फॉलिक अम्‍ल : मानव इतर प्राणी, तसेच काही सूक्ष्मजीवांच्या पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांपैकी फॉलिक अम्ल हे एक आहे. हे ब गटातील एक जीवनसत्त्व असून ते सामान्यतः ‘फॉलॅसीन’ या नावाने ओळखले जाते. याचे रेणवीय सूत्र (रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांची संख्या दर्शविणारे सूत्र) C19H19N7O6 असे आहे. हे टेरॉइलग्‍लुटामिक अम्ल या नावानेही ओळखले जाते.

इतिहास : मानवातील त्रुटिजन्य रोगांचा अभ्यास, प्राण्यांचे पोषण आणि सूक्ष्मजीवशास्त्र या निरनिराळ्या विषयांवरील संशोधनामधून फॉलिक अम्‍लाचा शोध लागला. पुष्कळ संशोधकांनी निरनिराळ्या नैसर्गिक पदार्थांपासून हा पदार्थ मिळविण्याचे प्रयत्‍न केले. विविध प्राणी व सूक्ष्मजंतू यांवर प्रयोग केले गेले. याशिवाय या अम्लाचे निरनिराळ्या रासायनिक संयुग्मी अवस्थेतील अस्तित्व इ. कारणामुळे या पदार्थास निरनिराळी नावे प्राप्त होणे अपरिहार्य होते. ‘जीवनसत्त्व एम’, ‘जीवनसत्त्व ब’, ‘जीवनसत्त्व ब१० व ब११’, ‘नोराइट इल्युएट फॅक्टर’, ‘लॅक्टोबॅसिलस केसिआय फॅक्टर’, ‘फॅक्टर आर’, फॅक्टर यू’, ‘फॅक्टर एस.’ इ. नावे या जीवनसत्वास देण्यात आली. १९४१ मध्ये एच्. के. मिचेल ई. ई. स्‍नेल व आर्. जे. विल्यम्स यांनी पालकाच्या पानापासून मिळणारा व अज्ञात संरचनेचा एक पदार्थ सूक्ष्मजीवांच्या वाढीस उपयुक्त असल्याचे दाखविले. त्यांनी या अम्ल पदार्थास लॅटिन शब्द फॉलियम (म्हणजे पान) यावरून फॉलिक अम्ल असे नाव दिले. कालांतराने वरील सर्व पदार्थ एकच असावेत असे वाटू लागून त्याची संरचना शोधण्याचे प्रयत्‍न सुरू झाले. १९४५ मध्ये आर्. बी. अँजिअर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यकृतापासून मिळविलेला व जीवनसत्त्व ब नाव दिलेला पदार्थ टेरॉइलग्लुटामिक अम्लाचा संयुग्मी पदार्थ असल्याचे दाखविले. पुढे वरील सर्व पदार्थ टेरॉइलग्लुटामेटे आहेत असे दिसून आले आणि फॉलिक अम्‍लाचा टेरॉइलग्‍लुटामिक अम्ल हे रासायनिक नाव मिळाले. १९४६ मध्ये अँजिअर व त्यांचे लेडर्ले प्रयोगशाळेतील सहकारी यांनी फॉलिक अम्लाचे अलगीकरण, संरचनेचा पुरावा व संश्लेषण (कृत्रिम रीत्या घटक आणून निर्मिती करणे) यांचे वर्णन प्रसिद्ध केले.

संरचना : फॉलिक अम्‍लाची रेणवीय संरचना पुढीलप्रमाणे आहे. 

फॉलिक अम्ल (टेरॉइलग्लुटामिक अम्ल)

वरील संरचनेवरून हे सहज ध्यानात येते की, या अम्‍लाचा प्रत्येक रेणू ३ गटांचा बनला आहे : (१) ग्‍लुटामिक अम्ल, (२) पॅरा-ॲमिनो बेंझॉइक अम्ल (पाबा-PABA) आणि (३) टेरिडीन गट. अन्नातील फॉलिक अम्ल हे यांचे संयुग असून त्यामध्ये ग्‍लुटामिक अम्ल रेणूंची अधिक भर असते व म्हणून त्याचा रेणूभार अधिक असतो. फॉलिक अम्लाचा रेणूभार ४४१·४ आहे.

गुणधर्म: फॉलिक अम्ल हा पिवळा स्फटिकीय पदार्थ असून तो थंड पाण्यामध्ये ०·१ टक्का विरघळतो. अल्कोहॉलाच्या विरल विद्रावात तो विरघळतो. या विद्रावापासून बेरियम किंवा शिसे यांच्या लवणरूपात फॉलिक अम्‍लाचा अवक्षेप (तळाशी राहणारा आणि न विरघळणारा भाग) वेगळा करता येतो. प्रकाशाच्या जंबुपार वा अवरक्त (दृश्य वर्णपटाच्या जांभळ्या रंगापलीकडील वा तांबड्या रंगाच्या अलीकडील) भागात फॉलिक अम्लाचे विशिष्ट शोषणपट्टे दिसतात [⟶ वर्णपटविज्ञान]. नेहमीच्या अन्‍न शिजवण्याच्या पद्धतीमुळे अन्‍नातील मूळचे फॉलिक अम्ल बरेच कमी होते. प्रशीतकामध्ये (रेफ्रिजरेटरामध्ये) ठेवलेल्या पदार्थात ते दोन आठवडे टिकते.

