फळमाशी : विशेषतः फळांना अतिशय पीडक (उपद्रवकारक) अशी माशी. हिच्या अळ्या सर्वसाधारणपणे फळांमध्ये पोसल्या जात असल्याने तिला फळमाशी म्हटले जाते. या माश्या आर्थ्रोपोडा संघातील इन्सेक्टा वर्गाच्या डिप्टेरा गणातील ट्रायपेटिडी कुलातील आहेत. फळमाशीची लांबी सु. अर्धा सेंमी. असून पिवळसर विटकरी रंगाचे निमुळते पोट व सामान्यपणे पसरलेले पारदर्शक पंख ही हिची वैशिष्ट्ये होत. हिच्या पंखांवर तपकिरी पट्टे वा ठिपके असतात. ती बसलेली असताना पंखांची सावकाशपणे वर-खाली अशी हालचाल होत असते. यावरून त्या इतर माश्यांपेक्षा वेगळ्या ओळखता येतात. फळमाशीच्या पंखातील शिरांची मांडणी साधी असते. फळमाशीच्या शृंगिका (सांधेयुक्त स्पशेंद्रिय) आखूड व डोळे लहान असतात. हिला दृढरोम (राठ केस) नसतात.
वाढीला लागलेल्या फळाच्या सालीखाली मादी एक वा अनेक अंडी घालते. ती ३ ते ५ दिवसांत उबून मळकट पांढऱ्या रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. या अळ्या सु. १·२५ सेंमी. लांब असून त्यांना पाय नसतात. या अळ्या फळामध्ये शिरून त्यातील रस व गर खाऊन टाकतात. त्यामुळे फळाचा नाश होतो किंवा त्याची गुणवत्ता घटते. १-२ आठवड्यांत पूर्ण वाढ झाल्यावर या अळ्या मातीत पडून कोशावस्थेत जातात. कधीकधी सुकलेल्या फळातही त्या कोशावस्थेत जातात. कोशातून ८-१०दिवसांनी पूर्ण वाढलेली फळमाशी बाहेर पडते. अशा प्रकारे फळमाशीचे चक्र पूर्ण होण्यास ३ ते ४ आठवडे लागतात व एका वर्षात तिच्या अनेक पिढ्या निर्माण होतात.
फळमाश्यांच्या सु. १,२०० जाती असून काही महत्त्वाच्या जाती पुढील होत. ऱ्हॅगोलेटिस सिंग्युलेटा जातीची माशी चेरीची फळे पोखरते व त्यामुळे त्यांचे खूप नुकसान हाते. ऱ्हॅगोलेटिस पोमोनेला जातीची माशी सफरचंदामध्ये असते व तिच्यामुळे सफरचंदाचा रंग व प्रत खराब होतात. भूमध्य सामुद्रिक भागातील सेराटिटिस कॅपिटाटा जातीच्या माशीचा उपद्रव मुख्यत्वे लिंबू वर्गीय फळांना होतो द्राक्षे, सप्ताळू, अलुबुखार, सफरचंद, नासपती, बिही, कॉफी वगैरे सु. १०० जातींच्या फळांनाही तिचा उपद्रव होतो. अॅनास्टेफा लूडेन्स या मेक्सिकोतील फळमाशीमुळे लिंबू वर्गीय फळे व आंबा याचे व एपोक्रा कॅनाडेब्सिस जातीमुळे बेदाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्राक्षांचे नुकसान होते. डेकस डॉर्सॅलिस व डे. ओलिई या भारतातील फळमाश्यांच्या प्रमुख जाती असून पेरू, आंबा, लिंबू, संत्री, भोपळा वर्गीय फळे, ऑलिव्ह तसेच केळी, अननस, अव्होकॅडो, टोमॅटो, खरबूज, काकडी, कलिंगड इ. १५० जातींच्या फळांना त्या उपद्रवकारक ठरल्या आहेत. कार्पोमिया व्हेसुव्हिएना जातीच्या फळमाशीची अळी विशेषकरून बोरांचे नुकसान करते
