अल्-मुस्तानसिरिया मदरसा : इस्लाम अध्ययन केंद्र, १३ वे शतक, बगदाद.बगदाद : हे इतिहासप्रसिध्द शहर विद्यमान इराकची राजधानी आहे. लोकसंख्या ३०,००,००० (अंदाज १९७५). ते दक्षिणोत्तर येथे आकृती आहे वाहणाऱ्या  टायग्रिस नदीच्या दोन्ही काठांवर व युफ्रेटिस नदीपासून उत्तरेस सु. ४० किंमी. वर आंतरराष्ट्रीय रेल्वेमार्गावर वसले आहे. तेहरान (इराण) च्या नैऋत्येस ६९२ किमी.वर व बेरूटच्या पूर्वेस ८०५ किमी.वर ते असून याच्या परिसरात प्राचीन मेसोपोटेमियातील अनेक संस्कृतीची –उदा., अगेडी (अक्कड), बॅबिलन, बुर्ज, अकार्कफ इ. केंद्रे होती. टायग्रिसच्या पूर्वेकडील शहरास अल्-रूशाफड म्हणतात. बहुतेक ऐतिहासिक वास्तू याच भागात आहेत. पश्चिमेकडील भागास अल्कर्ख म्हणतात. हे दोन्ही भाग पुलांनी जोडलेले आहेत. इराकमधील बहुतेक सर्व मोठे उद्योगधंदे बगदादमध्ये केंद्रित झाले असून गालिचे, कातडी वस्तू, कापड, तंबाखू, सिमेंट इ. उद्योग तसेच तेलशुध्दीकरण व ॲरॅक हे मद्यपेय गाळण्याचे कारखाने महत्त्वाचे होत. खजूर, धान्य, लोकर, गालिचे आणि इतर पदार्थ यांची ही मोठी बाजारपेठ असून त्यांची निर्यातही केली जाते. रेडिओ व दूरचित्रवाणी यांचे हे देशातील एकमेव केंद्र आहे. अरब देशांतील हे पहिलेच दूरचित्रवाणी केंद्र असून ते १९५६ मध्ये सुरू झाले. सहा वस्तुसंग्रहालये व तीन विद्यापीठे येथे असून रेल्वे, मोटर व विमान या मार्गांनी ते इतर देशांशी जोडलेले आहे.

इतिहास : टायग्रिसच्या पश्चिमकाठी असलेल्या सॅसॅनियन वंशाच्या ताब्यातील बगदाद या खेड्यात अब्बासी खलीफा अल्-मन्सूर याने आपली राजधानी वसविली (इ.स.७६२) व त्यास अल्-मन्सूरिया हे नाव दिले. पुढे⇨हारून अल्-रशीद (कार.७८६-८०९) याने शहरास तटबंदी करून त्याचा औद्योगिक विकास घडवून आणला. त्याचप्रमाणे इस्लामी जगतातील ज्ञानविज्ञान, कलाकौशल्य व उद्योगधंदे यांचे ते केंद्र बनविले. बगदादचा हा सुवर्णकाल म्हणता येईल. या काळात अनेक परदेशी विद्वान, कलावंत इ. बगदादकडे आकृष्ट झाले. पुढे अल्-मामूनने (कार.८१३-३३) येथे एक अकादमी व ग्रंथालय स्थापून जुन्या ग्रीक-इराणी वाङ्मयाचे अरबीत भाषांतर करण्याची व्यवस्था केली. त्यावेळी गालिचे आणि नक्षीदार विटा यांचा बगदादमध्ये मोठा व्यापार चाले. तसेच बगदाद हे त्या काळी बागबगीच्यांचे नगर (मदीनत अस्-सलेम) म्हणून प्रसिध्द होते. अरेबियन नाइटस किंवा धन थाउजंड अँड वन नाइटस (अल्प लय्लह् व लय्लह्) मधील कितीतरी कथा बगदादमध्येच घडतात. हारून अल्-रशीदच्या मृत्यूनंतर (८०९) अब्बासीची राजधानी सु. ५०-६० वर्षे समाराला हलविण्यात आली होती. नवव्या शतकाच्या अखेरीस ती पुन्हा बगदादमध्येच पण टायग्रिसच्या पूर्व काठावर बसविण्यात आली. १०९५ मध्ये त्या भोवती नवीन तटबंदी करण्यात आली. ती एकोणिसाव्या शतकापर्यंत अवशिष्ट होती. चंगिझखानाचा नातू हुलागूखान याने १२५८ मध्ये बगदाद उद्ध्वस्त करून अल्-मुस्तशिम ह्या शेवटच्या अब्बासी खलीफाचा खून केला आणि ही खिलाफत संपुष्टात आणली [⟶अब्बासी खिलाफत]. तैभूरलंगाने या नगराची नासधूस केली. इराणचा पहिला इस्माइलशाह (कार.१५००-१५२४) याने इ. स. १५०८ मध्ये हे शहर काबीज केले. पुढे ऑटोमन सुलतान पहिला सुलेमान (कार.१५२०-६६) याने १५३४ मध्ये प्रथमच ते इराणकडून घेतले. मध्यंतरी इराणचा पहिला शाह अब्बास (कार.१५८७-१६२९) याने ते १६२१ मध्ये जिकंले पण लवकरच तुर्कस्तानच्या चौथ्या मुरादने ते जिंकून ऑटोमन साम्राज्यात समाविष्ट केले. १६३८ पासून पहिल्या  महायुध्दापर्यंत इराकचा भूप्रदेश हा ऑटोमन साम्राज्याचा एक भाग होता. ब्रिटिशांनी १७५५ मध्ये येथे प्रथम प्रवेश करून व्यापाराची वखार उघडली. ब्रिटिशांचे वर्चस्व वाढत जाऊन १९१७ मध्ये त्यांनी हे शहर जिकंले. इराकची राजधानी त्या ठिकाणी वसविण्यात आली (१९२१). अमीर फैझल इब्न हुसेन (कार.१९२१-३३) याचा त्याच साली राजा म्हणून शपथविधी झाला. १९५८ मध्ये अवचित सत्तांतरणाने राजेशाही नष्ट करण्यात येऊन ब्रिगेडीयर कासिमने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. पुढे १९६३ मध्ये त्याच्याविरूध्द पुन्हा अवचित सत्तांतरण होऊन कासिमला मारण्यात आले व बाथ पक्ष सत्तेवर आला. तोच पुढे १९६८ च्या सार्वत्रिक निवडणुकांत यशस्वी झाला.

