ध्वनिक्षेपक : (लाउडस्पीकर). विद्युत् चुबंकीय ऊर्जेचे ध्वनिऊर्जेत रूपांतर करणारा हा एक ⇨ ऊर्जापरिवर्तक आहे. याचे कार्य ⇨ ध्वनिग्राहकाच्या उलट असते. कोणत्याही रेडिओ ग्राहीतील (रेडिओ तरंग ग्रहण करणाऱ्या साधनातील) शेवटची इलेक्ट्रॉनीय पायरी श्राव्य विवर्धक ही असते. त्यापासून ध्वनिक्षेपकाला उर्जा मिळते व त्यातून श्राव्य ध्वनि-ऊर्जा बाहेर पडते.

आ.१. ध्वनिक्षेपकाचे घटक : (१) चिरचुंबक (उ-उत्तर ध्रुव, द-दक्षिण ध्रुव), (२) स्वर वेटोळे (चालक घटक), (३) कागदाचे शंक्वाकार पटल, (४) श्राव्य विवर्धकाकडून आलेली ऊर्जा, (५) रोहित्र [स्वर वेटोळे पटलाला कायमचे जोडलेले असते].

बहुतेक सर्व ध्वनिक्षेपकांत बदलत्या श्राव्य कंप्रता (दर सेकंदास होणारी कंपनसंख्या) वर्चसाचे (विद्युत् पातळीचे) वा विद्युत् प्रवाहाचे यांत्रिक कंपनांमध्ये रूपांतर करणारा एक चालक घटक असतो. चालक घटक त्याला जोडलेल्या एका पटलात कंपने निर्माण करतो व त्यामुळे त्याच्या आसपासच्या हवेत कंपने निर्माण होतात. हीच कंपने ध्वनितरंग म्हणून पुढे प्रेषित होतात. यांत्रिक कंपनांचे ध्वनितरंगांत रूपांतर करणारे पटल आकाराने सपाट किंवा शंकूप्रमाणे असून ते एका विशिष्ट प्रकारच्या कागदाचे बनविलेले असते. (आ.१).

प्रकार : चालक घटकानुसार ध्वनिक्षेपकांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येते : (१) चलनक्षम वेटोळेयुक्त (चिरचुंबक) गतिकीय, (२) चलनक्षम वेटोळेयुक्त (विद्युत् चुंबकजन्य स्थिर चुंबकीय क्षेत्र) गतिकीय, (३) दाबविद्युतीय अथवा स्फटिकयुक्त आणि (४) विद्युत् स्थितिक अथवा धारित्र प्रकार (विद्युत् भार साठवून ठेवणाऱ्या साधनाच्या तत्त्वाचा उपयोग करणारा प्रकार). यांपैकी पहिल्या प्रकारचाच ध्वनिक्षेपक जास्त प्रमाणात वापरला जातो.

आ.२. चलनक्षम वेटोळेयुक्त (चिरचुबंक) गतिकीय ध्वनिक्षेपक: (१) ॲलनिको चिरचुबंक, (२) चुंबकाचा ध्रुव भाग, (३) कागदाचे शंक्वाकार पटल, (४) स्वर वेटोळे, (५) आधार आवरण.

चलनक्षम वेटोळेयुक्त (चिरचुंबक) गतिकीय ध्वनिक्षेपकात (आ. २) एक वेटोळे (यालाच ‘स्वर वेटोळे’ म्हणतात) ॲलनिको या मिश्रधातूच्याचिरचुंबकाच्या स्थिर चुबंकीय क्षेत्रात ठेवलेले असते. श्राव्य विवर्धकातून येणारी विद्युत् ऊर्जा एका योग्य अनुरूप रोहित्राद्वारे (विद्युत दाब बदलणाऱ्या साधनाद्वारे) स्वर वेटोळ्याला दिली जाते आणि वेटोळ्यातील श्राव्य कंप्रता प्रवाहामुळे वेटोळ्यांच्या अक्षाच्या दिशेने एक यांत्रिक प्रेरणा निर्माण होते. त्यामुळे हे वेटोळे पुढेमागे हालते व त्याला दृढ रीतीने जोडलेले शंक्काकार पटलही पुढेमागे हालते. अशा प्रकारे श्राव्य विवर्धकातून येणाऱ्या श्राव्य कंप्रता ऊर्जेच्या प्रमाणात पटल कंप पावते आणि ध्वनितरंग निर्माण करते. चुंबकीय स्रोत घनता [→ चुंबकत्व] जितकी अधिक तितकी ध्वनिक्षेपकाची कार्यक्षमता व पटलाचे विद्युत् चुंबकीय संदमन (कंपनाची ऊर्जा कमी करण्याची क्रिया) अधिक असते. या प्रकारचा ध्वनिक्षेपक रेडिओ ग्राहीत नेहमी वापरतात.

