फळबाग : (फलसंवर्धन). फार प्राचीन काळापासून मनुष्याच्या आहारात फळांचा समावेश असल्याचे आढळून येते. मनुष्य भटक्या स्थितीत फिरत असताना तो प्राण्याची शिकार व जंगलातील लहान मोठी फळे यांवर उदनिर्वाह करीत असे. कालांतराने तो शेती करू लागल्यावर फळझाडांची लागवड निवासस्थानाभोवती लहान प्रमाणावर होऊ लागली असावी. ईजिप्शियन लोक, खजूर, द्राक्षे, ऑलिव्ह, अंजीर, केळी, लिंबू गटातील फळे आणि डाळिंब या फळझाडांची लागवड करीत. फळझाडांपैकी मनुष्याने सर्वप्रथम खजुराच्या झाडाची इ. स. पू. ७००० वर्षे या काळात लागवड सुरू केली. डाळिंबाची लागवड इ. स. पू. ३५०० वर्षे या काळात होत असे.

भारतातही फळझाडांची लागवड प्राचीन काळापासून होत असल्याचे आढळून आले आहे. इ. स. पू. चौथ्या शतकात लिहिलेल्या कौटिलीय अर्थशास्त्रात द्राक्षाच्या लागवडीसंबंधी उल्लेख आहे. सु. ४००० वर्षांपासून आंबा लागवडीत आहे असे दिसते. आंबा, केळी, द्राक्षे, अंजीर आणि खजूर ही फळे प्राचीन काळात लोकप्रिय होती. केळी, नारळ व आंबा ही फळे देवाला अर्पण करण्याची पद्धत आणि घरांचे दरवाजे व रस्त्यावरील कमानी सुशोभित करण्यासाठी आंबा व केळी या झांडांच्या पानांचा उपयोग हे फळझाडांच्या पूर्वापार लागवडीसंबंधी पुष्टी देणारे पुरावे आहेत. फणस, आवळा, चिंच आणि बेल ही फळझाडेही पुरातन काळापासून लागवडीत असावीत; परंतु सर्वसामान्यपणे फळझाडे शेताच्या बांधावर लावण्याची पद्धत असे व त्यांपासून कौटुंबिक गरजा भागत. मोठ्या प्रमाणावर फळझाडे लावण्याची पद्धत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत फारशी अस्तित्वात नव्हती. व्यापारी तत्त्वावर फळबाग लावण्याची पद्धत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सुरू झाली. याचे कारण म्हणजे फळांचे आहारातील महत्त्व लोकांना कळू लागले व त्यामुळे मागणी वाढली.

आहारातील फळांचे महत्त्व : फळांत पचनास सुलभ अशा प्रकारची शर्करा असते, त्यामुळे ती लहान मुले व उतार वयाच्या अथवा अशक्त प्रौढांसाठी फार उपयुक्त आहेत. सर्वसामान्य प्रकृतीच्या मनुष्यांसाठीही त्यांतील जीवनसत्त्वे व खनिज पदार्थांमुळे ती उपयुक्त आहेत. शिवाय ती सारक असून निरनिराळ्या फळांत विशिष्ट औषधी गुणधर्मही असतात. आंबा, पपई, फणस आणि खजूर या फळांत जीवनसत्त्व काजू, अक्रोड, बदाम, जरदाळू, केळी, सफरचंद यांत जीवनसत्त्व; बेल, लिची, पपई, अननस, डाळिंब यांत जीवनसत्त्व आणि पपई, लिंबू गटातील फळे, स्ट्रॉबेरी, बोर, आवळा व अननस या फळांत जीवनसत्त्व पुष्कळ प्रमाणात असतात.

प्रत्येक मनुष्याच्या आहारात दर दिवसाला कमीत कमी ६० ग्रॅ. फळांचा समावेश असणे आवश्यक आहे; परंतु, भारतात हे प्रमाण फक्त १५ ग्रॅ.च्या आसपास आहे (अमेरिकेत ते ४५० ग्रॅ. आहे).

एकक क्षेत्रफळातून मिळणाऱ्या ऊर्जेच्या (कॅलरींच्या) दृष्टीनेही फळझाडांच्या लागवडीला फार महत्त्व आहे. एक हेक्टर क्षेत्रातून दोन प्रमुख तृणधान्ये आणि पाच निरनिराळी फळे यांच्या लागवडीपासून मिळणारी ऊर्जा कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे.

कोष्टक क्र. १. काही तृणधान्ये आणि फळे यांच्या एक हेक्टरमधील लागवडीपासून मिळणारी ऊर्जा.

