फ्लिंट – १: अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या जेनेसी काउंटीचे मुख्य ठिकाण आणि जगातील मोटारगाडी उद्योगाचे एक मोठे केंद्र. हे फ्लिंट नदीकाठी डिट्रॉइटच्या वायव्येस सु. ८८ किमी. अंतरावर आहे. लोकसंख्या १,९६,९४० (१९७०).
जेकब स्मिथ या डिट्रॉइटच्या फर-व्यापाऱ्याने १८१९ मध्ये येथे पहिली वसाहत स्थापिली. १८५५ मध्ये तिला शहराची सनद मिळाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फ्लिंट हे लाकूडतोड व कृषिव्यवसाय यांचे प्रमुख केंद्र बनले. विपुल लाकूड पुरवठ्यामुळे याच काळात येथे ‘ड्युरँट-डॉर्ट कॅरेज कंपनी’ ची स्थापना झाली व १९००च्या सुमारास येथून प्रतिवर्षी एक लाखाहून अधिक घोडा-गाड्यांचे उत्पादन होऊ लागले. १९०३ च्या सुमारास येथे डेव्हिड ब्यूइक (१८५५-१९२९) याने ‘ब्यूइक मोटार कंपनी’ ची स्थापना केली. १९०४ मध्ये विल्यम ड्युरँटने (१८६१-१९४७) ही कंपनी आपल्या ताब्यात घेऊन तिचे पुनरुज्जीवन केले १९०८ च्या सुमारास ब्यूइकची गणना आघाडीच्या चार मोटार कंपन्यांमध्ये होऊ लागली. १९०८ मध्ये ड्युरँटने प्रसिद्ध ‘जनरल मोटर्स कंपनी’ची येथे स्थापना केली. या उद्योगामुळेच फ्लिंटचा विकास सुरू झाला. फ्लिंटमधील मोटारउद्योगाच्या इतर प्रवर्तकांमध्ये चार्ल्स नॅश, वॉल्टर क्राइस्लर (१८५७-१९७०),लुइस शेव्ह्रोले (१८७९-१९४१) इत्यादींची गणना होते. सध्या मोटारगाड्या व त्यांचे सुटे भाग यांच्या उत्पादनामध्ये फ्लिंटचा डिट्रॉइटनंतर दुसरा क्रमांक लागतो. येथील इतर उद्योगांमध्ये बांधकामाचे पोलाद, ओतकामाच्या वस्तू, सिमेंटचे ठोकळे, रसायने, रंग व रोगण, खाद्यपदार्थ, फर्निचर, तंबू व छते यांचा अंतर्भाव होतो.
‘चार्ल्स स्ट्यूअर्ट मॉट प्रतिष्ठान’ या प्रसिद्ध संस्थेचे प्रधान कार्यालय फ्लिंट शहरातच आहे. या प्रतिष्ठानाची स्थापना ‘जनरल मोटर्स कंपनी’चे एक संचालक चार्ल्स स्ट्यूअर्ट मॉट (१८७५-१९७३) यांनी १९२६ मध्ये केली असून फ्लिंटवासियांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक सुविधांकरिता या प्रतिष्ठानाने लक्षावधी डॉलर खर्च केले आहेत. ‘कम्यूनिटी स्कूल’ या संकल्पनेच्या विकासार्थ या प्रतिष्ठानातर्फे १९३० पासून सतत प्रयत्न करण्यात येतात. शहरात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था असून त्यांपैकी ‘मिशिगन बधिर विद्यालय’, ‘जनरल मोटर्स तंत्रविद्या संस्था’, ‘बेकर बिझिनेस युनिव्हर्सिटी’, ‘रॉबर्ट टी लाँगवे खगोलालय’, ‘बाउअर रंगमंदिर’ इ. प्रसिद्ध आहेत.
कापडी, सुलभा
“