फेबिअन समाजवाद : इंग्लंडमध्ये सनदशीर व वैध मार्गांनी समाजवादाची स्थापना करणे, हा उद्देश प्रसृत करणारी एक विचारसरणी. ४ जानेवारी १८८४ रोजी फेबिअन सोसायटीची स्थापना लंडन येथे झाली. सिडनी वेब, फ्रँक पॉडमूर, एडवर्ड पीझ, ⇨ जॉर्ज बर्नार्ड शॉ, सिडनी ऑलिव्हिअर, एच्‌.जी. वेल्स, ग्रॅहॅम वॉलॅस, ⇨ ॲनी बेझंट इ. बुद्धिवंतांच्या प्रेरणेने ही संस्था स्थापन झाली. नंतर ⇨ हॅरल्ड लास्की, बिआट्रिस वेब, ह्यू डाल्टन, ⇨ ह्यू गेटस्केल,जी. डी. एच्‌. कोल, रॅम्से मॅक्‌डॉनल्ड, क्लेमंट ॲटली इ. विचारवंत व नेते हे या संघटनेस पुढे येऊन मिळाले. कोणत्याही रक्तरंजित क्रांतीचा अथवा हिंसक मार्गाचा अवलंब न करता सनदशीर, वैधानिक पद्धतीने व क्रमाक्रमाने समाजवाद रुजवावयचा, असे हे निश्चित ध्येय या संस्थेपुढे होते. क्रांतीच्या मार्गाने जाण्याऐवजी सनदशीर व लोकशाहीमार्गांनी व्यावहारिक सुधारणा करता येतात व समाजाची आर्थिक पुनर्रचना करता येते, हा फेबिअन मतप्रणालीचा गाभा आहे. या मतप्रणालीचे आवाहन बुद्धिवादीवर्गाला मुख्यत्वेकरून आहे. राजकीय लोकशाही, आर्थिक समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य या तिन्हींचा समन्वय याच मार्गाने होऊ शकतो, अशी या विचारवंतांची धारणा होती. समाजवादाचे ध्येय क्रमाक्रमानेच व लोकशाही मार्गांनीच प्राप्त करावयाचे, यांवर त्यांचा अतिशय कटाक्ष आहे. त्यांच्या विचारात भिन्नता व विविधता असली, तरी लोकशाही समाजवादाविषयीच्या मूलभूत कल्पनांत फारसा फरक नाही.

रोममधील फेबिअस कुळातील प्रख्यात फेबिअन सेनापती ⇨ फेबिअस मॅक्सिमस (इ. स. पू. २७५-२०३) कन्केक्टर (दीर्घसूत्री) याच्या नावाने ही सोसायटी स्थापन करण्याचे कारण असे, की त्याने काळकाढूपणाच्या धोरणाचा व डावपेचांचा अवलंब करून दुसऱ्या प्यूनिक युद्धात (इ. स. पू. २१८-२०१) हॅनिबलचा पराभव केला होता. त्याच्या डावपेचांस ‘फेबिअन डावपेच’ असे म्हणतात. अशाच पद्धतीचा वापर करून योग्य काळापर्यंत वाट पाहून, हळूहळू समाजवादाचा प्रसार इंग्लंडमध्ये करावयाचा व त्यासाठी लोकशाही पद्धतीची कास धरावयाची, असे फेबिअन सोसायटीचे धोरण होते. त्याकरिता समाजवादी तत्त्वांवर सभा, व्याख्याने, चर्चासत्रे, परिषदा, वासंतिक वर्ग इ. माध्यमांद्वारे लोकांना शिक्षण देऊन राजकीय, आर्थिक व सामाजिक समस्यांसंबंधी संशोधनपर माहिती गोळा करणे व शासनकर्त्यांना, संसदसदस्यांना व लोकांना या संदर्भात जागृत करणे, हे फेबिअन संस्थेचे प्रमुख कार्य होते. माहितीपूर्ण पुस्तपत्राची वाढ करणे, ही मोहीम या संस्थेने चालविलेली होती.

या मतप्रणालीच्या पुरस्कर्त्यांनी राज्यसंस्था आवश्यक मानली आहे. मार्क्सवादातील शासनमुक्त समाजाचे स्वप्न त्यांना मान्य नव्हते. राज्यसंस्था हवी परंतु ती लोकशाही स्वरूपाची असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे समाजवादी हे प्रचलित भांडवलशाही शासनसंस्थेला समाजविरोधी मानतात. या विचारप्रणालीप्रमाणे वस्तूचे मूल्य केवळ श्रमशक्तीवर अवलंबून नसते कारण वस्तूचे मूल्य हा संपूर्ण सामाजिक प्रक्रियेचा परिणाम असतो. मार्क्सवादाचा मूलभूत आर्थिक सिद्धांत फेबिअन समाजवाद्यांना मान्य नाही. उत्पादनाचे विभाजन आणि वितरण न्याय्य रीतीने होऊन सर्व समाजाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे. हे कार्य सुव्यवस्थित रीतीने घडून यावे, यासाठी राज्याने ते करावयास पाहिजे. राज्याला अनावश्यक व आपत्ती न मानता फेबिअन समाजवादी त्याला समाजाचा विश्वस्त व प्रतिनिधी मानतात.

