फ्रेंच साहित्य : मध्ययुग : बारावे ते पंधरावे शतक : फ्रेंच साहित्याच्या विकासाला अकराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत योग्य तो बाव मिळाला नव्हता. शार्लमेन (७४२–८१४) ह्या फ्रँक लोकांच्या राजाच्या साम्राज्याचे विभाजन, त्यानंतर झालेले संघर्ष, नॉर्मनांची आक्रमणे, सरदारांचे आपापसातील झगडे अशा अनेक कारणांमुळे ही कोंडी झालेली होती. कांतिलॅन द सँत अलाली (नववे शतक, इं. शी. साँग ऑफ सेंट अलाली), व्ही द सँ लेझे (दहावे शतक) हे संत लेझेचे चरित्र, अशी काही चरित्रे ह्या कालखंडात लिहिली गेली. अकराव्या शतकात ख्रिस्ती धर्मयुद्धांची सुरुवात झाली आणि शूरोदारतेचे (शिव्हरी) आदर्श जोपासले जाऊ लागले. सरंजामशाहीवर अधिष्ठित असलेल्या सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या सरदार- उमरावांपुढे हेच आदर्श होते. ह्या आदर्शाचे, तसेच ख्रिस्ती धर्मरक्षणाच्या कार्यांचे चित्र काव्यातून उमटले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा होती. ह्या अपेक्षेतूनच ⇨ शांसाँ द जॅस्तसारखी वीरकाव्ये निर्मिली गेली. ला शांसाँ द रॉलां ही ह्या वीरकाव्यप्रकारातील श्रेष्ठ साहित्यकृती होय. बाराव्या शतकाच्या अगदी आरंभी तिची रचना झाली असावी. ह्या काव्याचे आपणास उपलब्ध असलेले सर्वप्राचीन हस्तलिखित इंग्लंडात, बाराव्या शतकाच्या मध्यास तयार केले गेले. मुस्लिम (सॅरसेन) सैन्याशी प्राणपणाने लढून हौतात्म्य पतकरणाऱ्या रॉलां नामक वीराची कथा ह्या काव्यात आलेली आहे. साधे, सरळ पण बेधक असे कथानिवेदन हे ह्या काव्याचे लक्षणीय वैशिष्ट्य. काव्याच्या अखेरच्या ओळीत कोणा तुरोल्दसाचा उल्लेख आलेला आहे. ‘हे महाकाव्य येथे संपले; कारण तुरोल्दसाच्या शक्ती क्षीण झाल्या आहेत,’ अशा आशयाचे उद्गार ह्या ओळीत आहेत. त्यांच्या आधारे, हा तुरोल्दसच ह्या काव्याचा कर्ता असावा, असे मत मांडले गेले असले, तरी त्याबद्दल अभ्यासकांत ऐकमत्य नाही. तो केवळ ह्या काव्याचा प्रतकर्ता असावा, असे सामान्यतः मानले जाते. ला शांसाँ द गीयोम आणि ल पॅलरिनाज द शार्लमाग्न ह्यांचा शांसाँ द जॅस्त ह्या काव्यप्रकारातील अन्य उल्लेखनीय काव्यांत अंतर्भाव होतो. अशा वीरकाव्याचे नायक, बाराव्या शतकातील ख्रिस्ती धर्मयोद्धयाच्या प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवून रंगविलेले दिसतात. ही काव्ये रचणाऱ्यांना ‘त्रुव्हॅर’ असे म्हणत; आणि ती किल्ल्याकिल्ल्यांत वा चौकाचौकांत जाऊन गाणाऱ्यांना ‘जाँग्लर’ अशी संज्ञा होती.
बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात ⇨ रोमान्स लिहिले गेले. वैशिष्ट्यपूर्ण दरबारी साहित्याचा हा एक नमुना होय. वीरकाव्ये जनसंमर्दापुढे गायिली जात; तथापि रोमान्स हे मुख्यतः वाचनासाठी लिहिले जात. निरनिराळे सरंजामशहा (फ्यूडल लॉर्ड्स) आपल्या पदरी असलेल्या व्यावसायिक कवींकडून ते लिहून घेत. प्रेम आणि साहस हे रोमान्सचे प्रमुख विषय. अद्भुततेचे वातावरण त्यात आदळते. ⇨ क्रेत्यँ द त्र्वा हा असे रोमान्स लिहिणाऱ्या आरंभीच्या कवींपैकी एक होय. सु. ११६५ ते ११९० हा ह्याच्या कर्तृत्वाचा काळ. काउंटेस मारी द शांपान्य हिच्या आश्रयास काही काळ राहिल्यानंतर तो ॲल्सेसच्या फिलिपकडे गेला. राजा आर्थर भाणि त्याचे सरदार ह्या विषयावर त्याचे रोमान्स आधारलेले आहेत. आज उपलब्ध असलेले रोमान्स पाहिले, तर राजा आर्थरवरील अगदी आरंभीचे रोमान्स क्रेत्यँ द त्र्वा ह्याने लिहिल्याचे दिसून येते. त्याच्यातला प्रभावी कथानिवेदक त्याच्या रोमान्सलेखनातून प्रत्ययास येतो. डौलदार, चित्रमय शैली, सूक्ष्म स्वभावचित्रण, छंदाची सफाईदार हाताळणी, गूढाचा आणि अतिमानुषाचा परिणामकारकपणे करून घेतलेला उपयोग ही त्याच्या रोमान्सलेखनाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये होत. फ्रेंच भाषेत रोमान्स हे ‘कुर्तवा’ (सरदारी) साहित्य म्हणून ओळखले जातात. रोमान्स ही आधुनिक कादंबरीची पूर्वावस्था म्हणता येईल.
बाराव्या-तेराव्या शतकांत लिहिल्या गेलेल्या काही कथा-काव्यांचा उल्लेख भावश्यक आहे. त्यांत मारी द फ्रांस (बाराव्या शतकाचा उत्तरार्ध) ह्या फ्रान्सच्या पहिल्या कवयित्रीने रचिलेल्या काही काव्यांचा अंतर्भाव होतो. प्रेमासाठी केलेली साहसे त्यांत वर्णिलेली आहेत. ‘रॉमां इदिलीक’ ह्या प्रेमकथा. अनेक प्रकारच्या हालअपेष्टा सोसल्यानंतर प्रेमी युगुलांचे होणारे मीलन अशा प्रेमकथांतून दाखविण्यात येते. अशा प्रेमकथांत ओकासँ व निकॉलॅत ही विशेष प्रसिद्ध आहे. ही कथा ‘शांतफाब्ल’ ह्या प्रकारातली, म्हणजे गद्यपद्यात्मक अशी आहे. आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता ओकासँ हा निकॉलॅत नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध ठेवतो. निकॉलॅत ही हलक्या दर्जाची; म्हणून आईवडिलांची त्यांच्या विवाहाला मान्यता नसते. ओकासँचा पिता काही काळ त्याला तुरुंगातही टाकतो. पुढे निकॉलत ही कार्थेजच्या राजाची कन्या असल्याचे उघड होते. यथावकाश ओकासँ आणि निकॉलत ह्यांचा विवाह होतो; परंतु तत्पूर्वी ताटातूट, निकॉलॅतला तिच्या मर्जीविरुद्ध दुसऱ्याशी–एका सॅरसेन राजाशी–विवाह करायला भाग पाडण्याचा प्रयत्न; तिने वेषांतर करून पळून जाणे वगैरे प्रकार होतात.
शांसाँ द जॅस्त व रोमान्ससारखे साहित्य समाजाच्या वरच्या थरातील मंडळींसाठी–म्हणजे उमरावांसाठी–होते. तथापि समाजाच्या अन्य थरांतील लोकांसाठी–मुख्यतः मध्यमवर्गीयांसाठी–साहित्यनिर्मिती होण्याची आवश्यकता यथावकाश निर्माण झालीच. अशा साहित्यात ⇨ फॅब्लोचा (फ्रेंच फाब्ल्यो) समावेश होतो. सामान्यतः बाराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि चौदाव्या शतकाचा आरंभ ह्या कालखंडात फॅब्लो रचिले गेले. फॅलो म्हणजे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रसंगांवर आधारलेल्या पद्यकथा होत. समाजातील विविध वृत्तिप्रवृतींच्या स्त्री-पुरुषांचे चित्रण ह्या पद्मकथांतून वास्तववादी दृष्टिकोणातून घडविलेले आहे. फॅब्लो ह्या प्रकारात मोडणाऱ्या सु. १५० पद्यकथा आज उपलब्ध आहेत. फॅब्लोतील पद्यकथा मुळात पौर्वात्य देशांतून आल्या असाव्यात, हे मत आज फारसे मान्य केले जात नाही. तथापि उपर्युक्त १५० कथांपैकी सु. १२ कथांचा उगम भारतीय आहे, असे काही अभ्यासकांचे मत आहे. फॅब्लोचा प्रभाव फ्रान्सबाहेरही पडला. विख्यात इंग्रज साहित्यिक चॉसर ह्याच्या कँटरबरी टेल्समधील काही कथा फॅब्लोंमधून घेतलेल्या आहेत. बोकाचीओच्या देकामेरॉनमधल्या काही कथाही फॅब्लोच्या आधारे रचिलेल्या आहेत. रोमां द रनार (इं. शी. हिस्टरी ऑफ रनार द फॉक्स) हा पद्यकर्थाचा एक समूहही उल्लेखनीय आहे. ह्या पद्यकथासमूहात विविध पशु पात्रे म्हणून येतात. रनारनामक कोल्हा हा ह्या कथांचा नायक. इझेग्रँनामक लांडगा हा त्याचा मुख्य शत्रू. हे दोन्ही प्राणी अनुक्रमे चातुर्य आणि पाशवी शक्ती ह्यांची प्रतीके म्हणून आलेले असून त्यांच्या संघर्षात अखेरीस चातुर्याचाच विजय होतो. रोमां द रनार ह्या पद्यकथासमूहातील सर्वांत जुन्या पद्यकथा सु. ११७५ ते सु. १२०५ ह्या कालखंडात वेगवेगळ्या कवींनी रचिल्याचे दिसते. नाट्यमय निवेदनाचे कौशल्य रोमां द रनारमधील एकूणच पद्यकथांतून प्रत्ययास येते. ग्रीक-रोमन पशुकथा हा ह्या कथांचा काही प्रमाणात मूलाधार असला, तरी यूरोपमधील लोककथांची परंपराही त्यांच्या पाठीशी आहेच. १९४८ मध्ये गेंट येथे इझेग्रिनुस ह्या नावाने रचिल्या गेलेल्या दोन कवितांचे रोमां द रनारशी निकटचे नाते दिसून येते. ह्या दोन कविता आणि रोमां द रनार ह्यांच्यात लक्षणीय साम्यस्थळे दिसून येतात. एखाद्या झाडाला जशा फांद्या फुटाव्यात, तशा ह्या रनारनामक कोल्ह्याच्या व्यक्तिरेखेपासून कथामाला गुंफल्या जात राहिल्या (तेराव्या शतकाचा पूर्वार्ध). तथापि ह्या मालांत जुन्या कथांचा कस आढळत नाही. त्यांतील काही कथांतून तर रनारलाच वगळल्याचे दिसते. रोमां द रनारशी नाते सांगणारी दोन काव्ये तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात रचिली गेली. कुरोनमां द रनार (३,००० ते ४,००० ओळी) आणि रनार लं नुव्हॅल (सु. ८,००० ओळी) ही ती होत. त्यांपैकी पहिल्यात रनार हा दंभ, विषयलोलुपता आणि अन्य दुर्गुणांचे प्रतीक म्हणून आलेला आहे. दुसऱ्याचे स्वरूप एका उपरोधप्रचुर रूपककथेचे आहे. झाकमार झेले हा त्याचा कर्ता. चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात रनार ल काँत्रफँ (लेखकाचे नाव अज्ञात) नावाची आणखी एक रचना अस्तित्वात आली. ती बरीच विस्तृत आहे. तिची एकूण तीन हस्तलिखिते आज उपलब्ध असून त्यांतील दोन पॅरिसमध्ये, तर एक व्हिएन्ना येथे आहे. पॅरिसमधील हस्तलिखितातील एकात सु. ३२,००० पद्ये असून दुसऱ्यात सु. १९,००० पद्ये आहेत. व्हिएन्ना येथील हस्तलिखितात पद्याप्रमाणेच गद्यभाग असून पद्यभाग सु. २० ते २५ हजार ओळींचा आहे आणि गद्यभाग पद्यभागाच्या, जवळजवळ निम्मा आहे. रनार ल काँत्रफँमधील कोल्हा रोमां द रनारमधील कोल्ह्याच्या जवळपास येतो, तर कधी तत्कालीन अपप्रवृत्ती रूपकात्मकतेने मांडतो.
बाराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत फ्रान्समध्ये भावकवितेची निर्मिती वैपुल्याने झाली. ह्या भावकवितेतील ‘शांसाँ द त्वाल’ हा गीतप्रकार सर्वांत प्राचीन होय. कशिदाकामासारखी कामे करीत असताना स्त्रियांनी म्हणावयाची ही गीते आहेत. ‘पास्तुरॅल’मध्ये एखादा सरदार आणि मेंढपाळ तरुणी ह्यांच्याशी संबंधित असा कथाभाग असे. सरदाराने त्या तरुणीचे प्रणयाराधन करावयाचे. कधी त्याला प्रतिसाद मिळतो; कधी मिळतही नाही. पास्तुरॅल ह्या प्रकारात दोन्ही प्रकारची वर्णने येतात. ‘शांसाँ दामूर’ हा प्रेमगीताचा एक प्रकार होय. मध्ययुगीन फ्रेंच भावकवितेच्या रचनेत काही सरदारवर्गीयांनीही भर घातलेली आहे. सरदार कॉनाँ द बेत्यून, शांपान्य ब्रीचा काउंट चौथा तीबो (१२०–१५३) ह्यांसारख्यांच्या रचनांचा तीत अंतर्भाव होतो. चौथा तीबो हा तर भावकवितेचा सम्राटच मानला जातो. सरदारवर्गाबाहेरील ज्या कवींनी उत्तम भावकवितेची रचना केली, त्यांत न्यूत्बफ (१२५०–८५) ह्याचा उल्लेख आवश्यक आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसठशीत प्रत्यय देणारी उत्कट आत्मपरता आपल्या कवितेतून आणणारा आरंभीचा फ्रेंच कवी म्हणून न्यूत्बफचा लौकिक आहे. सामाजिक-राजकीय उपरोधिका, एक अद्भुत नाटक, भक्तिपर पद्यकथा, संत एलिझाबेथचे चरित्र, फॅब्लो अशी बहुविध साहित्यनिर्मिती त्याने केली आहे. धर्मयुद्धांच्या (क्रूसेड्स) पुरस्कारार्थही त्याने कविता लिहिल्या. न्यूत्बफच्या काव्यातून त्याच्या खडतर जीवनाचे आणि आवादी दृष्टीचे प्रत्यंतर येते. अन्य कवींत झां बॉदेल आणि कॉलँ म्यूसे (तेरावे शतक) ह्यांचा समावेश होतो. बाराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि तेराव्या शतकाचा आरंभ, हा झां बॉदेलचा काळ होय. सॅस्न आणि ज द सँ निकॉला ही त्याची प्रसिद्ध काव्ये होत. शार्लमेन राजाचे गितेक्लँ किंवा वितिकींद ह्या सॅक्सन राजाबरोबर झालेले युद्ध हा सॅनचा विषय. ज द सँ निकॉला हा अद्भुत नाट्याचा (मिरॅकल ले) फ्रान्समधील सर्वप्राचीन नमुना होय. बॉदेलच्या या कृतीत जी नाट्यबीजे सुप्तावस्थेत आढळतात, त्यांचा विमुक्तपणे विकास झाला असता, तर एलिझाबेथन कालखंडातील इंग्रजी नाट्यकृतींच्या जवळपास येऊ शकतील अशी नाटके फ्रान्समध्ये निर्माण झाली असती, असे मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे. विनोद आणि गांभीर्य ह्यांचे एक विलक्षण प्रभावी मिश्रण ज द सँ निकालात झालेले आहे. लोकांच्या दैनंदिन व्यवहारांतील भाषेचा वापर, विविध व्यक्तिरेखा आणि निखळ आनंदनिर्मितीचा प्रयत्न ह्यांमुळे प्रत्येक प्रसंगात जिवंतपणा आलेला आहे. कॉलँ म्यूसेच्या कवितेत विडंबनाची प्रवृत्ती दिसते.
गीयोम द माशो (सु. १३००–७७) हा चौदाव्या शतकातील एक विशेष उल्लेखनीय कवी होय. त्याच्या काव्यरचनेचे मुख्यतः दोन भाग पाडता येतील : (१) दीर्घ कथाकाव्ये आणि बोधपर काव्ये, (२) भावकविता. ‘दी’ (इं. अर्थ) ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या कविता पहिल्या प्रकारात पडतात. उदा., दी दु व्हॅरजिए. ह्या रूपक काव्यात ⇨ रोमां द ला रोझ ह्या काव्याचे अनुकरण दिसते. बॅलड (फ्रेंच बाल्लाद) आणि राँदो ह्यांसारखे काव्यप्रकार हाताळणाऱ्या आरंभीच्या कवींत ह्या कवीचा समावेश होतो.
ह्या कालखंडात रचिल्या गेलेल्या रोमां द ला रोझ ह्या काव्याचा विशेष उल्लेख आवश्यक आहे. गीयोम द लॉरीस आणि ⇨ झां द म्यून (१ – सु. १३०५) हे ह्या काव्याचे कर्ते होत. ह्या काव्याचा पूर्वार्ध (सु. ४,००० ओळी) गीयोम द लॉरीस ह्याने रचिला असून त्याचा काळ बहुधा तेराव्या शतकाचा पूर्वार्ध हा असावा. ह्या काव्याचा सु. १८,००० ओळींचा उर्वरित भाग झां द म्यून ह्याने रचिला आहे. विख्यात रोमन कवी ऑव्हिड ह्याच्या ‘आर्ट ऑफ लव्ह’ (इं. शी.) ह्या काव्यग्रंथाच्या धर्तीवर रोमां द ला रोझचा पूर्वार्ध लिहिला गेला आहे. अर्थात गीयोम द लॉरीसने वर्णिलेली प्रेमकला ही त्याच्या काळात प्रचलित असलेल्या दरबारी प्रेमाची कला (आमूर कुर्तवा) आहे आणि लॉरीसच्या नजरेसमोर असलेला श्रोतृवर्ग हा तत्कालीन सरदारांचा आहे. ह्या काव्याचा लॉरीसकृत पूर्वार्ध म्हणजे दरबारी प्रेमावरील एक भव्य रूपक आहे. एका जादूच्या बागेतील गुलाबाचे फूल हस्तगत करण्यासाठी काव्यनायकाचा चाललेला प्रयत्न हे प्रेमाच्या पूर्ततेसाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. उत्तरार्ध लिहिणाऱ्या झां द म्यूनने मात्र या काव्याची हाताळणी मध्यमवर्गीय दृष्टिकोण बाळगून आणि सर्वसाधारण श्रोत्यांसाठी केलेली आहे. त्याच्या रचनेत लॉरिसच्या रूपकाला गौणत्व आलेले आहे. रोमां द ला रोझचा आदर्श इंग्लंड–फ्रान्समधील कवींपुढे सु. दोन शतके राहिला. मध्ययुगातील सर्वश्रेष्ठ इंग्रज कवी जेफ्री चॉसर ह्याने तर ह्या काव्याचे इंग्रजी भाषांतर–रोमान्स ऑफ द रोझ–करून आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आरंभ केला.
पंधराव्या शतकातील क्रीस्तिन द पीझां (सु. १३६४–सु. १४३०) ही कवयित्री आणि आलँ शार्त्ये (सु. १३९०–सु. १४४०), शार्ल दॉर्लेआं (१३९१–१४६५) आणि ⇨ फ्रांस्वा व्हीयाँ (१४३१–?) ह्यांसारखे कवी उल्लेखनीय आहेत. क्रीस्तिन द पीझांच्या कवितेवर एक प्रकारच्या उदासीनतेची छाया पडलेली आहे. ला बॅल दाम सां मॅर्सी (१४२४, इं. शी. द ब्यूटिफूल पिटिलेस लेडी) ही आलँ शार्त्ये ह्याची प्रसिद्ध कविता. प्रेयसीच्या निष्ठुरपणामुळे निराश होऊन मरणाऱ्या एका प्रियकरावर ती लिहिलेली आहे. शार्ल दॉर्लेआं हा एक उमराव. आझँकूरच्या लढाईत त्याला कैद करून इंग्लंडला नेण्यात आले होते. तेथे त्याने पंचवीस वर्षे तुरुंगवास भोगला. ह्या दुःखमय काळात कवितेनेच त्याला दिलासा दिला. त्याच्या काव्यात स्वदेशाविषयीची उत्कट ओढ दिसून येते. कुशल कारागिरी हे त्याच्या रचनेचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. फ्रांस्वा व्हीयाँ हा मध्ययुगातला सर्वश्रेष्ठ कवी. तॅस्तामां (इं. शी. टेस्टामेंट) आणि लॅ वा पती तॅस्तामां ह्या त्याच्या विशेष महत्त्वाच्या रचना होत. व्हीयाँचे जीवन चोरीचा आरोप, तुरुंगवास, हद्दपारी, खुनाच्या आरोपावरून सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा, तीतून सुटका अशा अनेक वादळी घटनांनी भरलेले होते. ऐन तारुण्यात एका भटक्याचे जीवन तो व्यतीत करू लागला होता. त्याने जीवनात अनुसरलेले चुकीचे मार्ग, भोगलेली दुःखे; त्याला प्रेमात आलेले अपयश ह्यांचे प्रतिबिंब तस्तामांमध्ये पडलेले असून जिच्यावर उत्कट प्रेम केले अशा एका स्त्रीच्या बेइमानीपणामुळे आपल्याला पॅरिस कसे सोडावे लागले हे पती तस्तामांमध्ये तो सांगतो. त्याच्या बॅलडरचनांत ‘ला बाल्लाद दे पांद्यू’–फासावर चढणाऱ्याचे मागणे–ही विख्यात आहे. प्रांजळपणा आणि उत्कटता हे गुण त्याच्या काव्यरचनेत प्रकर्षाने जाणवतात.
पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रां रेतॉरिकर (इं. अर्थ ग्रेट व्हेटरिशिअन्स) ह्या नावाने ओळखले जाणारे काही कवी प्रभावी ठरले. प्रामाणिक भावनेचा अभाव, निसर्गाची उपेक्षा, लॅटिन साहित्याचा अतोनात प्रभाव आणि नैतिक उद्बोधनाकडे असलेली प्रवृत्ती ही या कवींच्या काव्याची सर्वसाधारण वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. अशा कवींत झॉर्झ शाटलँ (१४०४–७५), झां मॉलीने (मृ. १५०७) ह्यांसारख्या काही कवींचा अंतर्भाव होतो.
बोधपर आणि उपरोधपर साहित्य : तेराव्या शतकाच्या आरंभापासून फ्रेंच भाषेत लक्षणीय स्वरूपाचे उपरोधपर साहित्य झाल्याचे दिसून येते. शिलेदारी साहसांवर आधारलेले रोमान्स विडंबन-उपरोधाचे लक्ष्य झालेले दिसतात, रोमां द रनारमध्येही उपरोधप्रचुरता आहेच. फोव्हॅल नावाच्या एका रोमान्सचा उल्लेख ह्या संदर्भात आवश्यक आहे. झेरव्हे द्यू ब्यूस नावाच्या कोणा एकाने तो लिहिला, असे म्हटले जाते. ही एक उपरोधप्रचुर रूपककथा आहे. तिचा नायक सर्व प्रकारच्या अपप्रवृत्तींचा एक प्रातिनिधिक नमुना आहे. त्याचे अर्धे शरीर मानवाचे, तर अर्धे घोड्याचे. पोप आणि त्याची प्रभावळ ह्यांवर हल्ला करण्याचा उद्देश या रोमान्समध्ये दिसतो. फिलीप द थाउन ह्या अँग्लो-नॉर्मन धर्मोपदेशकाने काही पशुकथा लिहिल्या आहेत. फ्रेंच भाषेतील पशुकथांचा हा सर्वप्राचीन नमुना होय. ह्या कथा बाराव्या शतकाच्या आरंभी लिहिल्या गेलेल्या असून त्या पद्यमय आहेत. त्या पशुकथांचे नैतिक तात्पर्यही त्या कवीने दिलेले आहे.
पद्याच्या माध्यमातून विविध विषयांवर उद्बोधक लेखन करण्याची प्रथा लवकरच पडल्याचे दिसून येते. पद्यमय ज्ञानकोशही रचिले गेल्याचे दिसते. तेराव्या शतकात गोत्ये (मेत्सचा गोत्ये म्हणून प्रसिद्ध) ह्याने असा एक ज्ञानकोश रचिला. लिमाज द्यू माँद हे ह्या कोशाचे नाव. फ्लॉरेन्समधील एक विद्वान व मुत्सद्दी ब्रूनेत्तो लातीनी ह्यानेही फ्रेंचमध्ये लिव्ह्र द्यू त्रेझॉर ह्या ज्ञानकोशाची रचना केली. काव्यशास्त्रावरील काही ग्रंथही लिहिले गेले.
नाटक : ग्रीक नाटकाप्रमाणेच फ्रेंच नाटकही काही धार्मिक विधींतून आकारास आले. ‘मिराक्ल’ (मिरॅकल प्ले वा अद्भुत नाटक) आणि ‘मिस्तॅर’ (मिस्टरी प्ले वा रहस्यनाटक) हे अगदी आरंभीचे नाट्यप्रकार.
एखाद्या धार्मिक वा अन्य प्रकारच्या आख्यायिकेवर मिराक्लची उभारणी झालेली असे. कुमारी मेरीच्या वा एखाद्या संताच्या अद्भुतपणे घडून आलेल्या हस्तक्षेपामुळे पश्चात्तापदग्ध व्यक्तींच्या जीवनाचे भले होणे, हा अशा नाटकातील मुख्य प्रसंग असे. नाटकांतील व्यक्तिरेखा सरदारवर्गातील, सर्वसामान्य लोकांतील अथवा धर्मोपदेशकांपैकीही असत. मिस्तॅरची रचना बायबलमधील कथांच्या आधारे केली जाई. झां बॉदेल आणि न्यूत्बफ हे दोघे आरंभीचे फ्रेंच नाटककार. त्यांनी लिहिलेली अनुक्रमे ज द सँ निकॉला (सु. १२००) आणि मिराक्ल द तेओफील (सु. १२६१) ही अद्भुत नाटके म्हणजे ह्या नाट्यप्रकाराची उपलब्ध असलेली सर्वांत प्राचीन उदाहरणे होत. ‘क्रँफेरी द ला पास्याँ’ नामक नाटकमंडळ्या मिस्तॅर ह्या प्रकारातली नाटके रंगभूमीवर आणीत. मिस्तरच्या प्रयोगासाठी भव्य रंगमंचाची आवश्यकता असे; अनेक दृश्ये त्यात समाविष्ट असत; त्यात भाग घेणाऱ्या नटांची संख्याही मोठी असे आणि तो अनेक दिवस चाले. आर्नूल ग्रेबांचे मिस्तॅर द ला पास्याँ (सु. १४५१) आणि शां मीशेलचा पास्याँ (१४८६) हे मिस्तॅर फार प्रसिद्ध होते.
‘सोती’ हा आणखी एक उल्लेखनीय नाट्यप्रकार. हा एक प्रकारचा उपरोधप्रचुर फार्स. सामाजिक चालीरीती, राजकीय घटना ह्यांवर त्यात टीका असे. हे फार्स करणाऱ्या वेगळ्या नाटकमंडळ्या असत. त्यांना सॉसिएते ज्वाय्यझ असे नाव होते. ल ज द्यू प्रँस दे सो ए मॅर सॉत ही प्येयर ग्रँगॉरची (१४७५ ?–१५३८) सोती विख्यात आहे.
ज्यांना निव्वळ फार्स वा प्रहसन म्हणता येईल अशा नाट्यकृतींत ला फार्स द मॅत्र पातलँ (सु. १४६५) हा विशेष यशस्वी ठरला. ह्याचा लेखक अज्ञात आहे. गुंतागुंतीचे कथानक आणि कुशल व्यक्तिरेखन ही ह्या फार्सची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये. आज आपणास उपलब्ध असलेल्या सु. शंभर प्रहसनांपैकी बहुतेकांची रचना पंधराव्या शतकात झालेली असून काही थोडी प्रहसने चौदाव्या शतकाच्या अखेरीस लिहिली गेली आहेत.
इतिहासलेखन : लॅटिन इतिवृत्तांची पद्यमय फ्रेंच रूपांतरे आरंभी झालेली दिसतात. रॉबेअर वास (बारावे शतक) आणि द सँत मॉर बन्वा (बारावे शतक) ह्यांची नावे ह्या संदर्भात उल्लेखनीय. वासचे रॉमां द ब्र्युत किंवा जॅस्त दे ब्रताँ हे इतिवृत्त जेफ्री ऑफ मॉनमथ (बारावे शतक) ह्या इंग्रज इतिवृत्तकाराने लिहिलेल्या इस्तोरिया रेगूम ब्रितानिॲवर आधारलेले असून त्यात मिनचा इतिहास आहे. रॉमां द रू हा नॉर्मंडीच्या ड्यूकांचा इतिहास. हळूहळू गद्य आणि स्वतंत्र इतिवृत्ते लिहिली जाऊ लागली. फ्रान्सच्या आरंभीच्या काही राजांची माहिती ग्रांद क्रॉनीक द फ्रांसमध्ये मिळते. प्रीमत नावाच्या एका संन्याशाने लॅटिन इतिवृत्तांच्या आधारे केलेला हा फ्रेंच अनुवाद (१९७४). फ्रेंचमधील हा पहिला महत्त्वाचा इतिहासग्रंथ मानला जातो.
झॉफ्र्वा द व्हीलार्द्वँ (सु. ११५२–सु. १२१२) ह्याच्या इतिहासलेखनाचा प्रयत्न विशेष लक्षणीय. काँकॅत द काँस्तांतिनॉप्ल ह्या आपल्या गद्यग्रंथात त्याने चौथ्या धर्मयुद्धाचा इतिहास दिलेला आहे. एक योद्धा, मुत्सद्दी, सल्लागार अशा वेगवेगळ्या नात्यांनी त्याने चौथ्या धर्मयुद्धात भाग घेतलेला होता. ह्या धर्मयुद्धात ख्रिस्ती धर्माच्या संरक्षणाचे नाव घेणाऱ्यांनी ख्रिस्ती बायझंटिन साम्राज्यावरच आघात केला होता. झॉफ्र्वा द व्हीलार्द्वँ ह्याने त्याबाबतचा खुलासा आणि समर्थन देण्याची भूमिका घेतलेली दिसते. वेधक, चित्रमय शैलीत लिहिलेला हा इतिहास म्हणजे गद्यात लिहिलेले शांसाँ द जॅस्त होय, असे म्हटले जाते; आणि ह्या इतिहासलेखनाचा घाट तसा आहेही. झॉफ्र्वा द व्हीलार्द्वँ ह्याच्या निवेदनातून स्पष्टवक्तेपणाबरोबरच एक प्रकारच्या तळमळीची प्रचीती येते. मध्ययुगातील उत्तम गद्यग्रंथांत त्याच्या इतिहासाचा समावेश होतो.
