फुरमानव, द्मीत्री अंद्रेयेविच : (७ नोव्हें. १८९१ – १५ मार्च १९२६). प्रसिद्ध रशियन कादंबरीकार. कस्त्रमस्काया प्रांतातील स्येरिदा ह्या गावी जन्मला. मॉस्को विद्यापीठात प्रवेश घेऊनही (१९१२) दोनच वर्षांनी शिक्षण सोडून तो सैन्यात दाखल झाला. ‘क्रास्नी दिसांत’ (इं. शी. रेड लँडिंग) ही त्याची पहिली कथा १९२२ मध्ये प्रसिद्ध झाली. चापायेव (१९२३) आणि मित्येझ (१९२५, इं. शी. रिव्होल्ट) ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. राष्ट्रीय वीरांच्या प्रभावी व्यक्तिरेखा त्याने ह्या कादंबऱ्यांतून निर्माण केलेल्या आहेत. आधुनिक सोव्हिएट गद्याच्या विकासातही ह्या कांदबऱ्यांना महत्त्वाचे स्थान आहे. चापायेव ह्या कादंबरीवर चित्रपट काढण्यात आला आहे. मॉस्को येथे तो निधन पावला.
पांडे, म. प. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)