फाँतन्वाची लढाई : (१० मे १७४५). बेल्जियममधील फाँतन्वा येथे झालेली ⇨ ऑस्ट्रियन वारसा युद्धातील (१७४०-४८) एक महत्त्वाची लढाई. ऑस्ट्रियाच्या राज्यवारसावरून झालेल्या तत्कालीन रेखाकार रणतंत्राची, पण सांकेतिक डावपेचांना डावलणारी ही वैशिष्ट्यपूर्ण लढाई होय. १७४५ साली फ्रेंच सैन्याचे नेतृत्व मॉरीस द साक्स याच्याकडे होते. त्याविरुद्ध ब्रिटिश, डच, ऑस्ट्रियन व हॅनोव्हर यांच्या संयुक्त सेनांचे नेतृत्व ब्रिटिश सेनापती ड्यूक ऑफ कंबरलंड याच्याकडे होते. संयुक्त सेना बेल्जियममधून कूच करीत होत्या. फ्रेंच सैन्याची त्यावेळची मानसिक स्थिती लक्षात घेऊन साक्सने संरक्षणाच्या दृष्टीने फाँतन्वा या गावाजवळ फ्रेंच सेनेचा रेखाकरी व्यूह रचला. उजव्या बगलेवर स्केल्ट नदी व डाव्या बगलेवर जंगल होते. संयुक्त सेनेचे उद्दिष्ट फ्रेंचांनी तूर्नेला घातलेला वेढा (१० मे १७४५) उठविणे असे असावे. संयुक्त सेनेकडे कसलीही योजना नव्हती. ब्रिटिश हॅनोव्हर पायदळ फ्रेंचांच्या तोफापर्यंत पोहोचले व तसेच परत फिरले. ही संधी साधून साक्सने प्रतिहल्‍ला केला व परिणामतः संयुक्त सेनेला पळ काढावा लागला. साक्सने संबंध फ्‍लँडर्स प्रदेशावर कबजा केला. या पराभवामुळे इंग्‍लंडवर फ्रेंचांचे आक्रमण होण्याची भीती निर्माण झाली होती. या युद्धाचे पडसाद तत्कालीन हिंदुस्थानातील इंग्‍लिश फ्रेंच कंपन्यातील संघर्षावरही उमटले [→ ईस्ट इंडिया कंपन्या].

दीक्षित, हे. वि.