या काळातच झां सीर द झ्वँव्हील (सु. १२२४–१३१७), ⇨ झां फ्र्वासार (सु. १३३७–सु.१४०४) आणि कॉमीन (सु. १४४६–सु. १५११) हे श्रेष्ठ इतिहासकार होऊन गेले. संत लूई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवव्या लूईचा झ्वँव्हील हा खास सेवक तसाच मित्रही होता. इस्त्वार द सँ लूई (इं. शी. हिस्टरी ऑफ सेंट लूई) ह्या नावाने त्याने आपल्या आठवणी १३०९ मध्ये पूर्ण केल्या. संत लूईच्या जीवनवृत्तांताबरोबरच त्याच्या राजवटीचा इतिहासही झ्वँव्हीलने दिलेला आहे. चिडखोर, परंतु धर्मनिष्ठ, उदार आणि विनोदप्रिय असा संत रचा स्वभाव त्याने रेखाटला आहे. साध्यासुध्या पण प्रत्ययकारी अशा शैलीत ह्या आठवणी त्याने लिहिल्या आहेत. ईजिप्तची प्राकृतिक वैशिष्ट्ये, नाईल नदीला आलेला पूर, बदाउन, मामलुक इत्यादींची जिवंत वर्णनेही ह्या आठवणींत आलेली आहेत.
फ्र्वासारच्या क्रॉनीकमध्ये, फ्रान्स आणि इंग्लंड ह्यांच्यात झालेल्या शतवार्षिक युद्धाच्या (१३३७–१४५३) पूर्वार्धातील महत्त्वाच्या घटनांचे निवेदन मुख्यतः केलेले आहे. वासारच्या शैलीतही चित्रमयता आणि नाट्य ह्यांचा प्रत्यय येतो. इंग्लंड, इटली आदी देशांचा वासारने प्रवास केला होता. त्याचप्रमाणे उमराववर्गाशीही त्याचा निकटचा संबंध होता. विविध प्रकारची माहिती त्याच्या ग्रंथात वैपुल्याने आढळते.
कॉमीनने लिहिलेल्या आठवणींचे आठ खंड असून त्यांतील पहिले सहा अकराव्या लूईच्या कारकीर्दीस वाहिलेले असून त्यांची रचना १४८९-९० मध्ये झाली असल्याची शक्यता आहे. नंतरच्या दोन खंडांत फ्रान्सचा राजा आठवा चार्ल्स ह्याने इटलीवर केलेल्या स्वारीचा वृत्तांत आहे. हे दोन खंड १४९७-९८ मध्ये रचिले गेले असावेत. ऐतिहासिक प्रसंग कॉमीन अत्यंत जिवंतपणे रंगवितो आणि त्यांतील कार्यकारणसंबंधांचा विचार करून त्यांचे मूल्यमापन करतो. काही अभ्यासकांच्या मते फ्रान्सच्या पहिल्या इतिहासकाराचा मान कॉमीनलाच देता येईल,
सोळावे शतक : फ्रेंच साहित्यातील हा प्रबोधनकाळ. ह्या शतकातील साहित्य विपुल असून ते विविधतेने नटलेले आहे. मध्ययुगाचा अस्त होऊन प्रबोधनाचे वारे ह्याच शतकात यूरोपात वाहू लागले [→ प्रबोधनकाल]. पंधराव्या शतकाच्या अखेरीस, १४९४ मध्ये फ्रान्सचा राजा आठवा चार्ल्स ह्याने नेपल्स जिंकण्यासाठी इटलीत प्रवेश केला. इटलीचा काही प्रदेश पादाक्रांत करण्याच्या हेतूने फ्रेंचांचा इटलीशी जो संबंध आला, त्याने त्यांच्या सांस्कृतिक जीवनावर लक्षणीय स्वरूपाचा परिणाम घडवून आणला. दान्ते, पीत्रार्क, मॅकिआव्हेली ह्यांच्या साहित्याने फ्रेंच प्रभावित झाले. प्राचीन ग्रीक-रोमन अभिजात साहित्यकृतींच्या साक्षेपी अभ्यासाची परंपरा इटलीत होतीच; त्यामुळे होमर, सॉफोक्लीझ, हीरॉडोटस, प्लेटो, प्लूटार्क ह्यांसारखे साहित्यिक, इतिहासकार, तत्त्वज्ञ ह्यांच्या कर्तृत्वाचा परिचयही फ्रेंचांना झाला.
फ्रेंच प्रबोधनाची एकूण तीन पर्ने मानली जातात. पहिले पर्व फ्रान्सचा राजा पहिला फ्रांसीस (कार. १५१५–४७) ह्याच्या राज्याभिषेकाबरोबरच सुरू झाले. ह्या राजाने नव्या विचारांचे स्वागत केले; साहित्यकलांना उत्तेजन दिले. यूरोपातील ख्रिस्ती धर्मसुधारणेच्या चळवळी ही यूरोपीय प्रबोधनामागील एक चैतन्यदायी शक्ती होती. पहिल्या फ्रांसीसने धर्मसुधारकांना आश्रय दिला. ह्या राजाच्या कारकीर्दीतच ‘कॉलेज द लॅक्तर रवाय्यो’ (आताचे कॉलेज द फ्रांस ) ह्या विद्यालयाची स्थापना झाली. ग्रांथिक लॅटिनबरोबरच ग्रीक आणि हिब्रू ह्या भाषांचे अध्ययन ह्या ज्ञानसंस्थेत होऊ लागले.
धर्मसुधारणेच्या दृष्टीने प्राचीन ग्रंथसंहितांच्या विशुद्ध रूपांचा शोध घेण्याचा प्रयत्न धर्मसुधारकांप्रमाणेच पंडितांनीही केला. गीयोम बुदे ह्या फ्रान्सच्या राजग्रंथपालाने ग्रीक तत्त्वज्ञान आणि ख्रिस्ती धर्म ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. कॅथलिक धर्मसंस्थेत राहूनच तिची सुधारणा करण्याची धडपडही झाली. ज्ञानलालसा, साहित्य-कलांचा विकास घडवून आणण्यासाठी झालेले प्रयत्न आणि धर्मसुधारणा ह्यांचे प्रवाह ह्या पहिल्या पर्वात समांतर जाताना दिसतात.
फ्रेंच प्रबोधनाचे दुसरे पर्व १५३४ पासून सुरू झाले, असे मानतात. १५३४ ते १५४७ ही पहिल्या फ्रांसीसच्या कारकीर्दीची अखेरची सु. १३ वर्षे आणि दुसऱ्या हेन्रीच्या (कार. १५४७–५९) कारकीर्दीची सु. १२ वर्षे असा एकूण सु. २५ वर्षांचा हा कालखंड. १५३४ मध्ये पहिल्या फ्रांसीसच्या धर्मविषयक धोरणात महत्त्वाचे परिवर्तन घडून आले. काही अतिरेकी प्रॉटेस्टंट पंथीयांच्या विरोधामुळे चिडून जाऊन राजाने त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली. जॉन कॅल्व्हिनसारख्या धर्मसुधारकाला पॅरिस सोडून स्वित्झर्लंडमध्ये जावे लागले. धर्मसुधारणावाद्यांची भूमिका दुराग्रही बनली. तिला कंटाळून काही साहित्यिक त्यांच्यापासून दुरावले. वाङ्मयीन प्रबोधन आणि धर्मसुधारणा ह्याचे मार्ग ह्या पर्वात भिन्न झालेले दिसतात.
प्रबोधनाच्या तिसऱ्या पर्वात नववा चार्ल्स (कार. १५६०–७४), तिसरा हेन्री (कार. १५७४–८९) आणि चौथा हेन्री (कार. १५८९–१६१०) ह्यांच्या राजवटी झाल्या. हा काळ कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट ह्याच्यातील तीव्र धार्मिक संघर्षाचा. त्याचा परिणाम साहित्यिकांवरही झाल्यावाचून राहिला नाही. आपापल्या पंथाचा पक्ष घेऊन लिहिण्याची प्रवृत्ती प्रकर्षाने दिसू लागली. १५६० ते १५९८ पर्यंत ह्या संघर्षाने फ्रान्समधील वातावरण प्रक्षुब्ध ठेविले होते. धर्मवेडाबरोबरच हिंसा- चारालाही अपरिहार्यपणे ऊत आला होता.
काव्य : प्रबोधनकालीन फ्रेंच साहित्याच्या वैपुल्याच्या आणि त्यातील विविधतेचा प्रत्यय काव्याच्या संदर्भात विशेत्वाने येतो. ⇨ क्लेमां मारो (१४९६–१५४४) ह्या श्रेष्ठ कवीची कविता त्या दृष्टीने लक्षणीय आहे. ल तांप्ल द क्युपिदाँ (इं. शी. क्युपिड्स टेंपल) सारखी दीर्घ काव्ये जशी त्याने रचली त्याप्रमाणे कॉकालान (इं. शी. कॉक अँड बुल स्टोरीज) सारखी लघुकाव्येही लिहिली. एक्लॉग, राँदो, शांसाँ, विलापिका, बॅलड असे काव्यप्रकारही त्याने हाताळले. काही पद्यमय पत्रांची रचनाही त्याने केलेली आहे. लादोलेंसांस क्लेमांतीन (१५३२, इं. शी. ॲडालेसन्स ऑफ क्लेमां) ह्या त्याच्या काव्यसंग्रहाने श्रेष्ठ कवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. विविध छंदांवरील त्याच्या प्रभुत्वाची प्रचीतीही त्यातून आली. ह्या काव्यसंग्रहातील बऱ्याच कविता रूपकात्मक असून पुराणकथांचा वापरही त्यात वैपुल्याने केलेला आहे. साधी, परंतु अत्यंत सफाईदार शैली हे मारोच्या काव्यरचनेवे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. एक प्रकारचा प्रसन्न नर्मविनोदही त्याच्या कवितांतून आढळतो. अस्ताला जाणारे व उदयाला येणारा प्रबोधनकाल ह्यांच्या संक्रमणकाळातील हा कवी असून त्याच्यावर मध्ययुगाचा प्रभाव अधिक जाणवतो. नाव्हारची राणी मार्गारीत हिने मारोला आश्रय दिला होता. ती स्वतः एक विदुषी होती. लॅटिन, इटालियन, स्पॅनिश आणि हिब्रू ह्या भाषांचा तिने अभ्यास केला होता. तिनेही काही काव्यरचना केलेली आहे. ⇨ प्येअर द राँसार (१५२४ – ८५) हा ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवी. मध्ययुगीन वाङ्मयीन परंपरा झुगारून देऊन फ्रेंच भाषा-साहित्याला नवे वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ⇨ ला प्लेयाद ह्या कविमंडळाच्या स्थापनेत रॉंसारने महत्वाची भूमिका बजावली होती. ह्या मंडळातील प्रमुख कवीही तोच होता. सुनीते, उद्देशिका, गीते, तात्विक चिंतनात्मक कविता अशी त्याची कविता वैविध्यपूर्ण आहे. ग्रीक, लॅटिन, आणि इटालियन कवींचा आदर्श प्लेयादसमोर होता ग्रीक पुराणकथांचेही त्यांना आकर्षण होते परंतु ह्या साहित्याचे सत्त्व पचवून कवी म्हणून आपली स्वतंत्र अशी प्रतिमा उभी करण्याचा रॉंसारचा प्रयत्न होता थोर इटालियन कवी पीत्रार्क ह्याच्या सुनीतरचनेचा आदर्श समोर ठेवूनही स्वतःला पीत्रार्कच्या प्रभावातून मुक्त करून घेणारा तो पहिला फ्रेंच कवी होता. अभिजात उद्देशिकेला अस्सल फ्रेंच पर्याय निर्माण करण्याचीही त्याची धडपड होती, अशी त्याच्या वाङ्मयीन कर्तृत्वाची प्रशस्ती समीक्षकांनी केलेली आहे. ऑद (इं. शी. ओड्स दोन माला १५५० १५५२), आमूर (इं. शी. लव्ह, दोनदा प्रकाशित १५५२ १५५३), इम्न (इं. शी. हिम्स, १५५५-५६) आणि दिस्कूर … (१५६२, इं. शी. डिस्कोर्स) हे त्याचे उल्लेखनीय काव्यसंग्रह. ओसंडून वाहणाऱ्या जीवनानंदाचा प्रत्यय त्यांतून येतो. फ्रेंचांचे महाकाव्य ला फ्रांसियाद (इं. शि. द फ्रांसियाद) निर्माण करण्याचा प्रयत्नही राँसारने केला पण तो पूर्णत्वास गेला नाही. ⇨ झोआकिम द्यू बेले (१५२५-६०), पॉंत्यूस द तियार (२१-१६०५), झां आंत्वान द बाईफ (१५३२-८९), एत्येन झॉदेल (१५३२-७३), रेमी बॅलो (१५२८-७७) आणि झां दोरा (१५०८-८८) हे प्लेयादमधील अन्य कवी होत.
झोआकिम द्यू बेले ह्याने १५४९ मध्ये प्लेयादचा जाहीरनामा प्रकाशित केला. ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यकृतींचा आदर्श फ्रेंच कवितेने समोर ठेवला पाहिजे, अशी भूमिका ह्या जाहीरनाम्यात मांडलेली होती. सुनीत उद्देशिका (ओड) फ्रेंचमध्ये आणण्याची आवश्यकताही त्यात प्रतिपादली होती. पीत्रार्कच्या धर्तीवर त्याने स्वतः काही सुनीते रचिली. ले रग्रॅ (१५५८, इं. शी. रिग्रेट्स) आणि ले झांतिकिते द रॉम, (१८५८, इं. शी. रोमन ॲन्टिक्विटिझ) हे त्याचे सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह असून त्यांतील सुनीते श्रेष्ठ दर्जाची आहेत. पॉंत्यूस द तियार ह्याने ॲरर आमुरझ (१५४९, १५५४ आणि १५५५) ह्या नावाने रचलेली सुनीतांची एक साखळी (सिक्केन्स) उल्लेेखनीय आहे. फ्रेंच भाषेतील आरंभीच्या सुनीतरचनेत झोआकिम द्यू बेले आणि पॉंत्यूस द तियार ह्यांचया सुनीतांचा अंतर्भाव केला जातो. बाईफ हा एक सामान्य कवी. लेझामूर द मेलिन (१५५२, इं. शि. लव्ह्स ऑफ मेलीन) ह्या नावाने प्रसिद्ध असलेली त्याची सुनीतसाखळी उल्लेखनीय आहे. एत्येन झॉदेलच्या भावकवितांत चिंतनशीलता आणि एक प्रकारचा जोम आढळतो. रेमी बॅलो ह्याने काही वर्णनात्मक कविता रचल्या काही काव्यांची भाषांतरे केली. त्याच्या कवितांतून नाजूक संवेदनशीलतेचा प्रत्यय येतो. प्लेयादमधील दोराचे महत्व मुख्यतः स्फूर्तिदात्याचे आहे. अभिजात साहित्यकृतींबाबतचा प्लेयादचा दृष्टिकोण घडविण्यातही त्याचे व्यक्तिमत्व प्रेरक ठरले.
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट ह्यांच्यात निर्माण झालेल्या संघार्षामुळे उपरोधप्रचुर कविता लिहिल्या गेल्या. ह्या संदर्भात टेऑडॉर आग्रीप्पा दोबिन्ये (१५५२ – १६३०) हा कवी विशेष उल्लेखनीय आहे. ले त्राजीक (लेखनारंभ १५७७, प्रकाशित १६१६) ह्या सु. १० हजार ओळींच्या सप्तखंडात्मक काव्यात त्याने धर्मयुद्धे, प्रशासनातील अपप्रवृत्ती, तत्कालीन चालीरीती इत्यादींवर उपरोधप्रचुर भाष्य केलेले आहे. दोबिन्ये हा कॅल्व्हिन पंथीय असल्यामुळे त्याने धर्मसुधारकांची बाजू घेतलेली आहे. ह्या काव्यातील अनेक ओळी फ्रेंच कवितेच्या इतिहासात चिरस्थायी झालेल्या आहेत. गीयोम द बार्तास (१५४४ – ९०) आणि झां द स्पॉंद (१५५७ – ९५) हे अन्य काही प्रॉटेस्टंट कवी होत. ला प्रमिॲर समॅन, (१५७८, इं. शी. फर्स्ट वीक ऑफ क्रीएशन) हे बार्तासचे सर्वोत्कृष्ट काव्य. ईश्वराकडून होणाऱ्या निर्मितीच्या प्रक्रियेचे सात दिवस ह्या काव्यात त्याने वर्णिले. त्या काळी उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक माहितीचा बार्तासने आपल्या ह्या काव्यासाठी उपयोग करून घेतला आहे. झां द स्पॉंद हा मूळचा प्रॉटेस्टंट तथापि तो कॅथलिक झाला. प्रबोधनाच्या उत्तरकालात फ्रेंच कवितेत ज्या गूढवादी प्रवृत्ती दिसून येऊ लागल्या, त्यांचा प्रत्यय स्पॉंदच्या कवितांतून येतो.
नाटक : सोळाव्या शतकात विपुल नाट्यलेखन झाले. त्यात धार्मिक नाटकांचा मोठा भाग आहे परंतु त्या नाटकांची गुणवत्ता मात्र ऱ्हासाला लागलेली दिसते. पंधराव्या शतकात अद्भुत आणि गूढनाट्यांना (मिरॅकल प्ले आणि मिस्टरी प्ले) जो चांगला दर्जा होता तो ह्या शतकात राहिला नाही. ही धार्मिक नाटके करणाऱ्या ज्या नाटकमंडळ्या होत्या त्यांत ‘कॉंफ्रेरी द ला पास्यॉं’ ही अग्रगण्य होती. धार्मिक संस्थांपासून ह्या नाटकमंडळ्या मुक्त झालेल्या होत्या परंतु धार्मिक नाटकांत नको तेथे प्रहसनात्मक आणणे, ज्यांच्या आधारे उद्बोधन व्हावे अशी अपेक्षा, त्या बाबीच हास्यास्पद करून सोडणे असे प्रकार ह्या नाटकमंडळ्यांकडून होऊ लागल्यामुळे ‘कॉंफ्रेरी ’सारख्या प्रमुख नाटकमंडळीलाही धार्मिक नाटके करण्यास बंदी करण्यात आली (१५४८). सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत धार्मिक नाटक क्षीणच होत गेले. तथापि ग्रीक-लॅटिन अभिजात नाट्यकृतींची इटालियन भाषांतरे फ्रान्समध्ये येऊ लागली आणि त्यांचा फ्रेंचांच्या नाट्यदृष्टीवर लक्षणीय परिणाम घडून आला. अभिजात नाट्यकृतींची फ्रेंच भाषांतरे तर होऊ लागलीच परंतु त्या नाट्यकृतींचा आदर्श समोर ठेऊन काही स्वतंत्र नाटके लिहिली गेली. त्यांत एत्येन झॉदेल ह्याने लिहिलेल्या क्लेओपात्र काप्तीव्ह (१५५२) आणि यूझेअन (१५५२) ह्यांचा अंतर्भाव होतो. क्लेओपात्र काप्तीव्ह ही फ्रेंचमधील पहिली शोकात्मिका असून यूझेअन ही त्या भाषेतील पहिली सुखात्मिका होय. ह्या नाट्यकृतींत फारशी प्रयोगशीलता नाही. रॉबेअर गार्न्ये (१५३४-९०) ह्याने ब्रादामांत (१५८२) हे नाटक लिहून फ्रेंचमध्ये शोकसुखात्मिकेचा (ट्रॅजिकॉमेडी) आरंभ केला. गार्न्येच्या नाट्यलेखनावर सेनिकाचा मोठा प्रभाव होता. बायबल, अभिजात साहित्यकृती आणि मध्ययुगीन साहित्य ह्यांतून त्याने आपल्या नाट्यकृतींचे विषय निवडले. त्याच्या अन्य नाट्यकृतींत बायबलमधील एका कथेवर आधारलेली ले ज्यूईव्ह (१५८३) ही विशेष यशस्वी ठरली. एलिझाबेथकालीन इंग्रज नाटककारांवर-विशेषतः टॉमस किडवर-गार्न्येचा प्रभाव आढळतो, प्येअर द लारीव्हे (सु. १५४०-१६१२) हा नाटककार इटालियन परंतु त्याने फ्रेंचमध्ये लेखन केले. १५७९ मध्ये सहा आणि १६११ मध्ये तीन अशा एकूण नऊ सुखात्मिका त्याने लिहिल्या. त्यांत लेझेस्प्री (१५७९) ही विशेष प्रसिद्ध आहे. विख्यात रोमन नाटककार टेरेन्स ह्याच्या अडेल्फी ह्या सुखात्मिकेचे कथानक लेझेस्प्रीच्या कथानकाशी जुळणारे आहे. लारीव्हेची प्रत्येक सुखात्मिका कोणत्या तरी इटालियन सुखात्मिकेवरून घेतलेली आहे व अनेक इटालियन सुखात्मिका ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यकृतींवर आधारलेल्या असल्यामुळे त्यांचेही अनुकरण लारीव्हेकडून अपरिहार्यपणे होताना दिसते.
गद्य : कथा : सोळाव्या शतकातील फ्रेंच गद्यात ज्यांनी मोलाची भर घातली त्या साहित्यिकांत ⇨ फ्रांस्वा राब्ले (१४९४ ? – सु. १५३३) ह्या श्रेष्ठ मानवतावादी उपरोधकाराचा अंतर्भाव होतो. राब्ले हा धर्मसुधारकांचा पुरस्कर्ता व ग्रीक-रोमन अभिजात साहित्याचा व्यासंगी. तथापि त्याची जागतिक कीर्ती पांताग्रुयेल आणि गार्गातुआ ह्या भव्य व्यक्तिमत्त्वांभोवती त्याने विणलेल्या दीर्घकथांवर मुख्यतः अधिष्ठित आहे. पांताग्रुयेल (१५३२ वा १५३३), गार्गांतुआ (१५३४), तियॅर लिव्ह्र (१५४६, इं. शी. थर्ड बुक), कार लिव्ह्र (१५५२, इं. शी. फोर्थ बुक) अशा खंडांत ह्या दीर्घकथा विभागलेल्या आहेत. ह्या खंडांखेरीज सॅकियॅम लिव्ह्र (१५६४, इं. शी. फिफ्थ बुक) हा एक खंडही ह्याच ग्रंथसाखळीतला मानला जातो. तथापि तो खरोखरी राब्लेने लिहिला किंवा कसे, ह्याबाबत वाद आहे. वैविध्यपूर्ण विनोद आणि निखळ, निर्भय वास्तववादी दृष्टी ही राब्लेच्या ह्या साहित्यकृतींची महत्वाची वैशिष्ट्ये होत. त्याचप्रमाणे उत्कट ज्ञानलालसा, असीम जीवनानंद आणि तीव्र कल्पनाशक्ती ह्यांचाही प्रत्यय त्यांतून येतो. फ्रेंच साहित्यातील वास्तववादी मुळे राब्लेच्या ह्या साहित्यकृतींत आढळतात. राब्लेचा विनोद अनेकदा ग्राम्य वाटत असला, तरी उपरोधाचे वाहन म्हणून तो अत्यंत प्रभावी ठरलेला आहे. पांताग्रुयेल आणि गार्गांतुआ ह्यांच्यावरील दीर्घकथांच्या उपर्युक्त खंडातून दिसून येणारी वाङ्मयीन गुणवत्ता सर्वत्र सारखी मात्र नाही.
ह्या काळातील अन्य कथकारांत मार्गरीत द नाव्हारे (१४९२-१५४९) आणि नोएल द्यू फेल (१५२०-९१) हे विशेष उल्लेखनीय. मार्गरीतच्या नावावर हेप्तामेरॉन हा कथासंग्रह मोडतो. विख्यात इटालियन साहित्यिक जोव्हान्नी बोकाचीओ ह्याच्या देकामेरॉन ह्या कथासंग्रहाचा आदर्श मार्गरीतसमोर असावा, असे दिसते. परंतु हेप्तामेरॉनमधील कथांतील मौलिकता लक्षात घेता, निव्वळ अनुकरणाची दृष्टी मार्गरीतने ठेवलेली नाही, हे दिसून येते. नोएल द्यू फेल ह्याचे प्रोपो ऱ्युस्तीक (१५४७, इं. शी. रस्टिक टॉक) आणि बालिव्हॅनरी हे दोन छोटे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांत ग्रामीण जीवनाचे चित्रण अत्यंत वेचकपणे करण्यात आले आहे. नोएल द्यू फेलवर असलेला राब्लेचा प्रभाव मात्र स्पष्टपणे प्रतययास येतो. गीयोम फेलवर असलेला राब्लेचा प्रभाव मात्र स्पष्टपणे प्रत्ययास येतो. गीयोम बूशेत (मृ. १६०७) ह्याच्या कथांचे स्वरूप विविध विषयांवर मारलेल्या गप्पा, असे आहे.
इतिहासलेखन : इतिहासविषयक ग्रंथांत इस्त्वार द्यू शव्हालिए द बाय्यार (सु. १५२४), दिस्कूर पॉलितीक ए मिलितॅर (१५८७) व कॉमांतॅर (१५९२) ह्यांसारख्या काही उल्लेखनीय ग्रंथांचा समावेश होतो. इस्त्वार द्यू ….. हा ग्रंथ बहुधा झाक द्यू माय्य ह्याने रचिलेला असून त्यात आठवा चार्ल्स, १२ वा लुई आणि पहिला फ्रान्सिस ह्यांनी इटलीविरूद्ध आखलेल्या लष्करी मोहिमांत भाग घेतलेल्या कॅप्टन प्येअर द्यू तेराय बायर ह्याच्या पराक्रमांचे वर्णन आहे. फ्रांस्वा द ला नू (१५३१-९१) ह्याच्या दिस्कूर …… मध्ये त्याच्या काही आठवणी, तसेच नेमस्तपणे व्यक्त केलेले राजकीय विचार आढळतात. ला नूची चिंतनशील वृत्ती त्याच्या लेखनातून स्पष्टपणे प्रत्ययास येते. ब्लेझ द मॉंलूक (१५०२-७७) हा अनेक युद्धे लढलेला लढवय्या. त्याने विविध युद्धांतील आपल्या आठवणी कॉमांतॅर ह्या नावाने लिहून काढल्या. सैन्यातील तरुण अधिकाऱ्यांना हे लेखन मार्गदर्शक ठरावे अशी त्याची इच्छा होती. टेऑडॉर आग्रीप्पा दोबीन्ये ह्या इतिहासलेखकाने इस्त्वार युनिव्हॅर्सॅल (खंडशः प्रकाशित, १६१६-२०) हा ग्रंथ उतारवयात लिहिला असला. तरी त्याचा लेखनातला जोम जाणवतो. इतिहास आणि संस्मरणिका लिहिणाऱ्या लेखकांत प्येअर द ब्रांतोम (१५४०-१६१४) ह्याचे नाव विशेष उल्लेखनीय. त्याची शैली सहजसुंदर आणि जिवंत आहे. सोळाव्या शतकातील सैनिकी आणि दरबारी जीवनावर त्याच्या संस्मरणिकांनी प्रकाश टाकला आहे.
राजकीय स्वरूपाचे लेखन करणाऱ्यात झां बॉदँ (१५३०-९६) ह्याचा उल्लेख आवश्यक. ला रेप्युब्लीक (१५७६) ह्या त्याच्या प्रसिद्ध ग्रथांत त्याने सर्वंकष राजसत्तेची तरफदारी केलेली आहे. अर्थात ही राजसत्ता संयमाने आणि नेमस्तपणे वापरली पाहिजे, असेही त्याने प्रतिपादिले आहे. गीयोम द्यू-व्हेअर (१५३५-१६२१) हा नीतिवादी. त्याच्या लेखनातून त्याची तात्त्विकतेकडे असलेली ओढ स्पष्टपणे दिसून येते. समर्थ आणि न्यायनिष्ठ सरकारची आवश्यकता त्याने आपल्या लेखनातून नमूद केलेली आहे. ख्रिस्ती धर्म आणि स्टॉइसिझम यांचा समन्वय साधण्याचा त्याने प्रयत्न केला. ला सातीर मेनिप्पे (१५९४) हे गद्यपद्यात्मक, उपरोधप्रचुर पुस्तपत्र, धर्मवेडे आणि संकुचित दृष्टीचे राजकारणी ह्यांच्यावर त्यात टीका आहे. प्यअर लर्वा, झाक झीलो, फ्लॉरां क्रेत्यां, निकोलस रापँ आणि प्येअर पीतू ह्या लेखकांनी परस्परांच्या सहकार्याने हे पुस्तपत्र लिहिले.
ईश्वरविद्याविषयक लेखनाच्या संदर्भात ⇨ जॉन कॅल्व्हिन (१५०९-६४) ह्याचे नाव सर्वाधिक महत्वाचे. ‘इन्स्टिट्यूट्स ऑफ द क्रिश्चन रिलिजन’ (इं. शी.) हा त्याचा ग्रंथ फ्रान्समधील धर्मसुधारणाचळवळीला मार्गदर्शक ठरलाच तथापि ह्या ग्रंथाने फ्रेंच भाषेतील उत्कृष्ट गद्यलेखनाचा एक आदर्शही निर्माण केला. हा ग्रंथ कॅल्व्हिनने लॅटिनमध्ये लिहून प्रसिद्ध केला (१५३६). नंतर त्याने स्वतःच ह्या ग्रंथाचे फ्रेंचमध्ये भाषांतर केले.(‘अँस्तित्युसिआँ द ला रलिजिआँ क्रेतिॲन’, १५४१). प्येअर व्हीरे (१५११-७१) ह्याने काही उपरोधप्रचुर पुस्तपत्रे लिहिली. प्येअर शारॉं (१५४१-१६०३) ह्याने ले त्र्वा व्हेरिते (१५९३) ह्या ग्रंथातून ईश्वराचे अस्तित्व, ख्रिस्ती धर्माचे आणि कॅथलिक पंथांचे श्रेष्ठत्व ह्यांसारख्या विषयांचे प्रतिपादन केले.
