गंगोपाध्याय, तारकनाथ : (३१ ऑक्टोबर १८४३–२२ सप्टेंबर १८९१). बंगालीतील पहिले वास्तववादी सामाजिक कादंबरीकlर. त्यांचा जन्म सध्याच्या जशोहर (जेसोर) जिल्ह्यातील बाँगआछडा ह्याखेड्यात, ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे माध्यमिक व उच्च शिक्षण कलकत्यास झाले. वैद्यकातील एल् . एम्. एस् . ही पदवी संपादन केल्यावर त्यांनी सरकारी आरोग्य खात्यात काम केले. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना बांगला देशात अनेक ठिकाणी प्रवास करावा लागे. त्यामुळे समाजाच्या भिन्न भिन्न थरांतील लोकांशी त्यांचा निकट संबंध येई. ह्या अनुभवांचा तारकनाथांनी आपल्या कादंबऱ्यांत कुशलतेने उपयोग करून घेतला आहे.

तारकनाथांनी पाच कादंबऱ्या व काही कथा लिहिल्या आहेत. स्वर्णलता (१८७४) ही त्यांची पहिली व फार गाजलेली कादंबरी. बंकिमचंद्र चतर्जी ह्यांच्या ध्येयवादी, पण अतिरिक्त काव्यमय आणि अद्‌भुतरम्य कादंबऱ्यांनी ज्या काळात वाचकांना भारून टाकले होते, त्या काळात ह्या कादंबरीने आपल्या रचनावैशिष्ट्याने बंगाली कादंबरीक्षेत्रात एका नवीन युगाचा प्रारंभ केला. बंगाली कादंबरीकार हळूहळू अद्‌भुतरम्यतेचा त्याग करून वास्तवतेकडे वळू लागले. स्वर्णलता  ही बंगाली कादंबरी-वाङ्मयातील उत्कृष्ट कृती मानली जाते. मराठीत का. र. मित्र यांनी तिचा लीला (१९०९) ह्या नावाने अनुवादही केलेला आहे.

बहुजनांविषयीच्या अपार कणवेतून त्यांनी आपल्या दर्जेदार कादंबऱ्या लिहिल्यामुळे त्या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. सहजसुदंर भाषा, हुबेहूब वातावरणनिर्मिती, सूक्ष्म मनोव्यापारदर्शन, वास्तव स्वभावरेखन, दैनंदिन जीवनातील नर्मविनोदात्मक संवाद आणि प्रापंचिक समस्यांचा सहानुभवी अंत:करणाने केलेला विचार ह्या सर्व गोष्टींचा वाचकांच्या मनावर खोल ठसा उमटतो. कादंबरीकार म्हणून तारकनाथांना अफाट कीर्ती लाभली.

खानोलकर, गं. दे.