इन्स ऑफ कोर्ट : इंग्‍लंडमधील लिंकन्स इन, इनर टेंपल, मिड्ल टेंपल व ग्रेज इन या चार विधिसंस्थांना देण्यात आलेले संयुक्त नाव. तेराव्या किंवा चौदाव्या शतकापासून या संस्था अस्तित्वात असल्याचे दिसून येते. पूर्वी ज्या इमारतींत विधिशाळा होत्या, त्या इमारतींवरून या संस्थांना ही नावे पडली आहेत. कायद्याचे विद्यार्थी आपापले संघ स्थापून खाणावळीतून राहात असत व नामांकित वकिलांकडे उमेदवार म्हणून काम करीत. तेथूनच इन्सचा उगम झाला असावा. आता या संस्था क्लबच्या स्वरूपात अस्तित्वात आहेत. तरीही वकिलीच्या व्यवसायातील प्रवेशावर त्यांचे नियंत्रण असते. कायद्याच्या उमेदवारांना या चार संस्थांपैकी कोणत्या तरी एका संस्थेचा आधार घेतल्याशिवाय बॅरिस्टर होता येत नाही.

या चार संस्थांनी मिळून १८५२ साली विधिशिक्षण मंडळ स्थापले. प्रत्येक इनमधून पाच असे मिळून २० आसनस्थ (बेंचर्स) या मंडळात आहेत. या मंडळामार्फत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते. धंद्यात प्रवेश मिळण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याने सत्रभाग पूर्ण करणे व परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. संस्थेने ठरविलेल्या किमान भोजनप्रसंगी उपस्थित राहणे ही सत्रभाग पूर्ण करण्याची पद्धत आहे. या दोन अटींमध्ये पौर्वापर्यसंबंध मात्र नाही. शिक्षणमंडळाच्या व्याख्यानांना हजर असलेच पाहिजे असा दंडक नाही. घरी अभ्यास करूनही परीक्षेस बसता येते.

या इन्समध्ये तीन वर्ग आहेत : (१) विद्यार्थी (२) बॅरिस्टर (३) आसनस्थ. विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर बॅरिस्टर म्हणून प्रशस्तिपत्रक देणे आणि सभासदांमध्ये शिस्त राखणे हे आसनस्थांचे काम होय. आसनस्थांना बॅरिस्टरची सनद रद्द करता येते, तसेच आसनस्थ सभासदांपैकी कोणासही काढून टाकता येते पण त्यासाठी योग्य कारणे पाहिजेत. अशा निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयाकडे दाद मागता येते.

विद्यार्थ्यास संस्थेत प्रवेश देण्यापूर्वी त्याने शिक्षण मंडळाने ठरविलेली परीक्षा उत्तीर्ण झाले पाहिजे. उद्योगधंदा करणाऱ्या इसमास अथवा सॉलिसिटरला बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही.

कवळेकर, सुशील