ओरफीत मासा : लांबट व चपट्या फितीसारख्या आकाराच्या माशांना फीत मासे हे नाव देतात. या प्रकारचे मासे ऑस्टेइक्थीज (सारकॉप्टेरिजिआय) या वर्गाच्या काही गणांतील निरनिराळ्या कुलांत आढळतात. लँप्रिडीफॉर्मीस गणातील लँप्रिडीडी कुलात ओपा, व्हेलिफेरिडी कुलात क्रेस्ट मासे, ट्रॅकिप्टेरिडी कुलात ओर मासे आणि पर्सिफॉर्मीस गणाच्या ट्रायकियुरिडी कुलात कटलॅस मासे या फित माशांचा समावेश आहे. वर निर्देश केलेले मासे जरी निरनिराळ्या कुलांचे असले, तरी त्या सर्वांचा आकार फितीसारखा आहे. तथापि ट्रॅकिप्टेरिडी कुलाच्या रिगॅलिकस वंशातील माशांनाच सामान्यपणे फीत मासे असे म्हटले जाते त्यांनाच ओर मासे असेही म्हणतात. हा फीत मासा खोल समुद्रात तळाशी राहतो. जगातील बहुतेक सर्व समुद्रांत (उदा., भूमध्य व उत्तर समुद्र, द. अटलांटिक, हिंदीमहासागर इ.) तो आढळतो. सहसा पाण्याच्या पृष्ठभागावर तो येत नाही जर आलाच, तर मृतावस्थेत अगर मरणप्राय अवस्थेत आढळतो. या माशाचे शरीर अर्धपारदर्शक, चापट, फितीसारखे असते. याची लांबी ६-७ मी. (क्वचित ९ मी. पर्यंत), उंची वा जाडी २० ते २५ सेंमी. व रुंदी ८ ते १० सेंमी असते. याचा रंग निळसर रुपेरी व चकाकणारा असतो आणि शरीरावर आडवे काळसर पट्टे असतात याचा पृष्ठपक्ष (पाठीवरील पर पर म्हणजे हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयुक्त अशी त्वचेची स्‍नायुमय घडी) डोक्यापासून शेपटीपर्यंत विस्तारलेला असतो. त्याचा रंग लाल असतो. याला पुच्छपक्ष (शेपटीचा पर) नसतो. पृष्ठपक्षाचे अग्रभागातील डोक्याजवळील काटे सुटे होऊन त्यांचा आयाळीसारखा पुंज तयार झालेला असतो. अधर पक्ष (खालचा पर) छातीजवळ अगदी लहान असतो. श्रोणी पक्षाचे (कटी प्रदेशावरील पराचे) लांब काट्यात रूपांतर झालेले असते. शरीरावर खवले असल्यास ते लहान व चक्रज (ज्यांच्या मोकळ्या कडा सारख्या वाकलेल्या असतात असे) असतात पुष्कळदा खवले नसतात. याचे जबडे बहिःक्षेप्य (बाहेर काढता येऊ शकतील असे) असतात, हे याचे वैशिष्ट्य आहे. या माशांच्या लांब आकारामुळे कधीकधी चुकीने यांना ‘समुद्री साप ’ समजले जाते.

लँप्रिडीफॉर्मीस माशांचा उदय क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वींच्या) काळात झाला. त्यांचे चार उपगण, सात कुले, अभिनव काळातील (गेल्या ११ हजार वर्षांतील) बारा वंश व एकवीस वा अधिक जाती अस्तित्वात आहेत. हे सर्व मासे खोल समुद्रात व महासागरात राहतात. त्यामुळे ते सहसा नजरेत पडत नाहीत.

जोशी, लीना