फ्युझेल तेल: किण्वनाने (आंबविण्याच्या क्रियेने) अल्कोहॉल बनविण्याच्या प्रक्रियेतून उपपदार्थ म्हणून मिळणारे, ॲमिल व ब्युटिल अल्कोहॉले [⟶ अल्कोहॉल] हे मुख्य घटक असलेले मिश्रण.

मका, राय, साखर कारखान्यातील मोलॅसिस (ऊसाच्या रसातील ज्या भागापासून साध्या प्रक्रियांनी साखरेचे स्फटिक मिळविता येत नाहीत असा भाग), बटाटे इत्यादींचे किण्वन करून अल्कोहॉल किंवा मद्य बनविण्याच्या प्रक्रियांत हे तयार होते. किण्वनासाठी वापरलेला कच्चा माल, किण्वन परिस्थिती आणि परिशोधन क्रिया यांना अनुसरून त्याचे प्रमाण तसेच त्यातील घटकांची प्रमाणे बदलतात. (कोष्टक पहा). सामान्यतः ४,५०० लिटर अल्कोहॉलाबरोबर सु. ४ ते २२ लिटर फ्युझेल तेल बनते.

शुद्ध कार्बोहायड्रेटांचे किण्वन केले, तर फ्युझेल तेल बनत नाही. किण्वनासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमात प्रथिने असली म्हणजे त्यांपासून ⇨ ॲमिनो म्‍ल तयार होऊन त्यांपासून फ्युझेल तेलातील अल्कोहॉले बनत असावी. यीस्टच्या (बुरशीसारख्या एक प्रकारच्या हरिद्रव्यरहित वनस्पतीच्या) पेशींच्या आत्मविलयनाने (पेशींमध्येच तयार झालेल्या एंझाइमांमुळे-जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांमुळे-पेशींच्या आपोआप होणाऱ्या विघटनाने) तयार होणारा पदार्थ व यूरिया यांसारखी नायट्रोजनयुक्त कार्बनी संयुगे किण्वन माध्यमात घातल्यास, तसेच माध्यम क्षारीय (अम्‍लाशी विक्रिया झाल्यास लवण तयार होण्याचा गुणधर्म असलेले) असल्यास तेलाचे प्रमाण वाढते परंतु खनिज नायट्रोजन संयुगांनी ते कमी होते. अम्‍ले व हॉप्स (बिअरच्या निर्मितीत वापरण्यात येणारे ह्युम्युलस ल्युप्युलस या वनस्पतीच्या स्‍त्री फुलातील वाळलेले पक्व शंकू) किंवा टार्टार यांनीही त्याच्या निर्मितीस अवरोध होतो.

किण्वनानंतर अल्कोहॉल मिळविण्यासाठी ऊर्ध्वपातन क्रिया (उकळून व तयार झालेली वाफ थंड करून द्रव मिश्रणातील घटक अलग करण्याची क्रिया) सुरू करीपर्यंत फ्युझेल तेलाची निर्मिती चालू राहते. ऊर्ध्वपातन करतात तेव्हा फ्युझेल तेल वेगळे होते. ते मिठाच्या संतृप्त (मिठाचे कमाल प्रमाण असलेल्या) विद्रावात मिसळून ढवळतात. एथिल अल्कोहॉल विद्रावात जाते व अशुद्ध फ्युझेल तेल जमा होते.

फ्युझेल तेल हे एक स्वच्छ, पिवळट रंगाचा तेलकट द्रव असून त्याला विशिष्ट व ठसका आणणारा दुर्गंध आणि शिसारी येईल अशी वाईट चव असते. वि. गु. ०·८३ – ०·८५. ते थंड पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे) आहे पण पाण्याचे तापमान वाढविल्यास विरघळते. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बने [⟶ ॲरोमॅटिक संयुगे ] व तेले यांतही ते विरघळते. जळताना त्याची ज्योत तेजस्वी असते.