आ. ३. विद्युत् चुंबकीय गतिकीय ध्वनिक्षेपक : (१) गाभा, (२) एकदिश विद्युत् क्षेत्र वेटोळे, (३) स्वर वेटोळे, (४) चुंबकाचा ध्रुव भाग, (५) कागदाचे शंक्वाकार पटल.

विद्युत् चुंबकीय गतिकीय प्रकारात (आ. ३) स्थिर स्वरूपाचे चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याकरिता विद्युत् चुंबक वापरतात. विद्युत् चुंबक सक्रियित करण्याकरिता एकदिश विद्युत् प्रवाह उद्‌गम वापरून त्याच्या साहाय्याने क्षेत्र वेटोळ्यात विद्युत् प्रवाह पाठवून त्यापासून विद्युत् चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात.

स्फटिकयुक्त ध्वनिक्षेपकात दाबविद्युतीय [→ दाबबिद्युत्] गुणधर्म असलेल्या स्फटिकामुळे निर्माण होणारी प्रेरणा पटलाला चालना देते.

धारित्र प्रकारच्या ध्वनिक्षेपकात त्याच्या एकमेकांपासून जवळ अशा समांतर पटलांवर जर असमान तऱ्हेचे वेगळे विद्युत् भार दिले, तर त्यामुळे त्यांमध्ये यांत्रिक आकर्षण निर्माण होते, या तत्त्वाचा उपयोग केला गेला आहे. या ध्वनिक्षेपकात मागील पटल स्थिर, वजनाने जड असते. ते लोखंड किंवा ॲल्युमिनियम यापासून केलेले असते. त्याला अनेक बारीक भोके पाडून धारित्राच्या आत हवेला मुक्त संचलन करता यावे असीही व्यवस्था केलेली असते. यामागील पटलाच्यावर कायलाइट या रबरासारख्या विद्युत् अपारक (ज्यात शक्तीचा किमान ऱ्हास होऊन विद्युत् क्षेत्र प्रस्थापित करता येते अशा) द्रव्याचा एक पातळ (≈ १ मिमी.) थर दिलेला असतो. या द्रव्याचा विद्युत् अपार्यता स्थिरांक ३ व विभंजन विद्युत् वर्चस् २,००० व्होल्ट या प्रतीचे असते.


कायलाइटच्या दुसऱ्या एका पातळ पटलावर अतिशय पातळ असा कथिल वर्खाचे थर देऊन चलनक्षम पटल बनविलेले असते. ध्वनिक्षेपकाची संवेदनक्षमता वाढविण्याकरिता व त्यामधील विकृतीचे प्रमाण कमी करण्याकरिता ध्वनिक्षेपकाच्या या दोन पटलांमध्ये काही हजार व्होल्ट एवढा स्थिर स्वरूपाचा विद्युत् दाब सतत ठेवला जातो. त्यावर श्राव्य विवर्धकाकडून येणारा प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशांनी वाहणारा) विद्युत् प्रवाह अध्यारोपित केला जातो. या प्रकारच्या ध्वनिक्षेपक उच्च कंप्रतेकरिता संवेदनक्षम असल्यामुळे त्याचा ‘ट्‌वीटर’(याचे वर्णन पुढे दिलेले आहे) म्हणून इतर ध्वनिक्षेपकांबरोबर ध्वनीची गुणवत्ता वाढविण्याकरिता उपयोग करतात. या ध्वनिक्षेपकाची किंमत कमी असते व योग्य अभिकल्पन (आराखडा तयार करण्याची  क्रिया) केल्यास त्यामध्ये कला (आवर्त म्हणजे ठराविक काळात पुनःपुन्हा होणाऱ्या गतीतील एखाद्या विशिष्ट संदर्भ स्थितीच्या सापेक्ष असणारी स्थिती) इ. विकृती कमी प्रमाणात असतात.

