिसौम्य स्वरूपातच दिसून येतो.

सशामध्ये पाच जातींचे बदराणू आढळून येत असले, तरी आयमेरिया पर्फोरान्स आ. स्टोडी या दोन जातींमुळे तीव्र स्वरूपाचा रोग होतो. आर्थिक उत्पादनासाठी सशाचे पेटीवजा पिंजऱ्यामध्ये प्रजनन (पैदास) करण्यात येते. अशा कळपामध्ये तीव्र स्वरूपाचा रोग आढळून येतो. चार महिने वयाच्या आतील सशांमध्ये मृत्यूचे प्रमाणही बरेच असते. आ. स्टेडी सशांच्य पित्तवाहिनीमध्ये राहतात व वाढतात. यकृताची वाढ होते व त्याच्या पृष्ठभागावर पिवळट पांढरट लहान गळवासारखे फोड दिसून येतात. सुरूवातीला या फोडांमध्ये पांढरट द्रव पदार्थ दिसतो पण काही काळाने हा द्रव घट्ट होतो. द्रव पदार्थांची सूक्ष्मदर्शकाने तपासणी केल्यास त्यात आ. स्टेडीच्या असंख्य युग्मकपुटीका आढळून येतात. आ. पर्फोरान्स या जातीचे बदराणू सशाच्या लहान आतड्यामध्ये राहतात. आतड्याच्या अस्तरत्वचेवर पांढरे ठिपके किंवा बारीक बारीक गाठी दिसतात. आतड्याचा श्लेष्मशोध (आतड्याच्या अस्तरत्वचेला दाहचुक्त सूज येऊन त्यातून बुळबुळीत पदार्थ बाहेर येणे)होतो. एकाच सशामध्ये बदराणूंच्या वर उल्लेखिलेल्या दोन्ही जातींमुळे रोग होतो व अशा वेळी यकृतामध्ये व आतड्यामध्ये वर उल्लेखिलेल्या विकृती आढळून येतात. रोगी ससा सुस्त बनतो, खातपीत नाही, नाईलाजाने हालचाल करतो, ढेरपोट्या होतो, डोळ्याच्या आतील कडा पिवळ्या होतात, नाकातून शेंब येतो. शेवटी जुलाब सुरू होतात व रक्तक्षय होऊन अशक्तपणा आल्याने दोन आठवड्यांच्या आजारानेतर मरण पावतो.

सर्व पाळीव प्राण्यांमध्ये कोंबड्यांच्या पिलांना बदराणूमुळे होणारा रोग अतितीव्र स्वरूपात होतो. वयस्क कोंबड्यामध्ये रोग चिरकारी (अनेक दिवस राहणाऱ्या) स्वरूपात होतो. आयमेरिया वंशाच्या ८ जातींचे बदराणू कोंबड्यांमध्ये आढळून येत असले, तरी त्यातील आ. टेनेलाआ. नेफॅट्रिक्स यांमुळे पिलांमध्ये नेहमी अतितीव्र स्वरूपाचा, तर आ. ब्रुनेटी  आ. मॅक्झिमा यांमुळेही बऱ्याच वेळा तीव्र स्वरूपाचा आणि आ. ॲसरव्हुलिना आ. भिटीस यांमुळे पिलांमधये सौम्य स्वरूपाचा व वयस्क कोंबड्यांमध्ये चिरकारी स्वरूपाचा आजार होतो. उरलेल्या दोन जातींचे बदराणू रोगकारक म्हणून महत्वाचे नाहीत व त्यांच्यामुळे क्वचित रोगोद्‌भव झाल्याचे आढळते. विशिष्ट जातीचे बदराणू पिलांच्या आतड्याच्या विशिष्ट भागामध्ये राहतात त्यामुळे त्या त्या भागातील आतड्याच्या अधिस्तरातील कोशिकांचा नाश होतो. आ. टेनेलामुळे अंधनालामध्ये, तर आ. नेकॅट्रिक्समुळे लहान आतड्यांमध्ये विकृती उतपन्न होतात. रोगसंसर्ग ६ ते १२ आठवड्यांच्या पिलांमध्ये जास्त प्रमाणात होतो. तथापि ३ आठवड्यांच्या पिलांमध्येही झाल्याचे आढळून येते. रोगकारक बदराणूंच्या युग्मकपुटी जितक्या जास्त प्रमाणात पोटात जातात तितक्या प्रमाणात रोगाची तीव्रता पिलामध्ये दिसून येते. मृत्यूचे प्रमाण कधीकधी १०० % असू शकते. पिलांचे खाणे बंद होते, पंखामध्ये चोच खुपसून पिले गुंगून उभी राहतात, विष्ठा रक्तमिश्रित असते. रक्तस्त्रावामुळे पिले अशक्त होत जाऊन ५ – ६ दिवसांत मरण पावतात. वयस्क कोंबड्यांमध्ये रक्तमिश्रित जुलाब हेच प्रमुश लक्षण दिसते. अंडी घालणाऱ्या कोंबड्या अंडी घालत नाहीत. मृत्यूचे प्रमाण अल्प राहते, मधूनमधून एखादी कोंबडी मरण पावते पण अंड्यांच्या व मांसाच्या उत्पादनात तात्पुरती घट येते. गादी पद्धतीने पाळण्यात आलेल्या कोंबड्याना सकृत्‌दर्शनी वदराणुजन्य रोग होण्याची शक्यता अधिक असते तथापि गादीमधील भुसा कोरडा ठेवल्यास आर्द्रतेच्या अभावी युग्मकपुटीची पुढील बीजाणुपुट अवस्था तयार न झाल्यामुळे बदराणूंचे जीवनचक्र खुंटून रोगोद्‌भव होत नाही असे आढळते.