फळमाश्यांमुळे काही अपायकारक वा विषारी वनस्पती आणि त्यांच्या बियांचा नाश होतो, हे जरी खरे असले, तरी त्यांच्यामुळे होणारी हानी खूप जास्त आहे. फळांचे उत्पन्न व दर्जा घटणे हा या माश्यांचा मुख्य उपद्रव आहे फळमाश्यांचा उपद्रव कमी करण्याचा सोपा मार्ग अजून सापडलेला नाही कारण त्यांची उत्पत्ती फार जलदपणे होते. शिवाय त्यांच्या अळ्या फळांच्या किंवा वनस्पतींच्या इतर अवयवांच्या आत असल्याने चूर्णरूप व द्रवरूप कीटकनाशके त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीत. यामुळे अंडी घालू लागण्यापूर्वीच फळमाशीचा नाश करणे आणि त्यांच्यामुळे दूषित झालेली फळे एकत्रित करून जाळून वा सु. ७५ सेंमी.पेक्षा अधिक खोल खड्ड्यात पुरून टाकणे हे उपाय केले जातात. फळे काढण्याच्या हंगामानंतर झाडावर राहून गेलेली खुरटलेली फळे काढून तीही जाळतात वा पुरतात. अंडी घालण्याच्या आधीच्या काळात काही गोड पदार्थ हे या माश्यांच्या बाबतीत आमिषाप्रमाणे ठरतात व त्यांच्या साह्याने माश्या पकडता येतात वा कीटकनाशक वापरून नष्ट करता येतात. उदा., १० लिटर पाण्यात सु. २८ ग्रॅम टार्टार एमिटिक व ५६० ग्रॅम गूळ घालून बनविलेल्या विद्रावाचा फवारा मारतात. काही रासायनिक अथवा बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) तेलांच्या वासाकडे फळमाश्या आकर्षित होतात. अशा तेलाचा वापर करूनही माश्यांचा नाश केला जातो. थंडीपासून रक्षण करण्यासाठी या माश्या ठराविक वेळी एकत्रित येत असतात. अशा वेळी त्या जाळ्यात पकडून वा कीटकनाशक वापरून नष्ट करतात. या माश्यांवर जगणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढवून किंवा किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) प्रारणाने (तरंगरूपी ऊर्जेने) विशेषतः नरांना वंध्यत्व आणून फळमाश्यांची संख्या नियंत्रित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. जानेवारी फेब्रुवारीमध्ये फळबागेतील जमीन नांगरणे हाही एक उपाय आहे. अशा नांगरण्याने फळमाश्यांचे कोश उघडे पडतात आणि नंतर ते इतर प्राण्यांकडून खाल्ले जातात. कधीकधी नांगरताना कोश दुखावले जाऊनही नष्ट होतात. फळांभोवती कागदी वा कापडी पिशव्या बांधणे, फळबाग स्वच्छ ठेवणे, कलिंगडासारखी फळे वरचेवर फिरवून ठेवणे, फळांवर उष्णता संस्करण करणे यांसारखे उपायही फळमाश्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी वापरले जातात. शिवाय आयात होणाऱ्या फळांमधून फळमाशीचा आपल्या देशात प्रवेश होऊ नये म्हणून अनेक देशांनी विशिष्ट कायदे केलेले आहेत.
कधीकधी ड्रॉसोफिलिडी कुलातील माश्यांनाही चुकीने फळमाश्या म्हणून संबोधिले जाते. मात्र त्यांना लहान फळमाशी, व्हिनेगर वा पोमेस माशी म्हटले जाते. यांपैकी विशेषकरून ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर जातीचा वापर आनुवांशिकतेच्या शास्त्रातील प्रयोगामध्ये आणि प्राणिवर्तनाच्या अध्ययनात केला जातो. कारण या माशीचे जीवनचक्र अवघ्या १० दिवसांत पूर्ण होते तसेच त्यांच्या लाला ग्रंथीतील गुणसूत्रे इतकी मोठी असतात की, साध्या सूक्ष्मदर्शकाने त्यांचे सहजपणे अध्ययन करता येते [→ ड्रॉसोफिला].
संदर्भ : Narayanan, E. S, Batra, H. N. Fruit Files and Their Cantrol, New Delhi, 1960.
बोरले, मु. नि. ठाकूर अ. ना.
“