फ्योरेल्ली, जूझेप्पे : (८जून १८२३ – २८जानेवारी १८९६). इटलीत पाँपेई या ऐतिहासिक नगरीचे उत्खनन करणारा इटालियन पुरातत्त्वज्ञ. त्याचा जन्म नेपल्समध्ये झाला मात्र त्याच्या पूर्वजीवनाबद्दल विश्वस‌नीय माहिती उपलब्ध नाही. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात पुरातत्त्वीय संशोधन वासमन्वेषण फारसे शास्‍त्रशुद्धनव्हते. केवळ खड्डे खोदून त्यांत सापडलेल्या कलात्मक वस्तूंची नोंद करणे, एवढ्यापुरतेच तत्कालीन संशोधन मर्यादित होते. ⇨ पाँपेई व ⇨ र्क्यूलॅनिअम यांसारख्या महत्त्वाच्याप्राचीन नगरींचे उत्खननही नियोजनपूर्वक केले जात नव्हते. १८६१साली फ्योरेल्लीने पुरावशेषांचे अधीक्षक या नात्याने स्तरनिबद्धउत्खननतंत्राचा अवलंब पाँपेईच्या उत्खननात प्रथम केला. या पद्धतीनुसार प्रत्येक थरातील पुरावा वेगवेगळा ठेवला जातो व त्यावरून संबंधित स्थळाचा सांस्कृतिक विकास कसा झाला, हे समजण्यास मदत होते. प्रत्येक पुरावशेषाची आहे त्या स्तरीय संदर्भात अचूक नोंद करून मगच तो तेथून हलविण्याची पद्धत फ्योरेल्लीने सुरू केली. या शिवाय आणखीही एक वैशिष्ट्य त्याच्या संशोधनपद्धतीत दिसून येते. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या ज्या राखेखाली दबून माणसे मृत्युमुखी पडली, त्या राखेच्या कवच्यांचा साच्यासारखाउपयोग करून फ्योरेल्ली याने त्यापासून हुबेहूब प्लॅस्टरच्या प्रतिकृती तयार केल्या. त्यामुळे स्तरनिबद्धअचूक नोंदणी व प्लॅस्टरच्या प्रतिकृतींच्या आधारे अवशेषांचे जतन या दोन बाबी त्याच्या संशोधनाचे वैशिष्ट्य ठरल्या. [⟶पुरातत्त्वीय उत्खनने].

त्याचे जीवन काहीसे अस्थिर होते. इटलीमध्ये १८४८साली झालेल्या क्रांतीमध्ये त्याला तुरुंगात डांबण्यात आले आणि तुरूंगातच त्याने पाँपेईचे वर्णन लिहिण्यास सुरूवात केली. सुटका झाल्यावर काही काळ त्याने बेकारीत घालविला परंतु त्यानंतर त्याचे नशीब उघडले आणि १८६०साली त्याचीनेपल्स विद्यापीठात पुरातत्त्वविद्येचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. एका वर्षानंतर तो पाँपेई उत्खननाचाप्रमुख संचालक झाला. पाँपेई येथेच संग्रहालय स्थापण्याचे महत्त्वाचे कामही त्याने पार पाडले.

त्याचे स्फुटलेखन विपुल असले, तरी १८६०ते १८६४या काळात लिहिलेला पाँपेईचापाँपेअनॅरम अँतीक्वितॅम हिस्तोरिया व १८७५साली लिहिलेला दीस्क्रिझी ऑन द पाँपेई हे दोन ग्रंथ विद्यमान्यठरलेले आहेत. त्याचे विद्वत्तापूर्ण लेखन व संशोधन यांमुळे त्याला १८६३साली नेपल्सच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे संचालक नेमण्यात आले व नंतर १८७५ मध्ये ‘इटालियन पुरावशेषव ललितकला’ या संस्थेचे महानिदेशक हे पद देण्यात आले. या पदावर असतानाच नेपल्स येथे निधन झाले.

संदर्भ : 1. Brion, Marcel, Pompeil and Herculaneum, London, 1962,

            2. Ceram, C.W.A Picture Historyof Archaeology, London, 1958.

देव,शां.भा. देशपांडे.सु.र.