ताराशंकर बंदोपाध्यायबंदोपाध्याय, ताराशंकर : (२३ जुलै १८९८–१४ सप्टेंबर १९७१). बंगाली साहित्याच्या आधुनिक युगातील भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारविजेते, श्रेष्ठ कांदबरीकार कथाकार. वीरभूम जिल्ह्यातील लाबपुर येथे जन्म व सुरूवातीचे शिक्षण. शांलात परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कलकत्त्याच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये व साऊथ सबर्बन कॉलेजमध्ये त्यांनी काही काळ शिक्षण घेतले पण राजकीय चळवळीतील सक्रिय भागामुळे व प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. जन्मभर लेखन हाच व्यवसाय त्यांनी केला. १९४२ मध्ये ‘अँटी-फासिस्ट रायटर्स अँड आर्टिस्ट्स असोसिएशन’ चे ते अध्यक्ष होते. १९५२ मध्ये ते विधानसभेचे सदस्य झाले. १९५७ मध्ये चीन सरकारच्या नियंत्रणावरून त्यांनी चीनला भेट दिली. १९५८मध्ये ‘ॲफ्रो-एशियन रायटर्स कॉनफरन्स’च्या मंडळावर असताना त्यांनी रशियाचाही दौरा केला. १९४२ साली बीरभूम जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद १९४४ मध्ये कानपूर येथे भरलेल्या ‘प्रवासी बांगला साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद व अखेर १९६९ मध्ये ‘वंगीय साहित्य परिषदे’चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९७१ मध्ये विश्व-भारती विद्यापीठात ‘नृपेंद्रचंद्र मेमोरियल’ व्याख्यानमालेचे व्याख्याते आणि त्याच वर्षी कलकत्ता विद्यापीठांच्या निमंत्रणावरून ‘डी. एल् . रॉय मेमोरियल’ व्याख्यानमाला त्यांनी गुंफली. १९६८ साली कलकत्ता व जादवपूर या विद्यापीठांनी त्यांना सन्मान्य डी.लिट्.देऊन त्यांचा गौरव केला. कलकत्ता येथे ते निधन पावले.

ग्रामीण जीवनाच्या डोळस आकलनातूनच ताराशंकरांचे व्यक्तिमत्व घडले. लहानपणी बाऊल, वैष्णव व शाक्त पंथीय गायकांच्या गीतांचा त्यांच्या मनावर खोल संस्कार झाला. ग्रामीण विभागात प्रचलित असलेल्या दंतकथा, भूतकथा, स्थानिक देवदेवतांच्या कथा हीच ताराशंकरांच्या साहित्याची प्रमुख सामग्री होय. ते खऱ्या अर्थी बंगालच्या मातीत रूजलेले लेखक आहेत त्यांच्या अभिव्यक्तिवर कुठलेही विदेशी संस्कार नाहीत. ताराशंकर प्रथम कवी व नंतर कथाकार म्हणून साहित्यप्रातांत उतरले. त्रिपत्र हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९२६ साली प्रसिध्द झाला. पहिल्यावहिल्या कथा कल्लोल, कालि ओ कलम, उपासना, धूपछाया इ. नियतकालिकांमधून प्रसिध्द होत होत्या. कथांमधील सुप्त बीजे उचलून ताराशंकरांनी त्यांच्या कादबंऱ्या लिहिल्या. चैताली धूर्णि (१९३२) ही त्यांची पहिली कादंबरी होय. धातृदेवता (१९३९), गणदेवता (१९४३) व पंचग्राम (१९४४) ही कादंबरीयत्री (ट्रिलॉजी) ताराशंकरांची महाकवीसदृश प्रतिभा व चौफेर आकलन दर्शविते. सरंजामशाहीतील दडपशाही, अत्याचार, अंधविश्वास, रूढिग्रस्तता यांचे यथासांग चित्रण करीत असतानाच ताराशंकर मावळत्या जमीनदारांच्या वंशजांचे द्विधा व केवलिवाणे अस्तित्व साकार करतात आणि अशा समांतर बांधणीवर पाप-पुण्याचे,सुष्ट-दुष्टांचे, जुन्या-नव्यांचे प्रश्न मानवी जीवनातील संमिश्र जटिलतेसह दृश्यरूप करतात. हासुली बाँकेर उपकथा (१९५१) यासारख्या कादंबरीमध्ये एक ग्रामीन दंतकथा रूपकात्मकतेने त्यांनी वर्णिलेली आहे. या कादंबरीत जमीनदार व जमीन कसणारी कुळे यांच्या परस्परसंबंधातील ताण, १९४२ सालच्या भयानक वादळामुळे उदध्वस्त झालेले ग्रामीण जीवन व अखेर गरिबीमुळे पुन्हा सत्ताधारी पक्षाला शरण जाणारे श्रमिक शेतकरी असा तीन पदरी गोफ विणून ताराशंकरांनी एक दंतकथेला भूतकाळ व वर्तमान काळ या दोहोंमध्ये खेळविले आहे व त्याद्वारे दंतकथेला विस्तृत परिमाणे प्राप्त करून दिली आहेत. नागिणी कव्यार काहिनी (१९५२) या कांदबरीत नाग व मांत्रिक यांच्या पारंपारिक संबंधामधील संघर्ष व त्यात धडपडणारी अंधविश्वासू ग्रामीण जनता यांचे चित्रण आहे. साप,स्त्री व मृत्यू यांचे या कादंबरीतील विचित्र प्रतिमामूलक साधर्म्य ताराशंकरांच्या लेखणीला धार आणते. आरोग्यनिकेतन (१९५३) या कादंबरीत शुश्रूषेच्या पध्दती हेतू व मानवी जीवनातील अभिलाषा यांचे परस्पर ताण दृग्गोचर होतात. राजकमल (१९३५) कवि (१९४४) यांसारख्या कादंबऱ्यांमध्ये कलांवताचे जीवन, त्याच्या सौंदर्यपिपासू वृत्ताची अखंड तृष्णा आणि सामाजिक नीतिमूल्ये यांमधील संघर्ष काव्यात्मकतेने रंगविलेला आहे.

