कपट : फसविण्याच्या इच्छेने केलेले कृत्य. अशा कृत्याने व्यक्तिगत अयोग्य फायदा मिळतो किंवा इतराला अन्याय्य नुकसान पोहोचतेम्हणून ते समाजहिताच्या विरुद्ध समजण्यात येते. भारतीय दंडसंहितेत कपट या शब्दाची व्याख्या देण्यात आलेली नाही किंवा कपट हा स्वतंत्र गुन्हाही मानण्यात आलेला नाही. मात्र अनेक गुन्ह्यांत कपट हा आवश्यक भाग मानण्यात आला आहे. उदा.,अफरातफर,तोतयेगिरी,बनावट कागदपत्र, बनावट चलन इ. कृत्ये गुन्ह्यात मोडण्याकरिता कपटाची आवश्यकता आहे. कपटाने केलेले कृत्य फौजदारी कायद्याप्रमाणे गुन्ह्यात व दिवाणी कायद्याप्रमाणे अपकृत्यात मोडते.

कपटाचे कृत्य गुन्ह्यात मोडण्याकरिता फसवणूक किंवा फसविण्याची इच्छा किंवा काही प्रसंगी नुसती गुप्तताही पुरेशी होते. तसेच अशा कपटाने किंवा गुप्ततेने प्रत्यक्ष इजा किंवा संभाव्य इजा किंवा प्रत्यक्ष किंवा संभाव्य इजेचा धोका निर्माण करण्याची इच्छा असणे,आवश्यक असते. स्वतःचा फायद करून घेण्याचे किंवा दुसर्‍यास नुकसान पोहोचविण्याचे उद्दिष्ट सफल करण्याकरिता कपटाचा साधन म्हणून उपयोग करण्यात येतो. सत्य माहीत असताना न मिळणारा फायदा कपटी माणसास कपटाने मिळाला असल्यास गुन्हेगारी उद्दिष्टाकरिता कपट केले आहे,असे समजण्यात येतेपण प्रसंगी केवळ सर्वसाधारण फसविण्याची इच्छाही व्यक्तीस दोषी व शिक्षापात्र ठरविण्यास पुरेशी होते.

अपकृत्य : कपटाच्या अपकृत्याचे दोन प्रकार आहेत: ( अ) कपटव ( आ) हानिकारक खोटेपणा.

(अ) कपट:वादीस फसविणार्‍या या दुष्कृतीमुळे वादी चुकीचे कृत्य करून स्वतःस हानी करून घेतो.तथ्याचा खोटाव्यपदेशन ( रेप्रेझेंटशन),खोटेपणाची जाणीव असताना असले व्यपदेशन करणे, वादीने किंवा वादीसह एखाद्या गटाने याप्रमाणे कृती करण्याचा उद्देश प्रतिवादीने बाळगणे व व्यपदेशनावर विश्वास ठेवून कृती केल्यामुळे वादीचे नुकसान होणे,या चार गोष्टींनी कपटाची दुष्कृती कारवाईयोग्य ठरते.ज्यांना कपटाने कमी-अधिक फायदा झालेला असतो आणि जे कपटास मदत किंवा प्रवृत्त करतात किंवा ज्यांनी कपट केले असेल,ते सर्व नुकसानीकरिता जबाबदार असतात.

(आ)हानिकारक खोटेपणा: या दुष्कृतीमुळे दुसर्‍याच्या चुकीच्या कृत्यासाठी वादीस हानी पोहोचते.दुर्व्यपदेशन ( मिस्‌रेप्रेझेंटेशन) कोणाकडे करण्यात आले यावरून दुष्कृती अपकृत्याच्या कोणत्या प्रकारात मोडते हे ठरते.वादीकडे केलेले दुर्व्यपदेशन कपटाच्या अपकृत्यात मोडते,तर वादीव्यतिरिक्त इतरांकडे त्याच्यासंबंधी केलेले दुर्व्यपदेशन हानिकारक खोटेपणाच्या अपकृत्यात मोडते.दोन्ही दुष्कृती कारवाई योग्य होण्यास वादीस नुकसान पोहोचणे आवश्यक असते.

हक्क किंवा माल-बदनामी,माल-फसवणूक व दुसर्‍याचे व्यापारी नाव उचलणे,असे हानिकारक खोटेपणाचे तीन मुख्य प्रकार आहेत. नुकसानभरपाई अथवा व्यादेश किंवा दोन्ही मागण्यांची कारवाई वादीस सर्वसाधारणतः सर्व प्रकारांत करता येते.विशिष्ट प्रकरणी त्यास घोषणात्मक दावाही लावता येतो.

बचाव: वादीला वस्तुस्थिती माहीत होती,प्रतिवादीने केलेल्या निवेदनावर विश्वास ठेवू शकत नसल्याचे वादीने आपल्या वर्तनाने किंवा शब्दाने दाखवून दिले होते,हे प्रतिवादीने सिद्ध केल्यास खोट्या कथनाच्या जबाबदारीतून प्रतिवादीची मुक्तता होते.

संदर्भ : 1.Heuston, R.F.V.Ed., Salmond on the Law of Torts, London, 1961.

2.Thakore, D.K. Vakil, M.R.The Indian Penal Code, Bombay, 1962.

खोडवे, अच्युत.