आ. ४. कर्णा व त्याला जोडलेले ध्वनिक्षेपकाचे पटल : (१) चिरचुंबक, (२) चुंबकाचा अग्रभाग, (३) पटल, (४) स्वर वेटोळे, (५) ध्वनिकक्ष, (६) कर्ण्याचा गळा, (७) कर्णा, (८) कर्ण्याचे तोंड.

कर्णा : संरचनेच्या दृष्टीने ध्वनिक्षेपकाला जोडण्यात येणारा कर्णा हा एक दृढ, अशोषक, निमुळता ध्वनिपरिवाह आहे असे म्हणता येईल. त्याचा आकार सरळ किंवा वाकडा वळवलेला असा कोणताही असू शकतो. त्यास दोन मोकळी टोके असतात. लहान आकाराच्या टोकास गळा म्हणतात. ध्वनिक्षेपकाचे पटल कर्ण्यांच्या गळ्यात बसवितात. ध्वनी प्रेषित करणाऱ्या मोठ्या आकाराच्या दुसऱ्या टोकास कर्ण्याचे तोंड म्हणतात. कर्ण्यांचे एक कार्य बरेचसे प्रेषण तारांसारखे असते. यामुळे आदान व प्रदान ध्वनींच्या संरोधांमध्ये [→ ध्वनि] सुजोडता आणता येते. गळ्यापाशी जेथे ध्वनि-ऊर्जा उद्‌गम बसविलेला असतो तेथे ध्वनिसंरोध उच्च मूल्याचा असतो, तर कर्ण्याच्या तोंडाशी त्याचा संरोध कमी मूल्याचा असतो. कर्ण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे त्यास योग्य तो आकार देऊन ध्वनि-ऊर्जेचे दिशिक वितरण बदलून तिचे प्रेषण एका विशिष्ट इष्ट दिशेत वाढविता येते. कर्णा वापरण्यापासून मुख्य फायदा म्हणजे प्रदान ध्वनीच्या गरिमात (मोठेपणात) होणारी वाढ. ध्वनिक्षेपकाच्या पटलाला मुक्तपणे हवेत कंपन करू दिले, तर त्यामुळे मिळणारा आवाज विशेष मोठा नसतो. पटलाचे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे मुक्त हवेचा एक तद्‌नुरूप लहान विभाग कंपित केला जातो हे त्याचे कारण आहे. पटलाला कर्णा जोडल्यास कंपनीय क्षेत्रफळात अनेक पटींनी वाढ होऊन त्यामुळे खूप जास्त मात्रेच्या हवेमध्ये ही कंपने निर्माण केली जातात. परिणामी ध्वनिक्षेपकाच्या पटलापासून मिळणाऱ्या ऊर्जेची श्रवणीय ध्वनी निर्माण करण्याची क्षमता वाढते.

आ. ५. कर्ण्याचे विविध आकार : (अ) शंक्वाकार, (आ) घातांकीय, (इ) घनीय, (ई) अपास्तीय, (उ) अन्वस्तीय.

कर्ण्यामुळे ध्वनिक्षेपकाची कार्यक्षमता वाढून ध्वनीमधील विकृतीसुद्धा कमी होते. कर्णा वापरल्यामुळे श्राव्य ऊर्जेसाठी सापेक्षतः कमी आकारमानाचे पटल वापरता येते. कर्ण्याच्या आकारमानाची प्रमाणे त्याच्या क्षेत्रफळ प्रसाराचे मान इ. ठरविताना कार्यक्षमता, कंप्रता प्रतिसाद, दिशिक गुणधर्म आणि आकारमान यांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने विचार केला जातो. कर्ण्याचा आकार शंक्वाकार, घातांकीय, घनीय, अपास्तीय, अन्वस्तीय इ. प्रकारचा असतो. यांपैकी घातांकीय आकारचा कर्णा सर्वांत जास्त प्रचलित आहे.

