फोर्ड प्रतिष्ठान : प्रख्यात अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड व त्याचा मुलगा एडझेल या दोघा पितापुत्रांनी १९३६ मध्ये स्थापन केलेले जनकल्याणकारी खाजगी प्रतिष्ठान. वैज्ञानिक, शैक्षणिक कार्य तसेच धर्मादाय हा या प्रतिष्ठानामागील हेतू होता. प्रारंभी त्याचे कार्यक्षेत्र मिशिगन राज्यापुरतेच सीमित होते. तथापि १९५० मध्ये त्याचे कार्यक्षेत्र वाढविण्यात आले आणि त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्यांवर आपले लक्ष एकवटले. फोर्ड प्रतिष्ठान हे वैश्विक शांतता, लोकशाही शासन, आर्थिक कल्याण, शिक्षण आणि मानवाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास अशा पाच प्रमुख कार्यक्षेत्रांवर भर देते. स्थापनेपासून १९७४ पर्यंत प्रतिष्ठानाने विविध जनकल्याणकारी योजना व इतर अनेक लोकोपयोगी कार्ये यांसाठी सु. ४२० कोटी खर्च केले.
फोर्ड प्रतिष्ठानाचे प्रधान कार्यालय न्यूयॉर्क येथे असून त्याच्या विश्वस्त मंडळात अठरा सदस्य आहेत. धोरणविषयक गोष्टी हे मंडळच ठरविते. प्रतिष्ठानाचे अधिकारी अनुदानयोग्य व्यक्ती व संस्था यांची शिफारस करतात व त्यांना अनुदान देण्यात येते. तथापि आपल्या प्रकल्पांच्या कार्यवाहीसाठी प्रतिष्ठानाने विशेष प्रकारच्या संस्था व संघटना निर्माण केल्या आहेत. फोर्ड प्रतिष्ठान हे जगातील सर्वांत मोठे खाजगी प्रतिष्ठान असून त्याची मत्ता सु. २२९·१४८ कोटी डॉ. (१९७८) होती.
प्रतिष्ठानाचे सहा कार्यविभाग असून प्रशिक्षित व व्यवसायिक तज्ञ त्यांची जबाबदारी सांभाळतात : (१) आंतरराष्ट्रीय विभाग हा विकसनशील राष्ट्रांमधील कुशल मनुष्यबळाला तसेच तेथील स्थानिक संस्थांना धान्योत्पादन, कुटुंबनियोजन, ग्रामीण विकास, आर्थिक संशोधन, विज्ञान व तंत्रविद्या यांमधील समस्यांचे निरसन करण्याच्या कामी साहाय्य करतो. (२) राष्ट्रीय घडामोडी विभाग कमी-उत्पन्न गटाच्या लोकांना अर्थसहाय्य करतो. (३) फोर्ड प्रतिष्ठानाने शिक्षणाच्या विकासावर फार मोठा भर दिला आहे. सु. ७५ टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली जाते. त्याचा शिक्षण व संशोधन विभाग हा समान संधी, शैक्षणिक अर्थप्रबंध व व्यवस्थापन शिक्षणपद्धतीमध्ये सुधारणा इ. गोष्टींमध्ये लक्ष घालतो. कार्नेगी कॉर्पोरेशनच्या सहाय्याने या प्रतिष्ठानाने ‘राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती संघटना’ स्थापन केली असून ‘वूड्रो विल्सन अधिछात्रवृत्ती कार्यक्रमा’चा विस्तार केला आहे. (४) मानव्यविद्या व कला या विभागाने स्थानिक व्यावसायिक रंगभूमी, संगीतिका (ऑपेरा), बॅले व वाद्यवृंद यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. कलावंत व नवोदित गुणी युवकांना या विभागातर्फे प्रशिक्षण देण्याचीही सोय करण्यात येते. (५) संदेशवहन विभागाने संदेशवहन धोरण, माध्यमांचा प्रभाव आणि वृत्तपत्रविद्या यांच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. (६) साधनसंपत्ती व पर्यावरण विभागातर्फे पर्यावरण व्यवस्थापन आणि साधनसंपत्तीचे विश्लेषण यांवर अधिक संशोधन केले जाते. आता सार्वजनिक धोरणासंबंधीही संशोधनकार्य हाती घेण्यात आले आहे.
प्रतिष्ठानाने १९६० पासून पुढील गोष्टींना अधिक प्रमाणात आर्थिक साहाय्य केले आहे : निग्रोंच्या शाळा व महाविद्यालये अल्पसंख्याक व गरीब स्वरमेळ वाद्यवृंद नागरी समस्याविषयक संशोधन महाविद्यालये व विद्यापीठे यांच्या व्यवस्थापनात सुधारणा लोकसंख्या वृद्धीबाबत संशोधन पर्यावरण व व्यवस्थापनतंत्राचा विकास इत्यादी.
प्रतिष्ठानाच्या उदार देणग्यांचा लाभ झालेल्यांत मोठी अमेरिकन विद्यापीठे, स्वरमेळ वाद्यवृंद, ब्रुकिंग्ज संस्था, ‘नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च’ ‘अमेरिकन कौन्सिल ऑफ लर्नेड सोसायटीज’ ‘सोशल सायन्स रिसर्च कौन्सिल,’ ‘नॅशनल एज्युकेशनल टेलेव्हिजन अँड रेडिओ सेंटर’ इत्यादींचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठानाने आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यांमधील राष्ट्रांना विकाससाहाय्य मोठ्या प्रमाणावर दिले आहे.
याशिवाय प्रतिष्ठानाने विशिष्ट हेतूंनी स्वतंत्र संस्था उभारल्या आहेत. ‘द फंड फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशन’ ही संस्था अमेरिकेतील उच्च शिक्षणाच्या विकासार्थ झटत असते. ‘रिसोर्सेस फॉर द फ्यूचर, इन्कॉर्पोरेटेड’ ही संस्था जल, शक्तिसाधने, खनिज संपत्ती यांचा वापर आणि तो करीत असताना निर्माण होणाऱ्या समस्या यांचे निरसन करण्यात गुंतलेली आहे. ‘द सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी इन द बिहेव्हिअरिल सायन्सेस’ ही प्रसिद्ध संशोधन संस्था म्हणून मान्यता पावली आहे.
पहा : प्रतिष्ठान.
गद्रे, वि. रा.