फैयाझखाँ : (८ फेब्रुवारी १८८१–५ नोव्हेंबर १९५०). हिंदुस्थानी संगीतातील एक प्रतिभाशाली गायक. त्यांचा जन्म आग्र्यानजीक सिकंदरा येथे झाला. त्यांच्या माता-पित्यांच्या दोन्ही घराण्यांकडून पिढीजाद गायकीचा समृद्ध वारसा त्यांना लाभला होता. सबदर हुसेनखाँ हे त्यांचे वडील. फैयाझखाँ आपल्या वडिलांकडून रमझानखाँ ऊर्फ ‘रंगीले’ या गवयाचे पणतू व आईकडून आग्रा घराण्याचे गग्गे खुदाबक्ष यांचेही फैयाझखाँपणतूच लागत. त्यांचे मातुल घराण्यातील आजोबा उस्ताद गुलाम अब्बासखाँ हे त्यांचे गुरू. त्याखेरीज अनेक गायकांना ऐकून व त्यावर मनन करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र गायकी घडवली. ग्वाल्हेर गायकीतील क्रमबद्ध रंजक राग-बढत व आग्रा घराण्यातील लयकारीने प्रभावित झालेली तनायत व बोल-अंग यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या गायकीत आढळतो. घराण्याच्या तालमीबरोबर आपला नैसर्गिक ढाला सूर न सोडता स्वतःच्या आवाज-धर्मानुसार त्यांनी रियाज केल्याने तो घन-गंभीर, भरदार व जव्हारीदार बनला. अप्रतिम ‘नोम्‌तोम्‌’ ने प्रारंभ करून ते राग-स्वरूप सुंदर रीतीने उभे करीत. प्रायः ख्यालिये, पण त्यांच्‍या गायकीवर धृपद-धमारचा खूपच असर होता. होरी- धृपद ते ठुमरी-गझलपर्यंत सर्व प्रकारचे गाणे सारख्याच प्रभुत्वाने व भावपूर्णतेने ते गात असल्याने त्यांना ‘चतुरंग गवई’ असे म्हणत. ‘प्रेमपिया’ या टोपणनावाने त्यांनी अनेक सुंदर चिजा बांधल्या. त्यांतून त्यांच्या कवित्वशक्तीचा प्रत्यय येतो. १९०६ मध्ये म्हैसूरच्या महाराजांकडून त्यांना सुवर्णपदक मिळाले. त्याखेरीज ठिकठिकाणी त्यांना पदके व पारितोषिके मिळाली. ‘आफताब-ए-मूसीकी’ (संगीत-भास्कर) हा किताब म्हैसूर सरकारने त्यांना दिला होता. १९१२ पासून तहहयात ते बडोदे संस्थानचे दरबार-गवई होते. तेथेच क्षयाच्या आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्वतंत्रप्रज्ञ गायकीचा वारसा जतन करून ठेवणाऱ्या त्यांच्या मोठ्या शिष्यपरंपरेत आता हुसेनखाँ, बशीर महंमदखाँ, स्वामी वल्लभदास, अझमत हुसेनखाँ, लखनौ येथील मॉरिस कॉलेजचे प्राचार्य रातंजनकर, शराफत हुसेनखाँ, मलकाजान, खादिम हुसेनखाँ इ. नामवंत गायकांचा समावेश होतो.

जठार, प्रभाकर