फ्युझेल तेलामध्ये मुख्यत्वे प्रकाशतः अक्रिय (त्यामधून जाणाऱ्या प्रतलीय ध्रुवित प्रकाशाचे-एकाच प्रतलात कंपने होणाऱ्या प्रकाशाचे-प्रतल वळविण्याच्या बाबतीत क्रियाशील नसलेले) ॲमिल अल्कोहॉल (आयसोब्युटिल कार्बिनॉल) व वामावर्ती (प्रतलीय ध्रुवित प्रकाशाचे प्रतल घड्याळाच्या काट्यांच्या गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेला वळविणारे) ॲमिल अल्कोहॉल (द्वितीयक ब्युटिल कार्बिनॉल) ही अल्कोहॉले असतात. त्याशिवाय n-प्रोपिल व आयसोप्रोपिल अल्कोहॉल व n-ब्युटिल व आयसोब्युटिल अल्कोहॉले थोड्या प्रमाणात आणि प्राथमिक हेक्झिल व प्राथमिक हेप्टिल अल्कोहॉलेही अत्यल्प प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे पुढील कार्‌बॉक्सिलिक अम्‍लेही त्यात आढळतात : फॉर्मिक, ॲसिटिक, प्रोपिऑनिक, ब्यूटिरिक, व्हॅलेरिक [ ⟶ कार्‌बॉक्सिलिक अम्‍ले], कॅप्रॉइक (C6), हेप्टॉइक (C7), कॅप्रिलिक (C8) पेलार्‌गॉनिक (C9) आणि कॅप्रिक (C10). एथिल ॲसिटेटादि ⇨ एस्टरे आणि ‌काही ⇨ आल्डिहाइडेही त्यात असतात.

किण्वन क्रियोसाठी वापरलेल्या पदार्थानुसार फ्युझेल तेहातील घटकांचे प्रमाण (%).

घटक

किण्वन क्रियेसाठी वापरलेले पदार्थ

मका

मोलॅसिस

बटाटे

राय

आयसोप्रोपिल अल्कोहॉल

०.६

n-प्रोपिल ”

२०·४- ११·७

२४·३

६·८५

आयसोब्युटिल ”

२३·९ – १२·२

७·४

२४·३५

१५·७

n-ब्युटिल ”

८·१

क्रियाशील ॲमिल ”

१४·६ – २३·४

} ५५·३

६८·७६

७९·८

आयसो ॲमिल ”

३६·३ – ५९·७

n-ॲमिल ”

४·३

अनिर्धारित भाग ”

४·८ – ३·००

०·०४

६·५

फ्युझेल तेलाचे ऊर्ध्वपातन केले असता १०५ – १२० से. तापमानमर्यादेत मिळणाऱ्या खंडात प्रामुख्याने आयसोब्युटिल अल्कोहॉल व १२५° – १३०° से. या खंडात ॲमिल अल्कोहॉल आढळते.

उपयोग : ब्युटिल व ॲमिल अल्कोहॉले यापासून मिळवितात. आईसक्रीम, सरबते, थंड पेये (कोल्ड्रिंक्स) यांमध्ये वापरली जाणारी कित्येक स्वादद्रव्ये या अल्कोहॉलाची एस्टरे आहेत. रेझिने, तेले आणि वसा (स्‍निग्ध पदार्थ) फ्युझेल तेलात विरघळतात व त्यामुळे फर्निचर व कातड्याचे सामान यांसाठीच्या पॉलिशे, व्हार्निशे, लॅकर्स, एनॅमले इत्यादींमध्ये ते वापरले जाते. त्याचप्रमाणे जलाभेद्य तक्ते बनविण्यासाठी क्लोरीनशोषक म्हणून, अल्कलॉइडांचे शुद्धीकरण व अभिज्ञान करण्यासाठी (अस्तित्व ओळखण्यासाठी), काही औषधांच्या निर्मितीत मध्यस्थ पदार्थ (अंतिम पदार्थ तयार होण्याच्या आधीच्या टप्प्यातील पदार्थ) म्हणून, स्फोटक द्रव्यांच्या निर्मितीत जिलेटिनीकारक (नायट्रोसेल्युलोजावर प्रक्रिया करून त्याला आकार देता येण्याकरिता ते मृदू करण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ) आणि अनावश्यक फेस नाहीसा करण्यासाठी फेसनाशक म्हणूनही याचा उपयोग होतो.

भारतीय उद्योग : भारतातील अल्कोहॉल तयार करणाऱ्या सु. ४० कारखान्यांपैकी १०–१२ कारखानेच १९५७ च्या सुमारास फ्युझेल तेल वेगळे करीत होते. सरदारनगर (जि. गोरखपूर) येथील सराया डिस्टिलरी, शाकरनगर (हैदराबाद) येथील शासकीय अल्कोहॉल कारखाना, नाशिक रोड येथील सेंट्रल डिस्टिलरी तसेच मीरत, शामली, रोझा, नवाबगंज इ. ठिकाणी फ्युझेल तेलाचे उत्पादन करण्यात येत होते. तेलाला भारतात मागणी कमी आहे. वार्षिक उत्पादन सु. ४५,००० लिटर असावे, असा अंदाज आहे.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part IV, New Delhi, 1957.

मिठारी, भू. चिं.