चांगल्या प्रकारे अभिकल्पित केलेला कर्णायुक्त ध्वनिक्षेपक विशिष्ट कंप्रता मर्यादेत इतर सरल प्रारक (कर्णारहित) ध्वनिक्षेपकांपेक्षा तौलनिक दृष्ट्या जास्त अचूक कंप्रता प्रतिसाद दाखवतो व त्याच्या प्रदानातील विकृतीचे प्रमाणही कमी असते. तो ८०% इतकी उच्च कार्यक्षमताही गाठू शकतो. ज्या ठिकाणी सुटसुटीत आकारमानापेक्षा कार्यक्षमता व ध्वनीची शक्ती मोठ्या असण्याची जरूरी असते तेथे (विशेषतः सार्वजनिक समारंभासाठी करावयाच्या ध्वनियोजनेत, चित्रपटगृहात इ.) कर्णायुक्त ध्वनिक्षेपक वापरतात. कर्ण्याचे आकारमान लहान हवे असल्यास त्याचे वेटोळे करता येते किंवा त्याची घडीही घालता येते परंतु त्यामुळे उच्चतर प्रदान कंप्रता संकेतात जास्त विकृती उत्पन्न होते.


आ. ६. बाधिकेचे प्रकार : (अ) सपाट (आ) मंजूषा.बाधिका : (बॅफल). ध्वनिक्षेपकापासून मिळणाऱ्या दिशिक वितरणाच्या आकृतिबंधावर नियंत्रण घालणे आवश्यक ठरते. या कार्याकरिता ज्या प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) नियंत्रण संरचना वापरतात त्यास बाधिका अशी संज्ञा दिली जाते. बाधिका इतर महत्त्वाची कार्येसुद्धा करतात. ध्वनिक्षेपकाचे पटल पुढे व मागे अशा दोन्ही बाजूंस ध्वनितरंगांचे प्रारण करते. मागे जाणारे तरंग परावर्तित होऊन परत पुढील बाजूस येऊन, पुढील भागात सरळ प्रारित केलेल्या तरंगांबरोबर परस्परक्रिया करू शकतात. यामुळे काही वेळा हे दोन तरंग एकमेकांस अनुकूल असतील, तर काही वेळा ते एकमेकांस विरोध करून एकमेकांच्या परिणामाचा निरास करतील. हा परिणाम विशेषतः लघुतरंगलांबीच्या ध्वनितरंगांमध्ये आढळून येतो. हा दुष्परिणामसुद्धा बाधिका योजनेमुळे टाळता येतो. बाधिकेमुळे ध्वनिक्षेपकाची कार्यक्षमताही वाढविता येते. आ. ६ मध्ये सपाट आणि मंजूषा प्रकारच्या बाधिका दाखविल्या आहेत. आ. ६ मध्ये दाखविलेले बाधिकेचे प्रकार समजण्यास सोपे आणि सर्वसामान्य वापरातील आहेत, हे लक्षात येईल. रेडिओ ग्राहीत याच प्रकारची बाधिका वापरलेली असते. या बाधिकेमुळे पटलाच्या पुढील बाजूपासून मागील बाजूपर्यंतच्या ध्वनीच्या बाह्य संक्रमण मार्गाची परिणामकारक लांबी वाढते आणि त्यामुळे पटलावरील ध्वनिकीय भार वाढविण्यास मदत होते. पटलाच्या पुढील भागापासून मागील भागापर्यंत बाधिकेभोवतालचे परिणामी अंतर एका तरंगलांबीच्या इतके असल्यास ध्वनिक्षेपकाचा प्रतिसाद