बंदिस्त न्यायचौकशी : (ट्रायल इन कॅमेरा) न्यायदानाचे काम जाहीर रीतीने होणे आवश्यक आहे, असा एक संकेत न्यायदानाच्या बाबतीत आहे. कारण न्यायदान जाहीर रीतीने झाले की ते लोकांसमक्ष होते आणि न्यायधीश न्यायदानाच्या कामात निःपक्षपातीपणे वागतील असा विश्वास निर्माण होतो. असे असल्यामुळे न्यायदानाचे काम चालू असताना न्यायालयात कोणालाही प्रवेश मिळतो. पण काही प्रकारचे दावे चालविताना त्यांतील पक्षकारांच्या दृष्टीने न्यायालयाचे दरवाजे सर्वांना खुले ठेवणे इष्ट नसते. अशा वेळी न्यायालयातून त्या दाव्यांतील पक्षकार व त्यांचे अधिवक्ते यांना वगळून इतरांना न्यायालयाच्या बाहेर जाण्याचा आदेश देण्याचा अधिकार न्यायाधीशाला आहे. अशा वेळी जी चौकशी होते, ती बंदिस्त न्यायचौकशी समजली जाते. ‘कॅमेरा’ या शब्दाचा अर्थ ‘न्यायाधीशांची खोली’ असा आहे. ज्यावेळी एखाद्या दाव्याची सुनावणी न्यायाधीशाच्या खोलीत किंवा न्यायालयात होते व पक्षकार आणि त्यांचे अधिवक्ते यांच्याशिवाय इतरांना न्यायालयात प्रवेश मिळत नाही, तेव्हा ती बंदिस्त न्यायचौकशी होय. असल्या प्रकारची चौकशी करणे आवश्यक असते अशी काही कायद्यांतच तरतूद असते. उदा.,, लहान मुलांसंबंधीचे दावे. इतर कायद्यांत असल्या प्रकारची चौकशी करण्याचा अधिकार न्यायाधीशाला दिलेला असतो. उदा.,, विवाहविषयक कायदे. न्यायाधीशाला इष्ट वाटले किंवा पक्षकारांनी त्याप्रमाणे विनंती केली, तर ती चौकशी बंदिस्त न्यायचौकशीच्या पध्दतीने होते. या प्रकारची चौकशी बलात्संभोग, विवाहविच्छेद वगैरे दाव्यांत होऊ शकते. बंदिस्त न्यायचौकशी दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या दाव्यांत होऊ शकते.
पहा : न्यायचौकशी.
टोपे, त्र्यं. कृ.