ह्या शतकातील साहित्यात ⇨ मीशेल एकेम द मॉंतेज (१५३३-९२) ह्या निबंधकाराचे एक वेगळे महत्व आहे. धर्ममतांच्या गलबल्यापासून हेतुपुरस्सर बाजूला राहून समंजसपणा व सहिष्णुता ह्यांचा एक आदर्शच त्याने घालून दिला. मॉंतेनकृत यॅसॅ (१५८०-८८) म्हणजे फ्रेंच प्रबोधनाच्या उत्तरार्धाचे एक परिपक्व फळच होय. ह्या विविध विषयांवरच्या निबंधांतूनच मॉंतेनच्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. ‘क सॅ ज ?’ म्हणजे ‘मला काय माहीत?’ हे त्याचे ब्रीदवाक्य होते. प्रत्येक माणसाने स्वतःला ओळखले पाहिजे, अशी त्याची धारणा होती आणि मॉंतेनचे निबंधलेखन हे एक प्रकारचे वाङ्मयीन आत्मशोधनच होते. मॉंतेनची प्रवृत्ती संशयवादी होती त्यामुळे कोणत्याही मताला किंवा दृष्टीकोणाला दुराग्रही वृत्तीने चिकटून राहणे त्याला मान्य नव्हते इतरांच्या मताची नेमकी कदर केली पाहिजे, असे त्याला वाटे. निसर्गाचे माहात्म्य त्याने मानले, त्याचप्रमाणे मानवी प्रतिष्ठेचे महत्त्वही त्याने सांगितले. विचाराप्रमाणेच मॉंतेनची भाषाही संपन्न व प्रभावी आहे.
सतरावे शतक : ह्या शतकांमध्ये चौथा हेन्री ( कार. १५८९-१६१०), तेरावा लूई ( कार. १६१० – ४३) आणि चौदावा लूई ( कार. १६४३-१७१५) अशा तीन राजांची फ्रान्सवर अनुक्रमे सत्ता होती. सोळाव्या शतकात धर्मसुधारणेचे आंदोलन आणि प्रॉटेस्टंट-कॅथलिकांमधील संघर्ष ह्यामुळे फ्रान्स अशांत, प्रक्षुब्ध होता. तथापि चौथ्या हेन्रीच्या कारकीर्दीत फ्रान्समध्ये स्थैर्य व शातंता प्रस्थापित झाली. चौथ्या हेन्रीने सरदारांच्या सत्तेला काही प्रमाणात आळा घातला होताच परंतु त्याच्याही पुढे जाऊन तेराव्या लूईच्या कारकीर्दीत, त्याचा समर्थ मुख्यमंत्री कार्दीनाल द रीशल्य (१५८५-१६४२) ह्याने राजाच्या सरदारांना आपल्या कह्यात आणून त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले त्यामुळे चौदाव्या लूईला सत्ताग्रहणाच्या वेळी एकसंघ आणि संघटित असे राज्य मिळाले. कला आणि साहित्य ह्यांत खास रस घेणारा एक नवा वर्ग फ्रान्समध्ये- विशेषतः पॅरिसमध्ये – उदयाला आलेला होता. १६२५ मध्ये रीशल्यने फ्रेंच अकादमीची स्थापना केली. ह्या अकादमीत चाळीस सदस्य होते. फ्रेंच भाषेचे शुद्धीकरण करणे, तिच्या व्याकरणाचे नियम निश्चित करणे आणि तिचा शब्दकोश तयार करणे ही फ्रेंच अकादमीची उद्दिष्टे होती. ह्या अकादमीचा एक सदस्य व्होझ्ला (१५८५-१६५०) ह्याने रमार्क स्यूर ला लांग फ्रांसेझ (१६४७) हा प्रबंध लिहुन फ्रेंच भाषेला नियमबद्ध आणि प्रमाण रूप देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
ह्या शतकाच्या आरंभी ⇨ फ्रांस्वा द मालेर्ब (१५५५-१६२८) ह्या कवीने गेल्या शतकात प्रभावी ठरलेल्या ला प्लेयाद ह्या कविमंडळाच्या काव्यविषयक भूमिकेला प्रखर विरोध केला. कवितेसंबंधीची आपली भूमिका मांडली. विशुद्ध भाषा नेमकी, परिमित परंतु समर्थ शब्दकळा ह्यांचा त्याने पुरस्कार केला. केवळ अलंकृततेच्या जोरावर उभे करू नये कवितेत भावनात्मकतेपेक्षा बौद्धिकतेस प्राधान्य द्यावे काव्यरचनेच्या संदर्भात कठोर नियमबद्धता पाळली जावी, असे मालेर्बचे विचार होते.
काही मातबर आणि सुसंस्कृत स्त्रियांनी आपल्या सालॉंमधून वा दिवाणखान्यांतून विद्धान, कलाकार, साहित्यिक ह्यांच्या बैठकी आठवड्यातून एकदा घेण्याची प्रथा सुरू केली. सांस्कृतिक वातावरण चैतन्यदायी ठेवण्याचे कार्यही ह्या बैठकांनी केले. मार्कीझ द रांबूये ह्याची पत्नी कॅथरीन उर्फ मादाम रांबूये हिचा सालॉं- ओतेल द रांबूये-म्हणजे पॅरिसमधील एक प्रमुख बौद्धिक-सांस्कृतिक केंद्र. तेथे होणाऱ्या चर्चांनी आणि वादसंवादांनी फ्रेंच साहित्यावर लक्षणीय प्रभाव टाकला. भाषा व चालीरीती ह्यांच्यात नागरी सुसंस्कृतपणा आणि शिष्टता आणण्याचे प्रयत्न ह्या आणि अशा सालॉंमधून जोरदारपणे करण्यात आले. ‘प्रेसिय’ चळवळ ह्या नावाने ते ओळखले जातात. व्हँसां व्ह्वात्यूर (कवी), गेअझ द बाल्झॅक (पत्रलेखक), फ्रांस्वा द मालेर्ब (कवी), व्होझ्ला (वैयाकरणी) आदी मंडळी मादाम रांबूयेच्या सालॉंची सदस्य होती.
अशा सालॉंमधून चालू झालेल्या प्रेसिय चळवळीने शिष्टतेचा अतिरेक केला. दाताला दात म्हणण्याऐवजी ‘मुखातील फर्निचर’ म्हणणे, गालाला गाल म्हणण्याऐवजी ‘लज्जेची सिंहासने’ म्हणणे, असे प्रकार भाषेत होऊ लागले. अशा कृत्रिमतेमुळे उत्स्फूर्त वाङ्मयीन आविष्काराला बाध येऊ लागला. ⇨ रासीन, ⇨ मोल्येर ह्यांच्यासारख्या फ्रेंच साहित्यश्रेष्ठींनी ह्या प्रवृत्तीविरुद्ध आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती. तेऑफिल द व्ह्यो (१५९०-१६२६) सारख्या कवींनी मालेर्बच्या वाङ्मयीन हुकूमशाहीला निःसंदिग्धपणे विरोध केला होता. पॉल स्कारॉं (१६१०-६०) ह्याने प्रेसिय चळवळीकडून जोपासल्या जाणाऱ्या अतिरेकी शिष्टपणाचा निषेध करण्यासाठी जाणून बुजून अशिष्ट भाषेचा वापर केला.
आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून ख्याती पावलेला ⇨ रने देकार्त (१५९६-१६५०) हा फ्रेंच तत्त्वज्ञ आणि गणिती ह्याच शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेला. तत्त्वज्ञानाप्रमाणे गणितातही त्याने मौलिक भर घातली.
ह्या शतकात ⇨ ब्लेझ पास्काल (१६२३-६२) हा फ्रेंच गणितज्ञ, भौतिकीविज्ञ आणि धार्मिक तत्त्ववेत्ता होऊन गेला. अंतिक तत्त्वे ही हृदयालाच प्रतीत होतात व श्रद्धेनेच त्यांचा स्वीकार करावा लागतो तसेच ईश्वरी अनुग्रहामुळेच श्रद्धेचा स्वीकार केला जातो, असे पास्कालचे म्हणणे होते. रोमन कॅथलिक चर्चच्या परंपरेतील जांसेनिस्त (यानसेन) पंथाचा तो पुरस्कर्ता होता. ले पांसे … ह्या ग्रंथात त्याने केलेले धार्मिक-तात्त्विक लेखन संगृहीत आहे. जांसेनिस्त पंथाचा पुरस्कर्ता आंत्वान आर्नो ह्याला जेझुइटांनी पाखंडी ठरविले होते. आर्नोची बाजू घेऊन पास्कालने जी अठरा पत्रे लिहिली ती ले प्रोव्हँसियाल (१६५६-५७) ह्या नावाने प्रसिद्ध आहेत.
ह्या शतकात पूर्वार्धात झालेल्या गद्यलेखकांत ऑनोरे द्यूर्फे (१५६७-१६२५) ह्याचा आस्त्रे (५ खंड, १६०७-१६२७) हा रोमान्स विशेष उल्लेखनीय आहे. गोपजीवनाची पार्श्वभूमी असलेल्या ह्या रोमान्समध्ये विविध अभिरुचींचे समाधान करणारी वैशिष्ट्ये – उदा., साहस, शूरोदारता (शिव्हल्री), तात्त्विक विचार, भावविवशता-आढळतात. ह्या रोमान्सला फार मोठी लोकप्रियता मिळाली. तिच्यातील व्यक्तिरेखाही संस्मरणीय ठरल्या. १६२० ते १६८० च्या दरम्यान तिचे अनुवाद-अनुकरण यूरोपभर झाले. ह्या रोमान्सचा पाचवा खंड ओनोरे द्यूर्फेच्या मृत्यूनंतर त्याच्या सचिवाने संस्कारिला असावा किंवा लिहिलाही असावा. ह्या रोमान्समध्येही प्रेसिय प्रवृत्ती दिसून येते. शिष्ट भाषा आणि शिष्टाचार ह्यांची मार्गदर्शिका म्हणूनही ह्या साहित्यकृतीकडे अनेकांनी पाहिले.
नाटक : सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात फ्रेंच रंगभूमीचा लक्षणीय विकास घडून आला. १५४८ मध्ये पॅरिसमधील ‘कॉंफ्रेरी द ला पास्यॉं ’ ह्या नाटकमंडळीने आपल्या धार्मिक नाटकांचे (मिस्तॅर) प्रयोग सादर करण्यासाठी ‘ओतेल द बुर्गोन्न’ नावाची इमारत मिळविली होती परंतु त्याच वर्षी ह्या नाटकमंडळीला आपली धार्मिक नाटके करण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर ह्या नाटकमंडळीने हे नाट्यगृह इतर व्यावसायिकांना भाड्याने द्यावयास सुरूवात केली. इंग्लिश, स्पॅनिश, इटालियन अशा निरनिराळ्या नाटकमंडळ्या ह्या ठिकाणी आपली नाटके करू लागल्या. आंत्वान द मॉंक्रेत्यँ (सु. १५७५-१६२१) ह्याची लेकॉसॅझ (१६०१, इं. शी. द क्वीन ऑफ द स्कॉट्स) ही ओतेल द बुर्गोन्न येथे सादर केल्या गेलेल्या पहिल्या शोकात्मिकांपैकी एक होय. मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स हिच्या जीवनावर आधारलेली ही नाट्यकृती. दाव्हीद आणि आमान ही त्याची नाटके बायबलमधील कथांवर आधारित आहेत. रॉबेअर गार्न्येचा काही प्रभाव आंत्वान द मॉंक्रेत्यँ ह्याच्या नाट्यलेखनावर आढळतो.
आलेक्सांद्र आर्दी (सु. १५७०-१६३२) हा सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातील एक उल्लेखनीय नाटककार. त्याने लिहिलेल्या नाटकांची संख्या निश्चितपणे सांगता येत नसली, तरी ती पाचशे ते सातशेच्या आसपास असावी. आज त्याची फक्त ३४ नाटके उपलब्ध आहेत. त्यांत शोकात्मिका, शोक-सुखात्मिका, गोपनाटके आणि पौराणिक नाटके ह्यांचा समावेश होतो. आदींची बहुतेक नाटके रूपांतरवजा होती. तो मोठा प्रतिभावंत नसला, तरी त्याच्या आधीच्या फ्रेंच नाटकारांपेक्षा नाटकातल्या नाट्याची अधिक जाणीव त्याला होती वाङ्मयीन गुणवत्तेपेक्षा प्रयोगक्षमतेवर त्याचा भर होता. खून, मारामाऱ्या, छळवाद ह्यांसारखी हिंसात्मक दृश्ये रंगभूमीवर दाखविण्यावर आदींचा भर होता. अतिनाट्याची प्रवृत्ती त्याच्या नाटकांतून प्रकर्षाने प्रत्ययास येते. तत्कालीन स्पॅनिश नाटकांचा आदर्श त्याच्या समोर होता. त्या नाटकांतून तसेच ग्रीक-रोमन इतिहासातून त्याने आपल्या नाटकांचे विषय निवडले. नाट्यरचनेचे अभिजात नियम मात्र त्याने फारसे पाळले नाहीत. मध्ययुगीन फ्रेंच नाटक आणि सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातील अस्सल अभिजात नाटक ह्यांच्या संक्रमणकाळातील नाटककार म्हणून आदींचे महत्व आहे. आदींप्रमाणे राकां (१५८९-१६७०), झां मारो (१६०४-८६) आणि झां द रॉत्रू (१६०९-५०) ह्यांनीही नाटके लिहिली. राकांने ऑनोरे द्यूर्फेच्या आस्त्रेच्या प्रभावातून ले बॅर्जरी (१६२५) नावाचे एक सुखात्म गोपनाटक लिहिले. राकां हा मुख्यतः कवी. त्याची काही सुंदर काव्यरचना उपर्युक्त नाट्यकृतीत असली, तरी तीत नाट्यगुण फारसे नाहीत. झां मारो ह्याने स्थळ, काळ व कृती ह्यांचे ऐक्य फ्रेंच नाटकात खऱ्या अर्थाने आणले. सिल्व्ही (१६२६), सिल्व्हानीर (१६३०) ही त्याची दोन शोक-सुखात्म (ट्रँजि-कॉमिक) गोपनाटके. मारोकृत सोफोनिस्ब (१६३४) ही अभिजात शोकात्मिकेच्या नियमांचे काटेकोर पालन करणारी पहिली फ्रेंच शोकात्मिका. झां द रॉत्रू हा कार्दीनाल द रीशल्यच्या ‘सँकोतर’ (अर्थ, पाच साहित्यिक) चा सदस्य होता. ह्या मंडळात एकूण पाच नाटककार होते आणि रीशल्यच्या सूचनांनुसार त्यांनी नाटके लिहावयाची, अशी योजना होती. सेंट जेनेस्ट (१६४६) आणि वेन्सेसलॉस (१६४७) ह्या त्याच्या दोन उल्लेखनीय शोकात्मिका. ह्या दोन्ही नाट्यकृती अनुक्रमे लोपे दे व्हेगा आणि फ्रांथीस्को द रोहास ह्या दोन स्पॅनिश नाटककारांच्या नाट्यकृतींच्या अनुकरणातून रचिल्या गेल्या आहेत. स्पॅनिश नाटकांचा मोठा प्रभाव रॉत्रूबर होता. फिलांद्र (१६३३), ला बॅल आल्फ्रॅद (१६३६) आणि ला सर (१६४५) ह्या त्याच्या काही सुखात्मिका. त्रीस्तां लेर्मीत (१६०२-५५) ह्याची ला मारियान (१६३६) ही शोकात्मिकाही उल्लेखनीय आहे. तथापि ⇨ प्येअर कोर्नेयच्या (१६०६-८४) नाट्यकृती हा फ्रेंच नाटकांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होय. ल सिद (१६३७) ही फ्रान्सची पहिली राष्ट्रीय शोकात्मिका लिहिण्याचा मान त्याच्याकडे जातो. अभिजात नाट्यकृतींच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल काही विद्वान समीक्षकांनी कार्नेयवर टीका केल्यामुळे हे नाटक वादग्रस्त ठरले. तथापि त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला नाही. ‘ल सिदसारखे सुंदर ’ अशा आशयाचा एक वाक्प्रयोगच ह्या नाटकाला मिळालेल्या कीर्तीमुळे फ्रेंच भाषेत रूढ झाला. कर्तव्यपालनाच्या जाणिवेतून स्वतःच्या स्वाभाविक प्रवृत्तीही दडपून टाकणाऱ्या तसेच स्वतःच्या नात्यागोत्यांचाही विचार न करणाऱ्या मनस्वी व्यक्तिरेखा कोर्नेयच्या नाटकांतून आढळतात. ल सिदमधला नायक रोद्रीग आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या भावी श्वशुराचा वध करतो, तर ऑरास (१६४०) ह्या नाटकात मेहुणे मेहुणे परस्परांशी युद्ध करण्यास सज्ज होतात.
अभिजाततावादी युग : फ्रान्सच्या राज्यकारभाराची सूत्रे १६६१ मध्ये चौदाव्या लूईच्या हाती आली. त्यानंतरच्या सु. वीस वर्षांचा कालखंड हा अभिजाततावादी साहित्यिकांचा काळ मानला जातो. चौदाव्या लूईच्या दीर्घ कारकीर्दीचा हा अत्यंत वैभवशाली असा काळ होता. उच्च अभिरुची आणि शिस्त ह्यांचा सर्वच क्षेत्रांत प्रभाव होता. सामाजिक शिष्टाचारांचा आदर्श राजदरबारात घातला गेला होता. सभ्य वर्तन व सुसंस्कृत भाषा हे अत्यंत आवयश्क असे गुण मानले जाऊ लागले. सदभिरुचीच्या जोपासनेवर भर दिला जाऊ लागला.
या कालखंडात मोल्येर, झां रासीन आणि ⇨ झां द ला फॉंतेन (१६२१-९५) ह्यांच्यासारख्या श्रेष्ठ साहित्यिकांचे वाङ्मयीन कर्तृत्व झाले.
बोध व मनोरंजन असे दोन्ही हेतू समोर ठेवून मोल्येरने आपल्या सुखात्मिका लिहिल्या. कंजुषपणा, खोटा बडेजाव, अतिरेकी शिष्टपणा, माणूसघाणेपणा, स्त्रीशिक्षणाचे अनिष्ट परिणाम, धर्माच्या नावाखाली चाललेली भोंदूगिरी अशा अनेक सामाजिक विषयांवर मोल्येरने आपल्या विनोदाचे प्रभावी शस्त्र चालविले.
आंद्रोमाक (१६६७) ह्या शोकात्मिकेने श्रेष्ठ नाटककार म्हणून रासीनची प्रतिमा प्रस्थापित झाली. कोर्नेयच्या ल सिद ह्या नाट्यकृतीसारखेच मोठे यश आंद्रोमाकने त्याला मिळवून दिले. अभिजात नाट्यकृतींचे नियम कोर्नेयला जाचत होते परंतु रासीनने मात्र अत्यंत सहजपणे त्यांचे काटेकोर पालन केलेले दिसते. नियतीपुढे हतबल झालेली माणसे रासीनच्या नाट्यकृतीतून दिसतात ग्रीक शोकात्मिकांचे
ती स्मरण करून देतात. उत्कट काव्यात्मता हा त्याच्या नाटकांचा आणखी एक लक्षणीय विशेष.
झां द ला फॉंतेन हा श्रेष्ठ बोधकथाकार. विविध छंदांत त्याने ह्या बोधकथा लिहिल्या. ह्या बोधकथांचे एकूण बारा खंड आहेत. त्यांपैकी पहिले सहा १६६८ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतरचे पाच १६७८-७९ मध्ये आणि अखेरचा-म्हणजे बारावा खंड १६९४ मध्ये प्रसिद्ध झाला. आपल्या बोधकथा लिहिण्यासाठी इसाप, फीड्रस आदींच्या कथांचा आधार त्याने घेतलेला असला, तरी त्याच्या कथा स्वतंत्र प्रतिभेचे सामर्थ्य दिसून येतेच. समाजाच्या विविध थरांत वावरणाऱ्या माणसांच्या दोषांवर मुख्यतः प्राण्यांच्या व्यक्तिरेखांतून, ला फॉंतेनने नेमके बोट ठेवले आहे. ⇨ मादाम द सेव्हीन्ये (१६२६-९६) ह्या सुसंस्कृत, बुद्धिमान स्त्रीने लिहिलेल्या पत्रांतूनही अभिजात वाङ्मयगुणांचा प्रत्यय येतो. तिच्या पत्रांचा पहिला संग्रह (त्यात ३१ पत्रे आहेत) तिच्या मृत्यूनंतर, १७२५ मध्ये प्रसिद्ध, झाला. त्यांतील बहुतेक पत्रे तिने तिच्या मुलीला लिहिलेली असून त्यातून तत्कालीन उमराववर्गाच्या जीवनाचे उद्बोधक आणि मनोरंजक दर्शन घडते तसेच त्या पत्रांतून पत्रलेखिकेच्या विलोभनीय व्यक्तिमत्त्वाचीही प्रचीती येते. पत्रांची सहजसुंदर शैलीही लक्षणीय आहे.
मादाम द लाफायेत (१६३४-९३) हिने लिहिलेली ला प्रँसॅस द क्लॅव्ह (१६७८) ही कादंबरीही उल्लेखनीय आहे. फ्रेंच भाषेतील मनोदर्शनात्मक अशी ही पहिली कादंबरी होय. एका स्त्रीच्या मनातील विचारभावनांचे द्वंद्व तीत अत्यंत प्रभावीपणे मांडलेले आहे. कादंबरीची शैली साधी पण सुंदर असून अभिजातवादी कलाकृतींना साजेसा संयमही तीत आढळून येतो.
अभिजातवादाला तात्त्विक बैठक ⇨ निकॉला ब्वालो-देप्रेओ (१६३६-१७११) ह्याने दिली. लार पोयेतिक (४ सर्ग, १६७४) हा त्याचा पद्यग्रंथ ह्या संदर्भात उल्लेखनीय आहे. विख्यात प्राचीन रोमन कवी हॉरिस ह्याच्या आर्स पोएतिका ह्या ग्रंथाचा आदर्श पुढे ठेऊन ब्वालो-देप्रेओने लार पोयेतीकची रचना केलेली आहे. ग्रंथाच्या पहिल्या सर्गात काव्यरचनेची सर्वसामान्य तत्त्वे सांगितलेली असून दुसऱ्यात विलापिका, ओड ह्यांसारख्या काव्यप्रकारांचा विचार केलेला आहे. शोकात्मिकांच्या व सुखात्मिकांच्या रचनेच्या नियमांची चर्चा तिसऱ्या सर्गात आहे, तर चौथ्या सर्गात साहित्यिकाला केलेला उपदेश आहे. सत्य आणि सौंदर्य ही ब्वालोच्या दृष्टीने मुख्य वाङ्मयीन तत्वे होत. ती साहित्यात प्रतीत होण्यासाठी कवीने मानवी स्वभावाचा जवळून अभ्यास केला पाहिजे. त्याचप्रमाणे प्राचीन साहित्यिकांचा आदर्श समोर ठेऊन विवेकाच्या पायावर साहित्यिकाने आपल्या वाङ्मयाची निर्मिती केली पाहिजे, अशी त्याची भूमिका होती.
द्यूक फ्रांस्वा द ला रॉशफूको (१६१३-८०) ह्याच्या माक्सीम ह्या ग्रंथाचा उल्लेखही आवश्यक आहे. १६६५ मध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. तत्पूर्वी, १६६४ मध्ये ह्या ग्रंथाची एक चोरटी आवृत्ती प्रसिद्ध झालेली होती आणि तीवर लेखकाचे नाव घालण्यात आलेले नव्हते. अत्यंत मार्मिक आणि खोचक अशा सु. ५०० छोट्या छोट्या वाक्यांचा हा संग्रह असून त्यात लेखकाच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे दर्शन घडते. माणसावर त्याच्या अहंकाराची सत्ता चालते त्यामुळे त्याने सद्गुणांचा कितीही आव आणला, तरी त्यामुळे तो फक्त इतरांची आणि स्वतःचीही वंचना करीत असतो सद्गुणांना स्वार्थाचा वा स्वतःच्या हितसंबंधाचा थोडा तरी स्पर्श झालेला असतोच, असे विचार ला रॉशफूकोने मांडलेले आहेत. त्याच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे हे सूत्र दिसते. एक कडवट निराशावाद ह्या ग्रंथातून दिसून येतो. त्याची गद्यशैली अभिजाततावादी गद्यशैलीचा आदर्श मानली जाते.
झां द ला ब्ऱ्यूयेअर (१६४५-९६) ह्याने आपल्या ले कारक्तँर (१६८८) ह्या ग्रंथात चौदाव्या लूईच्या मावळत्या काळातील फ्रेंच समाजाचे वास्तव चित्र रेखाटले आहे. त्याची शब्दकळा समृद्ध आहे वेधक, चित्रमय आणि उपरोधप्रचुर शैलीत त्याने विविध व्यक्तिचित्रे रंगवलेली आहेत. साहित्यिविषयक मार्मिक विचारही त्याने व्यक्तविले आहेत. ही व्यक्तिचित्रे ज्यांची आहेत, त्यांची खरी नावे मात्र त्याने आपल्या ग्रंथात दिली नाहीत.
धर्मविषयक साहित्यात ⇨ फेन्लॉं (१६५१-१७१५) आणि झाक बॉस्यूए (१६२७-१७०४) ही दोन नावे उल्लेखनीय आहेत. तेलीमाक (१६९९) ह्या आपल्या ग्रंथात फेन्लाँने अत्यंत प्रागतिक स्वरूपाचे राजकीय-नैतिक विचार व्यक्त केले होते. विशेषतः कोणताही राजा कायद्यापेक्षा श्रेष्ठ नसतो, हा त्याचा विचार त्या काळात अत्यंत प्रक्षोभक असाच होता. त्याच्या ह्या ग्रंथामुळे चौदाव्या लूईची त्याच्यावर नाराजी झाली. अठराव्या शतकात ह्या ग्रंथाचा यूरोपभर प्रभाव पडला.
झाक बॉस्यूए हा उत्कृष्ट वक्ता त्याचे धार्मिक लेखनही शैलीदार. प्रवचने आणि काही व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांच्या निमित्ताने त्याने केलेली प्रभावी भाषणे त्याच्या वक्तृत्वाची साक्ष देतात. आपल्या लेखनातून रोमन कॅथलिक पंथाचा त्याने प्रखरपणे पुरस्कार केला. दिस्कूर स्युर लिस्त्वार युनिव्हॅर्सॅल (१६८१, इं. शी. डिस्कोर्स ऑन युनिव्हर्सल हिस्टरी), त्रेते द ला कॉनॅसांस द दिय अे द स्वा मॅम (इं. शी. ट्रीटाइज ऑन द नॉलेज ऑफ गॉड अँड ऑफ वनसेल्फ), लेक्स्पोझिसिआँ द ला दॉक्त्रीन कातोलिक (१६७१, इं. शी. एक्सोझिशन ऑफ कॅथलिक डॉक्ट्रिन) हे त्याचे काही ग्रंथ होत.
अठरावे शतक : ह्या शतकाला ‘ल सिॲक्ल दे ल्युमिॲर’ म्हणजेच ‘ज्ञानयुग’ असे संबोधिले जाते. हे मुख्यतः गद्याचे युग आहे. सतराव्या शतकात कार्दीनाल द रीशल्य आणि चौदावा लूई ह्यांनी लादलेल्या कडक शिस्तीमुळे फ्रेंच जनतेला राजकीय बाबतींत राजाप्रमाणे आणि धार्मिक बाबतीत कॅथलिक चर्चप्रमाणे विचार करावयाची सवय लागलेली होती. मोल्येरसारख्या नाटककार समाजातील सर्व वर्गावर आपल्या नाट्यकृतींतून प्रखर टीका करतो परंतु राजाविरुद्ध बोलण्याचे कटाक्षाने टाळतो. चौदावा लूई १७१५ मध्ये मरण पावला. त्याच्यानंतर गादीवर आलेल्या पंधराव्या लूईची गैरवर्तणूक व गैरकारभार ह्यांमुळे अठराव्या शतकात राजेशाहीची प्रतिष्ठा आणि शक्तीही खालावल्याचे दिसून येते. शासनसंस्थेचे दोष वेशीवर टांगून राजकीय सुधारणांची मागणी करणारे विचारवंत आणि साहित्यिक ह्या शतकात उदयास आले. स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व ह्या तत्वत्रयीचा प्रसार करून सर्वव्यापी अशा फ्रेंच राज्यक्रांतीची पूर्वतयारी त्यांच्या लेखनाने केली. ह्या ज्ञानयुगाला ‘फिलॉझॉप’चे म्हणजे तत्त्ववेत्त्यांचे युग असेही म्हटले जाते. परंतु तत्त्ववेत्ता ह्या शब्दाचा पारंपारिक अर्थ ह्या शतकातील विद्वानांना अभिप्रेत नव्हता. ‘फिलॉझॉफ’ हा परमार्थवादाचा निःसंदिग्धपणे निषेध करतो इहलोकातील राजकीय, सामाजिक, नैतिक आणि धार्मिक समस्यांत तो रस घेतो. सारे पूर्वग्रह बाजूला सारून आणि केवळ वस्तुनिष्ठ दृष्टीने ह्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांची उत्तरे शोधून काढण्याचा त्याचा प्रयत्न आहे. अठराव्या शतकातील विख्यात फ्रेंच साहित्यिक ⇨ दनी दीद्रो (१७१३-८४) ह्याने संपादिलेल्या लांसिक्लोपेदी ह्या विश्वकोशात फिलॉझॉफची व्याख्या अशी केलेली आहे : फिलॉझॉफ हा कोणत्याही विधानाचा स्वीकार पुराव्याशिवाय करीत नाही. खोट्या कल्पनांवर तो कधीच विश्वास ठेवीत नाही. सत्यता, शक्यता व साशंकता ह्यांच्या नेमक्या परिसीमा तो जाणतो (म. अर्थ). फ्रेंच तत्त्वज्ञ रने देकार्त आणि इंग्रज तत्त्वज्ञ जॉन लॉक (१६३२-१७०४) ह्यांच्या विचारांचा प्रभाव ह्या
शतकातील तत्त्ववेत्त्यांवर होता. विचारवंत आणि साहित्यिक राजदरबारापासून दूर जाऊन राजनिष्ठेच्या बंधनातून मुक्त होऊ लागले, हा ह्या शतकाचा आणखी एक लक्षणीय विशेष होय. साहित्यिक हे हस्तिदंती मनोऱ्यात न राहता सामाजिक जाणीव जोपासू लागले. क्लब, सालॉं आणि काफे ह्यांतून सामाजिक, राजकीश्, आणि आर्थिक समस्यांचा उहापोह होऊ लागला, क्लब दांत्रसॉल (इं. अर्थ क्लब ऑफ द आंत्रसॉल) हा क्लब विशेष उल्लेखनीय. १७२४ मध्ये स्थापन झालेल्या ह्या क्लबचा एक सदस्य लाबे द सँ-प्येअर (१६५८-१७४३) हा अर्थशास्त्रज्ञ. राजकीय-आर्थिक सुधारणांचा पुरस्कार करणारे विविध प्रकल्प त्याने आपल्या लेखनातून मांडले. त्यात ‘प्रोजे द ला पॅ पॅरपॅत्युॲल (१७१३) ह्या प्रकल्पाचा समावेश होतो. चिरंतन शांतता आणि मानवजातीचे कल्याण ही उद्दिष्टे साधण्यासाठी त्याने हा प्रकल्प मांडला. त्यात निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय लवाद ह्यांसंबंधी अत्यंत मौलिक विचार मांडलेले होते. मादाम द तांसँ (१६८५ ?-१७४९) हिचा सालॉं वैचारिक चळवळीच्या दृष्टीने विशेष कार्यशील होता. ⇨ आंत्वान-फ्रांस्वा लाबे प्रेव्हो (१६९७-१७६३) हा कादंबरीकार, गाब्रीएल बॉनो द माब्ली (१७०९-८५) हा इतिहासकार ह्यांसारखे नामवंत तिच्या सालाँचे सदस्य होते. लॉर्ड बॉर्लिंगब्रुक (१६७८-१७५१) आणि लॉर्ड चेस्टरफील्ड (१६९४-१७७३) हे प्रसिद्ध इंग्रज मुत्सद्दी पॅरिसमध्ये असताना ह्या सालॉंला वारंवार भेट देत. काफे प्रोकोप, काफे लॉरां आणि काफे ग्रादो हे अत्यंत लोकप्रिय कॅफे होत.