प्रकर्षाने कमी होते. याकरिता बाधिकेचा आकार असममित ठेवलेला असतो किंवा ध्वनिक्षेपक बरोबर मध्यावर न बसवता जरा बाजूला बसवितात. वस्तुतः ह्या कारणासाठी एखादी अमर्याद सपाट बाधिका आदर्श होईल परंतु प्रत्यक्षात व्यावहारिक उद्दिष्ट साधण्याइतपतच बाधिकेचे आकारमान मोठे ठेवलेले असते. मागील बाजू संपूर्ण उघडी असेली मंजूषा, संपूर्ण बंद असलेली मंजूषा, एक भोक असलेली वा नळीची गुंडाळी बसविता येईल इतपतच मोकळी असलेली बंदिस्त मंजूषा अशा स्वरूपाच्या या बाधिकांच्या रचना असतात. मागील बाजूस उघडी असलेली मंजूषा सामान्यतः रेडिओ व दूरचित्रवाणी ग्राहीमध्ये वापरतात. अशा मंजूषांचे ⇨अनुस्पंदन नेहमी ध्वनिक्षेपकाच्या पटलाच्या मागील बाजूस होते. त्यामुळे ध्वनिक्षेपकाच्या प्रतिसाद अभिलक्षणांमध्ये अनिष्ट अशी उच्चता निर्माण होते. या अनुस्पंदनाची कंप्रता मंजूषा व ध्वनिक्षेपक यांच्यावर अवलंबून असते. चांगल्या तद्‌रूप ध्वनीसाठी मागून उघडी असलेली मंजूषा वापरणे इष्ट नसते. अशी मंजूषा शक्य तितकी उथळ असणे व ती भिंतीपासून सु. १५ सेंमी. दूर ठेवणे इष्ट असते. पूर्ण बंदिस्त मंजूषेतील ध्वनिक्षेपक पूर्णपणे परिबद्ध असल्यामुळे पटलाच्या पुढील व मागील बाजूंमध्ये काहीही व्यतिकरण (अनिष्ट मिश्रण) होत नाही. या प्रकारच्या मंजूषेच्या आतील भागाचे घनफळ मोठे असणे इष्ट असते. मंजूषेचे घनफळ जितके जास्त तितकी तिची अनुस्पंदन कंप्रताही सपाट बाधिकेच्या शक्य असलेल्या अनुस्पंदन कंप्रतेशी जास्त समीप येऊ लागते. मंजूषेच्या आतील भागात कंपनांचे संदमन करण्यासाठी मंजूषेला आतून नमदा (फेल्ट) अथवा तत्सम ध्वनिशोषक पदार्थाचे अस्तर देतात. त्यामुळे उच्च कंप्रतांकरिता ध्वनिक्षेपकाच्या संदमन क्रियेस मदत होते. बंदिस्त मंजूषा नीचतर कंप्रतांना एकविध प्रतिसाद देते, खोलीच्या भिंतीच्या समीपतेचा तिच्यावर काही परिणाम होत नाही पण तिची कार्यक्षमताही काहीशी कमी होते.

आ. ७. शिरःश्रवणी : (अ) काटछेद : (१) पटल (याच्या कंपनातील तीन स्थिती तुटक रेषांनी दाखविल्या आहेत), (२) नालाकृती चिरचुंबक, (३) चुंबकाचे ध्रुव भाग, (४) ३ चुंबकाच्या (प्रत्येक) ध्रुव भागावर गुंडाळलेले बारीक तारेचे हजारो वेढे असलेले वेटोळे, (५) कठीण रबराचे पात्र (कप), (६) कठीण रबराचे टोपीसारखे आवरण (आ) डोक्यावर चढवावयाच्या पट्ट्यासहित प्रमाणभूत शिरःश्रवणींची एक जोडी.

