फ्यूरर-हायमेनडॉर्फ, क्रिस्टोफ फोन : (२७ जुलै १९०९ – ). भारतीय आदिवासी जमातींचा विशेष अभ्यास करणारा ऑस्ट्रियन मानवशास्‍त्रज्ञ. ऑस्ट्रियात व्हिएन्ना येथे जन्म. वडील रूडोल्फ फ्यूरर-हायमेनडॉर्फ हे ऑस्ट्रियन साम्राज्यात नागरी अधिकारी होते. व्हिएन्नामधील थेरेशियनिट्शे अकादमीत शिक्षण घेऊन क्रिस्टोफने व्हिएन्ना विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी मिळविली व व्हिएन्ना विद्यापीठातच साहाय्यक व्याख्याता म्हणून नोकरीस प्रारंभ केला (१९३१-३४). पुढे रॉकफेलर प्रतिष्ठानची शिष्यवृत्ती त्याला मिळाली (१९३५-३७). त्यानंतर तो व्याख्याता झाला (१९३८). त्याच साली एलिझाबेथ बार्नार्डो या युवतीशी त्याचा विवाह झाला (१९३८). त्यानंतर भारतात हैदराबाद संस्थान आणि ओरिसा येथील जमातीच्या क्षेत्र संशोधनात्मक पहाणीला त्याने सुरूवात केली (१९३९-४३). पुढे जवळजवळ १५ वर्षांचा काळ भारतातील जमातींची पहाणी करण्यातच त्याने घालविला. या काळात भारत सरकारच्या परराष्ट्रीय खात्यात खास अधिकारी म्हणून सुबनसिरी येथे काम करण्याची संधी त्यास मिळाली (१९४४-४५). त्या वेळी त्याने दक्षिण, मध्य व ईशान्य भारत, तसेच नेपाळ या प्रदेशांतील गोंड, नागा, शेरपा, अपातानी इ. जमातींची संशोधनात्मक पहाणी केली. या संशोधनकार्यात त्याची पत्नी एलिझाबेथ ऊर्फ बेटी हिची मदत त्याला लाभली. जमातींमधील आजारी व्यक्तींना औषधोपचार करण्याचे कार्यही ती करीत असे.

त्याने हैदराबाद उस्मानिया विद्यापीठात प्राध्यापकाचे काम केले (१९४५-५०). या काळात निजाम सरकारचा ‘आदिवासी व मागासवर्गीय जाती या विषयांचा सल्लागार’ म्हणूनही त्याने काम केले. आंध्र प्रदेशातील अदिलाबादच्या ‘गोंड’ जमातीच्या पुनर्वसनाचे आणि कल्याणकारी योजनांचे हायमेनडॉर्फ याने केलेले कार्य वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. या संदर्भातील द राज गोंड्‌ज ऑफ अदिलाबाद (१९४८) हा ग्रंथ फारच बोलका आहे. त्यामुळे क्षेत्र संशोधक म्हणून त्याला जागतिक ख्याती प्राप्त झाली. त्याच्या क्षेत्र संशोधनाबद्दल ‘रिव्हर्स स्मृतिपदक’ त्यास देण्यात आले (१९४९).

लंडन विद्यापीठाने त्याची भारतातील जमातींचा खास अभ्यास करण्यासाठी मानवशास्‍त्र विभागात प्रपाठक म्हणून नियुक्ती केली (१९४९-५१). पुढे आशियाई मानवशास्‍त्राचा प्राध्यापक म्हणून तेथील ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’ (लंडन विद्यापीठ) या स्वतंत्र संस्थेत त्याची नियुक्ती करण्यात आली (१९५१-७६). त्या संस्थेचा तो अधिष्ठाता (१९६८-७६) आणि कार्यकारी संचालकही होता (१९७३-७५). या पदावरून १९७६ साली निवृत्त झाल्यावरही गुणश्री प्राध्यापक म्हणून तो तेथेच काम करीत आहे. १९५१ ते १९७६ या काळात भारतीय जमातींच्या संशोधनात्मक अभ्यासासाठी त्याला स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, सोशल सायन्स रिसर्च कौन्सिल ऑफ ग्रेट ब्रिटन, वेन्नर ग्रेन फाउंडेशन फॉर अँथ्रपॉलॉजिकल रिसर्च इ. संस्थांकडून अनुदान मिळत असे. त्यामुळे भारत, फिलिपीन्स, नेपाळ इ. देशांतील जमातींचा तिथे जाऊन प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी त्यास मिळाली.