गणदेवता या कांदबरीत ताराशंकरांनी शोषक व शोषित वर्गांमधील परस्पर कलहाची मूलबीजे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जनतारूपी गणदेवते चा कोप झाला तर समाज, न्याय, प्रतिष्ठा इत्यादींना कसा सुरूंग लागतो, ते समर्थपणे दर्शविण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीची न्यायव्यवस्था व पक्षपातीपणा यांवर विदारक प्रकाश टाकला आहे. कामगारवर्गाचा विद्रोह दर्शविणारी ही कादंबरी माणसामाणसांमधील चिवट व कोमल भावबंधदेखील तितक्याच कुशलतेने उलगडून दाखविते. शहरांमधील औद्योगीकणामुळे गावकऱ्यांना शहरांची ओढ लागते व परिणामी अगोदरच खिळखिळी झालेली ग्रामीण अर्थव्यवस्था आणखीच विस्कळीत होते. या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर ताराशंकरांनी आपमतलबी श्रीमंत वर्गाची कारस्थाने व मध्यम वर्गीयांची ससेहोलपट दाखविली आहे. ताराशंकराचे व्यक्तिगत आदर्श व त्यांच्या वाङ्ममयीन निष्ठा यांचा मनोहर साक्षात्कार म्हणजे गणदेवता. विद्रोहाची कारणे व परिणाम ग्रामीण जीवनाच्या विशाल पटभूमीवर तटस्थपणे चित्रित केलेले बघताना वाचकाला ताराशंकराचे द्रष्टेपण जाणवते.

छलनामगी (१९३७) हा ताराशंकराचा पहिला कथासंग्रह याशिवाय जलसाघर (१९३८), रसकली (१९३९), हारानो सूर (१९४५), कामधेनू (१९४९), चिरंतनी (१९६२), जया (१९६८) इ. त्याचे कथासंग्रह उल्लेखनीय आहेत. कादंबऱ्यांना नाट्यरूप देऊन तयार झालेली कवि (१९५७), आरोग्यनिकेतन (९१६८) ही त्यांची नाटके रंगभूमीवर गाजली. याशिवाय कालिंदी (१९४२), दुईपुरूष (९१४३), जुगविप्लव (१९५१) इ. त्यांची स्वतंत्र नाटकेही महत्त्वाची आहेत. याखेरीज साहित्येर सत्य (१९६१) हा साहित्यचर्चात्मक दीर्घ निबंध व आमार साहित्य जीवन (१९६२) या आत्मचरित्रात्मक आठवणी ताराशंकरांचे समृध्द साहित्यिक व्यक्तिमत्व  अधिक स्पष्ट करतात. शताब्दीर मृत्यू (१९७१) ही त्यांची शेवटची कादंबरी त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली.


