बंदोपाध्याय, माणिक : (१९ मे १९०८–३ डिसेंबर १९५६). आधुनिक बंगाली कादंबरीकार व कथाकार बिहारच्या संथाळ परगण्यातील डुमका गावी जन्म व प्राथमिक शिक्षण. खरे नाव प्रबोधचंद्र पण माणिक हे व्यावहारिक नावच लेखक म्हणून त्यांनी वापरले. बाकुंरा येथे मॅट्रीकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर ‘बांकुरा वेस्लियन मिशन कॉलेज’ मध्ये विज्ञानाचे विद्यार्थी म्हणून ते दाखल झाले. तेथून इंटरमीडिअट परीक्षा व नंतर बी.एससी. साठी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अस्थिर व चंचल स्वाभावामुळे त्यांचा हा शिक्षणक्रम अपूर्ण राहिला व त्यांना नोकरीही टिकवता आली नाही. बंगश्री नियतकालिकाच्या कचेरीत त्यांनी दोन वर्षे नोकरी केली. नंतर स्वतंत्रपणे प्रकाशनसंस्था चालविण्याचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. दुसऱ्या महायुध्दासाठी उभारण्यात आलेल्या ‘नॅशनल वॉर फ्रंट’ मध्ये प्रसिध्द अधिकारी म्हणून १९४३ पर्यंत त्यांनी नोकरी केली. याच सुमारास ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ मध्ये ते सामील झाले. संपूर्णपणे लेखनावरच ते आपली उपजीविका करत.
जननी (१९३५) ही त्यांची पहिली कादंबरी तथापि कथालेखक म्हणून ते १९२८ सालापासूनच वाचकांना परिचित होते. बिचित्रा या नियतकालिकात त्यांची ‘अतसी मामी’ (१९२८) ही कथा प्रकाशित झाली आणि बंगाली प्रकाशकांना या लेखकाचे सामर्थ्य जाणवले. पद्मानदीर माझी (१९३६) व पुतूल नाचेर इतिकथा (१९३६) या कादंबऱ्यांनी माणिक बंदोपाध्यायांना अफाट लोकप्रियता लाभली. यांपैकी पहिल्या कादंबरीत त्यांनी ग्रामीण बंगालमधील नावाड्याच्या जीवनाचे अविस्मरणीय चित्रण केले आहे आणि दुसरीत ग्रामीण विभागात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या एका शहरावासी डॉक्टरचे प्रश्न त्यांनी साकार केले आहेत. निसर्ग, मानव, सुधारणा, बुध्दीवाद व अंधश्रध्दा या प्रवृत्तींचे अत्यंत व्यामिश्र चिंतन या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये आहे. याशिवाय दिबारत्रीर काव्य (१९३५), अमृतस्य पुत्रा : (१९३८), शहरतली (दोन भाग, १९४०-४१) या त्यांच्या कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय आहेत. १९४३ साली माणिक बंदोपाध्याय कम्युनिस्ट पार्टीत गेले व त्यांच्या लेखनाला नवी परिमाणे लाभली. प्रथम पर्वातील उदासी, निरशावाद, अगतिकता इ. अनुभूतींना द्वंद्वांत्मक भौतिकवादाची बैठक प्राप्त झाली. सोनार चेये दामी (दोन भाग, १९५१-५२, आरोग्य (१९५३), हरफ (१९५४), इलूद नदी सबूज वान (१९५६), मसूल (१९५६) इ. त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या या द्वितीय पर्वातील होत. याशिवाय अतसी मामी ओ अन्यान्य गल्प (१९३५), प्रागैतिहासिक (१९३७), समुद्रेर स्वाद (१९४३), आम काल परसूर गल्प (१९४६), माटीर मसूल (१९४८) इ. त्यांचे कथासंग्रह महत्त्वाचे आहेत. लेखकेर कथा (१९५७) हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले.
माणिक बंदोपाध्यायांना प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक विशाल ग्रंथ वाटत असे. त्यामुळे व्यक्तीच्या जाणीव-नेणिवेचे अनेक स्तर उलगडून त्यांनी बंगाली भाषेत काही अविस्मरणीय पात्रे निर्माण केली आहेत. त्यांच्या स्वभावचित्रणकौशल्याला अक्षरशः तोड नाही. लेखकाचे व्यक्तिगत आयुष्य फार खडतर व दुःखमय होते पण तरीही या अनुभवांमुळे त्यांच्या लेखनात कधीही पूर्वग्रहदूषितता आली नाही. त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी फार विशाल व सर्वसमावेशक असल्यामुळे जीवनातील चैतन्य, विकृती, प्रेम, सौंदर्य, राग-द्वेष वगैरे सर्वच बाजूकडे ते वस्तुनिष्ठपणे बघू शकतात व तितक्याच प्रांजळपणे त्यांचे चित्रण करू शकतात. पोकळ भावविवशता व फाजील रूढिप्रियता यांची त्यांना अतिशय चीड होती. विज्ञाननिष्ठ परखड विश्लेषण आणि मानवताधिष्ठित गांभीर्य हे माणिक बंदोपाध्यायांच्या लेखणीचे अजोड गुणधर्म आहेत. आजच्या अनेक प्रथितयश लेखकांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, ही त्यांच्या लेखनकौशल्याची पावतीच होय. लोकप्रिय असूनही दर्जेदार लेखन करणार हा लेखक म्हणजे बंगाली कादंबरीविश्वातील एक अग्रगण्य कलावंत आहे.
माणिक बंदोपाध्याय हे एक कलंदर व्यक्तिमत्व होते आणि त्याचे परिणाम त्यांना वैयक्तीक व साहित्यिक जीवनात भोगावे लागले. इहलौकिक मानसन्मान व यश न मिळवूनही केवळ स्वतःच्या लेखन सामर्थ्यावर भारतीय साहित्यातच नव्हे तर जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळविणारे ते एक श्रेष्ठ कांदबरीकार होत. त्यांनी मानवी जीवन तळापासून ढवळून काढले व आदिम वासना,नियती व बुध्दिवादी सुधारणा यांचा संघर्षमूलक पट कौशल्याने उलगडून दाखविला.
त्यांची पद्मानदीर माझी ही कादंबरी इंग्रजीत हिरेंद्रनाथ मुखर्जी यांनी बोटमन ऑफ पद्मा (१९४८) या शीर्षकाने हिंदीत प्रबोध कुमार मजुमदार यांनी पद्मा नदी का माझी (१९५७) या शीर्षकाने अनुवादीत केली. कन्नड व तमिळमध्येही तिचे अनुवाद झाले.
पुतूल नाजेर इतिकथा ही कादंबरी इंग्रजीत सचिंद्रलाल घोष यांनी द पपेट्स टेल (१९६८) या शीर्षकाने, हिंदीत प्रबोधकुमार मजुमदार यांनी कठपुतलियों का इतिहास (१९५८) या शीर्षकाने, मराठीत अशोक शहाणे यांनी साईखेडियांच्या खेळाची गोष्ट (१९९७) या शीर्षकाने अनुवादीत केली. गुजराती व तमिळमध्येही तिचे अनुवाद झाले. त्यांच्या प्रागैतिहासिक या कथासंग्रहाचा विविध भाषांतरकारांनी इंग्रजीत भाषांतरित केलेल्या कथांचा संग्रह देवीप्रसाद चट्टोपाध्याय (चतर्जी) यांनी प्रायमेव्हल अँड अदर स्टोरिज या शीर्षकाने संपादित केला आहे. (१९५८) कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : Mitra, Sarojmohan, Manik Bandyopadhyay, New Delhi, 1974.
आलासे, वीणा
“