बगदादच्या परिसरात अनेक ऐतिहासिक अवशेष आढळतात. त्यांत शेकडो थडगी, मशिदी, संरक्षक तटबंदी व तिची भव्य द्वारे, बाजारपेठा, जुने राजवाडे, मनोरे इ. असून हारून अल्-रशीदच्या झुबैदा या पत्नीची मशीद  व अल्-मुस्तशिम याने बांधलेली मशीद या वास्तू प्रेक्षणीय आहेत. तसेच अब्बासी काळातील एक राजवाडा सुस्थितीत आहे. यांशिवाय अल्-मुस्तानसिरिया मदरसा (१२३३) ही वास्तू अवशिष्ट असून त्याचा उपयोग सीमाशुल्क कार्यासाठी केला जातो. संरक्षणासाठी बांधलेल्या भिंतीची मोडतोड झाली असली, तरी तलीस्मन दरवाजा आणि बाब एल्-वस्टानी बाब एल्-मुअझ्झम व बाब एल्-खर्गी हे काही भाग अवशिष्ट आहेत. मिद्हत पाशाने बांधलेला बालेकिल्ला मीर्जानिय व खास्सेकी या जुन्या मशिदींबरोबर अल् काझिमायन या भागातील सुवर्णाच्या घुमटाची आणि अठराव्या शतकात पूर्ण केलेली अदमिय ही प्रसिध्द मशीद आढळते. मुस्लीम कायदेपंडित ⇨अबूहनिफा (६९९-७६७) याचे थडगे व सूफी संत ⇨अब्दुल कादीर  जीलानी (सु. १०७८-११६६) यांची धर्मविषयक संदेश देणारी मशीद या दोन वास्तु अत्यंत पवित्र मानल्या जातात. आधुनिक वास्तूपैकी पहिल्या फैझल राजाचे थडगे, शासकीय विश्रामधाम, नगर सभागृह, संरक्षण खात्याची वास्तू, रिपब्लिकन पॅलेस, अल्-हिक्म विद्यापीठ आणि न्यू इराक वस्तुसंग्रहालय या कलात्मक व भव्य आहेत इराकवरील मंगोल-तुर्की आक्रमणात तसेच पहिल्या व दुसऱ्या महायुध्दात येथील अनेक ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त झाल्या .

संदर्भ : 1. Adams, R.M. Land Behind Baghdad, Chicago, 1965.

          2. Lloyd, Seton, Twin Rivers,New York, 1961. 

          3. Wiet Gaston, Trans, Feller, Seymour, Baghdad Metropolls of the Abbasid Callphate, Okla, 1971.

देशपांडे, सु. र.