स्वातंत्र्यसन्मुख भारताच्या ग्रामीण विभागातील आर्थिक विस्कळित पणा, परंपरा व वर्तमान यांचे  वास्तव भान आणि तुर्कातीत मानवी जीवनविषयक प्रश्नांची सखोल सहानुभूतिपूर्वक जाण, ही ताराशंकराच्या लेखणीची वैशिष्ट्ये होत. अनुभवाचा अस्सलपणा हेच त्यांच्या कलाकृत्रिचे खरे मूल्य आहे. एरवी भाषाशैली आणि सुबक मांडणी त्यांना कधीही साधली नाही. विद्रोही व प्रगतिवादी नायक रंगविलेले असले, तरी ताराशंकरांना परंपरेबद्दल जास्त सहानुभूती दिसते. नागरी जीवन व औद्योगीकरण त्यांच्या कादंबऱ्यांत फारसे आढळत नाही. ताराशंकरांनी त्यांच्या वेळच्या आधुनिक काळाचीच नव्हे. तर भविष्य काळाची पावलेदेखील अचूकपणे हेरली व त्यानुसार आर्थिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेऊन ग्रामीण जीवनातील उलाढालीचे तलस्पर्शी व वस्तुनिष्ठ चित्रण केले. याच कारणामुळे त्यांच्या कांदबऱ्यांना महाकाव्याची परिमाणे लाभली. स्वतःच्या काळाचे योग्य भान, भविष्याचा अंदाज घेऊ शकणारे द्रष्टेपण, ग्रामीण जीवनाचा अस्सल अनुभव व परखड मानवतावादी भूमिका या गुणांमुळे ताराशंकर हे बंगाली भाषेतील एक श्रेष्ठ वास्तववादी लेखक गणले जातात.

ताराशंकर यांनी १९४७ साली कलकत्ता विद्यापीठातर्फे ‘शरद मेमोरियल’ पदक १९५५ साली पश्चिम बंगाल सरकारतर्फे ‘रवींद्र मेमोरियल’ पारितोषिक १९५६ मध्ये आरोग्यनिकेतनला  साहित्य अकादेमीचा पुरस्कार, १९६३ मध्ये ‘शिशिरकुमार’ पारितोषिक व १९६७ मध्ये गणदेवतास भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. भारत सरकारने त्यांना १९६२ मध्ये ‘पद्मश्री’ व १९६८ मध्ये ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या गणदेवता या गाजलेल्या कादंबरीचे इंग्रजीत लीला राय (१९६९) हिंदीत हंसकुमार तिवारी (१९६७) व मराठीत इंदुमती शेवडे (१९७३) यांनी गणदेवता या शीर्षकानेच अनुवाद केले आहेत. आरोग्यनिकेतनचेही हिंदीत हंसकुमार तिवारी (१९५७) मराठीत श्रीपाद जोशी (१९६५) तेलुगूत जोनलगडू सत्यनारायणमूर्ती (१९७२) गुजरातीत रमणीक मेघाणी (१९६०) मलयाळम्मध्ये निलीन अब्राहम (१९६१) पंजाबीत अमर भारती (१९५९) व तमिळमध्ये टी.एन.कुमारस्वामी (१९७२) यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या इतर कादंबऱ्यांचेही इंग्रजीत  व इतर भारतीय भाषांत अनुवाद झालेले आहेत. मराठीत त्यांच्या कवि ह्या कादंबरीचा अनुवाद अरूणा नगरकर यांनी केला आहे (१९७२).

संदर्भ : Mahasveta Devi, Tarasankar  Bandyopadhyay, New Delhi, 1975.

आलासे, वीणा