फीबिगर, युहानेस आंड्रीआस ग्रिब : (२३ एप्रिल १८६७-३० जानेवारी १९३०). डॅनिश विकृतिवैज्ञानिक. कर्करोगविषयक संशोधनाबद्दल १९२६ सालच्या शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यकाच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते.

त्यांचा जन्म सिल्कबॉर येथे झाला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण सुप्रसिद्ध सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉख व एमिल फोन बेरिंग यांच्या मार्गदर्शनाखाली बर्लिन येथे झाले व १८९० मध्ये त्यांनी एम्. डी. पदवी मिळविली. त्यानंतर काही वर्षे त्यांनी निरनिराळ्या रुग्णालयांत काम केले.१८९१ मध्ये कोपनहेगन विद्यापीठात सूक्ष्मजंतुशास्त्र विभागात साहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली. हे काम करीत असतानाच त्यांनी पीएच्.डी. करिता अभ्यास केला व १८९५ मध्ये ही पदवी मिळविली. १८९४-९७ या काळात त्यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसाय केला. १८९७ मध्ये त्यांची कोपनहेगन विद्यापीठात विकृतिविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली व १९०० मध्ये ते इन्स्टिट्यूट ऑफ पॅथॉलॉजी या संस्थेचे संचालक झाले.

इ.स. १९०७ मध्ये काही क्षयरोगी घुशींचा प्रयोगशाळेत अभ्यास करताना त्यांना तीन घुशींच्या जठरात कर्करोगाची अर्बुदे (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठी ) आढळली. त्यावर संशोधनानंतर ही विकृती स्पायरोप्‍टेरा कार्सिंनोमा नावाच्या ( आता गॉन्गिलोनेमा निओप्‍लॅस्टिकम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या) परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या) कृमीमुळे होत असल्याचे फीबिगर यांना समजले. या कृमींचा मध्यस्थ पोषक झुरळ हा प्राणी असल्याचे व ही झुरळे वेस्ट इंडीजमधून आयात होणाऱ्या साखरेच्या पोत्यांतून येतात, हेही त्यांनी दाखवून दिले. १९१३ मध्ये फीबिगर यांनी या कृमींनी संसर्गित झालेली झुरळे उंदरांना व घुशींना खाऊ घालून त्यांच्या जठरात कर्करोग अर्बुदे उत्पन्न केली आणि अशा प्रकारे प्रयोगशाळेतील प्राण्यांत प्रवर्तनाने कर्करोग उत्पन्न करणारे ते पहिले शास्त्रज्ञ ठरले. ही अर्बुदे प्रक्षेपजन्य अर्बुदे (प्रत्यक्ष परजीवींचे वा सूक्ष्मजंतूंचे स्थलांतर न होता इतर असंबंधित अवयवांमध्ये उत्पन्न होणारी कर्करोग अर्बुदे) उत्पन्न करतात असे दाखवून ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांचा) विक्षोम कर्करोगाला कारणीभूत होतो, ह्या त्या काळी प्रचलित असलेल्या संकल्पनेला त्यांनी महत्त्वाचा आधार दिला. ऊतकांचा विक्षोभ हे कर्करोगाचे एकमेव प्रत्यक्ष कारण नाही असे नंतरच्या काळात दिसून आले असले, तरी रासायनिक कर्कजनक पदार्थांच्या निर्मितीच्या आणि त्यामुळे आधुनिक कर्करोग संशोधनाच्या विकासाच्या दृष्टीने फीबिगर यांचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे जपानी विकृतिवैज्ञानिक यामागिवा कात्सुसाबुरो यांना प्राण्यांच्या त्वचेवर डांबरापासून तयार केलेली रासायनिक संयुगे लावून कर्करोग उत्पन्न करण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी १९१६ मध्ये या पद्धतीने कर्करोग उत्पन्न करून दाखविला. नंतर फीबिगर यांनीही स्वतः या पद्धतीचा अवलंब केला.

डॅनिश कर्करोग समिती आणि इंटरनॅशनल ॲसोसिएशन फॉर इन्‌व्हेस्टिगेशन ऑफ कॅन्सर या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. ते कोपनहेगन येथे मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं.