फैजाबाद – १ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील फैजाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व इतिहासप्रसिद्ध शहर . लोकसंख्या कॅंटोनमेंटसह १,०९,८०६ ( १९७१ ). हे लखनौच्या पूर्वेस १२५ किमी . घागरा नदीकाठी वसले आहे . रस्ते व लोहमार्ग यांनी ते इतर शहरांशी जोडले आहे . पूर्वी फैजाबाद जंगलव्याप्त होते . या ठिकाणी सादतअली खा न या अयोध्येच्या पहिल्या नबाबाने शिकारीचे ठाणे केले . त्यांच्यानंतरचा नबाब सफदरजंग ऊर्फ अबुल – मन्सूर खान याने फैजाबादची स्थापना केली आणि तेथे आपले लष्करी ठाणे उभारले . यानंतरचा नबाब शुजाउद्दौला याचा इंग्रजांनी बक्सारच्या लढाईत (१७६४) पराभव केल्याने तो फैजाबादला आला . तेव्हापासून अयोध्येच्या नबाबाची राजधानी येथेच केली गेली . शुजाउद्दौलाने येथे किल्ला बांधला . त्याच्या कारकीर्दीत या शहराचे महत्त्व वाढले . त्याच्या निधनानंतर मात्र असफउद्दौलाने येथून राजधानी हलवून ती लखनौस नेली . शुजाउद्दौलाची प त्नी ( बहू बेगम ) मात्र येथेच राहत होती . येथील बेगमांचा खजिना हस्तगत करण्यासाठी वॉरन हेस्टिंग्जने असफउद्दौलास सैनिकी मदत पुरविली . वॉरन हेस्टिंग्जची ही कृती पुढे ब्रिटिश संसदेत भ्रष्टाचार प्रकरण म्हणून खूपच गाजली . परिणामतः त्यावेळी फैजाबादला खूपच प्रसिद्धी मिळाली . येथे साखरनिर्मिती , तेलगिरण्या , तंबाखूचे पदार्थ , कातडी वस्तुनिर्मिती इ . उद्योगांचा विकास झाला आहे . आसमंतातील शेतमालाची फैजाबाद ही एक मोठी बाजारपेठ आहे . येथे अवध विद्यापीठ ( १९७५ ) व नरेंद्र देव कृषी आणि तंत्रविद्या विद्यापीठ ( स्था . १९७४) इ . उच्च शैक्षणिक संस्था आहेत . येथील गुप्तचर उद्यानात एक मंदिर असून तेथूनच राम अदृश्य झाले असे म्हणतात . येथे अनेक उत्सव साजरे केले जात असून त्यांत जन्माष्टमी व रामलीला हे प्रमुख आहेत . येथील ब हू बेगमची कबर व शुजाउद्दौलाची गुलाब बारी ही कबर प्रेक्षणीय आहे .
गाडे , ना . स .
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..