रोगनिदान : वर उल्लेखिलेल्या निरनिराळ्या जनावरांतील लक्षणांवरून रोगनिदान करणे शक्य असले, तरी सूक्ष्मदर्शकाने रोगी जनावरांच्या-कोंबड्यांच्या-विष्ठेची तपासणी केल्यास बदराणूंच्या युग्मकपुटी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. निरोगी वयस्क जनावरांच्या विष्ठेमध्ये युग्मकपुटी आढळून येत असल्यामुळे १ ग्रॅ. विष्ठेमध्ये ५,००० च्या वर युग्मकपुटी आढळल्यास रोगलक्षणे बदराणूंशी निगडित आहेत, असे समजतात. निरोगी मेंढ्यांच्या लेंड्यांमध्ये कधीकधी हा आकडा १ लाखापर्यंत असू शकतो. तथापि ५०,०००च्या वर युग्मकपुटी आढळल्यास (१ ग्रॅ. विष्ठेमध्ये) रोगलक्षणे बदराणुजन्य असावीत, असे मानण्यास हरकत नाही. याशिवाय मेलेल्या रोग्याच्या आतड्यातील अधिस्तराची ऊतकवैज्ञानिक (अधिस्तराचे छेद घेऊन केलेली) परीक्षा केल्यास बदराणूंच्या जीवनाचक्रातील विविध अवस्था दिसून येतात.

उपचार व प्रतिबंधक उपाय: बदराणुजन्य रोग काही प्रमाणात स्वयंमर्यादित आहे. रोगी जनावराच्या आतड्याच्या आधिस्तरामध्ये बदराणूचे जीवनचक्र पुरे होईतो रोगी जनावर दगावले नाही, व पुन्हा नवीन संसर्ग झाला नाही, तर रोग आपोआप थांबतो. तथापि साथ आल्यावर प्रतिबंधात्मक उपाय व उपचार करणे जरूरीचे असते. सल्फाग्वानिडीन, सल्फामेथाझाइन, सल्फामेराझाइन व सल्फाक्विनोक्झॅलिन इ. अनेक सल्फासुंयगे उपचार व प्रतिबंधात्मक अशा दोन्ही दृष्टींनी परीणामकारक आहेत. सल्फामेझाथीन, सल्फाब्रोमोमेझाथीन ही औषधे दर ७.२ किग्रॅ. वजनाला १ ग्रॅम या प्रमाणात खाद्यामध्ये दिल्यास रोगी बरा होतो. नायट्रोफ्यूराझोन हे औषधही डुकरांच्या पिलांना व कोकरांना खाद्यामधून ०.०४ % प्रमाणात किंवा दर एक किग्रॅ. वजनाला ११ मिग्रॅ. या प्रमाणात ७ दिवस देतात. वासरांना दर एक किग्रॅ  वजनाला ३३ मिग्रॅ. देण्याची जरूरी असते. कोंबड्यांच्या पिलांना सल्फाक्विनोक्झॅलिन खाद्यामध्ये १ ते २ % किंवा पाण्यामध्ये संपृक्त (विरघळण्याचे प्रमाण जास्तीत जास्त असलेल्या) विद्रावाच्या स्वरूपात देतात. मात्र रोगलक्षणे दिसल्याबरोबर त्वरित उपचार सुरू करणे जरूर असते. जनावरांचे गोठे व कोंबड्यांची खुराडी स्वच्छ ठेवणे, गर्दीगर्दीने जनावरे वा कोंबड्या न ठेवणे,  तसेच लहान वयाची व वयस्कर जनावरे, कोंबड्या व कोंबड्यांची पिले एकत्र न ठेवणे इ. प्रतिबंधात्मक उपाय योजतात.

टर्की पक्षी, बदके, गिनी फाउल या पक्ष्यांमध्ये बदराणुजन्य रोग बदराणूंच्या विशिष्ट जातींमुळे होतात आणि पिलांमध्ये ते तीव्र स्वरूपाचे व वयस्क पक्ष्यांमध्ये चिरकारी स्वरूपाचे असतात. रोगनिदान व उपचार कोंबड्यांप्रमाणे करतात.

संदर्भ:  1. Blood, D.C. Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1

            2. Hagan, W. A. Bruner, D. W. The Infections Diseases of Domestic Animals, New York, 1951.

            3. Miller, W.C, Wesh, G. P. Black’s Veterinary Dictionary, London, 1962.

नामदास, ऱा. भा. दीक्षित, श्री. गं.