दिवाकर कृष्ण : (१९ऑक्टोबर १९०२–३१ मे १९७३). सुप्रसिद्ध मराठी कथाकार. पूर्ण नाव दिवाकर कृष्ण केळकर. गुलबर्गा जिल्ह्यातील गुंटकल (गुनमटकल) येथे ते जन्मले. मुंबई, पुणे आणि सांगली येथे राहून एम्. ए. एल्एल्. बी. झाल्यानंतर हैदराबाद येथे वकिलीचा व्यवसाय करू लागले. १९२२ मध्ये मासिक मनोरंजनाच्या एका अंकातून ‘अंगणातला पोपट’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह समाधी व इतर सहा गोष्टी ह्या नावाने प्रसिद्ध झाला (१९२७). त्यानंतर रूपगर्विता आणि सहा गोष्टी (१९४१) आणि महाराणी आणी इतर कथा (१९५५) हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. किशोरीचे हृदय (१९३४) व विद्या आणि वारुणी (१९४४) ह्या त्यांच्या कादंबऱ्‍या तोड ही माळ (१९३४) हे त्यांनी लिहिलेले नाटक.

दिवाकर कृष्णांनी फार थोड्या कथा लिहिल्या तथापि मराठी लघुकथेचे एक शिल्पकार म्हणून दिवाकर कृष्ण हे ओळखले जातात. कथानकाच्या चमत्कृतिपूर्ण गुंफणीपेक्षा हळुवारपणे घडविलेल्या भावनाविष्काराने लघुकथेत अधिक सखोलपणा आणि सामर्थ्य येते, हे दिवाकर कृष्णांनी आपल्या कथांतून प्रत्ययकारीपणे दाखवून दिले. त्यांची कथा अवतरताच मराठी ‘गोष्टी’चे मराठी ‘लघुकथे’त रूपांतर झाले. एका स्वायत्त साहित्यप्रकाराची प्रतिष्ठा मराठी कथेस मिळवून देण्यास त्यांचे कथालेखन कारणीभूत झालेच तथापि मराठी कथेच्या कक्षा रुंद करून तिच्या ठायी दडलेल्या सामर्थ्याचा त्यांनी प्रभावी प्रत्यय दिला. त्यांच्या कथेमुळे मराठी कथेला मनोदर्शनाचे तिसरे परिमाण लाभले. समाधी… हा त्यांचा कथासंग्रह म्हणजे मराठी कथेच्या उत्क्रांतिमार्गावरील एक महत्त्वपूर्ण टप्पा होय, असे मानले जाते ते याच कारणांसाठी.

मुंबई येथे १९५० साली भरलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य संमेलना’च्या अधिवेशनात कथा शाखासंमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९५४ मध्ये लातूर येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तथापि सामान्यतः अतिशय अबोल आणि सामाजिक जीवनात फारसे न मिसळणारे, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. हृदयविकाराच्या झटक्याने हैदराबाद येथे ते निधन पावले.

फडके, भालचंद्र

Close Menu
Skip to content