‘नागा’ संस्कृतीचे मूळ स्वरूप आणि तीत झालेल्या परिवर्तनाचे यथार्थ विवेचन नेकेड नागाज (१९३९), रिटर्न टू द नेकेड नागाज (१९७६) व कोन्थॅक नागाज (१९६८) इ. ग्रंथांत त्याने केले आहे. ते ग्रंथ अत्यंत मौलिक आहेत. पूर्व हिमालयातील ‘अपातानी’ या जमातीची प्रत्यक्ष संशोधनात्मक पहाणी करून त्यातील गुलामगिरी पद्धतीवर द अपातानीज अँड देअर नेबर्स (१९६२) हा ग्रंथ लिहिणारा पहिलाच मानवशास्‍त्रज्ञ म्हणून हायमेनडॉर्फचा उल्लेख केला जातो. स्वतः हायमेनडॉर्फ आणि त्याचा मोठा शिष्यवर्ग यांनी मिळून नेपाळमध्ये संशोधन करून हिमालयन बार्बरी (१९५५), कास्ट अँड किन इन नेपाळ, इंडिया अँड सीलोन (१९६६), द शेरपाज ऑफ नेपाळ (१९६४), हिमालयन ट्रेडर्स (१९७५) आणि हिमालयन ट्राइब (१९८०) इ. ग्रंथ प्रसिद्ध केले. यांपैकी काही ग्रंथांचे त्याने संपादन व सहलेखन केले आहे.

दक्षिण भारत व अरूणाचल प्रदेश यांतील आदिवासी जमातींमध्ये घडून येणाऱ्या परिवर्तनांचा अभ्यास करण्यासाठी एक प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याचे काम हायमेनडॉर्फ याने स्वीकारले आहे व त्या कार्यातच तो सध्या मग्‍न आहे. त्याचे स्फुटलेखन मानवशास्‍त्रीय विविध संस्थांच्या तसेच मॅन, अँथ्रॉपॉस, मॅन इन इंडिया, जिऑग्राफिकल जर्नल इ. नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय त्याने लिहिलेले काही महत्त्वपूर्ण ग्रंथ पुढीलप्रमाणे : द चेंचूज : जंगल फोक ऑफ द डेक्‍क (१९४३), द रेड्‍डीज ऑफ बायसनहिल्स (१९४५), मॉरल्स अँड मेरिट (१९६७), द गोंड्ज ऑफ आंध्र प्रदेश (१९७९) इत्यादी.

फ्यूरर्-हायमेनडॉर्फला अनेक मानसन्मान मिळाले : लेहिओ डी मेक्सिको येथे अभ्यागत प्राध्यापक (१९६४) रॉयल अँथ्रपॉलॉजिकल इ‌न्स्टिट्यूटचा अध्यक्ष (१९७५) ऑस्ट्रियन ॲकॅडेमी ऑफ सायन्स व अँथ्रपॉलॉजिकल सोसायटी ऑफ व्हिएन्ना यांचा अनुक्रमे १९६४ व १९७० यांत सभासद तसेच शरच्चंद्र रॉय सुवर्णपदक, सर पर्सी साइक्स स्मृतिपदक राजे वीरेंद्र पारितोषिक इत्यादी.

कीर्तने, सुमति