शिरःश्रवणी : (हेडफोन). हाही एक प्रकारचा ध्वनिक्षेपकच आहे. संदेशवहन ग्राही (उदा., विमानातील) व श्राव्य कंप्रता ऊर्जा लहान प्रमाणात उपलब्ध असते अशा व इतर ठिकाणी शिरःश्रवणी वापरतात. शिरःश्रवणी कानावर बसविल्यावर मध्यभागी भोक असलेल्या टोपणाच्या साहाय्याने पटल कानावर परिणामकारकपणे घट्ट बसेल अशी सोय केलेली असते. कान व पटल यांमध्ये असलेली अल्पशी हवा पटलाच्या कंपनांनुसार कानावर दाब देते. शिरःश्रवणीमधील चुंबकीय क्षेत्र हे स्थिर आकर्षण प्रेरणा निर्माण करणाऱ्या एका चिरचुंबकापासून आणि त्याचबरोबर श्राव्य कंप्रता वाहणारी वेटोळी असलेल्या विद्युत् चुंबकापासूनच निर्माण होते. वेटोळ्यातील बदलणाऱ्या विद्युत् प्रवाहामुळे तसेच बदलते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि चुंबकाचे संयुक्त क्षेत्र पटलामध्ये त्यानुरूप कंपने निर्माण करते. पटलाच्या कंपनामुळे श्राव्य ध्वनितरंग निर्माण होतात. वर वर्णन केलेल्या चुंबकीय पटलाखेरीज चलनक्षम वेटोळे, स्फटिक प्रवर्तक इत्यादींचा उपयोग करणाऱ्या शिरःश्रवणीही प्रचारात आहेत. शिरःश्रवणीचा कंप्रता प्रतिसाद सामान्यतः मर्यादित असतो.

दुहेरी व तिहेरी पद्धतीचे ध्वनिक्षेपक : एकच पटल असलेल्या ध्वनिक्षेपकाला विस्तृत कंप्रता कक्षेमध्ये समाधानकारकपणे काम देणे शक्य होत नाही. याकरिता मर्यादित कंप्रता कक्षेसाठी अभिकल्पित केलेले दोन वा अधिक ध्वनिक्षेपक किंवा दुहेरी अथवा तिहेरी एकत्रित संच वापरले जातात.


वेगवेगळ्या कंप्रता प्रतिसादाचे ध्वनिक्षेपक वापरले असता प्राप्त होणारी (विस्तृत) कंप्रता कक्षा त्यांच्यामध्ये विभागण्यात येते. त्यासाठी कंप्रता विभाजक विद्युत् मंडले वापरतात आणि अशा तऱ्हेने प्रत्येक ध्वनिक्षेपक आपआपल्या मर्यादित कंप्रता कक्षेत स्वतःच्या महत्तम कार्यक्षमतेत कार्य करतो.

एकत्रित दुहेरी पद्धतीत एका मोठ्या पटलाच्या अग्राजवळ त्याच्याशी समअक्षात व समतलात बसविलेले एक लहान उच्च कंप्रता पटल वापरले जाते. परस्परव्यापी कक्षेत दोन्ही पटले एकरूपतेने कार्य करतात. मोठ्या व लहान पटलांच्यामध्ये कंप्रता विभाजन हे सामान्यतः ४००—१,२०० हर्ट्‌झ या कक्षेत केले जाते. नीचतर कंप्रता कक्षेत काम करणाऱ्या ध्वनिक्षेपकास ‘वुफर’ व उच्चतर कंप्रता कक्षेत काम करणाऱ्या ध्वनिक्षेपकाला  ‘ट्‌वीटर’असे म्हणतात.

एकत्रित तिहेरी पद्धतीत एक मोठे नीच कंप्रता पटल, एक मध्यम कंप्रता कर्णा व एक उच्च कंप्रता कर्णा एकाच अक्षात योग्य अशा अंतरावर बसविलेले असतात. आतापर्यंत विशद केलेल्या निरनिराळ्या तत्त्वांचे व पद्धतींचे स्पष्टीकरण करण्याकरिता व्यवहारात या तत्त्वांचा एकत्रित रीत्या उपयोग करणाऱ्या अशा सार्वजनिक ध्वनिक्षेपण योजनेचे वर्णन खाली दिले आहे.