ह्या ज्ञानयुगात ⇨ शार्ल द सगॉंदा मॉंतेस्क (१६८९-१७५५) ह्या राजकीय तत्ववेत्त्याने लॅत्र पॅर्सान (१७२१, इं. शी. पर्शियन लेटर्स) ह्या नावाने लिहिलेल्या काल्पनिक पत्रांचा उल्लेख आवश्यक आहे. काही पर्शियन प्रवासी फ्रान्सबद्दलची त्यांची निरीक्षणे पत्रात नमूद करीत आहेत. अशी भूमिका घेऊन मॉंतेस्कने तत्कालीन फ्रेंच समाज आणि फ्रान्समधील सामाजिक-राजकीय संस्था ह्यांवर उपरोधप्रचुर टीका केली आहे ती करीत असताना प्रागतिक विचारही व्यक्तविले आहेत. फ्रेंच साहित्य, युद्ध, आंतरराष्ट्रीय कायदा इ. विविध विषयांवर मॉंतेस्कने ह्या पत्रांच्या माध्यमातून आपले विचार मांडलेले आहेत. ह्या पुस्तकाला फार मोठी लोकप्रियता लाभली. लेस्प्री दे लवा (१७४८) हा मॉंतेस्कचा एक महत्वाचा आणि मौलिक असा राज्यशास्त्रविषयक ग्रंथ. कायद्याची सर्वसाधारण तत्त्वे त्याने ह्या ग्रंथात प्रतिपादीली आहेत. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची कल्पनाही मॉंतेस्कने ह्या ग्रंथात मांडलेली आहे.
ल्यूक द क्लाप्ये मार्की द व्होव्ह्नार्ग (१७१५-४७) ह्याने आपल्या अँत्रोद्युक्सियॉं आ ला कॉनॅसांस द लेस्प्री युमॅ स्युइव्ही द रेफ्लेक्सियॉं ए माक्सीम (१७४६, इं. शी. इंट्रोडक्शन टू ॲन अंडरस्टँडिंग ऑफ द ह्यूमन माइंड, फॉलोड बाय रिफ्लेक्शन्स अँड मॅग्झिम्स) ह्या तात्त्विक स्वरूपाच्या ग्रंथात मानवी, मन, मनोविकार, सद्गुण आणि दुर्गुण ह्यांचा परामर्श घेतलेला आहे. मानवाच्या स्वभावात गुणांप्रमाणेच दोषही आहेत. ह्याचे भान त्याने ठेवलेले आहे तथापि मानवाकडे पाहण्याचा दृष्टिकोण निराशेचा नाही. व्होव्ह्नार्ग हा व्हॉल्तेअरचा मित्र डेइस्ट पंथाचा. लॉकचाही त्याच्यावर प्रभाव होता. व्होव्ह्नार्गने बुद्धीपेक्षा अंतःकरणाला अधिक महत्व दिले. उच्च विचार हे अंतःकरणापासूनच स्फुरतात, असे तो ठामपणे सांगतो. १८ व्या शतकातील बौद्धिक जीवनावर ⇨ व्हॉल्तेअरचा (१६९४-१७७८) सर्वाधिक प्रभाव होता. ‘व्हॉल्तेअरचे युग’ म्हणूनही हे शतक ओळखले जाते. तात्त्विक लेखन करणारा विचारवंत म्हणून व्हॉल्तेअरची प्रतिमा मुख्यतः प्रस्थापित झालेली असली, तरी त्याने नाटके, कविता असे ललित लेखनही केलेले आहे. त्याच्या प्रतिमेचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार त्याच्या काही उपरोधप्रचुर कथांतूनही (कॉंत) झालेला आहे. अत्यंत जटिल असे तात्त्विक, सामाजिक आणि धार्मिक प्रश्न ह्या कथांतून त्याने सुबोध परंतु ढंगदार भाषेत मांडलेले आहेत. झादिग (१७४७), कांदीद (१७५९) ह्या अशा काही कथा होत. मर्मभेदी उपहास, तल्लख बुद्धी आणि विनोद ह्यांचा स्वैर विलास अशा कथांतून पाहावयास मिळतो.
सेबास्त्यँ रॉक निकॉला शांफॉर (१७४१ – ९४) हा त्याच्या माक्सीम ह्या ग्रंथाबद्दल विशेष प्रसिद्ध आहे. ह्या ग्रंथातील त्याची वैचारिक सूत्रे ख्याती पावली, आंत्वान द रीव्हारॉल (१७५३-१८०१) ह्याने दिस्कूर स्युर ल्यनिव्हॅर्सालिते द ला लांग फ्रांसॅझ (१७८४, इं. शी. ऑन द युनिव्हर्सॅलिटी ऑफ द फ्रेंच लँग्वेज) मध्ये फ्रेंच भाषेचा गौरव केलेला आहे.
विख्यात इंग्रज कवी ⇨ अलेक्झांडर पोप ह्याच्या एसे ऑन मॅन ह्या काव्याचा फ्रेंच अनुवाद फ्रान्समध्ये अत्यंत लोकप्रिय झालेला होता. व्हॉल्तेअरवरही ह्या काव्याचा काही प्रभाव जाणवतो. ‘दिस्कूर स्युर लॉम’ (१७३४-३७) ही त्याची तात्त्विक कविता ह्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. लेख, पत्रके, पत्रे, नाटके, कथा, काव्य अशा विविध माध्यमांतून त्याने सत्ता व परंपरा ह्यांविषयीच्या आदरास धक्का दिला आणि फ्रान्समधील राजकीय क्रांतीचा मार्ग मोकळा केला.
विख्यात फ्रेंच साहित्यिक दनी दीद्रो ह्याने आपल्या विश्वकोशातून-लांसिक्लोपेदीतून-गतानुगतिकत्वाला विधायक विरोध करून मानवतावादी मूल्ये समाजात रूजविण्याचा प्रयत्न केला. ह्या विश्वकोशाला मॉंतेस्क, कॉंदीयाक (१७१५-८०), त्यूर्गो (१७२७-८१), केने (१६९४-१७७४), व्हॉल्तेअर ह्यांच्यासारख्या विचारवंतांचे साहाय्य लाभले होते. ह्या विश्वकोशाचा नोंदीतून अनेक प्रागतिक विचार व्यक्तविण्यात आले होते. धार्मिक सहिष्णुता, विचारस्वातंत्र्य, लोकशाहीवादी मूल्ये ह्यांचा पुरस्कार दीद्रोच्या विश्वकोशातील नोंदीतून करण्यात आला होता. दीद्रोचा विश्वकोश हा निव्वळ विश्वकोश राहिला नाही, तर परंपरा, धर्मक्षेत्रातील अपप्रवृत्ती, अज्ञान, सामाजिक अन्याय ह्यांच्याविरुद्धच्या लढ्यातील तो एक शक्तिशाली शस्त्र बनला. तांत्रिक-वैज्ञानिक विकासावरही दीद्रोने भर दिला आणि सामाजिक-राजकीय सुधारणांचा वेग वाढविण्यास मदत केली. विश्वकोशनिर्मितीखेरीज वैचारिक ग्रंथ, नाटके, कादंबऱ्या असे लेखनही दीद्रोने केलेले आहे.
ब्यूफॉं (१७०७-८८) हा निसर्गवैज्ञानिक. इस्त्वार नात्युरॅल (४४ खंड, १७४९-१८०४) हा त्याचा विख्यात ग्रंथ. ह्या ग्रंथाचे ३६ खंड त्याच्या हयातीत प्रकाशित झाले. मानव, पशुपक्षी, खनिजे, मासे, सरिसृप् आदींची माहिती ह्या महाग्रंथात दिलेली आहे. लामार्क व डार्विन ह्यांचा तो पूर्वसूरी होय. दिस्कूर स्युर ल स्तील (१७५३) ह्या त्याच्या ग्रंथातील ‘ल स्तील सॅ लॉम’ (द स्टाइल इज द मॅन हिमसेल्फ) हे वाक्य सुप्रसिद्ध आहे.
ह्या शतकात होऊन गेलेला फ्रेंच विचारवंत ⇨ झां झाक रूसो (१७१२-७८) हा केवळ फ्रान्समध्येच नव्हे, तर एकूण यूरोपीय विचारवंतांत अग्रगण्य ठरला. त्याच्या लेखनाने फ्रेंच राज्यक्रांतीच्या नेत्यांना स्फूर्ती दिली. कला आणि विज्ञान ही माणसांना गुलाम करण्याची साधने आहेत श्रीमंत आणि राजेरजवाडे त्यांचा उपयोग करून घेत असतात, असे विचार त्याने ‘दिस्कूर स्युर ले सियांस लेझार’ (१७५०) ह्या आपल्या निबंधात मांडले. ‘दिस्कूर स्युर लोरिजीन द लिनेगालिते’ (१७५४) ह्या दुसऱ्या एका निबंधात माणसाच्या नैसर्गिक मूलावस्थेचे एक चित्र गृहीतकाच्या स्वरूपात मांडून सर्व माणसे एके काळी समान होती परंतू नागरतेबरोबरच (सिव्हिलिझेशन) माणसामाणसांत विषमता निर्माण झाली असे प्रतिपादन त्याने केले आहे. कॉंत्रा सोस्याल (१७६२, इं. शी. सोशल कंट्रॅक्ट) हा त्याचा जगद्विख्यात ग्रंथ. राज्यशास्त्रावरील अभिजात ग्रंथांत त्याचा समावेश होतो. एक करार म्हणून व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचा समाज बनतो व्यक्ती आपले सारे हक्क समाजास देतात ते हक्क परत स्वतःकडे घ्यावयाचे असतील, तर व्यक्तीला समाज सोडावा लागेल, असे विचार रूसोने ह्या ग्रंथात व्यक्त केले होते. व्यक्तीपेक्षा समाज मोठा अशी भूमिका ह्या ग्रंथात त्याने घेतलेली असल्यामुळे प्रतिष्ठित राजसत्तेला त्यातून एक आव्हानच देण्यात आले होते. फ्रेंच राज्यक्रांतीचा हा धर्मग्रंथच ठरला. एमिल (१७६२) हा त्याचा शिक्षणविषयक ग्रंथ. तथापि तो वादग्रस्त ठरला कारण ईश्वर आणि माणूस ह्यांच्यात धर्मगुरूच्या वा धर्मसंस्थांच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही, असे विचार त्या ग्रंथातील एका प्रकरणात मांढलेले होते. ला नुव्हॅल एलोईझ (१७६१) ह्या पत्रात्मक कादंबरीत त्याने सात्विक प्रेमाचे आणि नैसर्गिक जीवनाचे गुणगान केले आहे.
ह्या शतकात नाटक, कविता, आणि कादंबरी ह्या तीन साहित्यप्रकारांच्या संदर्भात लक्षणीय स्वरूपाचा विकास घडून आला.
नाटक : नाट्यलेखनाच्या क्षेत्रात विख्यात फ्रेंच विचारवंत आणि साहित्यिक व्हॉल्तेअर ह्याने लिहिलेल्या शोकात्मिकांचा उल्लेख आवश्यक आहे. अदीप ही त्याने रचिलेली पहिली शोकात्मिका १७१८ मध्ये रंगभूमीवर आली. थीब्जचा राजा ईडिपस ह्याच्या प्राचीन ग्रीक कथेवर आधारलेल्या ह्या शोकात्मिकेतही काही धार्मिक आणि राजकीय प्रश्नांचे सूचन व्हॉल्तेअरने केलेले होतेच. ह्या शोकात्मिकेनंतर त्याने अनेक शोकात्मिका लिहिल्या. त्याच्या एकूण शोकात्मिकांची संख्या सु. तीस भरेल. व्हॉल्तेअरच्या नाट्यभाषेत एक प्रकारचा जोम आणि वक्तृत्वशीलता आहे अतिनाट्यत्म परिणाम साधण्याची त्याची प्रवृत्ती दिसते.
लामॉत-उदार (१६७२-१७३१) ह्या फ्रेंच नाटककाराची इनेस दे कास्त्रो (१७२३) ही शोकात्मिका प्रसिद्ध आहे. पोर्तुगालच्या चवथ्या आल्फॉन्सोच्या दरबारी असलेल्या एका उमरावाची इनेस ही कन्या. राजपुत्र पेद्रो तिच्या प्रेमात पडतो ती दोघे गुप्तपणे विवाह करतात. ह्या विवाहाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजा आल्फॉन्सो इनेसचा खून घडवून आणतो. पुढे पेद्रो गादीवर आल्यानंतर इनेसच्या खुन्यांचा सूड घेतो.
फीलीप (नारीको) देतूश (१६८०-१७५४), आलेक्सी पीरॉं (१६८९-१७७३) आणि शार्ल पालीसो द मॉंत्न्वा (१७३०-१८१४) हे तिघे सुखात्मिकाकार. देतूशच्या नाट्यकृतींतून नैतिक उद्बोधनाचा हेतू दिसून येतो. मेत्रोमानी (१७३८) ही पीरॉंची उल्लेखनीय सुखात्मिका. ह्या सुखात्मिकेत पीरॉंने कवींची -ह्या कवींत तो स्वतःही आहेच–थट्टा केली आहे. ले फिलॉझांफ (१७६०) ह्या आपल्या नाटकातून पालीसोने ज्ञानकोशकारांवर उपरोधप्रचुर टीका केलेली आहे. लेझोरिजिनो उ ल सॅर्क्ल (१७५५) ह्या सुखात्मिकेत त्याने रूसो आणि व्हॉल्तेअर ह्यांची हासकचित्रे (कॅरिकेचर्स) रेखाटली होती. ⇨ प्येअर कार्ले द शांब्लँ द मारीव्हो (१६८८-१७६३) आणि ⇨ प्येअर बोमार्शे (१७३२-९९) हे ह्या शतकातील श्रेष्ठ सुखात्मिकाकार. मारीव्होने गद्यसुखात्मिका लिहिल्या. विविध व्यक्तिरेखांच्या मनांचे विश्लेषण करण्याचे त्याचे सामर्थ्य त्यांतून प्रत्ययास येते. मारीव्होच्या नाटकांचा तो स्त्रीहृदयातील भावना व्यक्त करतो. ‘मारीव्होदाज’ ही एक खास संज्ञा, फ्रेंच भाषेत, त्याच्या नावावरून तयार झाली. मारीव्होदाज म्हणजे हृदयातील नाजूक भावनांचे विश्लेषण आणि त्यासाठी उपयोगात आणलेली वैशिष्ट्यपूर्ण अशी मार्मिक भाषा. ल ज द लामूर ए द्यू आझार (१७३०) ह्या त्याच्या नाट्यकृतींची लोकप्रियता आजही ओसरलेली नाही. तल्लख संवाद आणि निर्भिड सामाजिक टीका ही बोमार्शेच्या नाट्यलेखनाची काही वैशिष्ट्ये होत. ल बार्बिए द सेव्हील (१७८४, इं. शी. द मॅरेज ऑफ फिगारो ) ह्या त्याच्या नाट्यकृती श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. ल मारियाज द फिगारो ह्या त्याच्या नाट्यकृतीतील बुद्धिमान, धूर्त, बोलघेवडा नायक फिगारो हे फ्रेंच नाट्यसाहित्यात अमर झालेले पात्र आहे.
पारंपरिक साहित्यप्रकारांत नवचैत्यन्य आणावयाचे असेल, तर नवनवे प्रयोग केले पाहिजेत, असे दीद्रोचे मत होते. त्याला अनुसरून त्याने त्राजेदी बुर्ज्वाझ हा नवा नाट्यप्रकार संकल्पिला होता. ‘हिरोइक ट्रॅजिडी’ किंवा वीर-शोकात्मिका आणि पूर्णतः विनोदी सुखात्मिका ह्यांचा सुवर्णमध्य साधणारा हा नाट्यप्रकार होता. सर्वसामान्य मध्यम वर्गीयांच्या जीवनांतून ह्या नाट्यप्रकारातील नाटकांची कथानके घेतलेली असत. सामाजिक उद्बोधनाच्या दृष्टीनेही ही नाटके दीद्रोला महत्त्वाची वाटत होती. ल फिस नात्युरॅल (१७५७) आणि ल पॅर द फामिय (१७५८) ह्या दोन नाट्यकृती लिहून दीद्रोने ह्या नव्या नाट्यप्रकाराचा वस्तुपाठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थात दीद्रोच्या तात्त्विक लेखनाच्या तुलनेत त्याचे हे नाट्यलेखन फारसे महत्त्वाचे नाही. प्येअर क्लोद निव्हेल द ला शोसे (१६९२-१७५४) ह्याने फ्रेंचमध्ये एक प्रकारच्या भावविवश सुखात्मिकेचे (सेंटीमेंटल कॉमेडी) प्रवर्तन केले. सुखात्मिकेचा हा प्रकार ‘कोमेदी लार्मोयांत’ ह्या नावाने ओळखला जातो. नित्याच्या कौटुंबिक जीवनातील प्रश्न आणि अडचणी ह्यांचे वास्तववादी चित्रन ह्या नाटकांत असे. ते करित असताना निर्माण होणारे कारुण्य अनेकदा ह्या सुखात्मिकांतील विनोदापेक्षा अधिक होत असे. कधी अशा नाटकांतून विनोद अभावानेच दिसे. ला फोस्स आंतिपाती (१७३३, इं. शी. फॉल्स ॲन्टिपथी) आणि ल प्रेजुजे आ ला मॉद (१७३५, इं. शी. फॅशनेबल प्रेजुडिस) ही ला शोसेची उल्लेखनीय नाटके. दीद्रो आणि ला शोसे ह्या दोघांच्या नाट्यलेखनातून सुखात्मिका आणि शोकात्मिका ह्यांच्यातील काटेकोर सीमारेषा पुसट करण्याचा प्रयत्न दिसून येतो.
कादंबरी : ⇨ आलँ-रने ल साझ (१६६८-१७४७), प्येअर कार्ले द शांब्लँ द मारीव्हो व आंत्वान फ्रांस्वा लाबे प्रेव्हो हे ह्या शतकातील महत्त्वाचे कादंबरीकार. ल दिआब्ल ब्वात (१७०७, इं. भा. द डेव्हिल अपाउन टू स्टिक्स, १७०८), जिल ब्लास (४ खंड, खंड १ व २, १७१५ खंड ३, १७२४ आणि खंड ४, १७३५), ह्या आलँ-रने ल साझ ह्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. त्या उपरोधप्रचुर आहेत. स्पॅनिश साहित्याचा त्याच्यावर असलेला प्रभाव त्याच्या ह्या कादंबऱ्यांतून स्पष्टपणे जाणवतो. द डेव्हिल अपाउन टू स्टीक्स ही कादंबरी व्हालेत दे गेव्हारा (१५७९-१६४४), ह्या स्पॅनिश लेखकाच्या एल दियाब्लो कोखुयॅलॉ ह्या कादबंरीचे स्वैर रूपांतर होय. जिल ब्लासमध्ये त्याने स्पॅनिशमधील पिकरेस्क कादंबरीचे तंत्र अवलंबिलेले दिसते ल साझचे सामाजिक निरीक्षण, तसेच त्याची व्यक्तीरेखेसंबधीची संकल्पना नेमकी आणि रेखीव आहे. त्याच्या व्यक्तिरेखाही बऱ्याच गतीमान वाटतात. आधुनिक कादंबरीच्या जनकांत त्याचा अंतर्भाव करण्यात येतो. ला व्ही द मारिआन (१७३१-४१, इं. शी. लाइफ ऑफ मारीआन), आणि ल पेइझां पारव्हन्यू (१७३५-३६, इं. शी. द फॉरच्यूनेट पीझंट) ह्या मारीव्होच्या उल्लेखनीय कादंबऱ्यांपैकी काही होत. ‘लाइफ ऑफ मारिआन’ मध्ये मारिआन ही तरुणी स्वतःच आपली जीवनकथा सांगत असल्याचे दाखविले आहे. अनेक अडचणींना तोंड देऊन आणि विविध प्रकारचे अनुभव घेऊन ती अखेरीस आपल्या प्रियकराशी विवाह करण्यात यशस्वी होते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबतच्या तिच्या प्रतिक्रियांचे विश्लेषण मारीव्होने अत्यंत सूक्ष्मपणे केलेले आहे. विख्यात इंग्रज कादंबरीकार ⇨ सॅम्युएल रिचर्ड्सन ह्याला पामेला…. ह्या त्याच्या प्रसिद्ध कादंबरीचा विषय ह्या कादंबरीवरून सुचला, असे एक मत आहे. मानसन्मान आणि संपत्ती मिळविण्यासाठी आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाचा उपयोग करून स्त्रियांना भुरळ पाडणारा एक सधिंसाधू ‘द फॉरच्यूनेट पीझंट’ मध्ये मारीव्होने रंगविलेला आहे. प्रसिद्ध इंग्रज ⇨ हेन्री फील्डिंग ह्याची जोसेफ अँड्रूज ही कादंबरी मारीव्होच्या ‘द फॉर्च्यूनेट पीझंट’च्या प्रभावातून निर्माण झाली असण्याची शक्यता सूचित केली जाते. एक प्रकारच्या मनोविश्लेषणाची प्रवृत्ती हे मारीव्होच्या कादंबऱ्यांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. प्रेव्होच्या कादंबऱ्यांतून मनोविश्लेषणाबरोबरच तत्कालीन समाजातील अनीती आणि भोगलोलुपता ह्यांचे वास्तववादी चित्रण आढळते. लिस्त्वार द्यू शव्हालिए दे ग्रिय ए द मानॉं लेस्को (१७३१, इं. भा. माना लेस्को, १९४९) ही त्याची कादंबरी ह्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. झाक आंरी बेर्नारदँ द सँ प्येअर (१७३७-१८१४), प्येअर शॉदेर्लो द लाक्लो (१७४१-१८०३) हे आणखी दोन उल्लेखनीय कादंबरीकार होत. झाक आंरी बेर्नार्दँ द सँ प्येअर हा निसर्गवैज्ञानिक. पॉल ए व्हिर्जिनी (१७८७) ही तयाची कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. निसर्गापासून दूर जाणाऱ्या मानवांच्या जीवितांत येणारे दुःख आणि अपूर्णता दाखविण्याचा प्रयत्न त्याने ह्या कादंबरीत केलेला आहे. ला शोमिॲर अँदिॲन (१७९१) ह्या कादंबरीला त्याने भारतीय पार्श्वभूमी दिलेली आहे. ले लिअँझाँ दॉंजरझ (१७८२, इं. शी. डेंजरस रिलेशन्स) ही प्येअर शॉदेर्लो द लाक्लोकृत कादंबरी म्हणजे फ्रेंच कादंबरीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा होय. राज्यक्रांतिपूर्व फ्रेंच समाजाचे एक मनोदर्शनात्मक चित्र तीत आहे.
काव्य : तर्कशुद्धता आणि बुद्धिनिष्ठा ह्यांना विशेष महत्त्व देणाऱ्या ह्या शतकातील वातावरण काव्याला फारसे अनुकूल होते, असे म्हणता येणार नाही. ह्या शतकात कोणी श्रेष्ठ कवीही होऊन गेल्याचे दिसत नाही. व्हॉल्तेअर, झां बातीस्त ल्वी ग्रेसे (१७०९-७७) आणि आलेक्सी पीरॉं हे ह्या कालखंडातील काही उल्लेखनीय कवी होत. ला आंरियाद (१७२३) हे व्हॉल्तेअरकृत महाकाव्य. हेन्री ऑफ नाव्हार (हाच पुढे चौथा हेन्री ह्या नावाने फ्रान्सचा राजा झाला.) हा ह्या महाकाव्याचा नायक. ह्या महाकाव्यातून व्हॉल्तेअरने धर्मवेडेपणाचा निषेद केला आहे. व्हॉल्तेअरच्या बऱ्याच कविता उपरोधप्रचुर आहेत.
ग्रेसे हा जेझुइट. व्हॅर -व्हॅर (१७३४) आणि ला शार्त्रझ (१७३५, इं. शी. द चार्टर हाऊस), ही त्याची काव्य उल्लेखनीय आहेत. त्यापैकी ‘द चार्टर हाऊस’ हे काव्य ग्रेसेच्या धार्मिक वरिष्ठानां न रुचल्यामुळे ग्रेसेची पंथातून हकालपट्टी झाली. पीरॉंची कविता हलकीफुलकी आहे. ⇨ आंद्रे मारी द शेन्ये (१७६२-९४) हा ह्या शतकातला सर्वश्रेष्ठ कवी म्हणून ओळखला जातो. त्याच्या उद्देशिका-विलापिकांतून एका खऱ्याखुऱ्या भावकविचे दर्शन घडते. ‘ॲरमॅस’ आणि ‘लामेरीक’ ही त्याची तात्त्विक चिंतनात्मक काव्ये श्रेष्ठ दर्जाची आहेत. ह्या काव्यांतून मानवाचा इतिहास आणि विज्ञानाची वाटचाल ह्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न शेन्येने केला आहे. ही काव्य पूर्ण करायला त्याला पुरेसे आयुष्य लाभले नाही. ‘अखेरचा अभिजाततावादी आणि पहिला स्वच्छंदतावादी’ कवी असे शेन्येचे वर्णन काही वेळा केले जाते. अभिजाततावादाचे ठळक संस्कार त्याच्यावर झालेले होते. ग्रीसमध्ये त्याचा जन्म झाला होता. ग्रीक विलापिकेतले नाजूक सौंदर्य ह्यांच्याबद्दल ग्रीकांना वाटणारे प्रेम त्याच्याही ठायी होते. तथापि काव्यछंदांमध्ये त्याने काही नाविन्यपूर्ण बदल घडवून आणले, काव्यरचनेचे काही अभिजात संकेत त्याने बाजूला ठेवले आणि अठराव्या शतकातील फ्रेंच कवितेत सामान्यतः अभावानेच आढळणारा सुसंवाद आणि लवचिकपणा आपल्या कवितेत आणला. आपली वाङ्मयीन भूमिका स्पष्ट करण्यासाठी ‘लँव्हँसिआँ’ ही कविता लिहिली. फ्रेंच स्वच्छंदतावादाची वाट त्याने तयार करून ठेवली, असे मानले जाते.
आत्मचरित्रात्मक लेखन : ह्या शतकातील आत्मचरित्रात्मक लेखनाला आज महत्वाच्या ऐतिहासिक दस्तऐवजाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ह्या लेखनाचे वाङ्मयीन मोलही मोठे आहे. अशा लेखनात रूसोचे ले कॉंफेस्यॉं (१७८१-८८, इं. शी. कन्फेशन्स) आणि ⇨ द्यूक द सँ-सीमॉं (१६७५-१७५५) ह्यांचे मेम्वार्स (प्रकाशित १८२९-३०) ह्यांचा समावेश होतो. रूसोची ‘कन्फेशन्स’ अत्यंत निर्भीड असून त्यांत त्याने स्वतःच्या वृत्तिप्रवृत्तींचे सूक्ष्म विश्लेषण केलेले आहे. द्यूक द सँ-सीमॉंच्या मेम्वार्समध्ये १६९१ ते १७२३ ह्या कालखंडातील दरबारी जीवनाचे तसेच राजकीय परिस्थितीचे चित्रण आढळते.
एकोणिसावे शतक : एकोणिसावे शतकात तीन मुख्य साहित्यिक प्रवाह दिसून येतात : स्वच्छंदतावाद, वास्तववाद व प्रतिकवाद. या प्रवाहांच्या प्रारंभाचा व अंताचा काल निश्चिंतपणे ठरविणे कठीण असले, तरी ते एकामागून एक येतात असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. तथापि हे प्रवाह कित्येक ठिकाणी एकमेकांत मिसळून गेलेले दिसतात. उदा., ⇨ वाल्झॅक (१७९९-१८५०) आणि ⇨ फ्लोथेअर (१८२१-८०) हे लेखक स्वच्छंदतावादी तसेच वास्तववादी पण आहेत. स्वच्छंदतावादाचा बहर ओसरल्यावरही, ⇨ शार्ल बोदलेअर (१८२१-६७), ⇨ जोसेफ अर्नेस्त रनां (१८२३-९२), यूझेअन फ्राँमांतँ (१८२०-७६), ⇨ एदमॉं रॉस्तां (१८६८-१९१८), या साहित्यिकांवर स्वच्छंदतावादाचा प्रभाव आढळून येतो.
फ्रेंच राज्यक्रांतीने बदलून टाकलेल्या समाजाला एका नवीन साहित्याची जरूरी होती. सुसंस्कृत आणि संख्येने मोठा असा वाचकवर्ग तयार झाला होता. विविध विषयांत रस घेणाऱ्या या वाचकवर्गाला, भावनोत्कट, स्फूर्तिदायक, कल्पनारम्य, साहसप्रधान, चित्रमय अशा साहित्याची आवश्यकता भासत होती. ह्या आवश्यकतेतूनच एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वच्छंदतावादी चळवळीचा आरंभ झाला. स्वच्छंदतावाद म्हणजे फ्रासमधील राजकीय क्रांतीचा वाङ्मयीन पडसादच होय. सुरुवातीला ही चळवळ अभिजाततावादातील वस्तुनिष्ठता, तर्कशुद्धता व शिस्तबद्धता यांच्या विरुद्ध असून आत्मपरता, कल्पनाशक्ती व भावना यांचा विचार करणारी होती.
