उखाणा : उखाण्यालाच आहणा, उमाणा असे प्रतिशब्द आहेत. त्यालाच संस्कृतात प्रहेलिका व हिंदीत पहेली असे म्हणतात. महाराष्ट्रात लग्‍न, डोहाळजेवण, बारसे, हळदीकुंकू इ. समारंभांत ज्या एका विशिष्ट पद्धतीने स्त्रिया पतीचे नाव घेतात, त्या पद्धतीस उखाणा म्हणतात. कोडे किंवा कूटप्रश्न हा उखाण्याचा आणखी एक अर्थ. लहान मुले अशा प्रकारचे उखाणे एकमेकांना घालतात. उदा., ‘सुक्या विहिरीत पाखरे फडफडतात’ या उखाण्याचे उत्तर कढई व लाह्या. 

टोमणेवजा प्रश्नोत्तरांनाही उखाणा असे म्हणतात. मुली फुगडी खेळताना, कोंबडा घालताना अशा उखाण्यांचा वापर करतात. फुगडी घालताना :

पहिली : केळं बाई केळं, कर्‍हाडी केळं 

                      एवढी मोठी झालीस तरी लग्‍न नाही केलं. 

दुसरी : कोरा कागद काळी शाई 

                      माझ्या लग्‍नाची तुला का ग घाई?

स्त्रियांच्या उखाण्यांत पतीच्या नावाबरोबर सासर-माहेरचे कुलशील आणि पतीचा मान वाढविणारे ऐश्वर्यशाली बोलणे असते. उदा., 

झूल झुंबराची, पालखी सोन्याची 

                      माडी चंदनाची आहे लाखाची 

लेक कोणाची – लेक देसायांची 

                      सून कोणाची – पवारांची 

रुखवत गेला सासूबाईंकडे – सासूबाई म्हणतात नाव घे 

                      नाव आहे हळदीसाठी, नाव आहे कुंकवासाठी 

कुंकवानं भरल्या वाट्या — हळदीला नाही तोटा 

                      रांगोळ्यांची आरास – दरवळतो उदबत्त्यांचा सुवास 

सुवर्णाचं ताट, मांडला चंदनाचा पाट   

                       XXXराव बसले जेवायला तर केला समयांचा थाटमाट.

खेड्यातील स्त्रियांचा उखाणा लांबलचक असतो. पतीचे नुसतेच नाव घेतले तर त्याचे आयुष्य कमी होते, या समजुतीने ते उखाण्यांतून घेतले जाते. पुरुषही काही प्रसंगी उखाण्यातून पत्‍नीचे नाव घेतात. उदा., 

समोर होती खुंटी, खुंटीला होतं दावं 

                    मी जाईन तिकडं पार्वतीनं यावं. 

रुखवताच्या वेळच्या उखाण्यांमध्ये अतिशयोक्ती व विनोद असतो. उदा., 

आला आला रुखवत त्यात होता तवा

                    विहीणीनं कपडे धुतले पानिपतची लढाई झाली तवा! 

ग्रामीण भागात विहिणी विहिणी एकमेकींना अश्लील उखाणेही घालतात. सर्वसाधारणतः उखाण्यांची भाषा खेळकर व चटकदार असते. उदा., 

गळ्यात सरी वाकू कशी, पायात पैंजण चालू कशी 

  XXXX बसले मित्रापाशी तर मोठ्यानं बोलू कशी? 

असे हे प्राचीन काळापासून परंपरेने चालत आलेले उखाणे, मराठी लोकसाहित्याचे एक लेणे आहे.

जगताप, बापूराव