”जास्तीत जास्त लोकांचे, जास्तीत जास्त कल्याण’’ या ⇨ जेरेमी बेथॅमच्या विचारसरणीवर फेबिअन मतप्रणाली उभी आहे. इंग्लंडमध्ये पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झालेले असल्यामुळे परंपरांवर आणि अनुभवजन्य सिद्धांतांवर त्याचा भर आहे. नैतिक अधिष्ठानावर आणि समतेवर त्यांचा दृढ विश्वास आहे. अनिर्बंध सत्तेचा अभाव, उत्पादन साधनांची सामूहिक मालकी, उद्योगधंद्यांवर लोकशाही पद्धतीने नियंत्रण घालणे, समाजात विनाकष्ट जगणाऱ्या वर्गाच्या उत्पन्नावर वाढते कर बसवून तो वर्ग कमी करणे आणि त्या प्राप्तीचा विनियोग समाजातील इतर वर्गांच्या राहणीचे मान वाढविण्यासाठी करणे, देशातील खाणी, शेती, कारखाने यांपासून मिळणारा खंड आणि नफा यांचा विनियोग सामाजिक सुखसोयींकडे करणे, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यापासून लोकशाही समाजवादाची बांधणी करून शासन संस्थेमार्फत तिची सुसूत्रता कायम ठेवणे, राज्यसंस्थेला जनतेची विश्वस्त, मार्गदर्शक आणि व्यवस्थापन मानणे इ. फेबिअन मतप्रणालीची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. या विचारसरणीमध्ये साम्यवादी विचारातील वर्गविग्रह, कामगार क्रांती व त्यानंतरची कामगार हुकूमशाही राजवट इ. कल्पनांना वाव नाही.

फेबिअन विचारप्रणाली इंग्लंडमध्ये स्थिर करण्यासाठी वेब पतिपत्नी यांनी, त्याचप्रमाणे त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक निबंध, पत्रके, व्याख्याने इत्यादीकांचा सतत उपयोग केला. फेबिअन एसेज इन सोशॅलिझम (१८८९) या बर्नार्ड शॉ यांनी संपादित केलेल्या पुस्तकात त्यांच्या विचारांचे स्वरूप स्पष्ट झालेले दिसते. या ग्रंथाने मजूर पक्षाला वैचारिक अधिष्ठान लाभले [→ वेब, सिडनी जेम्स व बीआट्रिस]. विसाव्या शतकात फेबिअन विचार अधिक दृढतर करण्यासाठी न्यू फेबिअन एसेज (१९५२) हे पुस्तक आर्‌. एच्. एस्. क्रॉसमन याने संपादित करून प्रसिद्ध केले. समाजातील अव्यवस्थेला आणि वैफल्याला भांडवलशाही जबाबदार असून या सर्व अनर्थाचे मूळ, केवळ त्यांचा समाजवादच नष्ट करू शकेल, अशी त्यांची धारणा होती. मजूर संघटनांचा उपयोग अनुकूल अशा प्रकारचे कायदे संमत करून घेण्यासाठी सिडनी वेबने केला. या कार्यासाठी १८९३ मध्ये मजूर पक्षाची स्थापना झाली परंतु ‘लेबरपार्टी’ हे नाव १९०६ साली स्वीकारले. शासकीय दृष्ट्या सोयीचे व व्यवहार्य असे उपाय शोधून काढण्यावर सिडनी वेबचा भर होता. सैद्धांतिक पार्श्वभूमीची अथवा मूलभूत तत्त्वज्ञानाची यासाठी त्याला गरज भासली नाही. आधुनिक जगाचा कल समाजवादाकडे आहे व तो तसाच वाढत जाणार, याची वेबने मनाशी खूणगाठ बांधली होती. समाजाचे परिवर्तन होणे अटळ होते, हे फेबिअन मतप्रणालीच्या पुरस्कर्त्यांनी ओळखून त्याप्रमाणे पाऊल टाकण्यास सुरूवात केली होती. कल्पनेच्या जगात वावरण्यापेक्षा अथवा हवेत किल्ले बांधण्यापेक्षा वेबला सदरच्या कल्पना प्रत्यक्ष कृतीत कशा उतरविता येतील, याचा ध्यास होता म्हणून त्याच्या समाजवादाला वास्तवतेची जोड लाभली आहे. यादृष्टीने पार्लमेंटकडून त्याने कायदे संमत करून, मजुरांची स्थिती सुधारण्यावर भर दिला. हा बदल संसदीय पद्धतीने व क्रमाक्रमाने त्याला घडवून आणावयाचा होता. या कार्यासाठी एक यंत्रणा त्याला उभी करावयाची होती.

