विद्युत् स्विच फलक : कोणतेही विद्युत मंडल उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी वापरले जाणारे स्विच, ⇨विद्युत् मंडल खंडक, मापके, वितळतार (फ्यूज), विद्युत् साधनांसाठीची संपर्क अग्रे इ. ज्या फलकावर बसविलेली असतात, त्या फलकास विद्युत् स्विच फलक असे म्हणतात. असे फलक विद्युत् शक्तिनिर्मिती केंद्रात आणि ज्या ज्या ठिकाणी विद्युत् शक्तीचा प्रत्यक्ष वापर केला जातो अशा सर्वच ठिकाणी वापरले जातात. विद्युत् शक्तीचा प्रत्यक्ष करणारी अशी ठिकाणे म्हणजे सर्वच छोटे-मोठे कारखाने, वेगवेगळी कार्यालये, विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने, राहण्यासाठी वापरली जाणारी घरे इ. होत.  

विद्युत् स्विच फलक वेगवेगळ्या आकारमानांचे असतात. संबंधित ठिकाणी बसविण्यात आलेल्या उपकरणांचे आकारमान आणि संख्या यांनुसार या फलकांचे आकारमान ठरवले जाते. या फलकावर प्रामुख्याने एक स्विच बसविलेला असतो. या स्विचाच्या साहाय्याने विद्युत् शक्ती निर्माण करणारे केंद्र तेथून ही विद्युत् शक्ती बाहेर वाहून नेणाऱ्या तारांपासून आवश्यकतेनुसार अलग करता येते. तसेच विविध विद्युत् भारांच्या बाबतीतही या विद्युत् भारांसाठी वापरली जाणारी उपकरणे स्विचांच्या साहाय्याने बाहेरून येणाऱ्या विद्युत् प्रवाहापासून अलग करता येतात.  

या विद्युत् स्विच फलकावर स्विचांखेरीज जरूरीनुसार संरक्षक उपकरणे (उदा., विद्युत् मंडल खंडक, वितळतार), दर्शक उपकरणे आणि विविध विद्युत् राशिमापके बसविलेली असतात. फलकावरील स्विचामध्ये दोन प्रकारची क्षमता असणे अत्यंत आवश्यक असते. एक म्हणजे या स्विचामधून जेव्हा विद्युत् प्रवाह वाहत असतो, तेव्हा त्या प्रवाहाने तो स्विच प्रमाणाबाहेर गरम न होता त्यातून प्रवाह वाहत राहिला पाहिजे आणि दुसरे म्हणजे मंडल संरक्षणाच्या दृष्टीने विद्युत् मंडलात कोठेही अचानक काही दोष निर्माण झाल्यास स्विच एकदम खंडित झाला पाहिजे. या खंडनासाठी विद्युत् प्रवाह कमी असेल त्या वेळी तांब्याच्या बेचक्यामध्ये बसणारे तांब्याचे एक पाते वापरले जाते, परंतु ज्या वेळी विद्युत् प्रवाह जास्त असेल त्या वेळी त्या ठिकाणी असा स्विच उघडताना मोठी विद्युत् प्रज्योत (वायूतून होणारे विद्युत् विसर्जन) निर्माण होते. ते टाळण्यासाठी किंवा निदान कमी करण्यासाठी स्विचाच्या चल अग्रांसाठी दोन पात्यांची एक पट्टी वापरतात. त्यांपैकी एक पाते दुसऱ्या पात्यास स्प्रिंगेच्या साहाय्याने जोडलेले असते, त्यामुळे स्विच उघडताना स्प्रिंगेमध्ये ताण निर्माण होऊन काही क्षणांतच स्विचाचे चल अग्र स्थिर अग्रापासून अलग होते आणि विद्युत् प्रवाह खंडित होतो. अशा रीतीने प्रज्योत लवकर विझून स्विचाची पाती लवकर निकामी निकामी न होता त्यांचे आयुष्य वाढते.  

सर्वसाधारणपणे वर वर्णन केलेले विद्युत् स्विच फलक तीन प्रकारांचे असतात.  

जनित्र केंद्रातील स्विच फलक: [जनित्र म्हणजे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत रूपांतर करणारे साधन ⟶विद्युत् जनित्र]. जनित्र केंद्रातील फलक जनित्राच्या शेजारीच बसविलेले असतात. या फलकांवर स्विचाखेरीज जनित्राचा क्षेत्र विद्युत् प्रवाह आणि घूर्णक विद्युत् प्रवाह, विद्युत् दाब, कंप्रता (दर सेकंदास होणारी आंदोलनांची संख्या), कार्यशक्ती इत्यादींच्या मापनासाठी विविध विद्युत् मापक यंत्रणा आणि क्षेत्रनियंत्रक रोधही बसविलेले असतात. यांखेरीज विद्युत् प्रवाह मूल्य प्रमाणाबाहेर गेल्यास जनित्र विद्युत् मंडलापासून आपोआप अलग व्हावे म्हणून, विद्युत् मंडलाच्या एकसरीत एक वितळतार बसविलेली असते. मात्र अशा तरविद्युत् स्विच फलक फक्त अल्प विद्युत् उत्पादनक्षमता असलेल्या जनित्र केंद्रातच वापरता येतात.  