फ्रेंच स्वच्छंदतावादाची मुळे जरी मध्ययुगीन फ्रेंच साहित्यात शोधून काढता येत असली, तरी त्याच्या तत्कालीन प्रेरणा जर्मन व इंग्रजी साहित्यात सापडतात. जर्मन महाकवी गटे ह्याची ‘सॉरोज ऑफ यंग वेर्थर’ (इं. अर्थ) ही कादंबरी, इंग्रज कादंबरीकार सर वॉल्टर स्कॉट ह्याच्या ऐतिहासिक कादंबऱ्या व इंग्रज कवी लॉर्ड बायरन ह्याचे काव्य यांपासून फ्रेंच स्वच्छंदतावाद्यांच्या एका संपूर्ण पिढीने स्फूर्ती घेतली. अभिजाततावादाच्या जाचक नियमांपासून स्वच्छंदतावादाने साहित्याची मुक्तता केली. स्थल, काल व घटना यांच्या ऐक्यावर आधारलेली अभिजात शोकात्मिका नव्या युगाला साजणारी व मानवणारी अशी नसल्यामुळे ⇨ व्हिक्टर द्यूगोने (१८०२-८५) ‘द्राम’ ह्या नाट्यप्रकारातील नाटके लिहिली. ह्या द्राममध्ये हास्य व करुण ह्या रसांचे मिश्रण असून स्थलकालविषयक एकसूत्रीपणाला झुगारून देण्यात आले होते. द्रामची कल्पना ही दीद्रोचीच. त्याची त्राजेदी बुर्ज्याझची कल्पना व द्रामची कल्पना ह्या जवळजवळ सारख्याच आहेत. वास्तववाद हा स्वच्छंदतावादातून उदयास आला व नंतर त्याच्याविरुद्ध बंड करून उठला. कल्पनारम्यता, गूढता यांच्या आहारी गेलेलया स्वच्छंदतावादाने भावनात्मकतेवर विशेष भर देऊन वास्तवाला मुरड घातली. प्रचलित समाजशास्त्रीय-मानसशास्त्रीय तत्त्वांतून व प्रत्यक्षार्थवादाच्या (पॉझिटिव्हिझम) तत्वप्रणालीतून प्रेरणा घेऊन वास्तववाद उभा राहिला. मनुष्याच्या वर्तनाचा व त्याच्या भोवतालच्या वातावरणाचा तपशीलवार अभ्यास करून त्याच्या स्वभावाचे चित्रण करणे हा वास्तववादाचा मुख्य उद्देश होता. स्वच्छंदतावादाने भावनात्मक व काल्पनिक विश्वाच्या अभिव्यक्तीसाठी माध्यम म्हणून काव्याची निवड केली, तर वास्तवादाने मुख्यतः गद्याचा आश्रय घेतला. यामुळे कादंबरी या प्रकाराचा अभूतपूर्व विकास झाला. बाल्झॅकने कादंबरीत नवीन आशय ओतला व नवीन विषय हाताळले. त्याच्या मते, कादंबरी म्हणजे सामाजिक रीतिरिवाजांचा इतिहास होय. ⇨ स्तँदालने (१७८३-१८४२) मानसशास्त्रीय वास्तववादाचा पाया घातला व त्याचबरोबर आपल्या कादंबऱ्यांतून समकालीन सामाजिक इतिहासही चित्रित केला. आपली स्वच्छंदतावादी वृत्ती काबूत आणण्यासाठी सुरुवातीला ग्यूस्ताव्ह फ्लोबेअर ह्या कादंबरीकाराने वास्तववादाचा आधार घेतला पण कालांतराने तीच त्याची सहजप्रवृत्ती बनली. वास्तववादाच्या पुढे जाऊन ⇨ एमिल झोलाने (१८४०-१९०२) ⇨ निसर्गवादाचा पाया घातला व प्रयोगसिद्ध कादंबरीचा (रोमांएक्स्पेरिमांताल) प्रारंभ केला. संयमित अभिव्यक्ती, घाटाचा काटेकोरपणा आणि वस्तुनिष्ठता ह्यांवर भर देणारा ल पार्नास किंवा पार्नॅसिअन या नावाने ओळखला जाणारा कलावादी काव्यसंप्रदाय स्वच्छंदतावादाविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झाला. त्याचप्रमाणे निसर्गवादाच्या अतिरेकांची प्रतिक्रिया म्हणून प्रतीकवाद उदयास आला. प्रतीकवादी हे अंतर्मनात खोल शिरून स्वप्नराज्यातील गूढ वाटांची गुंतागुंत उकलण्याचा प्रयत्न करतात.
स्वच्छंदतावाद : ⇨ मादाम द स्ताल (१७६६-१८१७) ही लेखिका स्वच्छंदतावादाची अग्रदूत मानली जाते. द ला लितेरात्यूर (१८००, इं. शी. ऑन लिटरेचर) व द लालमाग्न्य (१८१०, इं. शी. ऑन जर्मनी) या ग्रंथांत तिने नव्या स्वच्छंदतावादी साहित्यसंप्रदायास अनुकूल असे विचार मांडले, तसेच देल्फीन (१८०२) व कॉरीन (१८०७) ह्या आपल्या कादंबऱ्याही स्वच्छंदतावादी वळणाने लिहिल्या. स्वच्छंदतावादी संप्रदायावरील मादाम द स्तालचा प्रभाव उल्लेखनीय आहे. तथापि स्वच्छंदतावादाचा खरा जनक ⇨ शातोथ्रीआं (१७६८-१८४८) हा होय. आताला (१८०१) व रने (१८०२) या त्याच्या कादंबऱ्या त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. रने ह्या कादंबरीचा रने हा अस्वस्थ-निराश नायक फ्रेंच साहित्यातील पुढील सर्व स्वच्छंदतावादी नायकांचा पुर्वसूरी आहे, असे म्हणता येईल, ल जनी द्यू क्रिस्तिआनिस्म (१८०२, इं. शी. द नेचर ऑफ क्रिश्चॅनिटी) या ग्रंथात त्याने ख्रिस्ती धर्म हा सर्वात अधिक काव्यात्म असून स्वातंत्र्य, कला व साहित्य यांना तो पूरक आहे, असे समर्थपणे प्रतिपादले. या ग्रंथामुळे पुढील स्वच्छंदतावादी साहित्यिकांना ख्रिस्ती धर्माविषयी आपुलकी उत्पन्न झाली. मादाम द स्ताल व शातोब्रीआं यांच्या साहित्यापासून प्रेरणा घेऊन उदयास येत असलेल्या स्वच्छंदतावादाच्या प्रमुख प्रतिनिधींत ⇨ लामार्तींन (१७९०-१८६९) ह्या कवीचा समावेश होतो. लामार्तीनचे मेदितासियॉं पोएतीक (इं. शी. पोएटिक मेडिटेशन्स, १८२०, चिकित्सक आवृ. १९१५) हा काव्यसंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. लामार्तीनच्या काव्याला मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. मानवाच्या भवितव्यविषयक समस्या विशद करण्यासाठी त्याने जॉसलँ (१८३६) हे महाकाव्य रचिले. राफाॲल (१८४९) व ग्राझिॲल्ला (१८५२) या कादंबऱ्यांत व ले कॉंफिदांस (१८४९) या आत्मचरित्रात लामार्तीनने आपल्या जीवनातील अनुभव कथन केले आहेत. निसर्ग, शुद्ध प्रेम,आत्म्याचे अमरत्व, मृत्यू हे लामार्तीनचे आवडते विषय असून त्याचा पिंड भावकवीचा आहे. त्याच्या चिंतनपर काव्यातसुद्धा ही भावात्मकता दिसून येते. शातोब्रीआंने जसे आपल्या रंगमय शैलीने फ्रेंच गद्याला नवजीवन दिले त्याचप्रमाणे उत्कटता, उत्स्फूर्तता व गेयता या गुणांमुळे लामार्तीनने फ्रेंच काव्यास नवचैतन्य प्राप्त करून दिले.
व्हिक्टर ह्यूगो हा श्रेष्ठ स्वच्छंदतावादी नाटककार. क्रॉम्वेल (१८२७) ह्या त्याच्या नाटकाची त्याने लिहिलेली प्रस्तवना ही स्वच्छंदतावादाचा अधिकृत जाहीरनामा मानली जाते.
‘द्राम’ या नवीन नाट्यप्रकारात वापरलेल्या तत्त्वांचे या प्रस्तावनेत विवेचन आढळते. शोकात्मिका आणि सुखात्मिका यांमध्ये अभिजाततावादाने निर्माण केलेली भिंत तोडून टाकून ह्यूगोने परंपरागत ऐक्यत्रयीही धाब्यावर बसविली. त्याच्या यॅर्नानी (१८३०) ह्या पद्यनाटकाच्या पहिल्या दोन प्रयोगांच्या वेळी अभिजाततावादी आणि स्वच्छंदतावादी ह्यांच्यात संघर्ष घडून आला होता. ह्या संघर्षात स्वच्छंदतावाद्यांना विजय मिळाला. आणि स्वच्छंदतावाद्यांच्या यशावर शिक्कामोर्तब झाले. तथापि व्हिक्टर ह्यूगोचा पिंड नाटककारापेक्षा कवीचाच होता. त्याच्या ले झॉरिआंताल (१८२९). ले फय दो तॉन (१८३१), ले व्हआ झँतेरियर (१८३७) या काव्यसंग्रहांत व विशेषतः ला लेजांद दे सिॲक्ल (१८५९, इं. शी. द लेजंड ऑफ सेन्व्यूरीज) या महाकाव्यात व्हिक्टर ह्यूगोची तीव्र कल्पनाशक्ती, भाषाप्रभुत्व आणि रचनाकैशल्य हे सर्व गुण दिसून येतात. नॉत्र-दाम द पारी (१८३१), व ले मिझेराब्ल (१८६२) या त्याच्या कादंबऱ्याही अत्यंत यशस्वी ठरल्या. आपल्या प्रतिभेच्या विविध पैलूंनी या श्रेष्ठ साहित्यिकाने फ्रेंच साहित्यातील एकोणिसावे शतक उजळून टाकले. ⇨ आल्फ्रेद व्हीक्तॉर द व्हीन्यी (१७९७-१८६३) हा स्वच्छंदतावाद्यांतील तत्त्वचिंतक कवी होय. त्याच्या बहुतेक कविता रूपकात्मक असून त्यात त्याचे जीवनविषयक तत्वज्ञान गोवले गेले आहे. पोॲम आंतीक ए मॉदेर्न (१८३६, इं. शी. एन्शंट अँड मॉडर्न पोऐट्री) या काव्यसंग्रहातील ‘ला मॉर द्यू लू’ या कवितेत आत्यंतिक दुःखातही चित्तवृत्ती ढळू न देणऱ्या स्टोइक पंथाचा आदर्श रंगविलेला आहे. व्हीन्यीने कादंबरीलेखनही केले. सँ मार (१८२६) या कादंबरीत सरदारशाहीचा नायनाट केल्याबद्दल रीशल्यला दोष दिला आहे. ‘सॅर्व्हित्यूद ए ग्रांदर मिलितॅर’ (१८३५, इं. भा. द मिलिटरी नेसेसिटी, १९५३) या नावाने त्याने लिहिलेल्या तीन कथांतून सैनिकांच्या त्यागाचे व कर्तव्यदक्षतेचे गोडवे गाइलेले आहेत. चॅटरटन (१८३५) या नाटकात प्रतिभावंत कवींवर समाज कसा जुलूम करतो. त्याचे हृदयद्रावक चित्रण आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, उत्कट प्रेमात वा अमरत्वाच्या कल्पनेत लामार्तीनला शांती मिळत होती. परंतु व्हीन्यीला कुठेही शांती लाभत नाही. कसलीही तक्रार न करता जीवनाचे आघात मुकाट्याने सोसणे हेच त्याच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे आणि दुःखामुळेच सर्व मानवता एकत्र येते हाच त्याच्या निराशावादी तत्त्वज्ञानातील एकमेव आशेचा किरण होय.
⇨ आल्फ्रेद द म्यूसे (१८१०-५७) हा या शतकाचा ‘आफां तॅरीब्ल’ किंवा ‘व्रात्य पोरगा’ मानला जातो. सुरूवातीला अभिजाततावादाची तरफदारी व स्वच्छंदतावाद्यांचा उपहास करणारा हा कवी अखेरीस आत्यंतिक स्वच्छंतावादी बनला. ⇨ झॉर्झ सांद (१८०४-७६) या विदुषीच्या प्रेमात पडून पोळून निघाल्यामुळे त्याने ‘न्युई’ या उत्कट व उत्स्फूर्त अशा प्रेमकविता लिहिल्या. काव्याला विवेकापेक्षा भावनेचेच अधिष्ठान पाहिजे, असे म्यूसेचे मत होते. ले काप्रीस द मारियान (इं. शी. कॅप्रिशस मारियन), फांताझियो आणि आँ न बादीन पा आव्हॅक लामूर (१८३४, इं. शी. लव्ह इज नॉट अ जोक) ही हलकीफुलकी नाटके त्याने लिहिली. ह्या तिन्ही नाट्यकृती ला रव्ह्यू दे द मॉंद ह्या प्रसिद्ध फ्रेंच नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. (१९३३, १९३४, १९३४). लॉरेंझाचियो हे त्याचे ऐतिहासिक नाटक. १८९६ मध्ये ते रंगभूमीवर आले. मानसिक द्वंद्वाचे अत्यंत प्रभावी चित्रण त्यात आहे.
ल पार्नास : म्यूसे व इतर स्वच्छंदतावादी कवींच्या अतिरेकी भावविवशतेविरूद्धची प्रतिक्रिया म्हणून ‘ल पार्नास’ या नावाने ओळखला जाणारा साहित्यसंप्रदाय अस्तित्वात आला. या संप्रदायाचा अग्रदूत होता ‘कलेसाठी कला’ या तत्त्वाचा उद्गाता ⇨ तेऑफील गोतिए (१८११-७२). सुरूवातीला ही चळवळ रव्ह्यू फांतेझीस्त व रव्ह्यू द्यू प्रोग्रॅ (१८६३-६१) या साहित्याला वाहिलेल्या नियतकालिकांशी निगडीत होती. १८६६ मध्ये ल पार्नास कॉंतँपॉरँ (इं. शी. अर्थ- कंटेपररी लिटरेचर) ह्या शीर्षकाने एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यात ह्या संप्रदायाच्या सदस्यांच्या कविता होत्या. ⇨ लॅकाँत द लील (१८१८-९४) हा ह्या संप्रदायाचा नेता. ⇨ रने फ्रांस्वा आर्मा स्यूली-प्ऱ्यूदॉम (१८३९-१९०७), ⇨ होसे मारीआ द हेरेदिया (१८४२-१९०५), ⇨ फ्रांस्वा कोपे (१८४२-१९०८), लेआँ द्येर्क्स (१८३८-१९१२), ल्वी मेनार (१८२२-१९०१) ह्यांचा समावेश ह्या संप्रदायाचा अन्य कवींमध्ये होतो. ह्या संप्रदायाचा अग्रदूत गोतिए ह्याने चित्रकार म्हणून आपल्या कलाजीवनाला सुरूवात केली. त्याच्या साहित्यातही चित्रकलेचा प्रभाव जाणवतो. ‘जे सुंदर तेच शिव जे असुंदर ते अमंगल’ ही त्याची कलाविषयक भूमिका एमो ए कामे (१८५२, इं. शी. एनामोस अँड केमियोज) ह्या त्याच्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहात प्रकर्षाने प्रत्ययास येते. ले जन फ्रांस (१८३३, इं. शी. यंग फ्रान्स) ह्या आपल्या कथासंग्रहात गोतिएने स्वच्छंदतावाद्यांच्या अतिरेकावर उपहासाचे शस्त्र उगारले. वस्तुनिष्ठता, संयमित अभिव्यक्ती आणि घाटाचा काटेकोरपणे ही पार्नॅसिअन संप्रदायाने पुरस्कारिलेली तत्वे होती. ग्रीक-रोमन भूतकाळाचे ह्या संप्रदायाला विशेष आकर्षण होते.
लकॉंत द लील ह्याच्या कवितेत पार्नॅसिअन संप्रदायाची वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येतात. निसर्गातील विविध रंग त्याच्या कवितेने टिपले ग्रीक कला आणि विचार ह्यांचे माहात्म्य व्यक्तविले. प्राचीन भारतीय संस्कृतीचाही त्याच्यावर मोठा प्रभाव होता. ‘भागवत, ला व्हीझीआँ द ब्रह्मा’ (इं. शी. भागवत, द व्हिझन ऑफ ब्रह्मा) सारखे काव्य ह्या संदर्भात उल्लेखनीय आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाचा त्याच्या काव्यावरील परिणाम लक्षणीय आहे. स्यूली-प्ऱ्यूदॉम ह्याच्या कवितेत वस्तुनिष्ठता टोकाला नेलेली आढळते. विज्ञान आणि तत्त्वज्ञान ह्यांतील काही अमूर्त संकल्पनांनाही त्याने काव्यरूप दिलेले आहे. १९०१ मध्ये स्यूली-प्ऱ्यूदॉमला साहित्यातील नोबेल पारितोषिकाचा बहुमान प्राप्त झाला. हेरेदियाची कीर्ती त्याने रचिलेल्या ११८ सुनीतांवर अधिष्ठित आहे. फ्रेंच साहित्यातील सर्वोत्कृष्ट सुनीतांत त्याचा अंतर्भाव होतो. काटेकोर घाटाचा पार्नॅसिअन आदर्श ह्या सुनीतांतून परिपूर्णपणे साकार झालेला आहे. फ्रांस्वा कोपेच्या आरंभीच्या कवितेवर पार्नॅसिअन संप्रदायाचा प्रभाव आहे. लेआँ द्येर्क्सवर लकॉंत द लील आणि बोदलेअर ह्यांचा प्रभाव होता. प्रोमीथिअसच्या ग्रीक मिथ्यकथेवर आधारित असे एक महाकाव्य (प्रोमेते देलिव्ह्रे, १८४४) त्याने लिहिले.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बोदलेअरची कविप्रतिमा ठळकपणे उठून दिसते. शरीर व मन ह्यांमधील संघर्ष हा बोदलेअरच्या कवितेतील प्रमुख विषय. मनातील सूक्ष्मगहन वासना तो आपल्या कवितेतून उलगडून दाखवतो. ध्वनी, रंग, व गंध हे परस्परांशी निगडीत असून कवीने त्यांना आवाहन करणाऱ्या प्रतिमांचा (प्रतीकांचा) वापर केला पाहिजे, असा विचार बोदलेअरने आपल्या ‘कॉरॅस्पॉंदांस’ ह्या कवितेत मांडलेला आहे. फ्रेंच साहित्यातील प्रतीकवादाची पूर्वचिन्हे त्यात दिसतात. झेरार द नेर्व्हाल (१८०८-५५) हया स्वच्छंदतावादी कवीच्या कवितेतूनही प्रतीकवादाची लक्षणे आढळतात. ओरेलिया ह्या नावाने त्याने आपली काही स्वप्ने व्यक्तविली आहेत त्याचप्रमाणे आपल्या मानसिक विकृतीच्या विविध अवस्थाही शब्दांकित केल्या आहेत.
प्रतीकवाद : फ्रेंच प्रतीकवाद ही मुख्यतः काव्यक्षेत्रातील चळवळ. १८८० पासून ती सुरू झाली. ⇨ पॉल व्हर्लेअन (१८४४-९६) आणि ⇨ स्तेफान मालार्मे (१८४२-९८) हे फ्रेंच प्रतीकवादाचे प्रमुख प्रतिनिधी. कविता तरल, ओघवती आणि आवाहक असली पाहिजे, अशी प्रतीकवाद्यांची भूमिका होती. त्यांच्या दृष्टीने कवितेत वर्णनात्मकतेला स्थान नव्हते. संवेदना, अंतःप्रज्ञा आणि विविध भावानुभवांचे कविमनावर होणारे संस्कार अभिव्यक्त करणे हे कवितेचे कार्य होय, असे ते मानीत होते. कवीला जे प्रतीत होते, ते वास्तव अशी प्रतीकवाद्यांची धारणा म्हणून कवी कवितेत योजीत असलेल्या प्रतिमा ही त्याच्या आत्मिक स्थितीची प्रतीके ठरली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. प्रतीकवाद्यांवर सर्वात जास्त प्रभाव पडला तो ⇨ अर्त्यूर रॅबोचा (१८५४-९१). एकोणीस वर्षाचा असतानाच या कवीने फ्रान्सचा श्रेष्ठ कवी अशी प्रसिद्धी मिळविली. जीवनविषयक व साहित्यविषयक जुन्या परंपरेविरुद्ध त्याने बंड केले व अंतर्मनाच्या अंधःकारमय प्रदेशात शिरून अदृश्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. यामुळेच त्याच्या काव्यात कधी कधी दुर्बोधता येते. यून सॅझॉ आंनाफॅर (१८७३, इं. शी. ए सीझन इन इन्फेर्नो) या काव्यसंग्रहात त्याच्या जीवनातील अनुभवच त्याने संकलित केले आहेत. पॉल व्हर्लेअनने ले पोअम सात्युर्नियां (१८६६) हा काव्यसंग्रह प्रसिद्ध करून अत्यंत लयबद्ध. संगीतमय व आत्मपर काव्यलेखन सुरू केले. ‘लार पोएतीक’ (१८७१-७२, इं. शी. पोएटिक्स) या कवितेत तो स्वप्नमयता, भावनात्मकता व सूचकता यांचा पुरस्कार करतो. कविता अवाहक असावी, ओघवती असावी, ही प्रतीकवाद्यांची भूमिकाही ह्या कवितेत व्यक्त झालेली आहे. कविता आवाहक करण्यासाठी मालार्मेने विविध प्रतीकांचा आणि रूपकांचा तर उपयोग केलाच परंतु कवितेतील लयताल आणि वाक्यरचना ह्यांबाबतही प्रयोग केले. कविता आणि संगीत ही विशुद्ध कल्पनेचीच (आयडिया) पर्यायी अंगे होत, असे मालार्मेने मानले. तथापि मालार्मेच्या काही कविता आणि काही गद्यलेखनही अत्यंत दुर्बोध आहे. लाप्रँ-मिदी दँफोन (१८७६, इं.शी. आप्टरनून ऑफ ए फॉन), पोएझी (१८८७, इं.शी. पोएम्स) हे त्याचे काही उल्लेखनीय काव्यसंग्रह.
वास्तववाद : फ्रेंच साहित्यातील वास्तववाद हा मुख्यतः कादंबऱ्यांतून प्रकटला. स्तॅंदालच्या कादंबऱ्या हया मानसशास्त्रीय वास्तववादाची उदाहरणे होत, असे म्हटले जाते. मानवी कृत्यांकडे पाहण्याची स्तॅंदालची एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी होती. विचार हा संवेदनेतून निर्माण होतो आणि माणसाचे वर्तन त्याच्या विकारांकडून नियंत्रित केले जाते. साहजिकच माणसाच्या सुखाभिलाषेचा फार मोठा परिणाम त्याच्या वागण्यावर होतो. तेव्हा आपले सद्गुणही हितसंबंधांतून निर्माण होतात ह्याची जाणीव आपण निःसंकोचपणे ठेवली पाहिजे. त्याच्या कादंबऱ्यांतील पात्रे सुखाच्या व प्रेमाच्या शोधात असतात व हा शोध घेताना ते आपल्या बुद्धिमत्तेचा, शक्तीचा व साहसी वृत्तीचा पुरेपूर उपयोग करुन घेतात व आपल्या मार्गात येणाऱ्याचा काटा काढायला मागेपुढे बघत नाहीत. त्याच्या स्त्रीपात्रांतसुद्धआ हेच स्वभावविशेष आढळतात. ल रुज ए ल न्वार (१८३०, इं. शी. रेड अँड ब्लॅक) या कादंबरीतला ज्युलियां सॉरेल हा नायक आपला उद्देश साधण्यासाठी अगदी शांत चित्ताने नीती-अनीतीची बंधने झुगारून देतो व अखेरीस निर्भयपणे मृत्यूलादेखील कवटाळतो. ला शार्त्रझ द पार्म (१८३९) या कादंबरीतला नायक फाब्रीस देल दॅंगो हाही असाच साहसी जीवन जगतो. स्तँदालची शैली सोपी होती. अगदी गुंतागुंतीचे विचारही स्पष्टपणे व्यक्त करण्याचा त्याचा प्रयत्न असे.
ऑनोरे द बाल्झॅकने आपल्या कादंबऱ्यांच्या समुच्चयाला ‘ला कॉमेदी युमॅन’ (१७९९-१८५०) म्हणजे ‘मानवी नाट्य’ हे समर्पक असे शीर्षक दिले. समकालीन फ्रेंच समाजाचे वास्तवपूर्ण व तपशीलवार वर्णन करणे ही बाल्झॅकची योजना होती. बाल्झॅकवर नव्या शास्त्रीय शोधांचा प्रभाव पडला होता. विशेषतः झाफ्र्वा सँ-तीलेअर या निसर्ग वैज्ञानिकाचे सिद्धांत त्याच्या परिचयाचे होते. प्राण्यांमध्ये जशा भिन्न जाती असतात तशाच मनुष्यांमध्येही असतात व प्राण्यांमध्ये भोवतालच्या वातावरणानुसार जसे बदल होतात, तसेच मानव समाजात होतात, असे बाल्झॅक आपल्या कादंबऱ्यांतून सुचवितो. या तत्त्वानुसार त्याने कॉमेदी युमॅनचे विभाग पाडले : (१) रीतिरिवाजांचा अभ्यास, (२) तत्वज्ञानात्मक अभ्यास व (३) चिकित्सात्मक अभ्यास. भोवतालच्या वातावरणाला दिलेल्या महत्त्वामुळे त्या वातावरणाचे तो साद्यंत वर्णन करतो. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील फ्रेंच समाजाच्या या अभ्यासावरून असे स्पष्ट दिसून येते, की समाजजीवनावर अतिशक्तिमान अशा ‘फ्रँक’चाच हुकूम चालू असून कधीही न संपणाऱ्या अशा या जीवनकलहात मानवी मूल्यांचा, भावनांचा व शक्तीचा ऱ्हास होत जातो. त्याच्या ला पो द शाग्रँ (१८३१), अजेनी ग्रांदे (१८३३), ल पॅर गोरिओ (१८३४, इं. शी. फादर गोरियो,) ल कुझँ पॉंस (१८४७, इं. शी. कझन पॉस) या श्रेष्ठ कादंबऱ्यांतूनही हेच निदर्शनास येते. फ्रेंच साहित्यावर स्वच्छंदतावादाचा प्रभाव अत्युच्च होता. त्यावर बाल्झॅकच्या वास्तववादाचा उतारा म्हणून उपयोग झाला. ज्या दृश्य व सुप्त शक्ती मानवी स्वभावावर प्रभाव टाकतात त्यांचा बाल्झॅकने सखेल अभ्यास केला व आपल्या परिणामकारक शैलीने त्यांचे विश्लेषण केले. फ्रेंच साहित्यातील वास्तववादाचा संस्थापक म्हणून त्यालाच मान द्यावा लागेल. कादंबरीच्या विषयांत व घाटात त्याने आमूलाग्र क्रांती घडवून आणली व या साहित्यप्रकाराने तत्वज्ञान विज्ञान, राज्यशास्त्र, धर्म, समाजशास्त्र ही समाजजीवनाची विविध क्षेत्रे व्यापिली. त्याने अप्रत्यक्ष रीत्या वास्तववादी रंगभूमीला उत्तेजन दिले. ⇨ एमिल ओझ्ये (१८२०-८९), ⇨ आलेक्सांद्र द्यूमाचा (१८०२-७०) पुत्र ⇨ आलेक्सांद्र द्यूमा (फीस) (१८२४-९५) यांनी बाल्झॅकपासूनच प्रेरणा घेतली.
झॉर्झ सांद ही एकोणिसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ लेखिका होय. तिच्या कादंबऱ्यांतील बहुतेक घटना बेरी या तिच्या मूळ प्रदेशाच्या परिसरात घडलेल्या आहेत. फ्रान्समध्ये प्रादेशिक कादंबऱ्यांचा प्रारंभ तिनेच केला. साध्या, सोप्या पण ओघवत्या शैलीत व अत्यंत उत्कटतेने लिहिलेल्या तिच्या कादंबऱ्यांत गरीबांविषयीची कळकळ, समाजवादी प्रवृत्ती, निसर्गाविषयीचे प्रेम, ग्रामीण जीवनविषयीची ओढ ही दिसून येतात. तिचे साहित्य आदर्शवादी आहे. मानीव चांगुलपणावर व मानवतेच्या प्रगतीवर तिचा दृढ विश्वास होता. ला मार ओ दियाब्ल (१८४६, इं. शी. डेव्हिल्स पाँड) व ले मॅत्र सॉनर (१८५२, इं. शी. मास्टर म्यूझिशन्स) या तिच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.
स्वच्छंदतावादाच्या उत्कर्षकालात ⇨ प्रॉस्पेअर मेरीमे (१८०३-७०) ह्याने ला क्रॉनीक द्यू रॅग्न द शार्ल नफ (१८२९) ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली असली, तरी मुख्यतः तो ‘मातेओ फाल्कॉने’ (१८२९), ‘कॉलाँबा’ (१८४०) व ‘कार्मेन’ (१८४५) ह्या दीर्घकथांसाठी प्रसिद्ध आहे. कोर्सिका व स्पेनची पार्श्वभूमी लाभलेल्या या कथांत मेरीमे रांगड्या व प्रलयंकारी भावना अत्यंत संयमशीलपणे चित्रित करतो. मात्र मेरीमेच्या कादंबऱ्यांत काही स्वच्छंतावादी प्रवृत्तीही दिसून येतात.
एक विशिष्ट साहित्यिक संप्रदाय म्हणून वास्तववाद विशेष प्रभावी झाला तो १८५० नंतर फ्लोबेअरच्या मादाम बोव्हारी (१८५७) या कादंबरीच्या प्रकाशनामुळे. ⇨ गॉंकूर बंधू व एमील झोला यांनी तर वास्तववादी प्रवृत्ती आणखी पुढे नेऊन निसर्गवादास जन्म दिला. डॉक्टर क्लोद बेर्नार (१८१३-७८) आणि टीकाकार व तत्वज्ञ ⇨ इपॉलित तॅन (१८२८-९३) यांच्या विचारसरणीच्या प्रभावातून झोलाने निसर्गवादाची प्रणाली मांडली. विज्ञानाचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोण, लेखनविषयीचे सूक्ष्म निरीक्षण, आनुवांशिकता आणि आसमंत ह्यांचे परिश्रमपूर्वक उभे केलेले संदर्भ आणि अगदी काटेकोरपणाने पुरविलेले वर्णनातील विपुल तपशील ही निसर्गवादी साहित्याची वैशिष्ट्ये झोलाच्या कादंबऱ्यांत आढळतात. ‘ले रूगाँ माकार’ ह्या नावाने झोलाने वीस कादंबऱ्यांची एक माला गुंफिली (१८७१-९३). या कादंबरीसमुच्चयात फ्रेंच समाजातील सर्व वर्गाचे प्रत्ययकारी दर्शन होते. उदा., ला फॉर्त्यून दे रूगॉंमध्ये (१८७१) खेडेगावातील जीवन, मानामध्ये (१८८०) उच्चभ्रू विलासी समाज. ल व्हांत्र द पारीमध्ये (१८७३) पॅरिसमध्ये व्यापारी वर्ग, ला बॅत युमॅनमध्ये (१८९०), रेल्वे, जॅरमिनालमध्ये (१८८५) खाण व खाणकामगार. ल रोमां एकस्पेरीमांताल (१८८०, इं. शी. द एक्सपेरिमेंट्ल नॉव्हेल) आणि ले रामांसिए नात्युरालिस्त (१८८१, इं. शि. द नॅचरॅलिस्टिक नॉव्हेलिस्ट्स) या ग्रंथांतून झोलाने आपली निसर्गवादाची तत्त्वप्रणाली मांडली. परिणामकारक चित्रणशैली व सूक्ष्म निरीक्षणशक्ती यांमुळे त्याच्या कादंबऱ्या अत्यंत प्रभावी ठरल्या आहेत. झोलाच्या भोवती एक निसर्गवादी गट तयार झाला. त्यामध्ये ⇨ गी द मोपासां व ⇨ योरिस कार्ल यूईस्मांस (१८४८-१९०७) यांचा अंतर्भाव होता. त्यांनी ले स्वारे द मेदां (१८८०) नामक कथासंग्रह प्रसिद्ध केला. तथापि ⇨ आल्फॉंस दोदे (१८४०-९७) सारख्या लेखकांनी निसर्गवादाची संकुचित तत्त्वप्रणाली अनुसरण्यास नकार दिला.
