फ्लिश : मुळात आल्प्स पर्वताच्या उत्तर भागातील (विशेषतः स्वित्झर्लंडमधील) तृतीय कल्पातील (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) शैलसमूहांसाठी ही संज्ञा वापरीत परंतु आता त्यांच्यासारख्या इतरत्र (उदा., पिरेनीज, ॲपेनाइन, कॉकेशस इ.) आढळणाऱ्या व इतर काळांमधील शैलसमूहांनाही फ्लिश म्हणतात. ज्या लांबट व निरुंद क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रचंड जाडीचा गाळ साचलेला असतो, त्याला भूद्रोणी म्हणतात. भूद्रोणीचे यूजिओसिंक्लिन व मायोजिओसिंक्लिन असे प्रकार पाडले जातात [⟶ भूद्रोणी]. गाळ साचताना अधूनमधून ज्वालामुखी क्रिया घडलेली असणे, हे सामान्यपणे यूजिओसिंक्लिनचे एक वैशिष्ट्य आहे, तर मायोजिओसिंक्लिनमध्ये ज्वालामुखी क्रियेने बनलेले पदार्थ थोडेच असतात. बऱ्याचदा मायोजिओसिंक्लिन सखल पठाराला लागून असते आणि यूजिओसिंक्लिनची सीमावर्ती जमीन ही वर उचलली जाणारी व जलदपणे झिजणारी असते. अशा परिस्थितीत भूद्रोणीतील गाळ गडद रंगाचे शेल, ग्रेवॅक इ. नमुनेदार खडकांचा बनलेला असतो. आल्प्स पर्वतामध्ये असा हजारो मी. जाडीचा गाळ साचलेला असून त्यासाठीच प्रथम ‘फ्लिश’ ही संज्ञा वापरण्यात आली. फ्लिश म्हणजे पातळ, कठिण, आणि ⇨ ग्रेवॅकासारख्या खडकामध्ये लयबद्धपणे अंतःस्तरित (निरनिराळ्या खडकांचे थर एकमेकांमध्ये साचले जाऊन बनलेली) अशी शेल खडकांची मालिका असते. फ्लिशची एकूण जाडी सामान्यपणे हजारो मी. असली, तरी प्रत्येक थर पातळ (काही सेंमी. ते १·२ मी.) असतो. वर उचलल्या जात असणाऱ्या पर्वताची झीज होऊन तयार होणारे पदार्थ फ्लिशमध्ये असतात व पर्वतनिर्मितीच्या हालचालींमुळे त्यांना घड्या पडलेल्या असतात. अशा प्रकारे पर्वतनिर्मितीच्या प्रारंभीची स्थिती फ्लिश शैलसमूहाने दर्शविली जाते. फ्लिशमधील कणांचा भरडपणा तळापासून वरच्या दिशेला वाढत गेलेला आढळतो. फ्लिशमध्ये जीवश्म (जीवांचे शीळारूप झालेले अवशेष) विरळाच व विशेषतः न्युम्युलाइट प्राण्यांचे जीवाश्म आढळतात. यांवरून हा शैलासमूह सागरात साचल्याचे सूचित होते. कोठेकोठे फ्लिशमध्ये पिंडाश्मांचे अथवा कोणाश्मांचे पट्टे तर कोठेकोठे रूपांतरीत खडकांचे मोठे धोंडे (वाइल्ड फ्लिश) आढळतात. गढद रंगाचे शेल, सूक्ष्मकणी वालुकाश्म व चुनखडकांचे पातळ थर यांच्या विपुलतेनुसार फ्लिशचे काळा, वालुकाश्ममय व कॅल्शियमी असे प्रकार पडतात.
फ्लिश सामान्यपणे सागरामध्ये मध्यम ते खोल (२,००० मी.पर्यंत खोलीच्या) पाण्यात साचले असल्याचे मानतात. यांतील अणकुचीदार, भरड वाळू मालिन्य-प्रवाहांनी (पाण्यातील गाळयुक्त प्रवाहांनी) साचली असावी. काही फ्लिशमध्ये आढळणारे अतिशय भरड असे पिंडाश्मासारखे पंकाश्म हे पाण्यातील पंक-प्रवाहांनी बनले असावेत.
स्वित्झर्लंडमधील फ्लिश मुखत्वे मऊ वालुकाश्म, मार्ल वालुकामय शेल यांचे बनलेले असून ते विस्तृत क्षेत्रात पसरलेले आहेत. ते इओसीन (सु. ५·५ ते ३·५ कोटी वर्षापूर्वीच्या) वा ऑलिगोसीन (सु. ३·५ ते २ कोटी वर्षापूर्वीच्या) काळातील आहेत. अनेक प्राचीन ⇨ भूद्रोणी निक्षेपांचे फ्लिश हे वैशिष्ट्य आहे. उदा., कँब्रियन-पूर्व (सु. ६० कोटी वर्षापूर्वीच्या) काळातील कॅनडामध्ये, पूर्व पुराजीव (सु. ६० ते ४२ कोटी वर्षापूर्वीच्या) काळातील ग्रेट ब्रिटनमधील कॅलेडोनियन भूद्रोणीत, उत्तर पुराजीव (सु. ४२ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील यूरोपातील आर्मोरिकन भूद्रोणीत, उत्तर ऑर्डोव्हिसियन व डेव्होनियन (सु. ४४ ते ३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील ॲपालॅचिअनमध्ये आणि तृतीय काळातील आल्प्स, हिमालय व कॉकेशसमध्ये आढळतात.
भारतीय उपखंडात हिमालयाच्या शिवालिक टेकड्यांतील स्पिती, गढवाल व कुमाऊँ भागांत फ्लिश आढळतात. स्पितीजवळील भागात चिक्कीम मालेवर क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षापूर्वीच्या) काळातील खडकांचा जाड थर असून त्यात जीवाश्महीन वालुकाश्म आणि वालुकामय शेल आढळतात, तेच फ्लिश होत. टेथिस सागर उथळ होत गेल्याचा हा पुरावा आहे. यानंतरच्या फ्लिशवरून जमीन सावकाशपणे वर येत गेल्याचे व सागर मागे होत गेल्याचे दिसून येते. बलुचिस्तानमध्ये मॅक्रान किनाऱ्याच्या उत्तरेकडील विस्तृत प्रदेशात, स्वित्झर्लंडमधील फ्लिशसारखे शैलसमूह आहेत, त्यांना ‘कोजाक शेल’ म्हणतात. त्यामध्ये कॅल्शियमी वालुकाश्म, हिरवट शेल व अल्प चुनखड असून शंखधारीचे (गॅस्ट्रोपोडांचे) थोडे जीवाश्मही आहेत. या जीवाश्मांवरून या फ्लिशच्या काही भागाचे तरी वय ऑलिगोसीन असल्याचे सूचित होते. कुमाऊँच्या तिबेटकडील सीमेवर जोहार येथेही फ्लिश असून त्यावर ज्वालामुखी टफ व कोणाश्म आढळतात. घसरणारे थर (वा जमीन) या अर्थाच्या स्विस-जर्मन बोली भाषेतील शब्दांवरून फ्लिश हे नाव आले आहे.
ठाकूर, अ. ना.
“