शरीरक्रियात्मक कार्य : फॉलिक अम्ल सस्तन प्राण्यांमध्ये मूळ स्वरूपात कार्यान्वित नसते. तो एक पूर्वगामी पदार्थ असून एंझाइमे (जीवरासायनिक किक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी प्रथिने) त्यापासून फॉलिनिक अम्ल बनवितात. हे कार्य प्रामुख्याने यकृत व अस्थिमज्‍जा (हाडांच्या पोकळीतील मऊ ऊतक ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा-पेशींचा-समूह) यांत होतो. क्रियाशील पदार्थास ‘टेट्राहायड्रोफॉलिक अम्ल’ म्हणतात आणि तो को-एंझाइम (एंझाइमाच्या बरोबर असणारा व त्याच्या कार्यास आवश्यक असणारा पदार्थ) असतो. ॲस्कॉर्बिक अम्ल (क जीवनसत्त्व) त्याचा ⇨ ऑक्सिडीभवनापासून बचाव करते.

फॉलिक अम्ल कोशिकांमधील ⇨ न्यूक्लिइक अम्‍लांच्या संश्लेषणात (जैव निर्मितीत) भाग घेते. फॉलिक अम्‍लाशिवाय जिवंत कोशिकांचे संपूर्ण विभाजन होत नाही. रक्तजननाकरिता ते अत्यंत आवश्यक असते. रक्तातील तांबड्या कोशिका अस्थिमज्‍जेत तयार झाल्यानंतर त्यांची पूर्ण वाढ झाल्याशिवाय त्या आपले कार्य करू शकत नाहीत. या वाढीकरिता काही एंझाइम विक्रिया व्हाव्या लागतात, त्यामध्ये फॉलिक अम्ल को-एंझाइमाचे कार्य करते. रक्तातील पांढऱ्या कोशिका व बिंबाणू (रक्त साखळण्याशी व रक्ताची गुठळी आकुंचित होण्याशी संबंधित असलेल्या वर्तुळाकार अथवा दीर्घवर्तुळाकार सूक्ष्म तबकड्या) यांच्यावरही ते परिणाम करीत असावे.

पुरवठा, अवशोषण, साठा व उत्सर्जन : तृणधान्ये, भाज्या, मांस व केळी यांमध्ये फॉलिक अम्ल असते. पालकात ते भरपूर प्रमाणात असते. त्याचे अवशोषण फक्त रिक्तांत्रातच (लहान आतड्याच्या वरच्या भागातच) होते. अवशोषणानंतर एंझाइमामुळे त्याचे संयुग्मी स्वरूप बदलते. ही क्रिया ऊतक, यकृत व अस्थिमज्‍जा यांत होते. मानवाच्या मोठ्या आतड्यात सूक्ष्मजंतू संश्लेषणाने फॉलिक अम्ल तयार करतात परंतु ते मानवाला उपयोगी पडत नाही. शरीरात काही महिने पुरेल एवढा त्याचा साठा असतो. फॉलिक अम्लाचे उत्सर्जन (शरीराबाहेर टाकण्याची क्रिया) मूत्रातून होते. सेवन केलेल्या अन्नातील काही भाग अत्यल्प प्रमाणात फॉलिनिक अम्लाच्या स्वरूपात मूत्रातून उत्सर्जित होतो. फॉलिनिक अम्ल किती तयार व्हावे हे ऊतकामधील ॲस्कॉर्बिक अम्‍लाच्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणून ⇨ स्कर्व्ही या रोगात ते मूत्रात आढळत नाही.


आमापन, एकक व दैनंदिन गरज : फॉलिक अम्लाचे आमापन सूक्ष्मजैव व रासायनिक पद्धतींनी करतात [⟶ आमापन, जैव]. याकरिता लॅक्टोबॅसिलस केसिआय अगर स्ट्रेप्टोकॉकस फीकॅलिस या सूक्ष्मजंतूचा उपयोग करतात. निसर्गात हे जीवनसत्त्व निरनिराळ्या स्वरूपांत आढळत असल्याने आणि यांतील काही रूपांची या दोन सूक्ष्मजंतूच्या बाबतीतील क्रियाशीलता ही भिन्‍न असल्याने तसेच टेरॉइलग्लुटामिक अम्लाच्या संयुग्मी पदार्थाचे जलीय विच्छेदन करणे (पाण्याच्या विक्रियेने घटक अलग करणे) अवघड असल्याने या जीवनसत्वाचे केवल परिणाम काढणे अतिशय कठीण असते. त्याची क्रियाशीलता शुद्ध फॉलिक अम्‍लाच्या वजनात उल्‍लेखितात.

