फ्राडिंग, गस्टाव्ह : (२२ ऑगस्ट १८६०–८ फेब्रुवारी १९११). श्रेष्ठ स्वीडिश भावकवी. जन्म अल्स्टर, व्हेर्मलांड येथे. शिक्षण अप्साला विद्यापीठात. तो पदवीधर मात्र होऊ शकला नाही. उदरनिर्वाहासाठी काही काळ पत्रकारी केली. फ्राडिंगचे आईवडील मनोरुग्ण होते व ती मनोरुग्णता आनुवंशिकतेने फ्राडिंगमध्येही उतरलेली होती. त्यामुळे त्याला वेळोवेळी आरोग्यभुवनांतून रहावे लागे. काव्यरचना हा त्यांच्या दुःखी आयुष्याचा एक आधार होता. गिटार अँड कॉन्सर्टीना (१८९१, इं. भा. १९२५) ह्या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाने श्रेष्ठ भावकवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. ‘न्यू पोएम्स’ (१८९४, इं. शी.), ‘स्प्लॅशिस अँड रॅग्ज’ (१८९६, इं. शी.), ‘न्यू अँड ओल्ड’ (१८९७, इं. शी.) आणि ‘ग्रेल स्प्लॅशिस’ (१८९८, इं. शी.) हे त्यानंतरचे काही काव्यसंग्रह. त्यापैकी ‘स्प्लॅशिस अँड रॅग्ज’ मधील ‘मॉर्निंग ड्रीम’ अशा इंग्रजी शीषकार्थाच्या कवितेवर अश्लीलतेचा आरोप येऊन फ्राडिंगवर खटला भरण्यात आला होता. त्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली, तरी ह्या प्रकरणामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून तो कधीच सावरला नाही. १८९८ ते १९०५ हा काळ त्याला अप्साला येथील एका मनोरुग्णालयात काढावा लागला. स्टॉकहोम येथे तो निधन पावला.
फ्राडिंगच्या आरंभीच्या कवितेत वास्तववादी प्रवृत्ती दिसून येत असल्या, तरी पुढे त्याच्यावर स्वच्छंदतावादाचा प्रभाव पडलेला दिसतो. जीवनातील विसंगतींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न त्याने आपल्या कवितेतून सातत्याने केला. जगातील प्रत्येक वस्तूला–कुरुपतेलासुद्धा – तिचा असा काही एक हेतू आणि कार्य असते, असा सूर त्याच्या कवितेत आढळतो. प्रसन्न विनोद आणि तीव्र नैराश्य ह्या दोहोंचा त्याच्या कवितेतून येणारा प्रत्यय त्या दृष्टीने लक्षणीय ठरतो. आपल्या जन्मभूमीची –व्हेर्मलांडची –विविध विलोभनीय रूपेही त्याने आपल्या कवीतेतून रंगविली आहेत. भावगेय अभिव्यक्तिला अनुकूल असलेली स्वीडिश भाषेची अंतःशक्ती त्याच्या कवितेतून उत्कटपणे साकारलेली आहे. बोलभाषा, लोकगीतांची लय आणि लोकनृत्यांतले ताल ह्यांचा परिणामकारक उपयोग फ्राडिंगने करून घेतला. तांत्रिक दृष्ट्याही त्याची कविता अत्यंत सफाईदार आहे.
कुलकणी, अ. र.