सामीलनामा : (इन्स्टमेंट ऑफ ॲक्सेशन). अस्तित्वात असलेल्या किंवा जन्मास येणाऱ्या सार्वभौम सत्तेला आपले अधिकार सुपूर्द करून आपले स्वतंत्र अस्तित्व पूर्णतः किंवा अंशतः संपुष्टात आणणारा करार म्हणजे सामीलनामा. सामीलनामा बिनशर्त किंवा सशर्त असू शकतो. भारतीय संघराज्याच्या जडणघडणीच्या इतिहासात ‘सामीलनामा’ हा एक महत्त्वाचा दस्तप्रकार ठरला आहे. ब्रिटिश सार्वभौम सत्ता भारत सोडून जाताना तिने भारत किंवा पाकिस्तान या नव्या संघराज्यांना संस्थानांवरील सार्वभौम अधिकार सुपूर्द केले नाहीत. त्यामुळे राजे-रजवाडे, नबाब यांच्या आधिपत्याखालील संस्थानांना तांत्रिकदृष्ट्या सार्वभौमत्व मिळणार होते पण त्यांचे स्वतंत्र अस्तित्व जवळपास अशक्य असल्याने त्यांना या दोहोंपैकी एका संघराज्यात सामील होण्याचा पर्याय ब्रि टिश संसदेने संमत केलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने दिला होता. विशिष्ट संघराज्यात आपण सामील होत आहोत, हे जाहीर करणारा करार म्हणजे सामीलनामा.

भारत स्वतंत्र होताना त्यात लहानमोठी मिळून ५५४ संस्थाने होती. त्यांतील सु. १४० संस्थाने ब्रिटिश सत्तेची मांडलिक असली, तरी अंतर्गत बाबतींत त्यांना पूर्ण अधिकार होते. त्यांच्यासाठी तयार केलेल्या सामीलनाम्याच्या मसुद्यात संरक्षण, परराष्ट्रसंबंध व दळणवळण हे तीन विषय संघराज्य सरकारकडे सोपवले जातील व बाकी विषय संस्थानांकडे राहतील, अशी तरतूद होती. इतर संस्थानांच्या बाबतींत पूर्वी केंद्र सरकारकडे अथवा शेजारच्या मोठ्या संस्थानाकडे असलेले सर्वच अधिकार अस्तित्वात येणाऱ्या संघसरकारला देण्याची तरतूद सामीलनाम्यात होती. बहुतेक संस्थानांनी प्रारंभीच्या खळखळीनंतर सामीलनाम्यावर सह्या केल्या. त्रावणकोर, हैदराबाद, जम्मू आणि काश्मीर अशा काही संस्थानांनी संघराज्यात सामील होण्यास प्रारंभी नकार दिला. जम्मू-काश्मीरचे अधिपती महाराजा हरिसिंग यांनी संस्थानावर पाकिस्तानचे आक्रमण झाल्यावर सामीलनाम्यावर सही केली. हैदराबाद संस्थानाने सामीलनाम्यावर सही करण्याऐवजी केंद्रीय सत्तेशी पूर्वीप्रमाणेच (ब्रिटीशकाळाप्रमाणे) संबंध ठेवणारा ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग केल्यामुळे भारत सरकारला हैदराबादेत पोलीस कारवाई करावी लागली आणि नंतर हैदराबाद भारतात सामील झाले. भोपाळ, त्रावणकोर या संस्थानांनी उशिरा का होईना सामीलनाम्यावर सह्या केल्या. सामीलनामा फक्त तीन विषयांपुरता असला, तरी नंतरच्या काळात संस्थाने स्वतंत्रपणे अगर प्रथम आपले संघ करून नंतर भारतीय संघराज्यात पूर्णपणे विलीन झाली.

सामीलनामा हा आपले प्रभुत्वाचे अधिकार दुसऱ्या सत्तेला देणारा करार असल्यामुळे त्या भूप्रदेशावर ज्यांचे आधिपत्य आहे असा राजा, संस्थानिक किंवा अधिकार असलेले लोकप्रतिनिधींचे मंडळ यांनाच तो करता येतो. अशा वैध करारामुळे सार्वभौम किंवा संघसत्तेला त्या प्रदेशाच्या कारभाराचा कायदेशीर अधिकार प्राप्त होतो.

संदर्भ : Menon, V. P. The Integration of the Indian States, Bombay, 1961.

चपळगावकर, नरेंद्र