सार्वजनिक ध्वनिक्षेपण योजना : कंठ संगीताचे कार्यक्रम व वाद्यसमूहांचे कार्यक्रम यांसाठी ध्वनिक्षेपण मूळ ध्वनीनुरूप होणे आवश्यक असल्यामुळे या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या ध्वनिक्षेपण योजना वापरण्यात येतात.

ध्वनिक्षेपकांची निवड : कार्यक्रमाच्या स्थानाची परिस्थिती (बंदिस्त, खुले इ.) आणि कार्यक्रमाच्या वेळी आवश्यक असणारी ध्वनिपातळी निर्माण करण्यासाठी लागणारी ध्वनि-ऊर्जा माहीत असल्यास ध्वनिक्षेपकांची निवड करता येते. उदा., उत्तम प्रकारच्या ध्वनिक्षेपणासाठी बहुकोशिक उच्च कंप्रता कर्णे आणि विस्तृत आकारमानाचे (३८ ते ४५ सेंमी. व्यासाचे) नीच कंप्रता ध्वनिक्षेपक यांचे संच वापरतात. त्यामुळे सर्व कंप्रतांना सारख्या मूल्याचा प्रतिसाद मिळण्यास मदत होते [→ उत्तम तद्‌रूपता ध्वनिप्रणाली]. विद्यालये, खुली व्याख्यानगृहे इत्यादींसारख्या गोंगाटाच्या ठिकाणी मूळ ध्वनीच्या नैसर्गिकपणाला कमी महत्त्व असते. अशा ठिकाणी फक्त वक्‍तृत्व कंप्रता कक्षा उपयोगात आणण्याच्या दृष्टीने लहान आकारमानाचे कर्णे उपयुक्त असतात. सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या साध्या ध्वनिक्षेपण योजनांसाठी आणि विस्तृत प्रमाणावर पसरलेल्या अनेक ध्वनिक्षेपकांच्या समूहासाठी २० सेंमी. व्यासाचे शंकू असणारे ध्वनिक्षेपक वापरतात.

ध्वनिक्षेपकांचे स्थान : मर्यादित उंचीच्या लांब सभागृहात सर्वत्र विखुरलेल्या ध्वनिक्षेपकांची मांडणी करण्यात येते, तर संगीत प्रेक्षागृहातील ध्वनिक्षेपक सामान्यतः रंगमंचाच्या दर्शनी कमानीच्या मध्यभागी वा रंगमंचाच्याच बाजूला बसविलेले असतात. व्याख्यानाच्या वेळी वापरावयाच्या ध्वनिक्षेपकांचे उत्तम स्थान व्यासपीठावरील मध्यभाग हे असते. अन्यथा व्यासपीठाच्या बाजूंना बसविलेल्या ध्वनिक्षेपकातून येणारा आवाज हा श्रोते पाहत असलेल्या दिशेपेक्षा वेगळ्या दिशेने येत आहे असे भासते.

ध्वनिक्षेपण योजनेचे अपेक्षित गुणधर्म : (१) ध्वनिक्षेपकांचे दिशिक गुणधर्म अशा तऱ्हेने निवडावे लागतात. की ध्वनि-ऊर्जा सर्व दिशांना सारख्या प्रमाणात विभागली जावी आणि कमीतकमी ध्वनि-ऊर्जा भिंतींवरून परावर्तित व्हावी. (२) योग्य ती ध्वनीची पातळी सर्वांत दूरच्या ठिकाणी निर्माण व्हावी परंतु ध्वनिक्षेपकाच्या नजिकच्या प्रेक्षकाला ध्वनींचे आघात सहन करावे लागू नयेत. (३) प्रेक्षागृहाच्या भिंतीवरून परावर्तित होणाऱ्या ध्वनींमुळे अनावश्यक कंपने निर्माण होऊ शकतात. ध्वनिक्षेपक आणि ध्वनिग्राहकाची योग्य मांडणी करून हा परिणाम कमी करता येतो. यासाठी ध्वनिग्राहक ध्वनि-उद्‍गमाच्या जास्तीत जास्त जवळ आणि ध्वनिक्षेपकापासून दूर ठेवतात.

