फ्लॅकोर्टिएसी : (अत्रुण कुल). फूलझाडांच्या [⟶ वनस्पती आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बीमध्ये दोन दलिका असलेल्या) वर्गातील एक कुल. ⇨ कॅरिकेसी (पपई फूल), ⇨ पॅसिफ्लोरेसी (कृष्णकमळ कुल), ⇨ मोरिंगेसी (शेवगा कुल) इ. कुलांशी ह्याचे साम्य असून ह्या सर्वांचा (एकूण १९ कुलांचा) अंतर्भाव परायटेलीझ या एकाच गणात (जे. एन्. मित्र यांनी पुरस्कार केलेल्या पद्धतीत) केला जातो. जे. हचिन्सन यांनी बिक्सेलीझमध्ये [केसरी गणात ⟶ बिक्सेसी] फ्लॅकोर्टिएसी कुलाचा समावेश केला आहे.
परायटेलीझ गणातील वनस्पती ⇨ ओषधी, झुडपे व वृक्ष असून त्यांची सोपपर्ण (तळाशी उपांगे असलेली) पाने समोरासमोर किंवा एकाआड एक असतात. फुले अरसमात्र, क्वचित एकसमात्र, अवकिंज, कधी परिकिंज, द्विलिगं, क्वचित एकलिंगी, पंचभागी किंवा चतुर्भागी (संवर्त व प्रदलमंडल स्पष्टपणे ओळखू येणारे) क्वचित पाकळ्यांचा अभाव असून परिदले पाचापेक्षा जास्त केसरदले परिदलांइतकी किंवा अधिक बीजके तटलग्न बिंब बहुधा असते [⟶ फूल]. ह्या गणाचा उगम व विकास ऱ्हीडेलीझ [⟶ फ्युमॅरिएसी] मार्गे ⇨ रॅनलीझ या गणापासून झाला असावा, असे मानतात. ऱ्हीडेलीझ व परायटेलीझ यांमध्ये ⇨ मोरिंगेसी हा जोडणारा दुवा समजतात. एलिओकार्पेसी, व्हायोलेसी, कॅरिकेसी, इ. कुलांशी फ्लॅकोर्टिएसी कुलाचे आप्तभाव असल्याचे आढळते.
या कुलात एकूण सु. ८४ वंश (ए. बी. रेंडेल यांच्या मते ७० वंश) व ८०० जाती (जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते ८५० जाती) अंतर्भूत आहेत व त्या सर्व काष्ठमय वृक्ष, झुडपे किंवा वेली असून त्यांचा प्रसार विशेषेकरून उष्ण कटिबंधात झालेला आहे. पाने साधी, बहुधा एकाआड एक व दोन रांगांत असतात. फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी किंवा बहुयुतिक (दोन्ही प्रकारची एकाच झाडावर), चतुर्भागी किंवा कधी अनेकभागी, बहुधा पानांच्या बगलेत किंवा टोकाकडील फुलोऱ्यांवर [मंजरी, वल्लरी ⟶ पुष्पबंध], क्वचित एकेकटी असतात. संवर्त बहुधा दीर्घस्थायी (फळ बनेपर्यंत राहणारा) पाकळ्या सुट्या, अपिकिंज किंवा परिकिंज व बिंबाबाहेर केसरदले अनेक, बहुधा सुटी, कधी जुळलेली व पाकळ्यांसमोर किंजपुट ऊर्ध्वस्थ व एकाच कप्प्याचा, काहींत अधःस्थ व अनेक कप्प्यांचा बीजके बहुधा अनेक, बीजकविन्यास तटलग्न [⟶ फूल ]. मृदुफळ किंवा अश्मगर्मी (आठळीयुक्त) फळ, क्वचित बोंड बिया सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) ⇨ परागण कीटकांद्वारे होते यातील ⇨ अत्रुण, ⇨ जुगुरू (तांबट पानआवळा), ⇨ चौलमुग्रा, ⇨ अट्टाक व ⇨ चिल्ला इ. वनस्पती उपयुक्त आहेत. काई ॲपल आणि सीलोन गूजबेरी (अनुक्रमे डोव्हिॲलिस कॅफ्रा व डो. हेबेकार्पा ) ह्या झुडपाचे कुंपण करतात. त्यांची रसाळ व स्वादिष्ट पण कच्ची आंबट फळे लोणच्याकरिता व पक्व फळे मुरंब्याकरिता वापरली जातात.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol.III, New Delhi, 1952.
2. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
3. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.
परांडेकर, शं. आ.
“