वादक्रय : (चॅम्पर्टी). कराराचा एक प्रकार. जी मिळकत दाव्याचा विषय आहे, अशा मिळकतीमध्ये काही हिस्सा मिळविण्यासाठी दाव्यात कोणत्याही प्रकारचा हितसंबंध नसलेल्या तिऱ्हाईत व्यक्तीने त्या दाव्यातील पक्षकाराबरोबर पैशाची अगर अन्य स्वरूपाची मदत करण्याच्या कराराला ‘वादक्रय’ असे म्हणतात.

वादक्रय करार हा फक्त दिवाणी बाबतीतच होऊ शकतो फौजदारी बाबतीत नाही. वादक्रय व्यवहारामधील करारासंबंधात इंग्लिश विधीमधील ‘मेन्टिनन्स’ व ‘चॅम्पर्टी’ या संज्ञांस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. इंग्लिश विधीमध्ये या दोन्ही संज्ञांचा उल्लेख अनेक वेळा एकत्रपणे योजण्यात येतो. मेन्टिनन्सचा भारतात जो पोटगी असा अर्थ अभिप्रेत आहे, तो तेथे नाही. मेन्टिनन्स म्हणजे पाठींबा किंवा पाठबळ दर्शविणे. ज्या दाव्यात वादविषयाशी काहीही संबंध नसताना त्या वादविषयातून उद्‌भवणाऱ्या दाव्याला पाठींबा अथवा पाठबळ दिले, तर तसे करणारी व्यक्ती गुन्हेगार ठरते. पाठिंबा अथवा पाठबळ देताना काही लाभ व्हावा अशी अपेक्षा बाळगून व्यक्तीने जर करार केला, तर तो वादक्रय करार होतो. इंग्लिश विधीमध्ये वादक्रय करार हा कॉमन लॉ तत्त्वाच्या विरुद्ध असल्यामुळे अशा तऱ्हेचा करार अवैध समजला जातो. शिवाय वादक्रय करार हा सामाजिक नीतिमत्तेला धरून नसल्यामुळे कज्जेदलालांचे फावते, असे इंग्लिश विधी मानतो.

भारतीय संविदा कायदा एखाद्या कराराचे स्वरूप वादक्रय करारासारखे आहे एवढ्याच कारणावरून तो अवैध मानत नाही, तर अशा कराराचा परिणाम हा सार्वजनिक हिताविरुद्ध असल्याचे आढळते, तरच असा वादक्रय व्यवहार अवैध मानला जातो. त्याचप्रमाणे असा करार हा जुगारी स्वरूपाचा, पिळवणूक करणारा, अतार्किक किंवा केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच प्रेरित होऊन केला असेल, तरच तो अवैध ठरविला जातो. एखादा दावा चालविण्यासाठी दिलेला पैसा परत मागण्याच्या दात्याच्या हक्कास भारतीय संविदा कायद्याने मान्यता दिली आहे. ज्या वादक्रय करारात दाव्यासाठी दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात दाव्याच्या मिळकतीत, दिलेल्या पैशाच्या मानाने, बराच मोठा मोबदला अंतर्भूत असेल, तर असा करार अवैध मानला जातो परंतु दाव्याच्या मिळकतीस योग्य प्रमाणात मोबदला मिळणार असेल, तर मात्र अशा करारास विधिमान्यता दिली जाते. दाव्याची अंमलबावणी लांबणीवर टाकण्याच्या हेतूने प्रेरित होऊन केलेला करारही अवैध समजला जातो. वादक्रय करार हा वैध किंवा अवैध आहे, हे ठरविण्यासाठी असा करार करणाऱ्या व्यक्तीचा हेतू काय होता, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते. असा हेतू जर सदोष किंवा फक्त दाव्यातील मिळकतीत हिस्सा मिळविण्यासाठीच असेल तर अशा हेतूने प्रेरित झालेला करार हा अवैध समजला जातो. केवळ दाव्यातील पक्षकारास मदत करण्याच्या हेतूनेच प्रेरित होऊन करार केल्याचे आढळल्यास सदरहू करार वैध समजला जातो. अशा तऱ्हेचा करार हा वैध आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्या पक्षाचे म्हणणे तसे असेल, त्यावर असते. एखाद्या वकिलाने दावा जिंकल्यानंतर त्याच्या पक्षकाराने केलेला खर्च व वकील फी ह्यांपेक्षा जास्त रक्कम मिळण्याबाबतचा करार केला असेल, तर असा करारही अवैध वादक्रयाचा व्यवहार समजला जातो.

नाईक, सु. व.