फेरांटी, सेबॅश्चन झ्यानी दे : (९ एप्रिल १८६४–? १९३०). इंग्लिश विद्युत् अभियंते. उच्च दाबाच्या विद्युत्‌ प्रवाहाची निर्मिती व त्याचे वितरण यांसंबंधीच्या महत्त्वाच्या कार्याकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म लिव्हरपूल येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना विजेची यंत्रे व उपकरणे यांविषयी गोडी होती. ते अठरा वर्षांचे होण्यापूर्वीच त्यांनी एक नवीन प्रकारचे विद्युत् जनित्र (यांत्रिक ऊर्जेचे विद्युत्‌ ऊर्जेत रूपांतर करणारे साधन) तयार केले व त्याचे एकस्व (पेटंट) मिळविले. फेरांटी यांनी विद्युत्‌ निर्मितीकरिता इंधन ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करण्याची वायू टरबाइनाची (इंधन जाळून तयार होणाऱ्या उष्ण वायूने फिरणाऱ्या चक्री एंजिनाची) कार्यक्षमता वाढविण्यासाठी अनेक वर्षे सतत प्रयत्‍न केले.

फेरांटी यांनी तयार केलेल्या विद्युत् जनित्राचे व त्यांनी शोधून काढलेल्या इतर साधनांचे व यंत्रांचे उत्पादन करण्यासाठी एक कंपनी १८८३ च्या सुमारास स्थापन करण्यात आली. त्यांनी मध्य लंडन भागात कित्येक चौरस किमी. क्षेत्रात २,३०० व्होल्ट दाबाच्या विद्युत्‌ शक्तीचे वितरण करण्याची व्यवस्था अंमलात आणली. १८९१ मध्ये त्यांनी लंडन इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशनकरिता डेटफर्ड येथील ४०,००० अश्वशक्तीच्या विद्युत् उत्पादन केंद्राचे अभिकल्पन (आराखडा) करून त्याची उभारणी केली. या केंद्रापासून उपकेंद्रांना १०,००० व्होल्ट दाबाच्या विद्युत् शक्तीचे वितरण करण्याची व्यवस्था करण्यात आली. इतक्या उच्च दाबाच्या विद्युत् शक्तीचा उपयोग करणे व ती दूर अंतरावर पाठविणे हे त्या काळात अपरिचित असल्याने फेरांटी यांनीच या कामाकरिता सर्व साधनसामग्री व यंत्रे अभिकल्पित करून बनविली. त्यांना कित्येक महत्त्वाच्या विद्युत् शोधांबद्दल आणि इतर कोणत्याही शास्‍त्रज्ञांपेक्षा आधुनिक विद्युत् पुरवठा पद्धतीसंबंधीचे श्रेय दिले जाते. त्यांनी विद्युत् जनित्रासह आपल्या शोधाबद्दल एकूण १७६ एकस्वे मिळविली.

लंडनच्या रॉयल सोसायटीने १९२७ मध्ये त्यांची सदस्य म्हणून निवड केली. १९१० मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनियर्स या संस्थेच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी काबाडकष्य नाहीसे करण्यासाठी विजेच्या उपयोगाचा अधिकाधिक प्रसार करण्याचे आवाहन केले होते.

कानिटकर, बा. मो.