फ्रूड, जेम्स अँथोनी : (२३ एप्रिल १८१८-२० ऑक्टोबर १८९४). या इंग्रज इतिहासकार आणि चरित्रकार. जन्म डार्टिंग्टन, डेव्हन येथे. शिक्षण ऑक्सफर्डच्या वेस्टमिन्स्टर आणि ओरिअल कॉलेजांत. पदवीधर झाल्यानंतर (१८४२) ऑक्स्फर्डच्या एक्झेटर कॉलेजात अधिछात्र (फेलो). विद्यार्थिदशेत असताना जॉन हेन्री न्यूमन ह्या ख्यातनाम ख्रिस्ती धर्मनेत्याच्या प्रभावातून ‘ऑक्सफर्ड मूव्हमेन्ट’ वा ‘ट्रॅक्टरिअन मूव्हमेन्ट’ ह्या नावाने सुरू झालेल्या धार्मिक चळवळीत भाग. इंग्लिश चर्चच्या आचारविचारप्रणालीत अनुस्यूत असलेल्या कॅथलिक प्रवृत्तींचे औचित्य दाखवून देण्यावर ह्या चळवळीचा भर होता. पुढे टॉमस कार्लाइलच्या तसेच अन्य काही प्रभावांतून फ्रूड प्रॉटेस्टंट पंथाकडे झुकला तो ऑक्सफर्ड मूव्हमेंटमधून बाहेर पडला. १८४९ मध्ये आपल्या अधिछात्रपदाचा त्याने राजीनामा दिला. त्यानंतर अनेक वर्षे लेखन हेच त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. १८९२ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात, आधुनिक इतिहासाच्या अध्यासनी फ्रूडची नियुक्ती झाली. किंग्जब्रिज, डेव्हन येथे तो निधन पावला.
हिस्टरी ऑफ इंग्लंड फ्रॉम द फॉल ऑफ वूल्सी टू द डिफिट ऑफ द स्पॅनिश आर्माडा (१२ खंड, १८५६-७०) ह्या ग्रंथावर इतिहासकार म्हणून असलेली फ्रूडची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. इंग्लंडच्या इतिहासातील ट्यूडर घराण्याच्या अभ्यासाची दिशाच फ्रूडच्या ह्या ग्रंथाने बदलून गेली. फ्रूडच्या प्रॉटेस्टंट दृष्टिकोणाचा लक्षणीय परिणाम त्याच्या ह्या इतिहासग्रंथावर झालेला आहे. इंग्लंडच्या इतिहासात सोळाव्या शतकात स्वातंत्र्यशक्ती (फोर्सीस ऑफ लिबर्टी) आणि तमःशक्ती (फोर्सीस ऑफ डार्कनेस) ह्या शक्तींचा संघर्ष चालू होता धर्मसुधारणेचे आंदोलन हे स्वातंत्र्यशक्तीचे प्रतीक, तर रोमन कॅथलिक चर्च हे तमाचे प्रतीक, असा विचार त्याने मांडलेला आहे. इतिहासाकडे पाहण्याची वैज्ञानिक दृष्टी त्याला मान्य नव्हती. इतिहास हे एक नाट्य असून ते घडविणाऱ्या व्यक्तिमत्वांवर विशेष भर द्यावा, असे त्याचे मत होते. कार्लाइलप्रणीत नायकत्वाच्या कल्पनेचा फ्रूडवर प्रभाव दिसतो. आठवा हेन्री हा फ्रूडला इंग्लिश इतिहासातील थोर नायक वाटत होता. पहिली एलिझाबेथ राणी ही मात्र त्याला दुबळी वाटत होती.
फ्रूडच्या ह्या इतिहासग्रंथात वस्तुस्थितीच्या चुका बऱ्याच आढळतात. इतिहासलेखनासाठी प्रचंड सामग्री जमवूनही त्याने ती निष्काळजीपणे हाताळल्याचे दिसते. फ्रूडच्या ह्या ग्रंथाला मोठी लोकप्रियता मिळाली परंतु इ. ए. फ्रीमनसारख्या इतिहासकारकांकडून झालेली कठोर टीकाही त्याला सोसावी लागली.
त्याने लिहिलेले कार्लाइलचे चरित्रही (४ खण्ड, १८८२-८४) गाजले. कार्लाइलच्या गुणदोषांचे कठोर विश्लेषण त्याने त्यात केलेले आहे. द इंग्लिश इन आयर्लंड इन द एटींथ सेंच्यूरी (३ खंड, १८७२-७४), इंग्लिश सीमेन इन द सिक्स्टींथ सेंच्यूरी (१८९५) असे काही अन्य ग्रंथही त्याने लिहिले आहेत.
कुलकर्णी, अ. र.
“