पहिल्या महायुद्धापर्यंत फेबिअन सोसायटी ही मजूर पक्षांतर्गत एक घटक म्हणून काम करीत होती. १९१८ नंतर मजूर पक्षाने नव्या घटनेचा स्वीकार केला. त्या घटनेचा मसुदा सिडनी वेब याने तयार केला होता. त्यावरच मजूर पक्षाच्या भावी कार्याची उभारणी केली गेली. याचा परिणाम मजूर पक्ष व फेबिअन सोसायटी अधिक जवळ येण्यात झाला. इंग्लंडमधील मजूर पक्षाचे वैशिष्ट्य असे होते, की याची उभारणी वैयक्तिक सभासदत्वावर नसून मजूर संघटनांवर होती. पुढे ही स्थिती बदलली. वाटाघाटीने व परस्परांच्या पूर्व संमतीने पार्लमेंटचे उमेदवार निवडले जात. अशा रीतीने निवडून आलेल्यांचा पार्लमेंटमधील मजूर पक्ष बनत असे. १९४५ च्या क्लेमंट ॲटलीच्या मजूर मंत्रिमंडळाने कोळसा, पोलाद, लंडनची बँक, नागरी विमान वाहतूक, रेल्वे इत्यादीकांचे राष्ट्रीयीकरण करून फेबिअन मतप्रणालीच्या पुरस्कर्त्यांना अभिप्रेत असलेला समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला. ‘राष्ट्रीय आरोग्य सेवा’ ही त्या वेळेच्या अधिकाररूढ मजूर पक्षाची सर्वांत महत्त्वाची कामगिरी समजली जाते. याच मजूर मंत्रिमंडळाच्या कारकीर्दीत भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश, सीलोन (श्रीलंका) या देशांना स्वातंत्र्य देण्यात आले. अर्नेस्ट बेव्हिन, ह्यू गेट्‌स्केल, विल्यम बेव्हरिज इ. मजूर पुढाऱ्यांची कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे. 

वेब पतिपत्नींनी १९३२ मध्ये रशियाला भेट दिली. तेथे त्यांना त्यांच्या कल्पनेतील समाजवादाचे दर्शन घडले. सोव्हिएट कम्युनिझम : ए न्यू सिव्हिलीझेशन (१९३५) या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांच्या बदलत्या मनोवृत्तीचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. १९४२ मध्ये जी. डी. एच्. कोल याने फेबिअन मतप्रणालीची फेरमांडणी करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. तो म्हणतो, ‘समाजवाद म्हणजे कोठेही वा कोणत्याही काळी लागू करण्याचा रामबाण उपाय अथवा साचेबंद सिद्धांत नाही’. फेबिअन सोसायटीचे आवाहन बुद्धिजीवी वर्गाला आहे. चर्चा आणि विचारविनिमय यांवर या मतप्रणालीची उभारणी झाली आहे पण एवढ्याने समाजवाद प्रत्यक्षात अंमलात आणता येत नाही. निवडणूक लढविणे हे फेबिअन सोसायटीचे काम नव्हे. त्यासाठी दुसरी यंत्रणा अपरिहार्य आहे.

इंग्लंडच्या उदारमतवादी परंपरेत साम्यवादाला स्थान नाही. व्यक्तिस्वातंत्र्य, परधर्मसहिष्णुता, सनदशीर मार्ग, घटनात्मक चळवळी यांवर त्यांची श्रद्धा आहे. नवसमाजनिर्मितीसाठी याच मार्गांनी आपण गेले पाहिजे, असा फेबिअन मतप्रणालीच्या पुरस्कर्त्यांचा आग्रह आहे. विरोधी विचारप्रणाली आणि विरोधी पक्ष यांचे उच्चाटन करण्यापेक्षा त्यांचे मतपरिवर्तन घडवून त्यांना अधिक योग्य वाटते. हा मार्ग दीर्घकालीन व कष्टदायक असला, तरी अंतिम मानवी मूल्यांच्या दृष्टीने तोच मार्ग कल्याणकारी राज्य स्थिरपद करण्यास युक्त ठरणार आहे हे निर्विवाद. या फेबिअन विचारसरणीचा इंग्लंडच्या सामाजिक विकासावर व समाजविषयक कायद्यांवर फार मोठा प्रभाव पडला. संशोधन व प्रसिद्धी ही कार्ये करणारी मजूर पक्षाची एक सलग्न संस्था म्हणून फेबिअन सोसायटी अस्तित्वात आहे.

संदर्भ : 1. Bulmer-Thomas, Ivor, The Growth of the British Party Systems, 2 Vols., New York, 1966.

           2. Pelling, H. M. Ed. A History of British Trade Unionism, New York, 1972.

           3. Pease, E. R. Ed. History of the Fabian Society, New York, 1963.

धारूरकर, य. ज.