निसर्गवादाची तात्त्विक भूमिका मांडण्याचे श्रेय झोलाकडे जात असले, तरी एद्मॉं द गॉंकूर (१८२२-९६) व झ्यूल द गॉंकूर (१८३०-७०) या बंधूंनी झोलाच्या आधीच निसर्गवादाचा पाया घातला होता, असे म्हणता येईल. त्यांनी भोवतालच्या जीवनाची काटेकोर टिपणे करून त्यांचा लेखनासाठी उपयोग केला. रने मोपरँ (१८६४), जेर्मिनी लासेर्त (१८६४) व मादाम जॅरव्हॅझ (१८६९) या कादंबऱ्यांत त्यांनी वैद्यकीय चिकित्सेची शास्त्रीय पद्धती अनुसरलेली आहे. त्यांतील बहुतेक पात्रे शरीराने व मनाने विकृत असून समाजाच्या निकृष्ट थरांतून घेतली गेली आहेत.
इतिहास : एकोणीसाव्या शतकात इतिहासलेखनास पूर्ण विकसित रूप प्राप्त झाले. इतिहासग्रंथाबरोबरच ऐतिहासिक लेखनही झाले. ह्या शतकात इतिहासलेखनाच्या विकासाला परिस्थिती पोषक अशीच होती. १७८९ ते १८१५ या कालखंडात राजकीय क्षेत्रात अत्यंत महत्वाचे असे बदल घडून आले होते. शिवाय, स्वच्छंदतावादी हे भूतकाळात विशेष रस घेत होते. राजकीय प्रचारात वृत्तपत्रकार व व्याख्याते यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागे. याच काळात पुरातत्वविद्या, भाषाशास्त्र, पुरालेखशास्त्र इ. शास्त्रांनी बरीच प्रगती करून इतिहासकारांना महत्वाची माहिती उपलब्ध करून दिली होती. शातोब्रीआंने एसॅ स्युर ले रेव्होल्युसिआँ (१७९७, इं. शी. एसे ऑन द रेव्हलूशन्स) हा ग्रंथ लिहून इतिहासप्रेमाला चालना दिली. त्याच्याकडून व सर वॉल्टर स्कॉटकडून प्रेरणा घेऊन व्हीन्यीने सँ मार (१८२६) व व्हिक्टर ह्यूगोने नोत्र-दाम द पारी (१८३१), मेरीमेने ला क्रॉनीक द्यू रॅग्न द शार्ल नफ. बाल्झॅकने ले श्वां (१८२९) व आलेक्सांद्र द्यूमाने ले त्र्वा मुस्कतॅर (१८४४) या कादंबऱ्या लिहिल्या. ऐतिहासिक नाटकांनासुद्धा चालना मिळाली. आलेक्सांद्र द्यूमाचे आंरी त्र्वा ए सा कूर (१८२९), द्यूगोचे यॅर्नानी, म्यूसेचे लोरेंझाचिओ (१८३४), व्हीन्यीचे चॅटर्टन, (१८३५) ही नाटके यशस्वी झाली. काव्यावरही इतिहासाचा प्रभाव दिसून येतो. व्हिक्टर द्यूगोचे महाकाव्य लेजांद दे सिॲक्ल, ⇨ प्येअर झां द बेरांझे (१७८०-१८५७) ह्याचा शांसॉं हा काव्यसंग्रह इत्यादी. इतिहासलेखनात तीन प्रमुख प्रवृत्या दिसून येतात : कथात्मक – गीयोम प्रोस्पॅर द बारांत (१७८२ -१८६६ – इस्त्वार दे द्यूक द बुरगॉग्न, १८२४-१८२६), आदॉल्फ त्येअर (१७९७-१८७७ – इस्त्वार द ला रेव्होल्युसिआँ, १८२३-१८२७), मीन्ये (१७९६-१८८४ इस्त्वार द ला रेव्होल्युसिआँ फ्रांसेझ, १८२४) व ऑग्यूस्तँ त्येरी (१७९५-१८५६-कॉंकॅत द लांग्लतॅर पार ले नॉर्मा, १८२५).
तत्त्वविवेचनात्मक इतिहास : गिझो : (१७८७-१८७४ इस्त्वार दला रेव्होल्युसिआँ दांग्लतेर (१८२३ – २५), किनॅः ल जेनी दे रलिजिआँ (१८४२) या ग्रंथांत इतिहासकथनापेक्षा ऐतिहासिक नियमांच्या विवेचनाला प्राधान्य दिले गेले आहे. भूतकालाचे पुनरूज्जीवन : ⇨ मीश्ले (१७९८-१८७४, इस्त्वार द फ्रांस, १८३३-६७ व इस्त्वार द ला रेव्होल्युसिआँ, सात खंड, १८४७-५३). मीश्लेने भूतकाळातील प्रसंग व व्यक्ती यांना सजीव करून आपल्या प्रतिभेने इतिहासाला महाकाव्याचे रूप दिले, तरी शास्त्रोक्त इतिहासाचा पाया फ्यूस्तेल द कूलांझ (१८३०-८९) याने घातला. इतिहास म्हणजे व काटेकोर माहितीचे संकलन ही व्याख्या कूलांझने आपल्या इतिहासलेखनातून प्रत्यक्ष अमलात आणली. इस्त्वार देझँस्तित्वुसिआँ पॉलितीक द लांसिॲन फ्रांस (१८७५-८९) व रशॅर्श ए नुव्हॅल स्युर कॅल्क प्रॉब्लॅम दिस्त्वार हे त्याचे महत्वाचे ग्रंथ होत. ला सिते आंतीक (इं. शि. एन्शंट सिटी) ह्या आपल्या ग्रंथात मानवशास्त्रीय दृष्टिकोण वापरलेला आहे.
टीकासाहित्य : एकोणिसाव्या शतकात इतिहासाप्रमाणेच टीका या साहित्यप्रकाराला शास्त्रीय स्वरूप आले. साहित्यिकांचे वर्गीकरण करताना ⇨ सँत-बव्ह (१८०४-६९) निसर्गवाद्यांचे अनुकरण करतो. तसेच सर्जनाच्या प्रक्रियेचा अभ्यास करून त्याचे नियम शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. जोसेफ अर्नेस्त रनां साहित्य आणि विद्वत्ता यांची अतूट सांगड घालून देतो. इपॉलित तॅन वंश, वातावरण व खण त्रिसूत्रीवर साहित्याचा कस ठरवितो. त्याच्या एसे द क्रिस्तीक ए दिस्त्वार (१८५८-९४) व द लँतेलिजांस (१८७०) या ग्रंथांचा झोलावर फार प्रभाव पडला. डार्विनचे सिद्धांत टीकाशास्त्रात आणण्याचा ब्यूनत्येअरने प्रयत्न केला.
सरदेयाय, मनोहरराय
विसावे शतक : विसाव्या शतकातील फ्रेंच साहित्यिकाचे सामान्यतः तीन कालखंड मानले जातात : पहिला, पहिल्या महायुद्धापूर्वीचा (१८९० ते १९१४) दुसरा, दोन महायुद्धांच्या मधला (१९१८ ते १९३९) आणि तिसरा, १९३९ नंतरचा. ही कालखंडाची विभागणी केवळ सोयीसाठी केलेली आणि म्हणूनच कृत्रिम आहे, हे उघड आहे. उदा., ⇨ मार्सेल प्रूस्त (१८७१-१९२२) व ⇨ आंद्रे झीद (१८६९-१९५१) यांना नावलौकिक जरी १९२० च्या नंतर मिळाला असला, तरी त्यांची बरीचशी साहित्यनिर्मिती पहिल्या महायुद्धाच्या आधी झालेली आहे. तसेच ⇨ सार्त्र (१९०५-८०), ⇨ माल्रो (१९०१-७६) आणि ⇨ मोर्याक (१८८५-१९७०) या समकालीन लेखकांपैकी मोर्याकची गणना दोन महायुद्धांच्या मधल्या काळात होत असली, तरी सार्त्रचे लिखाण बहुतांशी दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भातील घटनांशी निगडीत आहे.
चालू शतकांतील फ्रेंच साहित्याच्या पहिल्या कालखंडाची सुरूवात ⇨ ड्रायफस प्रकरणामुळे गाजली. १८९४ मध्ये फ्रेंच सरकारने ड्रायफस ह्या निरपराध ज्यू सैन्याधिकाऱ्यावर जर्मनीला गुप्त कागदपत्र पुरविल्याचा आरोप ठेवून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. काही पुरोगामी विचारांच्या व्यक्तींनी ड्रायफसच्या शिक्षेचा फेरविचार व्हावा आणि त्याचे पुनर्वसन व्हावे याकरिता देशव्यापी आघाडी स्थापन केली तर काही परंपरानिष्ठ फ्रेंच नागरिकांनी ड्रायफसच्या शिक्षेचा फेरविचार म्हणजे फ्रेंच सैन्याच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या इभ्रतीचा प्रश्न मानून, ड्रायफसविरुद्ध आवाज उठविला. एमिल झोला, ⇨ आनातॉल फ्रांस (१८४४ – १९२४) इं. फ्रेंच साहित्यिकांनी ड्रायफसला न्याय मिळावा म्हणून आटोकाट प्रयत्न केले.
पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस झालेल्या तहामुळे काही वर्षे बाह्यतः शांततेची गेली. तथापि अतिपूर्वेकडील राजकीय संघर्ष, स्पेनमध्ये पेटलेले यादवी युद्ध, इटली व जर्मनी ह्या देशांत बळावत असलेल्या फॅसिस्ट प्रवृत्ती, अशा कितीतरी घटनांमुळे भविष्यकाळाविषयीची आशास्वप्ने विरू लागली होती. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेल्या उद्ध्वस्तेच्या जाणिवेतून प्रस्थापित विचारसरणी, सामाजिक वर्तनाचे नियम, प्रचलित नीति-सौंदर्यमूल्ये यांचे वैयर्थ्य तरुण पिढीला जाणवले सर्वच निरर्थक आहे, अशी भावना बळावली. झुरिकमध्ये एकत्र येऊन काही कलावंतांनी ⇨ दादावाद ह्या संप्रदायाची केलेली स्थापना हा ह्या भावनेचाच परिपाक होता. ह्या कलावंतांत फ्रेंच कवि-शिल्पकार हान्स आर्प (१८८७-१९६६) ह्यचा समावेश होता. १९२१ मध्ये ह्या चळवळीचे केंद्र पॅरिसकडे सरकले आणि १९२२ च्या दरम्यान ह्या चळवळीचा अस्त झाला.
दादावादी हे विवेकविरोधी व बंडखोर असले, तरी त्यांनी विमुक्त सर्जनशीलतेला चालना दिली. त्यातूनच ⇨ अतिवास्तववादाचा उदय झाला. उच्च श्रेणीच्या वास्तवाचा म्हणजेच अतिवास्तवाचा शोध घेणे हे अतिवास्तववादी कला-साहित्याचे उद्दिष्ट होते. स्वप्नांतून किंवा अनिर्बंध कल्पनातरंगांतून प्रकट होणाऱ्या आविष्कारांत अतिवास्तव शोधण्याचा प्रयत्न काही लेखक-कलावंत करू लागले.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडात प्रकर्षाने जाणवणारी भावना होती ती तथाकथित मानवी संस्कृतीच्या संपूर्ण पराभवाची. युद्धात झालेली अपरिमित हानी, जर्मनांनी व्यापलेला स्वदेशाचा भाग, वंशभेदाच्या समस्या, आर्थिक पेचप्रसंग, युद्धकैद्यांना सोसावी लागलेली अमानुष वागणूक इत्यादींमुळे चिरंतन मानली गेलेली मूल्ये आणि बाळगलेल्या निष्ठा कोलमडून पडल्या होत्या. मानव अंतर्बाह्य बदलून गेला होता. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात ⇨ अस्तित्ववादाचा व्यापक आणि खोल असा परिणाम झाला. मानवी जीवन आणि परिस्थिती ह्यांच्याकडे पाहण्याची एक विवक्षित दृष्टी अस्तित्ववाद्यांनी दिली. मूल्यहीनतेच्या जाणिवेतून आलेली अगतिकता अधिकाधिक तीव्र होत गेली. नव-किंवा न-कादंबरी (न्यू किंवा अँन्टी नॉव्हेल), न-किंवा निरर्थ-नाट्य (थीएटर ऑफ द ॲब्सर्ड) आणि नवकाव्य यांची निर्मिती झाली. ही नव-साहित्याची लाट अलीकडेच ओसरू लागली आहे. जुने साहित्यप्रकार पुन्हा प्रचारात येत आहेत. नवकादंबरीकारांनी नाकारलेली कथन, स्वभावचित्रण, मनोविश्लेषण ही परिमाणे पुनःप्रस्थापित झालेली दिसतात.
पहिल्या महायुद्धापूर्वीचा कालखंड (१८९०-१९१४) : कादंबरी : निसर्गवादाचा पगडा कमी होत जाऊन फ्रेंच कादंबरी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस नवी वळणे घेऊ लागली होती. ⇨ मॉरिस बारेस (१८६२-१९२३) आणि पॉल बूर्झे (१८५२-१९३५) हे दोघे कादंबरीकार परंपरानिष्ठ होते. ल कयुल्त द म्वा ह्या नावाने बारेसने लिहिलेली कदंबरीत्रयी विशेष उल्लेखनीय आहे. ह्या त्रयीतील तीन कादंबऱ्या अशा : सू लेस दे बार्बार (१८८८), अँनॉम लिब्र (१८८९) आणि ल ज्यार्दा द बेरेनिस (१८९१). माणसाने आपल्या राष्ट्रीय संस्कृतीचा वारसा घेऊन आपले व्यक्तिमत्त्व संपन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण केले पाहिजे, असे विचार ह्या कादंबरीत्रयीतून त्याने मांडले आहेत. माणसाची आपापल्या प्रदेशांशी असलेली अतूट नाती व भावनिक बांधिलकी ह्याचा पुरस्कार त्याने ले देरासिने (१८९७), लापॅल ओ सॉल्दा (१९००) ह्या कादंबऱ्यांतून केला आहे. बूर्झेने आपल्या ल दिसीप्ल (१८९९) या कादंबरीत नियतिवाद आणि भोगवाद ह्या विचारसरणींचे अनिष्ट परिणाम दाखवले आहेत. पांरपरिक मूल्यांची जपणूक करीत बूर्झेचा वारसा चालविणरे दोन साहित्यिक म्हणजे रने बाझँ (१८५३-१९३२) आणि आंरी बॉर्दो (१८७०-१९६३). बाझँच्या ला तॅर की मर (१८९९), ल ब्ले की लॅव्ह (१९०७) च्या कादंबऱ्यांतून तसेच बॉर्दोच्या ला मॅझॉं ह्या कादंबरीतून कौटुंबिक जीवन व धार्मिक निष्ठा यांची तरफदारी आहे. मार्सेला प्रेव्हो (१८६२-१९४१) च्या कादंबऱ्यांमध्ये स्त्रीमनाचे विश्लेषण आढळते, तर ⇨ प्येअर लॉती (१८५०-१९२३) च्या कादंबऱ्यांना ताहिती, तुर्कस्तान, जपान अशा विविध देशांची निसर्गसुदंर पार्श्वभूमी लाभली आहे. लॉतीच्या दोन वैशिष्ट्यपूर्ण कादंबऱ्या म्हणजे मॉं फ्रेर इव्ह (१८८३) व ल पेशर दिस्लांद (१८८६). आलँ फूर्न्ये (१८८६-१९१४) ह्याने आपल्या ल ग्रॉं मॉल्न (१९१३) या वैशिष्ट्यपूर्ण कादंबरीत मॉल्न या व्यक्तिचित्राच्या द्वारे स्वतःचे बालपण आणि किशोरावस्थेतील कोवळा स्वप्नील प्रेमानुभव नाजुकपणे रेखाटला आहे. व्हालेरी लार्बो (१८८१-१९५७) याच्या ल ज्युर्नाल दाओ बार्नाबाथ (१९१३) कादंबरीचा नायक पेरू देशातील कोट्याधिश आहे. एकटेपणाची भावना असह्य होऊन मानवी जीवनाचे उद्दिष्ट शोधीत तो यूरोपभर फिरतो आणि स्वदेशी परतून स्थायिक होतो. या साहित्यकृतीतील नायकाची बेचैनी आधुनिक मानवाच्या मनःस्थितीची द्योतक आहे. रने ब्वालेव्ह (१८६७-१९२६) याने आपल्या ला बॅके (१९०१) आणि मादलॅन जन फाम (१९१२) ह्या कादंबऱ्यांतून ग्रामीण जीवनातील जिव्हाळ्याचे प्रश्न चितारले आहेत. एद्वार एस्तोन्ये (१८६२-१९४२) हा लापॅला द ला रूत (१९१९) ह्या कादंबरीत, तसेच लँफीर्भ ओ मँ द ल्युम्यॅर (१९२३) या कथासंग्रहात सर्वसामान्य माणसांची दुःखे आणि वैफल्य ह्याचे विश्लेषण करतो.
आनातॉल फ्रॉन्सच्या ल क्रिम द सिल्व्हेस्त्र बॉनार (१८८१, इं. शी. द क्राइम ऑफ सिल्व्हेस्त्र बॉनार), ला रोतिसरी द ला रॅन पेदोक (१८९३, इं . शी. ॲट द साइड ऑफ द क्कीन पेदोक) ह्यांसारख्या कादंबऱ्यातून एक प्रकारचा संदेहवादी वृत्तीचा प्रत्यय येतो. लील दे पँग्वँ (१९०८ इं. शी. पेंग्विन आयलंड्स) ह्या कादंबरीत त्याने परिपूर्ण मानवी समाजाची निर्मिती करणाऱ्यांचा उपहास केला आहे. ले दियझाँ स्वाफ (१९१२, इं. शी. गॉड्स आर ॲथर्स्ट) आणि ला रेव्हॉल्स दे झाँज्य (१९१४) ह्या दोन कादंबऱ्या फ्रेंच राज्यक्रांतिविषयक असून त्यांत फ्रांसचा निरीश्वरवाद, सहिष्णुता व मानवतावाद प्रकट झालेला आहे. १९२१ मध्ये फ्रांसला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
जागतिक किर्ती लाभलेल्या ⇨ रॉमं रॉलांवर (१८६६-१९४४) टॉलस्टॉय, गांधी, आंद्रे स्वारॅस यांचा प्रभाव दिसतो. झां ख्रिस्तॉफ (१० खंड, १९०४-१२) या त्याच्या सर्वश्रेष्ठ कादंबरीत एका प्रतिभाशाली जर्मन संगीतकाराच्या जीवनाचे चित्रण आणि त्याच्या अनुषंगाने आपले जीवनविषयक तत्वज्ञान त्याने प्रगट केले आहे. रॉलां हा आतेरराष्ट्रीय ऐक्य व शांतता यांचा प्रवक्ता होता. त्याने लिहिलेल्या रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, बीथोव्हन यांच्या चरित्रांतून तो दाखवून देतो, की माणूस आपल्या आंतरिक गुणांनी आणि मनःशक्तीने परिस्थितीवर मात करून महत्पदाला पोहोचू शकतो. माहात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर, भारतातील स्वातंत्र्यचळवळ या सर्वांविषयी रॉलांला विशेष आस्था होती. रॉलां ह्यास १९१५ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
मार्सेल प्रूस्त ह्याच्या आ ला रशॅर्श द्यु तां पेर्द्यू (७ खंड, १९१३-२७) ह्या महाकादंबरीत त्याच्या अत्यंत संवेदनशील आणि कलात्मक व्यक्तिमत्त्वाचे जसे दर्शन घडते. तसे त्याच्या काळातील समाजाचेही सखोल चित्रण आढळते. ह्या कादंबरीतून प्रुस्तने काळाला एक नवे परिमाण प्राप्त करून दिले आहे. स्मरणाशी निगडित असलेले स्वर, स्वाद, गंध किवा रंग ह्यांच्या तरल संवेदनामुळे आठवणी जागृत होतात आणि भूतकालीन अनुभूती आपण पाहिल्याइतक्याच उत्कटतेने जगू शकतो अशी प्रुस्तची धारणा असून तिचा प्रत्यय ह्या कादंबरीतून येतो. विख्यात आयरिश कादंबरीकार ⇨ जेम्स जॉइस ह्याच्यावर प्रूस्तचा प्रभाव दिसून येतो. आंद्रे झीद ह्याचे स्वातंत्र्यप्रेम आणि मानवतावादी दृष्टिकोण ह्यांमुळे तरुण पिढी त्याच्याकडे आकर्षिली गेली. ल मॉरिलिस्त (१९०२ इं. भा. द इमॉरॅलिस्ट, १९३०), ला पोर्त एत्र्वात (१९०९, इं. भा. स्ट्रेट इज द गेट, १९२४), ले फो मॉनॅय्यर (१९२६, इं. भा. काउंटरफिटर्स, १९२७) ह्या त्याच्या कादंबऱ्यांइतकीच-किंबहुना जास्तच-लोकप्रियता त्याच्या प्राजंळ दैनदिनीला लाभली. ही दैनंदिनी १८८९ पासून सु. ६० वर्षे तो लिहित होता. समलिंगी संभोगाचे समर्थन करणाऱ्या त्याच्या कॉरीदॉं (१९२४) ह्या ग्रंथाचे खूपच वादंग निर्माण केले. १९४७ साली झीदला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
काव्य : प्रतीकवादी काव्याचा वारसा आब्लेअर सामँ (१८५८-१९००), ⇨ आंरी द रेन्ये (१८६४-१९३६), ⇨ एमील व्हारहारेन (१८५५-१९१६) आणि ⇨ मॉरिस माटरलिंक (१८६२-१९४९) या कवींनी स्वतंत्रपणे पुढे चालविला. आल्बेअर सामँच्या ओ ज्यॉंर्द द लँफॉंत (१८९३) व ल शाऱ्यो दॉर (१९०१) या संग्रहांमध्ये त्याच्यातील निसर्गप्रेमी भावकवी दिसून येतो. आंरी द रेन्येने ले पोयॅम आँसॉं ए रॉमानॅस्क (१८९०) आणि ला सिते दे झो (१९०२) या आपल्या संग्रहांतून कवितांसाठी मुक्तच्छंदाचा उपयोग केला असला, तरी प्रयोगशिलतेपायी येणारी दुर्बोधता त्याने टाळली आहे. बदलत्या जगातल्या आधुनिक मानवाच्या जाणिवा व्हरहारेनच्या ले कापान्त्र आल्युसिने (१८९३), लेव्हील तॉंताक्युलॅर (१८९५) या त्याच्या काव्यसंग्रहात प्रगट झाल्या आहेत. प्रतिकवादाचा आविष्कार केवळ काव्यक्षेत्रापुरता मर्यादित नव्हता. उदा., माटरलिंकच्या काव्यापेक्षा त्याची प्रतीकवादी नाटके साहित्यदृष्ट्या अधिक श्रेष्ठ दर्जाची आहेत. पॉल फॉरने (१८७२-१९६०) सुरूवातीस प्रतिकवाद नाटके रंगभूमीवर आणली पण तो प्रतीकवादी कवी नव्हता.
प्रतीकवादी काव्यातील अतिरेकी गूढतेची तसेच पार्नॅसिअन संप्रदायाच्या भावनारहित कोरडेपणविरुद्धची प्रतिक्रिया नात्युरिझ्म ह्या १८९५ च्या सुमारास स्थापन झालेल्या काव्यसंप्रदायाने व्यक्तविली. सँ-झॉर्झ द बूएल्ये (१८७६-१९४७), पॉल फॉर, ⇨ फ्रांसी जाम्म (१८६८-१९३८) ह्यांसारखे कवी ह्या काव्यसंप्रदायात होते. नात्युरिझ्म हा निसर्गप्रेमी काव्यसंप्रदाय होता तथापि ग्रामीण जीवन दैनंदिन जीवनातील सुखदुःखे, सामाजिक न्याय, विश्वबंधुत्व असे विषयही त्यांनी आपल्या काव्यांतून हाताळले. काव्यातील उत्कटता आणि आवेग त्यांना महत्त्वाचा वाटत होता.
आन्ना द नॉआय (१८७६-१९३३) ही स्वच्छंदतावादी वृत्तीची भावकवयित्री. ला नुव्हॅल प्लेयाद ह्या कविमंडळात तिचा अंतर्भाव होतो. तिच्या लेझेब्लुझ्समॉं (१९०७) या संग्रहातून निसर्ग, प्रेम, तारुण्य हे तिचे स्फूर्तिविषयक असल्याचे दिसते, तर नंतरच्या ले फॉर्स एतॅर्नेल (१९२०) सारख्या काव्यसंग्रहात मृत्यू आणि नियती ह्यांबद्दलचा तिचा ध्यास व्यक्त झाला आहे. फ्रांसी जाम्म हा निसर्गपूजक कवी खेड्यातील जीवनातील सौंदर्य आणि सुखदुःखे आत्मीयतेने चित्रित करतो. परिचित वस्तू, प्राणी, फुले यांच्याशी तयाचा अखंडपणे संवाद चालू असतो. शार्ल पेगी (१८७३-१९१४) हा मूलतः गूढवादी कवी. त्याच्या काव्यात मानवतावाद, उत्कट देशप्रेम आणि ईश्वरश्रद्धा यांचा सुरेख संगम दिसून येतो. त्याच्या काव्याकृतींत ल मिस्तॅर द ला शारिते द ज्यानदार्क (१९०९) ही सर्वश्रेष्ठ समजली जाते.
विश्वबंधुत्वाच्या आदर्शाने भारून जाऊन ⇨ झार्झ द्यूआमेल (१८८४-१९६६), शार्ल व्हील्द्राक (१८८९- ) आणि रने आर्कोस (१८८१- ) या तिघा कवींनी आपला एक गट स्थापन केला. या गटाच्या प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या ⇨ झ्यूल रॉमँ (१८८५-१९७२) ह्याच्या व्ही युनानीम (१९०८) ह्या काव्यसंग्रहातील कवितांतून प्रेरणा घेऊन त्यातून ‘युनानिमिस्मे’ ह्या काव्यपंथाची विचारप्रणाली तयार झाली. मानवी एकात्मतेवर व बंधुभावनेवर त्यांचा भर होता. एखादा गट, समूह, शहर किंवा देश एका विशिष्ट भावनेने, विचारप्रणालीने प्रेरित होऊन एकात्मतेने कसा वागतो, हे त्यांनी आपल्या लिखाणांतून प्रकट केले.
पॉल झां तूले (१८६७-१९२०), फ्रांसीस कार्को (१८८६-१९५८) इ. कवींनी काव्यातील कृत्रिमता आणि नवतंत्र ह्यांचा हव्यास टाकून नैसर्गिक भावना व कल्पनाशक्ती यांना मुक्त अभिव्यक्ती देण्याच्या उद्देशाने ल ग्रूप फांतेझीस्ते ह्या कावपंथाची १९११ च्या सुमारास स्थापना केली.
⇨ गीयोम आपॉलिनेरच्या (१८८०-१९१८) काव्यातील आधुनिक प्रायोगिक दृष्टी ले आल्कूल (१९१३) आणि ले कालीग्राम (१९१८) ह्या त्याच्या काव्यसंग्रहांमध्ये प्रकर्षाने जाणवते. यंत्रयुगातील प्रतिमांचा वापर, विरामचिन्हांची अनुपस्थिती, स्वयंप्रेरित लेखन, कवितेचे मुद्रण करताना तिच्यातील ओळींची विषयानुसार विशिष्ट चित्राकार मांडणी इ. काव्यलेखनाचे आणि काव्यमुद्रणाचे नवनवे प्रयोग त्याने केले. स्वयंप्रेरित लेखन हे अतिवास्तववादाचे एक प्रमुख वैशिष्ट्य त्याच्या कवितेत आढळत असल्यामुळे अतिवास्तववादाचा तो एक पूर्वसूरी मानला जातो.
माक्स झाकॉब (१८७६-१९४४) ह्याच्या कॉर्न आ दे (१८१७, इं. शी. डाइस बॉक्स) ह्या गद्यकाव्यसंग्रहावर अतिवास्तववादी लेखनप्रवृत्तींचा प्रभाव दिसून येतो. ⇨ ब्लेअझ सांद्रार (१८८७-१९६१) ह्याने एक नवीन प्रभावी काव्यशैली निर्माण केली. जाझ, अतिवास्तववाद, धनवाद, (क्यूबिझम) ह्या विविध कला साहित्यसंप्रदायांचा प्रभाव त्याच्यावर दिसून येतो. कृतिप्रवण जीवन, नवनवे वैज्ञानिक शोध आणि साहसवृत्ती ह्यांचे त्याला आकर्षण वाटत होते. आपल्या काव्यात त्याने एकसमयावच्छेदता आणि चिक्कणितचित्रतंत्राचाही (कोलाज) उपयोग केला आहे.
रंगभूमी : फ्रेंच रंगभूमीला या काळात नवचैतन्य देण्याचे श्रेय आंद्रे आंत्वानाकडे (१८५८-१९४३) जाते. त्याने ‘तेआत्र लिब्र’ (१८८७-९६) ची स्थापना केली. या संस्थेने नव्या, तरुण नाटककारांची रंगभूमीवर आणली. निर्मिती आणि अभिनय ह्यांच्या संदर्भात नवनवे प्रयोग केले. नाटकांची निवड, नाट्यतंत्र यांबाबतचा आंत्वानचा विशाल दृष्टिकोण लक्षात घेऊनही त्याचे नाव मुख्यतः निसर्गवादी नाटकांशी निगडित राहिले आहे. तेआत्र लिब्रच्या निसर्गवादी तंत्राविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून पॉल फॉरने ‘तेआत्र दार’ ही नाट्यसंस्था सुरू करून (१८९०) प्रामुख्याने प्रतीकवादी नाटके सादर केली. पुढे १८९३ पासून लुग्ने पो (१८६९-१९४०) याने ‘तेआत्र द लव्ह्र या नावाने ती चालवली आणि प्रायोगिक तंत्राचा अधिक पद्धतशीरपणे उपयोग केला. नाट्यकलेसंबंधी व्याख्याने, चर्चा इत्यादींची प्रथा त्याने सुरू केली.