माणसाला दररोज सर्वसाधारणपणे ५० मायक्रोग्रॅम फॉलिक अम्ल पुरते. अन्नातील २०० मायक्रोग्रॅम संयुग्मी रूपातील पदार्थापासून तेवढे सहज मिळते. गर्भारपणात त्याची गरज दररोज ४०० मायक्रोग्रॅमपर्यंत वाढते. 

विरोधके: (एखाद्या पदार्थाच्या जैव संश्लेषणात वा क्रियेत व्यत्यय आणणारे दुसरे पदार्थ). सूक्ष्मजीव व प्राणी यांवरील प्रयोगांत विरोधके वापरून या अम्लाच्या को-एंझाइम क्रियाशीलतेचा अभ्यास करण्यात आला आहे. ही विरोधके फॉलिक अम्‍लाशी सदृश असे पदार्थ असून त्यांपैकी ॲमिनॉप्टेरीन (४-ॲमिनो टेरॉइलग्‍लुटामिक अम्ल) हा जास्त प्रभावी आहे. ही विरोधके सर्वच जातींच्या प्राण्यांत फॉलिक अम्ल विरोधके म्हणून काम करू शकतात असे मात्र नाही. ॲमिनॉप्टेरीन हे घुशी, कोंबडीची पिले, कुत्री व काही सूक्ष्मजीव यांना विरोधक म्हणून कार्य करते. केवळ १ मिग्रॅ. ॲमिनॉप्टेरीन मिसळून १ किग्रॅ. खाद्यपदार्थावर घुशींना वाढविले असताना त्या सर्व मरण पावल्या असे दिसून आले. अमिनॉप्टेरिनाच्या या प्रभावी विरोधी शक्तीचा मानवी रोगांच्या इलाजाकरिता उपयोग करण्यात आला आहे. कर्करोग व लहान मुलांत उद्‌भवणाऱ्या ⇨ श्वेतकोशिकार्बुद (पांढऱ्या कोशिकांची अनिर्बंध वाढ) या रोगांत ते वापरतात. हिवतापविरोधी औषधांमुळे (उदा., पॅल्युड्रिन) फॉलिक अम्लाच्या कार्यात अडथळा येतो.

त्रुटिजन्य विकार व औषधी उपयोग : सर्व प्राण्यांना फॉलिक अम्ल जीवनावश्यक आहे. कुत्रा, ससा व घुस हे प्राणी आपल्या आतड्यात ते संश्लेषणाने बनवू शकतात. कोंबडीची पिले व माकडे या प्राण्यांना ते आहारातून मिळणे आवश्यक असते. 

मानवामध्ये या जीवनसत्वाच्या त्रुटीमुळे महाकोशिकांचे (आकारमानाने अपसामान्य मोठ्या झालेल्या रक्तातील तांबड्या कोशिकांचे) प्राधान्य असलेला रक्तक्षय (पांडुरोग, ॲनिमिया) होतो. अस्थिमज्जेच्या कार्याकरिता फॉलिक अम्लाची गरज असते. त्याच्या त्रुटीमुळे रक्तातील कोशिकांच्या उत्पादनात व्यत्यय येतो. कोशिकांची वाढ पूर्ण होत नाही. या अडथळ्यावर मात करण्याच्या उद्देशाने अस्थिमज्‍जेची अभिवृद्धी होते व तीत बृहत्‌कोशिका जनकांची (मोठ्या आकारमानाच्या प्रारंभिक तांबड्या कोशिकांची) वाढ आढळते. याशिवाय अतिसार व हिरड्यांचा शोथ (दाहयुक्त सूज) ही लक्षणेही उत्पन्न होतात. 

उष्ण कटिबंधीय ⇨ संग्रहणी या रोगात फॉलिक अम्ल त्रुटीचे दुष्परिणाम आढळतात. फॉलिक अम्लाचे अवशोषण न झाल्यामुळे त्रुटी उत्पन्न होते.

संग्रहणीशिवाय पोषणज रक्तक्षय, लहान मुलांतील बृहत्‌कोशिकायुक्त रक्तक्षय, गर्भारपणातील रक्तक्षय आणि ⇨ वल्कचर्म या विकारामधील रक्तक्षय यांमध्ये फॉलिक अम्ल गुणकारी आहे. औषधी उपयोगातील फॉलिक अम्ल संश्लेषणाने बनविलेले असते. ते तोंडाने किंवा टोचून देता येते.

संदर्भ : 1. Bicknell, F. Prescott, F. The Vitamins in Medicine, London, 1953.

    2. Goodman, L S. Gilman, A. The Pharmacological Basis of Therapeutics, New York,    1968.

   3. Sebrell, W. H. (Jr.) Harris, R. S., Ed., The Vitamins, Vol. IV, New York, 1967.

   4. West, E. S. Todd, W. R. Textbook of Biochemistry, New York, 1961.

हेगिस्टे, म. द.