फार्कर, जॉर्ज : (? १६७८-२९ एप्रिल १७०७). इंग्रज नाटककार. जन्म लंडन डेअरी (काउंटी डेअरी) येथे एका धर्मोपदेशकाच्या कुटुंबात. डब्लिन येथील ट्रिनिटी कॉलेजात त्याने प्रवेश घेतला परंतु विद्याभ्यासापेक्षा नाट्यक्षेत्राकडे त्याचा ओढा असल्यामुळे डब्लिनमधल्याच एका नाटकामंडळीत त्याने शिरकाव करून घेतला मात्र नट म्हणून तो यशस्वी होऊ शकला नाही त्यामुळे नाट्यलेखनाकडे वळला. विनोदी नाटककार म्हणून लवकरच त्याचा लौकीक झाला. लव्ह अँड अ बॉट्ल ही त्याची पहिली नाट्यकृती १६९९ मध्ये रंगभूमीवर आली. त्याच्या अन्य नाट्यकृतींत द कॉन्स्टंट कपल ऑर अ ट्रिप टू द ज्यूबिली (१६९९), सर हॅरी वाइल्डेअर (१७०१), द इन्कॉन्स्टंट आणि द ट्विन राय्व्हल्स (दोन्ही १७०२), द स्टेज कोच ( १७०४), द रिक्रूटिंग ऑफिसर (१७०६) आणि द बोझ स्ट्रॅटगम (१७०७) ह्यांचा समावेश होतो.
सहृदयता, नैतिकतेचा जाणीव, उपरोधप्रचुर विनोद आणि नाट्यविषयाच्या हाताळणीत आढळून येणारा एक प्रकारचा जोमदारपणा ही फार्करच्या नाट्यकृतींची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. रेस्टोरेशन कालखंडातील हा अखेरचा सुखात्मिकाकार. तत्कालीन सुखात्मिकेच्या आदर्शापासून तो काहीसा दूर गेलेला दिसतो. तत्कालीन सुखात्मिकेने नैतिकतेची बंधने झुगारून दिली होती अश्लीलता व ग्राम्यता ह्यांचा उच्चांक गाठला होता. फार्कर मात्र बराच सोज्वळ असून नीतिमूल्यांची त्याने बूज राखलेली दिसते. एलिझाबेथकालीन सुखात्मिकांत प्रत्ययास येणारा प्रसन्न विनोद आणि विलोभणीय जीवनासक्ती त्याच्या नाट्यकृतींत दिसते म्हणूनच दंभ, मूर्खपणा विकारवशता ह्या समाजातील दोषांचा उपरोध करीत असतानाही मिस्कील मनोवृत्तीने तो त्यांचा आस्वाद घेत असल्याची प्रचीती येते. द रिक्रूटिंग ऑफिसर आणि द बोझ स्ट्रॅटगमसारख्या त्याच्या सुखात्मिका आजही लोकप्रिय आहेत. लंडन येथे तो निधन पावला.
भागवत, अ. के.
“