निसर्गवादाचा वारसा पुढे चालविणारे उल्लेखनीय नाटककार म्हणजे ⇨ झ्यूल रनार (१८६४-१९१० त्याचे प्वाल द कारॉत,१८९४, इं. भा. कॅरट्स, १९४६ हे नाटक विशेष गाजले), ऑक्ताव्ह मीर्बो (१८५०-१९१७, लेझाफॅर सॉं लेझाफॅर, १९०३, इं. शी. बिझिनेस इज बिझिनेस), एमील फाब्र (१८७० – १९५५, ले व्हॉंत्र दोरे, १९०५), झॉर्झ द पॉर्तोरीश (१८४९-१९३०, आमुरझ, १८९१), आंरी बाताय (१८७२ – १९२२, ला मार्श न्युप्शाल, १९०५) व आंरी बेर्न्स्तेन (१८७६-१९५३, ला ग्रिफ, १९०६, इं. शी. द क्लॉ) यांच्या नाटकांतून प्रेमभावनेचे विश्लेषण आहे. ⇨ फ्रांस्वा द क्यूरेल (१८५४-१९२८, ला नुव्हॅल इदॉल, १८९९), पॉल एर्व्ह्य (१८५७-१९१५, ले तनाय, १८९५), यूझेअन ब्रीअ (१८५८-१९३२, ले रॉंप्लॉंसाँ, १९०१) यांची नाटके प्रामुख्याने समस्याप्रधान आहेत. ⇨ एद्मॉं रॉस्तां (१८६८-१९१८) याची सीरानो द बेर्झीराक (१८९७) ही एक वीर-सुखात्मिका (हिरोइक कॉमेडी) असून लॅग्लॉं (१९००) हे ऐतिहासिक नाटक नेपोलियनच्या पुत्राच्या जीवनावर आधारलेले आहे.
झॉर्झ फेदो (१८६२-१९२१), त्रीस्तॉं बेर्नार (१८६६-१९४७), झॉर्झ कूर्तलीन (१८६० ? -१९२९) ह्यांचा समावेश उत्कृष्ट प्रहसनकारांत होतो. नाट्यक्षेत्रात ⇨ आर्ल्फद जारी (१८७३-१९०७) ह्याला आगळे आणि महत्वाचे स्थान आहे. त्याने आपल्या यूबू र्वा (१८९६, इं. शी. किंग उबू) या उपरोधप्रचुर फार्समधून समाजातील प्रस्थापित संस्था, नैतिक मूल्ये, संस्कृती यांच्यातील विसंगती दाखवून त्यांची टर उडवली आहे. बूर्झ्वाच्या सत्तालालसेचे प्रतीकरूपाने केलेले हे चित्रण आहे. पारंपारिक टीकाकरांनी मात्र त्याच्या या नाटकावर टीकेची झोड उठविली. जारीने या नाटकासाठी वापरलेल्या अभिनव तंत्रातूनच पुढे ॲब्सर्ड थीएटरने प्रेरणा घेतली.
वैचारिक साहित्य : या कालखंडातील साहित्यावर ⇨ आंरी बेर्गसॉंच्या (१८५९-१९४१) तत्वज्ञानाचा बराच प्रभाव दिसतो. शार्ल मॉरा (१८६८-१९५२) याची भूमिका कट्टर राजनिष्ठ आणि धर्मनिष्ठ विचारवंतांची होती. त्याने लक्सिआँ फ्रांसॅझ या प्रतिगामी चळवळीला पाठिंबा दिला. झां झॉरेअस (१८५९-१९१४) हा सुप्रसिद्ध फ्रेंच विचारवंत मानवतावादी समाजवादाचा पुरस्कर्ता होता. जर्मन आणि फ्रेंच लोकांमध्ये सलोख्याचे संबंध करण्यासाठी त्याने प्रयत्न केला.
समीक्षा : फेर्दीनां ब्ऱ्यूनत्येअर (१८४९-१९०६) हा साहित्याला डार्विनचे उत्क्रांतिवादी सिद्धांत लावतो काही वेळा नैतिक मूल्यांवर भर देतो. एमील फागे (१८४७-१९१६) हा साहित्यसमीक्षा करण्यासाठी सँत-बव्हची (१८०४-६९) पद्धती स्वीकारतो. झ्यूल मेअत्र (१८५३-१९१४) हा साहित्यनंदाला साहित्याचा निकष मानतो, तर ग्यूस्ताव्ह लांसॉं (१८५७-१९३४) हा साहित्यटीका हे शास्त्र समजतो. शक्य तेवढा तपशील एकत्र करून आणि अभ्यासातून साहित्याचे विश्लेषण करावे, असे मत त्याचे आहे.
माटरलिकंची पेलेआस ए मेलीझॉंद (१८९२) आणि ल्वाझो ब्ल (१९०९, इं. शी. द ब्लू बर्ड) ही दोन नाटके, प्रतीकवादी साहित्याचे उत्कृष्ट नमुने समजले जातात. माटरलिकंची नाटके त्यांतील नियतीची छाया असलेल्या स्वप्नधूसर वातावरणामुळे आपल्याला एका अनोख्या विश्वात घेऊन जातात. त्याच्या पेलेआस ए मेलीझॉंद ह्या नाटकावर आधारलेली दब्यूसीची संगीतिका अतिशय गाजली. माटरलिकंला १९११ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
⇨ पॉल क्लोदेल (१८६८-१९५५) याच्या प्रतीकवादी काव्यावर रँबोचा सर्वात अधिक प्रभाव आहे. त्याच्या कविता व बहुतेक नाटके पहि ल्या महायुद्धापूर्वी लिहिली होती. तॅत दॉर (१८९०), लानॉंस फॅत आ मारी (१९१२, इं. शी. टाय्डिंग्ज ब्रॉट टू मेरी) व ल सुलिये द सातँ (लेखनकाळ १९२५-२८, इं. शी. द सॅटिन स्लिपर) ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण प्रतीकवादी नाटके. ऐहिक सुखात गुरफटल्यामुळे देवाचे प्रेम नाकारणारी व्यक्ती अखेरीस ईश्वरासाठी सर्वस्वाचा त्याग करावयास सिद्ध होते, असे त्याने अनेकदा दाखविले आहे. त्याच्या श्रेष्ठ परंतु सादर करण्यास कठीण अशा नाट्यकृतींना समर्थपणे आणि कलात्मक पद्धतीने सादर करून रसिकांपर्यंत पोहचविण्याचे श्रेय झां-लूई बारो या जगद्विख्यात नाट्यनिर्मात्याला आहे.
दोन महायुद्धांमधील कालखंड (१९१८-१९३९) : काव्य : पहिल्या महायुद्धानंतरच्या कालखंडात काव्यक्षेत्रात दोन वेगवेगळ्या पण समांतर अशा साहित्यप्रवृत्ती विकसित झालेल्या दिसतात. एकीकडे ⇨ पॉल व्हालेरीचा (१८७१-१९४५) सौंदर्यशास्त्राचा अभ्यास व संशोधन, तर दुसरीकडे ⇨ आंद्रे ब्रतॉं (१८९६-१९६६) व त्याचे सहकारी यांनी स्थापन केलेला अतिवास्तववाद आणि त्याला अनुसरून केलेले साहित्यातील प्रयोग. सौंदर्यशास्त्रीय संशोधन आणि साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेचा वेध घेणे ही व्हालेरीची उद्दिष्टे होती. पुढे त्याने ला जन पार्क (१९१७, इं. शी. द यंग फेट) आणि शार्म (१९२२) हे काव्यसंग्रह प्रकाशित केले. तल्लख बुद्धिमत्ता आणि तरल संवेदनाशक्ती यांचा मनोज्ञ संगम या प्रतिभावंतात आढळतो. त्यामुळे त्याचे सौंदर्यशास्त्रावरील विवेचन अजूनही विचारप्रवर्तक समजले जाते. त्याचे काव्य, टीकालेख आणि व्याख्याने यांमुळे त्याला जागतिक कीर्ता लाभली आहे.
आंद्रे ब्रतॉंच्या काव्याप्रमाणेच त्याची नाद्ज्या (१९२८) ही कादंबरीही अतिवास्तववादी साहित्यातील एक उत्कृष्ट कृती मानली जाते. आपल्या तत्त्वप्रणालीचे सिद्धांत प्रतिपादन करण्यासाठी आंद्रे ब्रतॉंने तीन जाहीरनामे (१९२४, १९३०, १९३४) प्रसिद्ध केले. ⇨ ल्वी आरागॉं (१८९७ – ) हाही अतिवास्तववादी संप्रदायाचा एक संस्थापक सदस्य. त्रेते द्यू स्तील (१९२८) ह्या ग्रंथात त्याने अतिवास्तववादी कलातत्त्वांचे विवेचन केले आहे. फ द ज्वा (१९२०) आणि मुव्हमॉं पेर्पेत्युअँल (१९२५,) हे त्याचे उल्लेखनीय काव्यसंग्रह. पुढे त्याने साम्यवादी दृष्टिकोणाचा स्वीकार केल्यानंतर त्याच्या साहित्यावर विचारांचा प्रभाव दिसू लागला. ले बो कार्तिए (१९३६, इं. भा. रेसिडेन्शल क्वार्टर, १९३८) ही कादंबरी त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. ⇨ पॉल एल्यूआर (१८९५-१९५२) हा भाषेतील नाविन्याचा शोध घेण्याच्या प्रेरणेतून अतिवास्तववादाकडे वळला. अतिवास्तववादाची बैठक कायम ठेवूनही साध्या, सरळ अभिव्यक्तीचा त्याने स्वीकार केला. एल्यूआर हाही पुढे साम्यवादी झाली. अतिवास्तववादी पंथातील एक महत्वाचा कवी म्हणजे रॉबेअर देस्नॉस (१९००-४५) हा होय. संमोहनाच्या प्रभावाखाली अनुभवलेल्या विलक्षण जाणिवांना त्याने आपल्या काव्यातून अभिव्यक्ती दिली. स्वयंप्रेरित लेखनाचेही त्याने प्रयोग केले. कॉर ए बियॉं (१९३०) हा त्याचा काव्यसंग्रह उल्लेखनीय आहे.
काही कवी मात्र अतिवास्तववादाच्या प्रभावापासून अलिप्त राहिले. अशांपैकी लेआं-पॉल फार्ग (१८७६-१९४७), ⇨ झ्यूल स्यूपेरव्ह्येल (१८८४-१९६०), प्येअर रेव्हॅर्दी (१८८९-१९६०) आणि प्येअर-झां जुव्ह (१८८७ – ), यांचा उल्लेख करावा लागेल. १९६० चा नोबेल पारितोषिक विजेता ⇨ सँ-जॉन पॅर्स (१८८७-१९७५) हा व्हालेरी आणि क्लोदेल ह्यंच्या नंतरचा थोर फ्रेंच कवी. त्याचे काही वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंग्रह म्हणजे आनाबाझ (१९२४, इं. भा. आनाबासिस, १९३०), व्हॉं (१९४६, इं. भा. विंड्स १९५३), आमॅर (१९५७, इं. भा. सीमार्क्स) आणि क्रोनीक (१९६०). पॅर्सच्या काव्याला महाकाव्याची भव्यता आहे.
कादंबरी : दोन महायुद्धांच्या मधील कालखंडात कादंबरी हा साहित्यप्रकार विविध दिशांनी विकसित होत गेलाआणि समृद्ध झाला. मार्सेल प्रूस्त व आंद्रे झीद या श्रेष्ठ कादंबरीकारांनी काही नवे सिद्धांत मांडून त्यांना आपापल्या कादंबऱ्यांतून अभिव्यक्ती दिली. उदा., प्रुस्तने आपल्या कादंबऱ्यांतून काळाचे एक नवे परिणाम चित्रित केलेले आहे. त्याशिवाय सँत-बव्हने मांडलेला व्यक्ती व लेखक ह्यांमधील घनिष्ठ परस्परसंबंधांचा सिद्धांत खोडून काढला आहे आणि लिहिणारा ‘‘मी’’ हा मी-व्यक्तीपासून वेगळा आहे, असे त्याने प्रतिपादिले आहे. आंद्रे झीदने प्रस्थापित नीतिमूल्यापासून विमुक्त अशा जीवनवाटांचा शोध केला. याच काळात झ्यूल रॉमँ, ⇨ रॉझे मार्तँ द्यू गार (१८८१-१९५८) आणि झॉर्झ द्यूआमेल यांनी समकालीन समाजाचे चित्रण केले आहे. आंद्रे माल्रो, ⇨ आंत्वान द सँ-तेग्झ्यूपेरी (१९००-४४) व ⇨ आंरी मॉंतर्लां (१८९६-१९७२) या लेखकांनी आपापल्या विचारसरणीप्रमाणे माणसाची प्रतिमा रेखाटली आहे. फ्रांस्वा मोर्याक व झॉर्झ बेर्नानॉस (१८८८-१९४८) हे कॅथलिक पंथीय लेखक, आधुनिक मानवाची बेचैनी लक्षात घेऊन आपल्या धार्मीक तत्त्वांना नवीन अर्थ देताना दिसतात.
झ्यूल रॉमँने आपल्या ले झॉम द बॉन व्हॉलॉंते (१९३२-४७, इं. शी. मेन ऑफ गुडविल) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या २७ कादंबऱ्यांच्या समूहातून १९०८-३३ या कालखंडातील फ्रेंच जीवन व विचार ह्यांचे चित्रण केले आहे. ह्या कादंबऱ्यांतील प्रत्येक खंड कथानकदृष्ट्या मात्र संपूर्णपणे स्वतंत्र आहे. रॉझे मार्तँ द्यू गारच्या ले तीबो (१९२२-४०) या सात कादंबऱ्यांच्या मालिकेत, तीबो कुटुंबात होणाऱ्या स्थित्यंतरांच्या चित्रणाद्वारे त्या काळच्या समाजातील घडामोडींचे दर्शन होते. मार्तँ द्यू गारला १९३७ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. मानवी जीवनातील दुःखांविषयीची उत्कट सहानुभूती ही द्यूआमेलच्या कादंबरीलेखनामागील महत्वाची प्रेरणा. व्हि ए आव्हांत्यूर द सालाव्हँन (५ कादंबऱ्या, १९२०-३२) आणि ला क्रॉनिक दे पास्किए (१० कादंबऱ्या, १९३३-४५, इं. भा. द पास्किए क्रॉनिकल्स) ह्या त्याच्या कादंबरीमालिकावर त्याची किर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. आंरी द मॉंतर्लां, आंत्वान द सँ-तेग्झ्यूपेरी आणि आंद्रे माल्रो हे कादंबरीकर नियतीदत्त मानवी दुःखाचा वारसा स्वीकारूनदेखील मानवाचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करतांना दिसतात. आंरी द मॉंतर्लां व्यक्तिपूजक असून त्याच्यावर बारेस, झीद व नित्शेच्या विचारांचा प्रभाव दिसतो. ल सॉंज्य (१९२२, इं. शी. द ड्रीम) आणि ले बॅस्तिॲर (१९२६ इं. शी. बुलफायटर्स या त्याच्या कांही वैशिष्ट्यपूर्ण कादंबऱ्या असून युद्ध, मैदानी खेळ, बैलांची झुंज, शारीरिक प्रेम या सर्वात त्याला मानवी चैतन्य व शौर्य यांच्या अविष्काराचा प्रत्यय येतो. आंत्वान द सँ-तेग्झ्यूपेरीच्या व्हॉल द न्युई (१९३१, इं. शी. नाइट फ्लाइट), पिलॉत द गॅर (१९४२, इं. शी. द फ्लाइट टू आर्रास) ह्यांसारख्या कादंबऱ्या त्याच्या वैमानिक पेशाच्या अनुभवावर आधारलेल्या आहेत. धैर्य, इच्छाशक्ती आणि बंधुभाव यांच्या जोरावर नियतीने लादलेले दुःख हलके करण्यासाठी माणसाने झटले पाहीजे, असे सँ-तेग्झ्यूपेरी सुचवतो. ल पती प्रँस (१९४३, इं. शी. द लिट्ल प्रिन्स) ही त्याने लहान मुलांकरीता लिहीलेली एक कल्पनारम्य कादंबरी असली, तरी तिला तत्वज्ञानाची बैठक आहे.
आंद्रे माल्रोला फ्रेंच साहित्यात विशेष स्थान आहे. पुराणवस्तुसंशोधक, कलासमीक्षक, कादंबरीकार, विचारवंत अशा विविध भूमिका तो समर्थपणे जगला. त्याने स्पॅनिश यादवी युद्ध, जर्मनांविरूद्धची भूमिगत चळवळ व व्हिएतनामाचा स्वातंत्र्यलढा यांच्यामध्ये प्रत्यक्ष भाग घेतला. ले कॉंकॅरॉं (१९२८, इं. शी. द कॉंकरर्स), ला व्हा र्वायाल (१९३०, इं. शी. द रॉयल वे), ला कॉंदिस्यॉं ह्युमॅन (१९३३, इं. शी. मॅन्स फेट), या सर्व कादंबऱ्यांना त्याच्या ह्या कृतिप्रवण जीवनातील अनुभवांचा आधार लाभला आहे. त्याच्या दृष्टीने मानवी जीवन सार्थ करण्यासाठी कोणत्या तरी प्रकारची बांधिलकी आवश्यक आहे.
फ्रांस्वा मोर्याक हा कवी, नाटककार आणि कादंबरीकार असला, तरी त्याला मान्यता ही विशेषतः त्याच्या कादंबऱ्यांमुळे मिळाली. आत्मसंतुष्ट, सद्गुणी माणसांपेक्षा त्याला जाणता-अजाणता वाट चुकलेल्या पण आपले दुःख मूकपणे सहन करणाऱ्या संवेदनाशील व्यक्तीविषयी अधिक आत्मीयता वाटते. तॅरॅझ देकरू (१९२७, इं. शी. थेरेस), ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्वोत्कृष्ट कादंबरी. मोर्याकला १९५२ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
झॉर्झ बेर्नानॉस याने आपल्या कादंबऱ्यांतून आधुनिक माणसाच्या मनातील नैसर्गिक सत्प्रवृत्ती आणि सभोवार प्रबळ होत असलेल्या दृष्ट प्रवृत्ती यांच्यातील सतत चाललेला संघर्ष समर्थपणे चित्रीत केला आहे. ज्युर्नाल दँ क्युरे द कॉंपान्य (१९३६, इं. शी. डायरी ऑफ ए कंट्री प्रीस्ट) ही त्याची गाजलेली कादंबरी. मार्सेल ज्युआँदो (१८८८ – ) याने आपल्या शामिनादूर (दोन भाग १८३४ १९३६), क्रॉनिक मारीताल (१९३८) इ. कादंबऱ्यांतून लहान गावांतील समाजाचे चित्रण केले आहे. बेर्नानॉसप्रमाणेच ज्युआँदोदेखील मानसाच्या मनातील सुष्टदुष्ट प्रवृत्तींचा झगडा हा कॅथलिक धर्मतत्त्वाचाच एक अविष्कार समजतो (कारण कॅथलिक धर्मानुसार मानवी मनात सुष्टदुष्ट प्रवृत्तीचा झगडा अखंड चालू असतो). त्यातूनच तो प्रगतीकडे वाटचाल करतो. झूल्यँ ग्रीन (१९००- ) ह्याच्या ल व्हिझिऑनॅर (१९३४) सारख्या कादंबऱ्यांतून त्याची पाप आणि मृत्यू या कल्पनांनी पछाडलेली वृत्ती दिसून येते. ⇨ सीदोनी गाब्रीएल कोलेत (१८७३-१९५४) हिच्या कादंबऱ्यांतून शैशव आणि पौगंडावस्थेतील अतितरल, उमलत्या, अस्फुट प्रेमभावनांचे सूक्ष्म चित्रण दिसून येते. तिच्या गाजलेल्या कादंबऱ्या म्हणजे क्लॉदीन आ लेकॉल (१९००, इं. भा. क्लोदीन ॲट स्कूल, १९३०). ल ब्ले आँनॅर्ब (१९२३, इं. भा. राइपनिंग, १९३२), जिजी (१९४५). युद्धकाळात लिहिलेली आणि युद्धाचे प्रत्यक्ष दैनंदिन अनुभव वर्णन करणारी ⇨ आंरी बार्ब्यूस (१८७३- १९३५) ची ल फ (१९१६, इं. शी. अंडर फायर) ही कादंबरी फार गाजली आंद्रे शांसॉं (१९०० – ) आपल्या ले झॉम द ला रूत (१९२७) सारख्या कादंबरीतून सामाजिक व राजकीय समस्या सादर करतांना, प्रादेशिक रीतीरिवाजांचेही प्रभावी चित्रण करतो. ल्वी आरागॉंच्या ल व्हाज्यार द लँपेर्याल व ल काम्युनिस्त यांसारख्या कादंबऱ्यांतून त्याचा सामवादी दृष्टिकोण दिसून येतो. त्याशिवाय ‘मिझ आ मॉर’ (१९६५) व ‘ब्लॉश ऊ लुब्ली’ (१९६७) ह्या दीर्घकथांतून आरागॉंने आपले साहित्यनिर्मितीबद्दलचे विचार अप्रत्यक्षपणे व्यक्त केले आहेत.
‘पॉप्यूलिस्त’ साहित्यपंथ हा निसर्गवादी पंथाचे अतिरेकी सिद्धांत नाकारून सामान्य माणसाची सुखदुःखे आणि समस्या सरळ, साध्या शैलीत चित्रित करण्याच्या उद्देशाने स्थापन झाला. त्याची उद्दिष्टे दोन जाहिरनाम्यांद्वारे (१९२९, १९३०) निश्चित केली गेली. त्याचे प्रवर्तक लेआँ लमॉन्ये आणि आंद्रे तेरीव्ह होते. यूझेअन दाबी (१८९८-१९३६) या पॉप्यूलिस्ट लेखकाने आपल्या कादंबऱ्यांतून पॅरिस आणि उपनगरे यातील नागरिकांच्या जीवनातील कंटाळवाणा एकसुरीपणा दाखविला आहे.
इन्स्पेक्टर मॅग्रे हे अमर व्यक्तिचित्र निर्मिणारा ⇨ झॉर्झ सीम्नॉं (१९०३- ) याला अमाप कीर्ती व लोकप्रियता मिळाली. त्याच्या कादंबऱ्या केवळ पोलिसांच्या चातुर्यकथा नसून साहित्यगुणांनीही समृद्ध आहेत.
⇨ ल्वी -फेर्दिनां सेलीनच्या (१८९४-१९६१) अनेक कादंबऱ्यांपैकी व्हायाज ओ बू द ला न्युई (१९३२, इं. शि. जर्नी टू द एंड ऑफ द नाइट) ने साहित्यक्षेत्रात वादंग माजवले. आधुनिक अंधारयुगाचा वेध त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत घेणाऱ्या या कादंबरीत, सर्व तऱ्हेने नाडलेल्या उपेक्षित व तथाकथित संस्कृतीपासून तोडल्या गेलेल्या खालच्या समाजाचे प्रभावी चित्रण केले आहे. आणि ते करताना त्याच समाजाची ग्राम्य, शिवराळ पण जोरदार अर्थवाही भाषा त्याने वापरली आहे. सेलिनच्या ज्यूविरोधी भूमिकेमुळे त्याच्यावर बरीच टिका झाली.
मार्सेल एमेने (१९०२-६८) खेडुतांमध्ये प्रचलित असलेल्या अद्भुत लोककथांना आधुनिक रूप देऊन, त्यांचा उपयोग जीवनाचे उपहासगर्भ चित्रण करण्यासाठी केला. ज्यूमॉं व्हँर्त (१९३३, इं. शी. द ग्रीन मेअर) ही त्याची प्रसिद्ध कादंबरी होय. तसेच ले कॉंत द्यू ला पॅर्शे (१९३४, इं. शि. द वंडरफुल फार्म) हा त्याने लहान मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टींचा संग्रहही प्रसिद्ध आहे. शार्ल फेदीनां राम्यूझ (१८७८-१९४७), आंरी पुर्रा (१८८७-१९६०), आरी बॉस्को (१८८९- ), मॉरीस झनव्ह्वा (१९००- ) व झां जॉनो (१८९५ – १९७०) हे ग्रामीण जीवनावर लिहिणारे काही कादंबरीकार. यांपैकी झां जॉनोच्या कादंबऱ्यांत निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या खेडुतांच्या जीवनाचा सहजसुंदर अविष्कार आढळतो. त्याच्या काही उत्कृष्ट कादंबऱ्या म्हणजे रगँ (१९३०, इं. शि. हार्व्हेस्ट), ल ग्रॉं त्रुपो (१९३१), क मा ज्वा दमर (१९३५, इं. शि. द जॉय ऑफ मॅन्स डिझायरिंग).
रंगभूमी : दोन महायुद्धांच्या मधल्या कालखंडात रंगभूमीचा विशेष उत्कर्ष झालेला दिसून येतो. याचे मुख्य कारण म्हणजे, नवनव्या कल्पनांचा रंगभूमीवर आविष्कार करण्यासाठी धडपडणारे प्रयोगशील नाट्यनिर्माते आणि त्यांच्या नाट्यसंस्था. झाक कोपो (१८७९-१९४९) याने ‘व्हीय कोलोंबिये’ ही नाट्यसंस्था १९१३ पासून १९२४ पर्यंत चालवली. कोपोने केवळ नाटकेच सादर केली नाहीत, तर नवनव्या कल्पनांनी भारलेलीे नाट्यनिर्मातेही तयार केले. त्याच्या नंतरचे नाट्यनिर्माते म्हणजे शार्ल धुलँ (१८८५-१९४९), झॉर्झ पितॉएफ (१८८६-१९३९), लूई ज्युव्हे (१८८७-१९५७) आणि गास्तॉं बात्ती (१८८५-१९५२). ‘कार्तेल दे कात्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चतुष्ट्याला फ्रेंच रंगभूमीच्या विकासाचे मोठे श्रेय आहे. या सर्वच निर्मात्यांनी अनेकदा लेखकांना प्रोत्साहन देऊन नाटके लिहवून घेतली. कोपोने आंद्रे झीद, झ्यूल रॉमँ, मार्सेल आशार, झां झीरोदू इ. फ्रेंच नाटककारांची व शेक्सपिअर, इब्सेन, पिरांदेल्लो इ. परकीय नाटककारांची नाटके कल्पकतेने व तितक्या समर्थपणे रंगभूमीवर सादर केली.
साशा गित्री (१८८५-१९५७) ह्याची हलकी फुलकी मार्मिक ला जालुझी (१९१५), फॅझो अँरॅव्ह (१९१६) आणि मॉ प्येर आव्हँ रॅझॉं (१९१९) इ. प्रहसने पॅरिसमध्ये फार लोकप्रिय ठरली. साशा गित्री चित्रपटनिर्माता म्हणूनही महशूर आहे.
मार्सेल आशार (१८९९-१९७४) यानेही ब्हुले व्हू द मोआ ? (१९२४), ज्यां द ला ल्यून (१९२९) इ. आपल्या विनोदी नाटकांनी रंगभूमी गाजवली.
विनोदी नाटकांप्रमाणेच गंभीर, उपहासात्मक सुखात्मिकाही सादर केल्या जात होत्या. ह्या संदर्भात झ्यूल रॉमँ, एद्वार बुर्दे (१८८७-१९४४), ⇨ मार्सेल पाग्नोल (१८९५-१९७४), झाक द्यूव्हाल (१८९० – १९७२) व आर्मा सालाक्रू (१८९९- ) ही नावे उल्लेखनीय. झ्यूल रॉमँच्या क्नॉक (१९२३) या नाटकात आजच्या उद्योगप्रधान समाजावर टीका असली, तरी लेखकाच्या एकात्मतावादी (युनानिमिस्मे) तत्त्वाचाही आविष्कार आहे. मार्सेल पाग्नोलने आपल्या तॉपाझ (१९२६) या नाटकात तत्कालीन समाजावर उपरोधप्रचुर टिका केली आहे. तथापि मार्सेयच्या पार्श्वभूमीवरील त्याची मारीयुस (१९२८), फानी (१९२९) आणि सेझार (१९३१) ही नाट्यत्रयीही उल्लेखनीय आहे. लोकांची साधीसुधी भाषा पाग्नोल वापरतो. त्याच्या नाटकातील मोकळा विनोद लक्षणीय आहे. आर्मा सालाक्रू याने अद्भूतरम्य (पाल्चुली ), सामाजिक (ला तॅर ए रॉंदा, १९३८), समस्याप्रधान (लँकॉन्यु दारास, १९३५ आणि लार्शिपॅल लन्वार, १९४७) अशी सर्व प्रकारची नाटके समर्थपणे लिहिली आहेत.
मनोविश्लेषणावर भर देणारे दोल उल्लेखनीय नाटककार म्हणजे व्हील्द्राक आणि ⇨ आंरी रने लनॉरमां (१८८२-१९५१) हे होत. व्हिल्द्राकचे ल पाकबो तॅनासिती (१९२०) आणि लॅनॉरमांची ल तॉं एतँ सॉंज्य (१९१९), ल मॉज्यर द रॅव्ह (१९२२), व लॉम ए अँ फॉंतॉम (१९२५) ही नाटके विशेष गाजली. लॅनॉरमांवर फ्रॉइड व पीरांदेल्लो यांचा प्रभाव दिसून येतो. रंगभूमीवर क्रांतिकारक प्रयोग करणाऱ्या ‘आव्हां गार्द’ प्रवर्तकांत दोन महत्वाची नावे म्हणजे आंतोनँ आर्तो (१८९६-१९४८) आणि रॉझे व्हित्राक (१८९९-१९५२). आर्तो नट, नाटककार व नाट्यनिर्माता असला, तरी त्याचे मुख्य कार्य नाट्य कलेचा तत्वविवेचक या नात्याने आहे. त्याच्या ल तेआत्र ए सॉं दुब्ल (१९३८, इं. भा. द थिएटर ऍन्ड इट्स डबल, १९५८) या ग्रंथाचा यूरोपियन रंगभूमीवर मोठा प्रभाव पडलेला स्पष्ट दिसून येतो. त्याच्या मते नाटकात शब्दापेक्षा अंगविक्षेप, आवाज, नृत्य, गीत, प्रकाश, लय, नेपथ्य ह्यांना अधिक महत्व आहे. या सर्वांच्या द्वारा प्रेक्षकांच्या सुप्त, आदीमानवी भावनाविकारांना आवाहन करून चेतवले पाहिजे. सामाजिक व सांस्कृतिक संकेतांखाली दडलेला खरा क्रूर, हिंस्त्र, आदिमानव जागा केला पाहिजे. यामुळे आर्तो हा ‘तेआत्र द ला क्रूओते’ किंवा क्रौर्यनाट्य याचा प्रवर्तक मानला जातो. आर्तो हा अतिवास्तववादी चळवळीशी निगडित होता. याशिवाय त्या चळवळीचा पूर्वसूरी मानल्या गेलेल्या आल्फ्रॅद जारीचे ॠणही त्याने मान्य केले आहे. आर्तोचा बेकेट, ⇨ यानेस्कू यांच्यावरील प्रभाव निर्विवाद आहे.
