फॅर्ल, जेम्स टॉमस : (२७ फेब्रुवारी १९०४ – ). अमेरिकन कादंबरीकार व कथालेखक. जन्म शिकागो येथे. तेथील कॅथलिक शाळांत आणि पुढे शिकागो विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. कारकून, विक्रेता, बातमीदार अशा विविध नोकऱ्या त्याने केल्या. स्टड्स लॉनिगन आणि डॅनी ओनील ह्या फॅर्लने आपल्या कादंबऱ्यांतून निर्मिलेल्या प्रसिद्ध व्यक्तिरेखा. स्टड्स लॉनिगन हा शिकागोच्या दक्षिण भागातील कनिष्ट मध्यमवर्गीयांच्या वस्तीत–एका झोपडपट्टीत-राहणारा कॅथलिक पंथीय मुलगा. तेथील सामाजिक आणि आर्थिक विपन्नतेमुळे त्याचा होणारा अधःपात व त्याला येणारे अकाली मरण ह्यांचे वास्तववादी चित्रण यंग लॉनिगन (१९३२), यंग मॅनहुड ऑफ स्टड्स लॉनिगन (१९३४) आणि जज्मेंट डे (१९३५) अशा तीन कादंबऱ्यांमधून फॅर्लने केलेले आहे. लॉनिगनवर झालेले धर्माचे संस्कार त्याला अधःपातापासून वाचविण्यास असमर्थ ठरल्याचे ह्या कादंबरीतून जाणवते. डॅनी ओनील हाही स्टड्स लॉनिगनसारखीच सामाजिक पार्श्वभूमी असलेला तरुण तथापि आपल्या मानसिक धैर्याच्या जोरावर अधःपाताला प्रवृत्त करणाऱ्या परिस्थितीवर मात करून तो एक यशस्वी लेखक कसा होतो, हे फॅर्लने पाच कादंबऱ्यांमधून दाखविले आहे (अ वर्ल्ड आय नेव्हर मेड, १९३६ नो स्टार इज लॉस्ट, १९३८ फादर अँड सन, १९४० माय डेज ऑफ अँगर, १९४३ व द फेस ऑफ टाइम, १९५३). यांखेरीज फॅर्लची बर्नर्ड क्लेअर (१९४६), द रोड बिट्वीन (१९४९) व यट् आदर वॉटर्स (१९५२) ही कादंबरीत्रयीही उल्लेखनीय आहे. त्याच्या बऱ्याचशा कथा द शॉर्ट स्टोरीज ऑफ जेम्स टी. फॅर्ल (१९३७) यात संग्रहित केलेल्या आहेत. फॅर्ल हा मार्क्सवादाने प्रभावित झालेला असला, तरी पोथीनिष्ठ मार्क्सवादी नव्हता. सामाजिक-आर्थिक विषमतेबद्दल त्याला चीड होती. एमिल झोला, थिओडोर, ड्रायझर, जेम्स जॉइस आणि मार्सेल प्रूस्त हे कादंबरीकार फॅर्लचे आदर्श होते. फॅर्लने आपल्या कादंबरीलेखनात झोलाच्या निसर्गवादी आणि जेम्स जॉइसच्या संज्ञाप्रवाही तंत्राचा उपयोग केला आहे. ड्रायझरप्रमाणेच फॅर्ल हा वास्तववादाचा प्रखर पुरस्कर्ता होता. अन्य साहित्यिक आविष्काराच्या नव्या पद्धती शोधीत असताना फॅर्ल हा वास्तववादाच्या मार्गाने जाऊन निर्धाराने कादंबरीलेखन करीत राहिला. वास्तवाच्या निर्दय चित्रणात तो केव्हाही मागे पुढे पाहत नाही म्हणूनच त्याचे लेखन मन विश्रब्ध न करता बधीर करून सोडते. फॅर्लच्या अन्य उल्लेखनीय लेखनात अ नोट ऑन लिटररी क्रिटिसिझम (१९३६) ह्या त्याच्या टीकाग्रंथाचा समावेश होतो. त्यातील साहित्यविचारावर मार्क्सवादी दृष्टिकोणाचा परिणाम दिसतो.
संदर्भ : 1. Branch, E. M. James Thomas Farrell, Minnesota, 1963.
2. Branch, E. M. A Bibliography of Farrel’s Writing (1921-57), Oxford, 1959.
नाईक, म. कृ.
“