फ्लेकर, जेम्स एल्रॉय : (५ नोंव्हेंबर १८८४ – ३ जानेवारी १९१५). इंग्रज कवी. लंडनमध्ये जन्म. शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजात (१९०२-०६). पदवीधर झाल्यानंतर विदेश सेवेत शिरण्याच्या उद्देशाने केंब्रिज येथे अरबी व फार्सी ह्या भाषांचा त्याने अभ्यास केला. १९१० ते १९१३ ह्या काळात कॉन्स्टँटिनोपल (आता इस्तंबूल), स्मर्ना (सध्याचे इझमिर, तुर्कस्तान) आणि बैरूत येथे ब्रिटिश वाणिज्य दूतावासांत त्याने नोकरी केली. १९१३ मध्ये प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्याला स्वित्झर्लंडमध्ये यावे लागले. तेथील डाव्होस शहरी त्याचे निधन झाले.
संयमित अभिव्यक्ती, घाटाचा काटेकोरपणा व वस्तुनिष्ठपणा ह्यांवर भर देणाऱ्या ‘पार्नॅसिअन’ ह्या कलावादी फ्रेंच काव्यसंप्रदायाचा फ्लेकरवरील प्रभाव जाणवतो त्याचप्रमाणे विशुद्ध सौंदर्याचा त्याला लागलेला ध्यास आणि पौर्वात्य देशांकडे ओढ घेणारे त्याचे मनही दिसते. वेधक प्रतिमांचा आणि वैविध्यपूर्ण छंदांचा वापर हे त्याच्या काव्यरचनेचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. द ब्रिज ऑफ फायर (१९०७), फॉर्टी – टू पोएम्स (१९११) आणि त्याच्या मृत्युनंतर प्रसिद्ध झालेला द ओल्ड शिप्स (१९१५) हे त्यांचे काव्यग्रंथ उल्लेखनीय आहेत. ‘द गोल्ड लर्नी टू समरकंद’ ही त्याची विशेष ख्याती पावलेली कविता. हसन (१९२२) आणि दॉन ह्वान (१९२५) ह्या त्याच्या नाट्यकृती. १९१६ मध्ये कलेक्टेड पोएम्स हे त्याच्या कवितांचे संकलन प्रसिद्ध झाले.
बापट, गं. वि.
“