रॉझे व्हित्राकने व्हिक्तार ऊ लेझॉंफॉं पुव्हार (१९२८), या नाटकात अतिवास्तववादी तंत्र अवलंबिले आहे. ⇨ झां कोक्तो (१९८९-१९६३) याला त्याच्या असामान्य सर्वस्पर्शी प्रतिभेमुळे फ्रेंच साहित्यात एक आगळे स्थान आहे. त्याच्यावर अतिवास्तववादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. काव्य, कादंबरी, नाटक, चित्रकला, चित्रपट, बॅले इ. अनेक क्षेत्रांत त्याने कीर्ती मिळवली. त्याचे महत्वाचे साहित्य म्हणजे ल काप द बॉर्न एस्पॅरॉंस (१९१९, इं. शि. द केप ऑफ गुड होप -काव्यसंग्रह) ल झॉंफॉं तेरीब्ल (१९२९-कादंबरी), ऑर्फे (१९२७ – नाटक) आणि ला माशीन अँफॅर्नोल (१९३४, इं. भा. द इन्फनर्ल मशीन, १९३६-नाटक). ⇨ झां झीरोदू (१८८२-१९४४) याने सुरूवातीस कादंबऱ्या लिहिल्या. पण पुढे तो नाटकाकडे वळला आणि त्याच्या क्षेत्रात त्याने विशेष मान्यता मिळवली. त्याची विशेष उल्लेखनीय नाटके म्हणजे अँतॅरमझो (१९३३, इं. भा. द एंचांटेड, १९५०) आणि ला फॉल द शायो (१९४५, इं. रूपांतर द मॅड वुमन ऑफ शाय्यो). झीरोदूने नाटकाला स्वप्नसृष्टीचे दालन खोलण्याचे एक साधन मानले. काहीशा अद्भुत, अतिमानवी, परीकथासदृश वातावरणात वावरणारी पात्रे त्याच्या नाटकांत आढळतात. लोककथा-मिथ्यकथांचा उपयोग करून त्यांतून मानवी समस्या व संघर्ष ह्यांचे दर्शनही त्याने घडविले आहे. ⇨ झां आनुईय (१९१० – ) ह्यांची नाटके रंगभूमीवर अतिशय यशस्वी ठरली. जीवनातील काही अवघड, मानसिक आणि सामाजिक प्रश्न त्याने आपल्या प्रभावी नाट्यतंत्राने सादर केले आहेत. त्याची गाजलेली नाटके म्हणजे ल व्हाज्यार सां बागाज्य (१९३७, इं. भा. ट्रॅव्हलर विदाउट लगेज, १९५१), ल साव्हॉज (१९३८, इं. भा. रेस्टलस हार्ट, १९५७), आँतिगॉन (१९४४) न रेव्हेये पा मादाम (१९७०, इं. शी. डोंट अवेकन द लेडी) ही होत. ⇨ आंद्रे मोर्वा (१८८५- ) हा मुख्यतः चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. व्हॉल्तेअर, प्रूस्त, व्हिक्टर ह्यूगो आदींची त्याने लिहिलेली चरित्रे विख्यात आहेत.
⇨ गाब्रीएल मार्सेल (१८८९- ) हा अस्तित्ववादी नाटककार. ल क्वात्योर अँ फादीज (१९२०), अँनॉम द दिय (१९२५) ही त्याची काही उल्लेखनीय नाटके. मार्सेल हा ईश्वराचे अस्तित्व मानणारा अस्तित्ववादी आहे.
समकालीन साहित्य (१९४० – ) : झां पॉल सार्त्रं आणि ⇨ आल्बेअर काम्यू (१९१३-६०) यांच्यापासून समकालीन साहित्याचा कालखंड सुरू होतो, असे सामान्यतः मानले जाते. त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीवर फार मोठा प्रभाव दिसून येतो. या दोघांनीही जीवनातील असंबद्धता आणि अर्थशून्यता दाखवून मानवी स्थितीचे मर्म विशद करण्याचा प्रयत्न केला.
सार्थने आपली तत्त्वमीमांसा हायडेगर ह्या जर्मन तत्वज्ञान्यापासून स्वीकारली. आपले अस्तित्ववादी तत्वज्ञान सार्त्रने लॅत्र ए ल नॅयॉं (१९४३, इं. भा. बीईंग अँड नथिंगनेस) या ग्रंथात सुसंघटीत स्वरूपात मांडले आहे. त्याच्या लॉ नॉझे (१९३८, इं. शी. नॉसिआ) आणि ले शामॉं द ला लिबर्ते (४ भाग, १९४५-४९, इं. शी. रोड्स टू फ्रीडम) या कादंबऱ्यांतूनही त्याचे तत्त्वज्ञान व्यक्त झाले आहे.
सार्त्रने ‘लेक्झिस्तॉंश्यालिझ्म ए तॅ युमानिझ्म’ (१९४३) या प्रदीर्घ लेखातही आपले विचार स्पष्ट केले आहेत. त्याच्या ले मूश (१९४३, इं. शी. द फ्लाइज), ल वी क्लो (१९४४, इं. शी. नो एक्झिट), ल मँ साल (१९४८, इं. शी. द रेड ग्लव्ह्ज), ल दियाब्ल ए ल बॉं दिय (१९५१, ल्यूसिफर अँड द लॉर्ड) इ. नाटकांतूनही सार्त्रचे अस्तित्ववादी विचार व युद्धातील अनुभव व्यक्त झालेले दिसतात.सार्त्रला १९६४ साली नोबेल पारितोषिकाचा बहुमान देऊ केला होता पण तो त्याने नाकारला.
⇨ सीमाँ द बोव्हार (१९०८ – ) हीसुद्धा एक अस्तित्ववादी. तिला एक श्रेष्ठ कादंबरीकर्ती म्हणून नाव मिळले. ले मॉंदरँ (१९५४) ह्या तिच्या प्रदीर्घ कादंबरीत युद्धोत्तर फ्रेंच समाजाचे सर्वांगीण चित्रण आलेले आहे. शिवाय तिच्या आत्मचरित्रपर चार कादंबऱ्या, ल दझिएम सॅक्स (१९४९, इं. शी. द सेकंड सेक्स) हा स्त्रीजीवनविषयक आणि ला व्हिएयॅस (१९७०) हा वृद्धावस्थेबद्दलचा विचारप्रवर्तक प्रबंध तिच्या प्रतिभेचा आणि अनुभवाचा आवाका सिद्ध करतात.
काम्यूचा पिंड तत्त्वचिंतकाचा. अस्तित्ववादी विचारप्रवाहातील एक उपप्रवाह त्याच्या नावाशी निगडित आहे. स्वतः काम्यूने मात्र आपण अस्तित्ववादी असल्याचे निःसंदिग्धपणे नाकारले होते. नाटके, कथा, कादंबऱ्या बादी त्याच्या साहित्यातही त्याच्यातील तत्त्वचिंतक प्रकर्षाने प्रकटला आहे. ले त्रॉंज्य (१९४२, इं. भा. द आउटसाइडर, १९४६- कादंबरी), कालिग्युला (१९४४, इं. भा. १९४८-नाटक), ल मीथ द सिसिफ (१९४२, इं. भा. द मिथ ऑफ सिसिफस ……, १९५५–वैचारिक ग्रंथ) हे त्याचे काही उल्लेखनीय साहित्य. १९५७ साली काम्यूला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. [→ अस्तित्ववाद ].
फ्रान्समध्ये साम्यवादी साहित्याचा पंथ निर्माण झाला नाही. फ्रान्सच्या पराभवानंतर सुरू झालेल्या जर्मनांविरुद्धच्या भूमिगत प्रतिकार चळवळीत फ्रेंच कम्यूनिस्ट पक्षाने हिरीरीने भाग घेतला. त्यात ल्वी आरागॉं आणि पॉल एल्यूआर हे कम्यूनिस्ट प्रणालीला पाठींबा देणारे साहित्यिक होते. त्यामुळे इतरही काही साहित्यिक साम्यवादाकडे ओढले गेले. साम्यवादाशी सर्वस्वी सहमत नसूनही सार्त्रला साम्यवादाबद्दल आदर होता. साहित्यातील हा साम्यवादी प्रभाव साधारणतः १९५६ नंतरच्या रशिया, हंगेरी, पोलंड इ. देशातील घटनांमुळे ओसरू लागला. काही साहित्यिकांनी कम्यूनिस्टांशी असलेले संबंध तोडले. आरागाँने मात्र आपली राजकीय बांधीलकी कायम ठेवली. निवडलेल्या भूमिकेशी प्रामाणिक राहताना त्याला ज्या मानसिक संघर्षातून जावे लागले, त्याचे अप्रत्यक्ष चित्रण त्याच्या ला समॅन (१९५८, इं. शी. होली वीक) या ऐतिहासिक कादंबरीत त्याने केले आहे.
कादंबरी : जर्मनांविरूद्ध झालेल्या भूमिगत चळवळीच्या अनुषंगाने विपुल साहित्य निर्माण झाले. त्यातील विशेष गाजलेल्या दोन कादंबऱ्या म्हणजे व्हॅर्कोरची (१९०२- ) ल सिलॉंस द ला मर (१९४५) आणि रॉझे इकॉरची ल फीस दाव्ह्राँम. फ्रांस्वाझ सागॉं (१९३५- ) हिच्या बॉंज्यूर त्रिस्तॅस (१९५४) आणि अँ सॅर्तां सुरीर (१९५६) या कादंबऱ्या खूपच गाजल्या. युद्धोत्तर काळातील तरुण पिढीचे बदलते भावविश्व आणि त्यांच्या समस्या यांचे सूक्ष्म व सखोल विश्लेषण तिने अभिजात शैलीत केले आहे.
दुसऱ्या महायुद्धाचा हादरा पहिल्या महायुद्धाहून जास्त जबर होता. सार्त्र, काम्यू, आरागॉं यांनी युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला होता. तरीही आपल्या साहित्यात त्यांनी मानवी परिस्थितीवर मात करणाऱ्या मानवाचे श्रेष्ठत्व दाखविणारी प्रतिमा उभी केली होती. तथापि कालांतराने अगतिकतेची आणि हताशतेची भावनव अधिकाधिक तीव्र होत गेली. साहित्यमूल्ये, साहित्यतंत्र, साहित्यभाषा, या सर्वांचा पुनर्विचार करण्याची निकड त्यामुळे निर्माण झाली. अंतर्बाह्य बदललेल्या मानवाला अभिव्यक्तीसाठी नव्या माध्यमाची गरज भासू लागली. या अपरिहार्य गरजेतूनच ॲब्सर्ड किंवा विसंवादी थिएटर, नव-कादंबरी किंवा न- कादंबरी आणि नवकाव्य ह्यांचा जन्म झाला.
नव-कादंबरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आधुनिक कादंबरीकारांमध्ये बॉरिस व्हिआँ (१९२०-४९), आंद्रे प्येअर द मॉंदियार्ग, ⇨ ज्यूलियां ग्राक (१९१०- ) आणि प्येअर क्लॉसॉवस्की यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. व्हिआँच्या लेक्यूस दे ज्यूर (१९४७, इं. शी. फ्रॉथ ऑन द दे ड्रीम) आणि लार्राश कर (१९५३, इं. शी. हार्टस्नॅचर), तसेच ग्राकच्या ल रिव्हाज दे सीर्त (१९५१) आणि ला प्रॅस्कील (१९७०) या कादंबऱ्या वाचकाला एका अद्भूत, अनोख्या विश्वाचे दर्शन घडवतात. त्यात दुःस्वप्नाची भीती आणि अज्ञानाची हुरहुर असली, तरी वाचकाला भारून ठेवण्याचे सामर्थ्यही आहे. आंद्रे दॉतॅलची लाझ्यूर (१९६८) आणि मीशेल बेर्नारची ले कुर्तिझान (१९६८) या कादंबऱ्याही वरील कादंबऱ्यांशी साधर्म्य दाखवतात.
⇨ नाताले सारोत (१९०० – ), क्लोद सीमॉं (१९१३-), मार्गरीत द्यूरास (१९१४- ), ⇨ आलँ रॉब-ग्रीये (१९२२ – ) या नव-कादंबरीकारांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने नवनवे मार्ग चोखाळले. तथापी त्यांच्या काही मूलभूत साहित्यप्रवृत्तींमध्ये निश्चित असे साधर्म्य आढळून येते. ते म्हणजे नव-कादंबरीकारांनी वाल्झॅकपासून रूढ झालेली कादंबरीची कल्पना नाकारून, कादंबरी ह्या साहित्यप्रकाराचे प्रकृतिविशेष समजले जाणारे कथन आणि स्वभावचित्रण यांना फाटा दिला.
नाताले सारोतच्या त्रॉपिझ्म (१९३८, इं. भा. ट्रॉपिझम्स, १९६३) या कादंबरीमुळे ती नव-कादंबरीची आद्य प्रवर्तक मानली जाते. नव-कादंबरीविषयीचे तिचे विचार लॅर द सूप्सॉं (१९५६, इं. भा. द एज ऑफ सस्पिशन, १९६३) मध्ये तिने मांडले आहेत. तिच्या कादंबऱ्यांतून सुसूत्र कथन नाही, व्यक्तिचित्रण नाही, बहुतेकदा व्यक्तींना नावेही दिलेली नाहीत. किंबहुना केवळ सर्वनामांचाच वापर केला आहे. तरीही तिच्या लेखनात कुठेही दुर्बोधता किंवा कृत्रिमता येत नाही. तिचे वैशिष्ट्य म्हणजे, क्षणजन्य संवेदना आणि अस्फुट भावना यशस्वीपणे शब्दबद्ध करणे होय. तिच्या काही प्रमुख साहित्यकृती म्हणजे पॉत्रँ दँ अँकान्यु (१९४८, इं. शी. पोट्रेट ऑफ ए मॅन अन्नोन), ल प्लानतारीयुम (१९९५, इं. शी. द प्लेनिटेरिअम), व्हू लेझॉं दे ? (१९७२, इं. शी. डू यू वेअर देम?), दीझ लेझॅबेसील (१९७६).
क्लोद सीमॉं यांच्या दृष्टीने वास्तव हे संदिग्ध आणि सतत बदलते आहे. सामान्यतः लेखक आपल्या कल्पनेने त्याला सुसूत्रता देण्याचा प्रयत्न करतात. याउलट सीमॉंने वास्तवाचे व्यामिश्र व संदिग्ध स्वरूप आणि त्याच्यातील सुसूत्रतेचा अभाव व्यक्त करण्यासाठी त्याला साजेशी शैली वापरली आहे. लांबलचक आणि सतत सरकत पुढे जाणाऱ्या, कालप्रदर्शक क्रियापदांचा वापर टाळून, क्रियाविशेषणांनी सैलपणे बांधलेल्या या वाक्यांचे सूत्र सापडण्यास वाचकाला कठीण जाते. त्याच्या प्रमुख कादंबऱ्या म्हणजे ला रूत दे फ्लॉंद्र (१९६०, इं. शी. द फ्लँडर्स रोड), इस्त्वार (१९६७, इं. शी. हिस्टरी), ला वाताय द फार्साल (१९६९, इं. शी. द बॅटल ऑफ फार्सेलस).
मार्गरीस द्यूरासच्या कादंबऱ्यांमध्ये घटना अत्यंत कमी कथा पुढे सरकत नाही काही क्षण शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न असतो. एखादा हावभाव, दृष्टिक्षेप, शब्द, इतकेच नव्हे तर स्तब्धतेलाही अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. तिची उल्लेखनीय कादंबरी म्हणजे मॉदेरातो कॉंताबील (१९५८).
आलँ रॉब-ग्रीये हा नव-कादंबरीचा प्रवक्ता मानला जातो. पुर अँ नुव्हो रोमां (१९६४, इं. शी. टूवर्ड्स ए न्यू नॉव्हेल) या लेखसंग्रहात त्याने नव-कादंबरीविषयीचे विचार मांडले आहेत. त्याच्या मते कादंबरीकार हा फक्त बघत असतो, ऐकत असतो, दिसणाऱ्या वस्तू, व्यक्ती, घटना यांना तो अर्थ देत नसतो, किंवा त्यांचे विश्लेषणही करीत नसतो. रॉब-ग्रीयेची ‘सपाट’ वर्णनशैली वस्तू आणि व्यक्ती यांच्या अंतरंगात शिरत नाही. ल व्हायर (१९५८), ला जालुझी (१९५९, इं. शी. द जेलसी), ला मॅर्झो द रॉंदेव्हू (१९७०, इं. शी. द हाउस ऑफ ॲसिग्नेशन) ह्या त्याच्या गाजलेल्या कादंबऱ्यांपैकी काही होत.
मीशेल ब्युतॉरचे (१९२६- ) साहित्य उत्क्रांत होत गेलेले दिसते. ल पासाज्य द मिलॉं (१९५४) आणि ला मॉदिफिकास्यॉं (१९५८, इं. शी. सेकंड थॉट्स) या त्याच्या सुरूवातीच्या कादंबऱ्यांतून कथाप्रवाहाचा ओघ जाणीवपूर्वक तोडलेला आहे. कथा सतत सांधे बदलत जाते. ले देग्रे (१९६१, इं. शी. डिग्रीज) या दुसरा टप्पा निदर्शित करणाऱ्या त्याच्या कादंबरीतून एकच घटना विविध दृष्टिकोणांमधून कथन केली जाते. व्यक्तीची बैद्धिक व सांस्कृतिक घडण आणि जाण त्याच्या भौगोलिक कक्षेशी संलग्न आहे, असे तो आपल्या साहित्यातून सुचवितो. त्याच्या लेखनाचा तिसरा टप्पा त्याच्या नाटकांतून दिसून येतो. तेथे त्याने चिक्कणितचित्रणतंत्राचाही अवलंब केला आहे. शिवाय त्याच्या ॲसे स्यू लेस्ये (१९६८) या समीक्षाग्रंथातून स्वतःच्या लिखाणातील विविध प्रयोगांचा आढावा त्याने घेतलेला आहे.
नव-कादंबरीकारांचा पंथ असा कधीच स्थापन झाला नाही, तरी एक नवीन साहित्यिक वातावरण, एक नवा दृष्टिकोण त्यांच्यामुळे निर्माण झाला. या संदर्भात फीलीप सॉलॅर (१९३६- ) याच्या प्रेरणेने सुरू झालेल्या तॅल कॅल या नियतकालिकाचा उल्लेख करणे जरूर आहे.
काव्य : ल्वी आरागॉं आणि पॉल एल्यूआर ह्या दोन कवीचे काव्यलेखन ह्या कालखंडातही चालूच होते. ल क्रॅव्हकर (१९४०, इं. शी हार्टब्रेक), लेझ दॅल्सा (१९४२, इं. शी. एल्साज आइज) आणि ला दियान फ्रांसॅझ (१९४५) हे आरागॉंचे काही उल्लेखनीय काव्यसंग्रह. एल्यूआरचा पोएझी अँनँनेरोप्यु हा काव्यसंग्रहही निर्देशनीय आहे. आरागॉं आणि एल्यूआर ह्यांच्या ह्या काव्यसंग्रहांतून त्यांचे मानवप्रेम, राष्ट्रप्रेम तसेच त्यांची राजकीय मतप्रणालीही असंदिग्धपणे व्यक्त झालेली आहे.
या सुमारास काव्यक्षेत्रात विविध प्रयोग केले गेले. एक प्रयोगशील कवी म्हणून रॅमॉं कॅनो (१९०३- ) ह्याला महत्त्वाचे स्थान आहे. साहित्यभाषा, विशेषतः काव्यभाषा आणि काव्यरचना, यांमध्ये त्याने विविध व मूलगामी स्वरूपाचे प्रयोग केले. उदा., शब्दोच्चारानुसार शब्दलेखन, शब्दाच्या ऐवजी चित्रांचा वापर इत्यादी.
आजच्या प्रमुख कवींमध्ये फ्रांसीस पॉंज्य (१८९९- ), आंरी मीशो (१८९९- ), झाक प्रॅव्हॅर (१९००-), ⇨ रने शार (१९०७- ) हे उल्लेखनीय आहेत. फ्रांसीस पॉंज्य हा प्रचलित भाषेला पूर्वसंकेतापासून प्रयत्नपूर्वक मुक्त करून स्वतःची भाषा व अभिव्यक्ती शोधतो. त्याच्या काव्यात चित्रकार शार्दँ, ब्राक आणि शिल्पकार आल्बेर्तो जाकोमात्ती (१९०१- ६६) यांचा प्रभाव दिसतो तसेच वस्तूंना आध्यात्मिक (मेटॅफिजिकल) परिणाम प्राप्त होते. त्याचे उल्लेखनीय संग्रह म्हणजे ल पार्ती प्री दे शॉज (१९४२), ल ग्रॉं रकय (१९६१) आणि ल साव्हॉं ए नुव्हो रकय (१९६७).
आंरी मीशो ह्याच्या काव्यातून त्याची मानसिक बेचैनी आणि व्यथा सूचित होते. ती व्यक्त करण्यासाठी प्रलित साहित्यप्रकारांची व भाषेची असमर्थता जाणून अभिव्यक्तीसाठी त्याने अतिसामान्य आणि अकाव्यमय शैलीचा वापर केलेला आहे. त्याचा एक उल्लेखनीय काव्यसंग्रह म्हणजे व्हॉं ए पुस्यॅर (१९६२).
झाक प्रॅव्हॅर हा १९२९ पर्यंत अतिवास्तववादी गटात होता. दैनंदिन जीवनातील विसंवाद, खोटेपणा, यांत्रिकता तो आपल्या काव्यातून व्यक्तवितो. त्यासाठी विडंबनाचाही आश्रय घेतो. प्रेम, संताप, विनोद, व भावुकता यांचा सुंदर मिलाफ त्याच्या कवितांतून आढळतो. पारॉल (१९४६) हा तयाचा लोकप्रिय काव्यसंग्रह.
रने शार हा अतिवास्तववादी चळवळीतील प्रतिभावंत कवी. १९३७ मध्ये तो या गटातून बाहेर पडला असला, तरी अतिवास्तववादी तत्वप्रणालीचा प्रभाव सतत त्याच्या काव्यात दिसून येतो. किंबहुना अतिवास्तववादी तत्वांपेक्षा सर्वोत्कृष्ट आविष्कार त्याच्या काव्यातून दिसून येतो. आर्सेनाल (१९२९). ल मार्तो सॉं मॅत्र (१९३४, इं. शी. द हॅमर विदाउट अ मास्टर) हे त्याचे काव्यसंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. जर्मनविरोधी भूमिगत चळवळीत त्याचा महत्वाचा वाटा होता. ‘ल पोएम प्युल्वेरिझे’ (१९४७), ‘ला पारॉल आँनिर्शिपॅल’ (१९६२) इ. त्याच्या रचना एकाहून एक सरस आहेत. याशिवाय त्याने आस्वादक आणि विश्लेषणात्मक असे बरेच टीकालेखन केलेले आहे.
प्येअर झां झूव्हच्या काव्यात त्याची जीवनविषयक हताशता उमटली आहे. त्याला ताओइझममध्ये आशेचा किरण दिसतो. म्वार (१९६२) हा त्याचा वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंग्रह. यांशिवाय आजचे काही कवी उल्लेखनीय आहेत. प्येअर एमान्यूएल (ज्यूर द कॉलॅर), इव्ह बॉनफ्वा (प्येअर एक्रीत, १९६४), झॉर्झ पॅरोस (युन व्ही ऑर्दिन्यॅर, १९६७), झां-क्लोद रनार (ला ब्रॅझ ए ला रिव्हिएर, १९६७), झां ग्रॉज्यॉं (ला ग्ल्वार, १९६९), आंद्रे फ्रॅनो (ला सँत फास, १९६८), मीशेल दगी (वी दीर, १९६६) आणि झाक रूबो (एप्सीलान, १९६८).
नाटक : पॅरिसमध्ये जुन्या नाट्यनिर्मात्यांची जागा आंद्रे बार्साक, झॉर्झ व्हिताली, रॉज्ये ब्लँ, झाक फ्राब्री, आंत्वान बुर्सेये, साशा पितोॲफ इ. नवीन निर्मात्यांनी घेतली. तथापि या क्षेत्रातील मातबर समजले जातात झां-लूई बारो आणि झां व्हिलार. क्लोदेच्या श्रेष्ठ नाट्यकृती रसिकांपुढे आणण्याचे श्रेय झां-लूई बारोकडे जाते. याशिवाय त्याने सादर केलेल्या प्रायोगिक नाट्यकृती म्हणजे ज्यारी स्युर ला ब्यूत आणि राब्लॅ. झां व्हिलार या सुप्रसिद्ध नटनिर्मात्याने ‘तेआत्र नास्वोनाल द पारी’ ही अभिनव नाट्यसंस्था स्थापन करून नवीन व जुनी नाटके सादर केली. मोल्येरच्या नाटकांप्रमाणेच मॉंर्याकची आणि माँतर्लांची नाटकेही रसिकांपुढे आणली.
कालदृष्ट्या नव-कादंबरीला समांतर अशी ॲब्सर्ड थीएटर किंवा न-नाट्याची निर्मिती आणि विकास झाल्याचे दिसते. यूझेअन यानेस्कू हा ॲबसर्ड थीएटरचा प्रवर्तक मानला जातो. त्यानंतर सॅम्युएल बेकेटच्या नाटकात या नाट्यप्रकाराला अधिक गहनता लाभली. अभिनव क्रांतिकारक नाट्यतंत्र आणि भाषा वापरल्यामुळे ही नाटके अत्यंत परिणामकारक ठरली. सॅम्युएल बेकेटला १९६९ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. ॲब्सर्ड थीएटरचे इतर नाटककार ⇨ झां झने (१९१०- ), फेर्नांदो आराबाल आणि आर्त्यूर आदामॉव्ह (१९०८-७०) हे होत.
यूझेअन यानेस्कू ह्यास ला कांतात्रीस शोव्ह (१९५०, इं. भा. बाल्ड प्रिमा दोन्ना, १९५८) या नाटकाच्या प्रयोगामुळे एकदम प्रसिद्धी मिळाली. जीवनातील यांत्रिकता व निरर्थकता यांचे विडंबनात्मक चित्रण त्याने केले आहे. त्याच्या नाटकातील निरर्थकतेची भावना पुढेपुढे जास्त नैराश्यपूर्ण होत गेली. तथाकथित शाश्वत मूल्यांची दिवाळखोरी त्याच्या नाटकांतून प्रत्ययाला येते. अखेरीला उरते ती फक्त रितेपणाची आणि अगतिकतेची भावना. त्याची इतर नाटके म्हणजे ला लॅसॉं (१९५१, इं. भा. लेसन, १९५८), ले शॅझ (१९५२, इं. भा. द चेअर्स, १९५८), रिनॉसेरॉस (१९६०), ल र्वा स मर (१९६२, इं. शी. एक्झिट द किंग).
सॅम्युएल बेकेटच्या आँनॉंदॉं गोदो (१९५२, इं. भा. वेटिंग फॉर गोदो, १९५४) या युगप्रवर्तक नाटकामध्ये जीवनातील निरर्थकतेची भावना अत्यंत प्रत्ययकारी रीतीने व्यक्त झाली आहे. बेकेटच्या नाटकांतून त्याचे शून्यवादी तत्वज्ञान (निहिलीझम) जाणवते. भाषेचे माध्यम निरूपयोगी ठरल्यामुळे विचार पोहोचविण्यासाठी प्रकाशयोजना, हावभाव, निर्जीव वस्तू ही साधने त्याने वापरली आहेत. बहुतांशी माणसांच्या हास्यास्पद वागणुकीतूनच त्यांच्या जीवनाचा शोकात्म आशय बेकेट व्यक्त करतो. त्याची इतर नाटके फँ द पार्ती (१९५७, इं. भा. एंड गेम, १९५८), ओ ले बो ज्यूर (१९६३, इं. शी. हॅपी डेज) आणि कॉमॅदी (१९६६). बेकेटच्या अखेरच्या नाटकात गतिशून्य, शब्द हरवलेल्या विश्वात मानव अडवून पडलेला दाखवला आहे.
झां झने ह्याने आरंभी कादंबरीलेखन केले त्यातून गुन्हेगारांच्या आणि मनोविकृतांच्या जगाचे दर्शन घडविले. नाट्यलेखनाकडे तो नंतर वळला. ओत स्युरव्हॅय्यांस (१९४९, इं. भा. डेथवॉच, १९५४), ले बॉथ्र (१९४७, इं. भा. द मेड्स, १९५४), ले नॅग्र (१९५८, इं. भा. द ब्लॅक्स, १९६०) ही त्याच्या उल्लेखनीय
नाटकांपैकी काही होत. जुर्नाल द्यू व्हॉलर (इं. शी. द थीफ्स जर्नल) हे त्याचे आत्मचरित्र अत्यंत प्रांजळ आणि धक्कादायक आहे.
आर्त्यूर आदामॉव्ह हा जीवनातील विसंवाद दाखवीत असतानाही सामाजिक आशयाला महत्व देतो समाजाविरूद्ध बंडाचा आवाज उठवतो. त्याची महत्वाची नाटके म्हणजे ल पिंग पॉंग (१९५५), पाव्लो पाव्ली (१९५७, इं. शी. ऑफ लिमिट्स, १९६९). फॅर्नांदो आराबल याच्या तेआत्र पानिकवर अमेरिकेतील लिव्हिंग थीएटरची छाप दिसते.
समीक्षा : दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात सार्त्र, ब्युतॉर, रॉबग्रीये, यानेस्कू यांनी ललितलेखनाबरोबरच विपुल टीकालेखन केलेले आहे. सार्त्रचे फ्लोबेअर व बोदलेअरवरचे समीक्षाग्रंथ अस्तित्ववादी टीकाशास्त्राचे नमुने समजले जातात. नवटीकाकारांमध्ये झां-प्येअर सीमॉं आणि तॉदॉरोव्ह हे दोघे उल्लेखनीय आहेत. तथापि यांच्या व्यतिरिक्त गास्तॉं बाशलर (१८८४-१९६२), मॉरीस ब्लॉशो (१९०७- ) व रॉलॉं बार्त (१९१५-८०) यांनी आपापल्या टीकाशास्त्रीय नवसिद्धांतांनी साहित्यात वादंग उठविले. बाशलारच्या साहित्यटीकेला मानसशास्त्रीय तत्वांची, विशेषतः युंगच्या तत्त्वांची, बैठक आहे, तर रॉलॉं बार्तची साहित्यटीका भाषाशास्त्रीय विचारांशी निगडित आहे.
आजचे साहित्य पुन्हा एकदा जुन्या साहित्यप्रकारांकडे वळले आहे. फ्रांस्वा नुरिस्ये, झील्बेअर सेस्ब्रॉ, मार्गरीत युर्सनार, मीशॅल तुर्निअे हे आजचे काही उल्लेखनीय लेखक.
संदर्भ : 1. Breneton, Geoffrey, A Short History of French Literature, London, 1954.
2. Breneton, Geoffrey, An Introduction to the French Poets, London, 1957.
3. Cazamian, L. A History of French Literature, Oxford 1960.
4. Fowlie, Wallace, A Guide to Contemporary French Literature, New York, 1967.
5. Mansell, Jones P. Studies in Modern French Literature, Manchester, 1961.
6. Matley, Anne-Marie, French Literature, Bangalore, 1960.
7. Saintsbury, George, A Short History of French Literature, Oxford, 1945.
टोणगावकर, विजया