फॉन : प. आफ्रिकेतील बेनीन (दाहोमी) प्रजासत्ताकातील एक जमात. त्यांना दाहोमियन असेही म्हणतात. त्यांची लोकसंख्या ८,५०,००० (अंदाजे १९७१) होती. अल्पप्रमाणात ते नायजेरियातही आढळतात. पश्चिम आफ्रिकेतील गिनी किनाऱ्यावरील प्रदेशातील ट्वी भाषा बोलणाऱ्या निग्रोंच्या चार उपशाखांपैकी ‘एजा’ उर्फ ‘एव्ही’ या उपशाखेमध्ये या जमातीचा समावेश होतो. एव्ही भाषेची बोलीभाषा ते बोलतात. शेती आणि मासेमारी ही त्यांच्या उपजीविकेची साधने. मका, रताळी व सुरण ही त्यांची प्रमुख पिके. तेल माडाची मोठ्या प्रमाणावर लागवड करून ते त्या तेलाचा व्यापारही करतात. शेती आणि घराचे बांधकाम यांबाबतीत सहकारी संघटना आढळते. प्रत्येक खेड्यात धंदेवाईक शिकाऱ्यांचा एक गट असतो. भांडी बनविणे व कापड विणणे हे दुय्यम धंदेही या जमातीत रूढ आहेत. जमातीत कवडीचे चलन प्रचलित आहे.
फॉन राजाने अठराव्या शतकात दाहोमीत सत्ता स्थापन केली. गुलामांचा व्यापार हे तत्कालीन राजवटीत उत्पन्नाचे मोठे साधन होते. राजसत्ता वंशपरंपरेने प्राप्त होई. राज्यकारभाराच्या सोयीसाठी राजाने मंत्रिमंडळ स्थापून त्याच्याकडे विविध खाती सोपविली होती. १८९४ च्या सुमारास फ्रेंचांनी हे राज्य जिंकले व तेथे आपली वसाहत स्थापन केली. फ्रेंच वसाहतकाळात या जमातीचे अनेक लोक आधुनिक शिक्षण घेऊन पुढे आले. त्यांच्यात ख्रिस्ती धर्माचाही मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला.
फॉन ही पितृवंशी जमात असून थोरल्या मुलाकडे वारसाहक्क जातो. त्यांच्यात मुलेमुली शक्यतो वयात आल्यानंतर विवाह करतात. वधूमूल्याची पद्धत असून ते कवड्यांच्या चलनात किंवा गोधनाच्या रूपाने देतात. सेवाविवाहही रूढ आहे. आते-मामे भावंडांतील विवाहास अग्रक्रम देण्यात येतो. शिवाय साटेलोटे विवाहही प्रचलित आहेत. बहुभार्याविवाहाची पद्धती असली, तरी त्यात मेहुणीविवाहास अधिक प्राधान्य देण्यात येते. कुटुंबातील प्रत्येक विवाहित स्त्रीस स्वतंत्र घर असून अशा सर्व स्त्रियांची घरे एकाच प्राकारयुक्त परिसरात असतात. घराजवळच पूर्वजपूजेसाठी एक दालन व धान्याचे कोठार असते.
फॉन हे जडप्राणवादी आहेत. पूर्वजपूजेस ते अधिक महत्त्व देतात. याशिवाय त्यांच्यात अनेक निसर्ग देवदेवतांचीही पूजा करतात. जमातीत मावु-लिस्सा हे जोडदैवत मानले जाते. मावु म्हणजे पृथ्वी अथवा चंद्र आणि लिस्सा म्हणजे आकाश किंवा सूर्य. ‘फा’ म्हणजे इच्छाशक्ती आणि ‘डा’ म्हणजे चैतन्य. प्रत्यक्ष विश्व आणि त्याचा निर्माता यांची परंपरा मावुमध्येच समाविष्ट असणाऱ्या ‘फा’ व ‘डा’ यांच्यामुळे चालू राहते. तसेच व्हूडू म्हणजे अनेक देव, ज्यांच्या मध्यस्थीनेच मानवाचे नैमित्तिक जीवन सुरळीत चालते.
संदर्भ : 1. Argyle, W. J. The Fon of Dahomey : a History and Ethnography of the Old Kingdom, Oxford, 1966.
2. Murdock, G. P. Africa, Its Peoples and Their Culture History, New York, 1959
कीर्तने, सुमति
“