नष्टशेष: (सॅल्व्हेज). नष्टशेष वस्तू किंवा नष्टशेष शोधन शुल्क. समुद्रावरील संकटग्रस्त जहाज किंवा जहाजी माल वाचविणाऱ्यास माल किंवा मोबदला देण्याची तरतूद सागरी विधीत आहे. हा मोबदला तेव्हाच देण्यात येतो, जेव्हा वाचविणाऱ्यावर संकटग्रस्त जहाजासंबंधी कोठलीही कायदेशीर जबाबदारी टाकलेली नसते. त्याच्या कार्याच्या परिणामस्वरूप जरी येणारे संकट टळले, तरी सामान्यतः त्याची मोबदल्याची मागणी संमत होऊ शकते. माल वाचविण्याकरिता जो काही योग्य खर्च झाला असेल, त्याचाही समावेश त्याच्या मोबदल्यात असतो.

सागरी नष्टशेषचा नियम संकटात सापडलेले जहाज किंवा माल यालाच साधारणतः लागू असतो. जमिनीवरील मालास तो लागू नसतो. तसेच गोदीतील किंवा किनाऱ्यावरील जहाजाबद्दल नष्टशेषाचा नियम लागू नाही. सागरी संकट प्रत्यक्ष असले पाहिजे काल्पनिक किंवा शक्यता असणारे असू नये.

अमेरिकेतील मुक्त समुद्र त्याचप्रमाणे नौकानयनास योग्य असणाऱ्या नद्या व तळी यालाही नष्टशेषाचा नियम लागू आहे. ब्रिटनमध्ये नष्टशेष मुक्त समुद्रावरील कृत्तीस देण्यात येत असला, तरी विमानाबद्दलही अशा प्रकारचा मोबदला देण्यास हल्ली सुरुवात झाली आहे.

मोबदला ठरविताना जहाजाची व वाचविलेल्या मालाची किंमत, झालेला खर्च व पतकरलेला धोका लक्षात घेण्यात येतो. न्यायालय साधारणतः ठरलेल्या प्रमाणात मालक, नौकाधिपती व वाचविलेल्या जहाजावरील कर्मचारी यांच्यात नष्टशेषची विभागणी करते. सरकारने खास योजलेल्या जहाजावरील कप्तानाला आणि कर्मचारी वर्गाला नष्टशेषची रक्कम देण्यात येत नाही.

मुक्त करणारा हा संकटमुक्त मालमत्तेचा मालक बनतो, हा साधारणतः असलेला समज चुकीचा आहे. खरा मालक नष्टशेष शुल्क देऊन केव्हाही आपली मालमत्ता मागू शकतो. असे असले तरी संकटमुक्त मालावर मुक्त करणाराचा सागरी बोजा असतो. मोबदल्याचे पैसे वसूल झाल्याशिवाय तो माल त्याने परत करण्याची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे जो मालक आपली मालमत्ता परत मागत नाही, त्याला नष्टशेष मोबदल्याबद्दल जबाबदार धरले जात नाही.

खोडवे, अच्युत