ध्वनिक्षेपकाची अभिलक्षणे : ध्वनिक्षेपकाचा अभिकल्प करणाऱ्या तज्ञास खालील अभिलक्षणांमध्ये विशेष स्वारस्य असते.

संरोध : चलनक्षम वेटोळ्याच्या ध्वनिक्षेपकाकरिता संरोध सु. ४०० हर्ट्‌झ या कंप्रतेस मोजण्यात येतो. हा संरोध उद्‍गमाच्या (विवर्धक) संरोधाशी सुजोड असावयास पाहिजे. उद्‍गमाचा संरोध अतिनीच असल्यास नीच कंप्रता प्रतिसादाचा अपहार होतो आणि उद्‍गमाचा संरोध अति-उच्च असल्यास ध्वनिक्षेपकाच्या अनुस्पंदनाच्या आसपासच्या अरुंद कंप्रता पट्ट्याचा प्रतिसाद अतिशय क्षीण होतो.


संदमन : ध्वनिक्षेपकाचे संदमन अंशतः ध्वनिजन्य, अंशतः घर्षणजन्य व अंशतः विद्युत् चुंबकीय असते. विद्युत् चुबकीय संदमन शक्ती विवर्धकाच्या पट्टिका रोधावर [→ इलेक्ट्रॉनीय विवर्धक] अवलंबून असते. कंपनांना प्रतिबंध करण्यास जरूर असलेल्या संदमनाच्या कमीतकमी मूल्यास क्रांतिक संदमन म्हणतात व ते वरील घटक विचारात घेणाऱ्या गणितीय सूत्रावरून काढता येते. ध्वनिक्षेपकाचे एकदा क्रांतिक संदमन झाले म्हणजे त्याचा कंप्रता प्रतिसाद अनुल्लंघनमुक्त होतो.

कंप्रता प्रतिसाद अभिलक्षणे : कोणत्याही ध्वनिक्षेपकाची मूळ ध्वनीचे चांगले व यथार्थ पुनरुत्पादन करण्याची क्षमता अनेक घटकांवर अवलंबून असते. कंप्रता प्रतिसाद अभिलक्षणे अत्यंत कडक चाचणीखाली मोजली जातात. ही अभिलक्षणे नंतर एका आलेखाद्वारे प्रसिद्ध केली जातात. या आलेखात एका अक्षावर कंप्रता व दुसऱ्या अक्षावर प्रदान शक्ती दर्शविलेली असते. इष्ट कंप्रता कक्षेत आलेखाचा वक्र सपाट असणे हेच उत्तम अभिकल्पित ध्वनिक्षेपकाचे निदर्शक असते.

ध्वनिक्षेपकाचे अपेक्षित गुणधर्म : अभिकल्पाच्या दृष्टीने कोणत्याही ध्वनिक्षेपकामध्ये पुढील गुणधर्म असणे आवश्यक असते : (१) उत्तम संवेदशीलता, (२) संपूर्ण कंप्रता कक्षेमध्ये अल्प विकृती, (३) एकविध (सर्वत्र एकसारखा) कंप्रता प्रतिसाद, (४) क्षणिक विद्युत् बदलास योग्य प्रतिसाद, (५) मंद अनुस्पंदनी कंप्रतेला पुरेसे संदमन व (६) पुरेशी श्राव्य ऊर्जा वापरण्याची क्षमता.

पहा : उत्तम तद्‌रूपता ध्वनिप्रणाली.

संदर्भ : 1. Briggs, G. A. Loudspeakers, Port Washington, N. Y., 1958.

           2. Henney, K. Radio Engineer’s Handbook, New York, 1959.

           3. McLachlan, N. W. Loudspeakers, New York, 1960.

           4. Markus, W. Levy, A. Elements of Radio Servicing, St. Louis, 1967.

           5. Slarzberg, M.  Osterheld, W. Essentials of Radio Eletronics, New York, 1961.

पेण्ढारकर, श. भा. (इं.) भदे, व. ग. (म.) शेंडे, अ. वा.