फ्लूरँस, मारी-झां-प्येअर : (१३ एप्रिल १७९४ – ८ डिसेंबर १८६७). फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिक. जन्म दक्षिण फ्रान्समध्ये मॉउरेइलहान या गावी. प्येअर फ्लूरँस या नावानेच त्यांनी आपले सर्व लेखन केले. माँपेल्ये येथून वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी वैद्यकाची पदवी घेतली. नंतर ते पॅरिस विद्यापीठात दाखल झाले आणि त्यांनी शरीरक्रियाविज्ञानाच्या-विशेषतः ⇨ तंत्रिका तंत्राच्या – अभ्यासास व संशोधनास वाहून घेतले. १८२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या फ्रेंच भाषेतील खंडात त्यांचे हे संशोधन संकलित केलेले आहे. १८२५ व १८४२ मध्ये ह्या खंडाच्या पुरवण्याही प्रसिद्ध झाल्या. शरीरक्रियाविज्ञानपर संशोधनाच्या इतिहासाचा हा तंत्रिका तंत्रावरील खंड एक मानदंड मानला जातो. १८२८ मध्ये बाराँ झॉर्झ क्यूव्ह्ये (१७६९ – १८३२) यांनी त्यांना ‘कॉलेज द फ्रान्स’ मध्ये आपले सहायक प्राध्यापक म्हणून घेतले. १८३० मध्ये ते निसर्गविज्ञानेतिहास संग्रहालयात प्राध्यापक झाले आणि १८५५ मध्ये कॉलेज द फ्रान्समध्ये प्राध्यापक झाले. १८२८ मध्येच ते ‘अकादमी ऑफ सायन्सेस’चे सभसद व नंतर १८३३ मध्ये अकादमीचे कायम सचिव झाले. सचिव असतांना त्यांनी डॉमीनीक फ्रांस्वा ॲरागो (१७८६ – १८५३) यांच्या सहकार्याने अकादमीच्या बैठकांचे अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी Comtes rendus हे दर्जेदार वैज्ञानिक नियतकालिक सुरू केले ते अद्यापि चालू आहे. हे नियतकालिक त्यांची विशेष महत्त्वाची कामगिरी समजली जाते. १८३८ मध्ये ते अकादमी फ्रान्सचे उपप्रमुख व १८४० मध्ये प्रमुख म्हणून निवडले गेले. १८२४ व २५ मध्ये त्यांना लागोपाठ दोन वेळा ‘माँत्यों’ पारितोषिक प्राप्त झाले.
झॉर्झ क्यूव्ह्ये यांच्या हाताखाली त्यांनी १८१४ ते १८२२ ह्या काळात कबूतराच्या मेंदूतील विशिष्ठ भाग शस्त्रक्रियेने अलग केल्याने मेंदूच्या कार्यात कोणते बदल घडून येतात, हे अभ्यासण्यासाठी अनेक प्रयोग केले. त्यांनी मेंदूची तीन प्रमुख क्षेत्रे निश्चित केली : (१) प्रमस्तिष्क गोलार्ध (सेरिब्रल हेमिस्फिअर), (२) निमस्तिष्क (सेरिबेलम) आणि (३) मध्यक (मेड्यूला). त्यांनी कबूतराच्या मेंदूतील प्रमस्तिष्क गोलार्ध कापून अलग केला तेव्हा कबूतराच्या सर्व संवेदना नष्ट झाल्या पण संतुलन (इक्विलिब्रियम) नष्ट झाले नाही जेव्हा निमस्तिष्क क्षेत्र काढले तेव्हा संतुलन नष्ट झाले आणि जेव्हा मध्यक काढले तेव्हा कबूतर मृत झाले. यावरून त्यांनी मेंदूतील गोलार्धक्षेत्र हे उच्च मानसिक व बौद्धिक कार्याशी, निमस्तिष्क क्षेत्र हे सर्व हालचालींचे नियंत्रण करणारे -संतुलन राखणारे-क्षेत्र व मध्यक हे जीवनधारणेस अतिशय आवश्यक असे श्वसन, रुधिराभिसरण, रक्तदाब इ. क्रिया सुरळीत ठेवणारे क्षेत्र म्हणून निश्चित केले.
कानातील अर्धवलयाकृती नलिकांचाही संतुलनात सहभाग असतो असे त्यांनी सप्रयोग सिद्ध केले. त्यांनी लावलेला आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे मेंदूचे कोणतेही एक क्षेत्र कापून टाकले, तर परिणामी मेंदूच्या इतर सर्व क्षेत्रांची कार्यक्षमता कमी होते हा होय. म्हणजेच मेंदूत क्षेत्रांनुसार कार्यविभागणी असली, तरी एकूण कार्यात्मक एकात्मकताही असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मेंदूच्या कार्यिक क्षेत्रविभागणीच्या फ्लूरँस यांच्या या शोधास पुढे १९०६ मध्ये प्येअर मारी (१८५३-१९४०) आणि १९२६ मध्ये एच्. हेड (१९२३- ) यांच्या संशोधनाने तसेच १९२९ मध्ये कार्ल लॅशली (१८९०-१९५८) यांच्या संशोधनाने फ्लूरँसप्रणीत मेंदूच्या कार्यिक एकात्मकतेच्या शोधास पुष्टी मिळाली.
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधात शरीरक्रियावैज्ञानिक संशोधनाद्वारे ज्यांनी प्रायोगिक तसेच शरीरशास्त्रीय मानसशास्त्राची पायाभरणी केली, त्यांच्यात फ्लूरँस यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्याचे सर्व लेखन फ्रेंचमध्ये असून ते पुढील ग्रंथांत संकलित आहे : रशॅर्श एक्स्पेरिमांताल स्यूर ले प्रॉप्रिएते ए ले फाँक्सियाँ द्यू सिस्तॅम नॅर्व्ह दां लेझानिमो व्हॅरतॅब्र (१८२४), इस्त्वार दे त्राव्हो द जॉर्ज क्यूव्हिए (१८४१), इस्त्वार दे त्राव्हो ए देझिदे द ब्युफाँ (१८४४), रकय देझेलॉज इस्तोरीक ल्यू दां ले सेआंस प्युब्लीक द लाकादेमी दे सियांस (१८५६). पॅरिसजवळील माँझराँ येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले.
अकोलकर, व. वि. सुर्वे, भा. ग.
“