चलित्र नियंत्रक स्विच फलक: [विद्युत् ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर साधन म्हणजे चलित्र ⟶विद्युत् चलित्र]. चलित्र नियंत्रक स्विच फलकावर योग्य आकारमानाचा स्विच, वितळतार, विद्युत् दाबमापक, विद्युत् प्रवाहमापक आणि शक्तिमापक बसविलेली असतात. बऱ्याच वेळा स्विच आणि वितळतार दोन्ही मिळून एका लोखंडी पेटीत बसवितात आणि तिचे झाकण बंद करून स्विचाची उघडझाप बाहेरूनच करावयाची व्यवस्था केलेली असते. यांशिवाय या फलकावर चलित्र सुरू करण्यासाठी एक आरंभकही (स्टार्टरही) बसविलेला असतो. चलित्रावर जास्त भार आल्यास चलित्र गुंडाळी जळू नये म्हणून, या आरंभकातच एक अतिप्रवाह-सुटका व्यवस्था केलेली असते. तसेच काही वेळा विद्युत् प्रवाह अचानकपणे खंडित होतो व ज्या वेळी खंडित विद्युत् प्रवाह परत सुरू होईल, त्या वेळी चलित्र आपोआप चालू न व्हावे म्हणून अविद्युत् दाब सुटका व्यवस्थाही केलेली असते. यांशिवाय विद्युत् प्रवाह चालू आहे हे दर्शविण्यासाठी फलकावर प्रत्येक कलेमागे एक दर्शक दिवा लावलेला असतो. सर्वसाधारणपणे त्रिकलांसाठी अनुक्रमे तांबडा, पिवळा आणि निळा (किंवा हिरवा) असे तीन वेगवेगळ्या रंगांचे दिवे वापरण्याची पद्धत आहे.  

कित्येक वेळा कारखान्यात चलित्राखेरीज इतरही अन्य उपकरणे वापरली जातात. अशा वेळी त्या त्या उपकरणाशेजारी अशाच प्रकारचे पण वेगवेगळे स्विच फलकबसवितात. त्यांच्यावरही आवश्यक ती साधने बसविलेली असतात.

  

घरगुती वापरासाठीचा विद्युत् स्विच फलक: विजेच्या घरगुती वापरासाठी प्रत्येक घरात एक छोटासा स्विच फलक बसविलेला असतो. त्यावर एक विद्युत् शक्तिमापक, एक स्विच आणि घरात पुढे जेवढी मंडले केलेली असतील तितके वितळधारक बसविलेले असतात. यांशिवाय त्यावरच विद्युत् पुरवठा करणाऱ्या संस्थेकडून किंवा कंपनीकडून आलेल्या कलातारेच्या एकसरीत तिच्या तर्फेच एक स्वतंत्र आणि सीलबंद केलेला वितळतारधारक बसविलेला असतो. या व्यवस्थेमुळेच कंपनीने परवानगी दिली असेल त्यापेक्षा जास्त विद्युत् प्रवाह कोणताही ग्राहक कधीही वापरू शकत नाही.  

विद्युत् स्विच फलक सर्वसाधारणपणे उत्तम प्रतीच्या लाकडापासून तयार करण्याची पद्धत आहे, परंतु विद्युत् दाब आणि विद्युत् प्रवाह जास्त असेल, तर त्या ठिकाणी त्यासाठी संगमरवरी अथवा बेकेलाइटाचा फलक वापरतात. त्याचा विद्युत् रोध जास्त असल्यामुळे त्यातून होणारी विद्युत् प्रवाहाची झिरप खूपच कमी असते. शिवाय हे फलक जलाभेद्यही असतात. त्यामुळे ते दमट हवामानात विशेषतः पावसाळ्यात चांगले काम करतात.

भूयोजन: विविध ठिकाणी विद्युत् प्रवाहाचा वापर करणाऱ्या लोकांना विजेचा धक्का बसू नये म्हणून प्रत्येक स्विच फलकावरील विद्युत् स्विच आणि इतर उपकरणांची वेष्टने जमिनीशी जोडलेली असतात म्हणजे त्यांचे भूयोजन (अर्थिंग) केलेले असते [⟶भूयोजन].

व्यवहारात विद्युत् शक्तीचा वापर जसजसा वाढत गेला, तसतशी विद्युत् शक्ती उत्पादन केंद्रे व विविध विद्युत् वितरण केंद्रे यांची शक्ती सुद्धा (विद्युत् प्रवाह आणि विद्युत् दाब) त्याच प्रमाणात वाढत गेली. स्वाभाविकच वर वर्णिलेले विद्युत् स्विच फलक आणि त्यांवरील विविध सामग्री आता निरुपयोगी ठरू लागली आणि म्हणून त्यांची जागा स्विच गिअरने घेतली आहे.

पहा : स्विच गिअर.

कोळेकर, श. वा.