फिशर, हान्स : (२७ जुलै १८८१ – ३१ मार्च १९४५). जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ व १९३० च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांनी पाने व रक्त यांतील रंगद्रव्यांच्या रासायनिक संघटनाविषयी महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांचा जन्म फ्रँकफुर्ट जवळच्या हख्‌स्ट येथे झाला व शिक्षण लोझॅन, म्यूनिक व मारबुर्ख विद्यापीठांत झाले. त्यांनी १९०४ मध्ये मारबुर्ख विद्यापीठाची पीएच्‌.डी पदवी मिळविली व त्यानंतर वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून १९०८ मध्ये त्यांनी म्यूनिक विद्यापीठाची एम्‌.डी. पदवी मिळविली. काही दिवस वैद्यकीय व्यवसाय केल्यावर त्यांनी बर्लिन येथे एमील फिशर यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्ष रसायनशास्त्राचे संशोधन केले व १९१६ साली इन्सब्रुक (ऑस्ट्रिया) येथे वैद्यक-रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९१८ मध्ये ते व्हिएन्ना विद्यापीठात गेले व १९२१ मध्ये म्यूनिक येथील टेक्‍निकल युनिव्हरर्सिटीमध्ये कार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक व इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्‌गॅनिक केमिस्ट्री या संस्थेचे संचालकही झाले.

वनस्पतीमध्ये असणाऱ्या हरितद्रव्य (क्लोरोफिल) या रंगद्रव्याची संरचना आणि रक्तातील हीमोग्‍लोबिनापासून मिळणाऱ्या हीमीन या स्फटिकी रंगद्रव्याची संरचना यांसंबंधी केलेले संशोधन आणि विशेषतः १९२८ साली केलेले हिमिनाचे संश्लेषण (कृत्रिम रीतीने बनविणे) या कामगिरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. ज्ञात संघटनाच्या पदार्थांपासून त्यांनी हीमीन कृत्रिम रीतीने बनविले. त्यामुळे साध्या कार्बनी द्रव्यांपासून हीमीन बनविणे शक्य झाले. बिलीरुबीन या पित्तातील रंगद्रव्याचेही त्यांनी संश्लेषण केले, संरचना निश्चित केली आणि त्याच्या व हीमिनाच्या संरचनांमधील परस्परसंबंध स्पष्ट केला. कॅरोटीन हे अ जीवनसत्त्वाचे पूर्वगामी (ज्यापासून शरीरात जीवनसत्त्व तयार होते असे) संयुग, पॉर्फिरीन ही हीमिनापासून मिळणारी व लोह नसलेली संयुगे आणि पक्ष्यांच्या पिसांमध्ये असणाऱ्या रंगद्रव्यांसंबंधीही त्यांनी संशोधन केले. हरितद्रव्याचे संश्लेषणही त्यांनी मृत्यूपूर्वी जवळजवळ पूर्ण केले होते.

लीबिक स्मृतिपदक (१९२९), डेव्ही पदक (१९३७), हार्व्हर्ड विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट पदवी (१९३६) इ. सन्मान त्यांना मिळाले आहेत. एच्‌. ओर्थ या आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी १९३७ मध्ये Die Chemie des Pyrrol (४ खंड) हा ग्रंथ प्रसिद्ध केला तो या क्षेत्रात प्रमाणभूत मानला जातो. त्यांनी म्यूनिक येथे आत्महत्या केली.

कानिटकर, बा. मो.