तृणधान्य अथवा फळ हेक्टरी अंदाजी उत्पन्न (टन) १०० ग्रॅ. खाद्य भागातून मिळणारी ऊर्जा (कॅलरीमध्ये) हेक्टरी मिळणारी ऊर्जा (लक्ष कॅलरीमध्ये)
 गहू १ ·३६  ३४६ ४७ ·०५
 भात २ ·७२  ३४५ ९३ ·८४
 केळी २५ ·००  १५० ३७६ ·३२
 पपई २८ ·४१  ३९ ११० ·७९
 द्राक्षे १६ ·८१  ४५ ७५ ·६४
 आंबा १२ ·५०  ५० ६७ ·२०
पेरू (लखनौ) २२ ·७२  ६८ १५४ ·४९

 

क्षेत्र व उत्पादन : जागतिक उत्पादनाच्या दृष्टीने सफरचंद, द्राक्षे, संत्रे, मोसंबे व लिंबू गटातील इतर फळे, केळी आणि आंबा ही फळे विशेष महत्त्वाची आहेत. त्याखालोखाल ऑलिव्ह, नासपती, पीच (सत्पाळू), अलुबुखार ही फळे असून त्यानंतर खजूर, अननस, जरदाळू, ॲव्होकॅडो व स्ट्रॉबेरी या फळांचा क्रमांक लागतो. जगात सर्वांत अधिक उत्पादन द्राक्षाचे असून त्याखालोखाल लिंबू गटातील फळांचे आहे. त्यानंतर अनुक्रमे केळी व सफरचंद यांचा क्रमांक लागतो. कोष्टक क्र. २ मध्ये काही महत्त्वाच्या फळांचे १९७८ सालचे जागतिक उत्पादन, भारतीय उत्पादन आणि सर्वाधिक उत्पादन करणारा देश व त्याचे उत्पादन ही माहिती दिलेली आहे.

कोष्टक क्र. २ काही महत्त्वाच्या फळांचे उत्पादन (१९७८)

 फळाचे नाव  जागतिक उत्पादन  भारतीय उत्पादन  सर्वाधिक उत्पादन करणारा देश व त्याचे उत्पादन
अक्रोड (टन) ७,८५,०८२ १५,५००  तुर्कस्तान १,५०,०००
अननस (हजार टन) ६,८३६ ११२  थायलंड १,२५०
अलुबुखार (हजार टन) ५,२४१ २६  युगोस्लाव्हिया ७०६
ॲव्होकॅडो (हजार टन) १,२८४  मेक्सिको ३००
आंबा (हजार टन) १३,७८२ ९,१४९  भारत ९,१४९
काजू (टन) ४,९८,५९५ १,५७,२००  भारत १,५७,२००
केळी (हजार टन) ५७,२८३ ३,८५३  ब्राझील ६,१७६
खजूर (हजार टन) २,६६४  इराक ५८१
चेस्टनट (टन) ५,०१,३८०  चीन १,६८,०००
जरदाळू (हजार टन) १,५८४ १३  स्पेन २२७
द्राक्ष (बेदाणे) (किग्रॅ./हेक्टर) ५,५७७ २,६५४  नेदर्लंड्स २५,०००
नासपती (हजार टन) ७,६५१ ६२  इटली १,१४०
पपई (हजार टन) १,५१४ २२६  इंडोनेशिया २३०
पिस्ता (टन) ७६,८३४  इराण ६०,०००
पीच (सप्ताळू) (हजार टन) ६,७८७ १४  अमेरिकेची संयुक्त संस्थाने    (अ. सं. सं.) १,३५९
बदाम (टन) ८,३०,५१२  स्पेन २,९८,५००
रासबेरी (टन) २,३६,३८२  प. जर्मनी २२,११०
लिंबू (हजार टन) ४,६४५ ४५३  अ. सं. सं. ९१६
 संत्रे (हजार टन) ३४,११० १,०३७  अ. सं. सं. ८,६४०
सफरचंद  (हजार टन) ३१,२८० ७४२ रशिया ७,०००
स्ट्रॉबेरी(टन) १५,६४,४२३ अ. सं. सं. २,९३,९२६
हॅझेलनट  (टन) ५,०४,०४५ तुर्कस्तान ३,२०,०००

 

उपलब्ध आकडेवारीप्रमाणे भारतातील प्रमुख फळझाडांचा लागवडीखालील क्षेत्र (हेक्टरमध्ये) पुढीलप्रमाणे आहे : आंबा ५,३०,४००; लिंबू गटातील फळे ९०,०००; केळी १,८५,६००; पेरू ५८,०००; काजू १,९१,०००; द्राक्षे २,८००; पपई ६,०००; सफरचंद गटातील फळे ९,६००; इतर फळे १,६३,२०० असे एकूण १२,३७,२००. १९६९ सालाच्या सुमाराची राज्यवार क्षेत्राची आकडेवारी (हेक्टरमध्ये) उतरत्या क्रमाने पुढीलप्रमाणे होती : आंध्र प्रदेश १,८६,०००; केरळ (नारळाचे क्षेत्र वगळून) १,६८,०००; बिहार १,५३,२००; तमिळनाडू १,२१,२००; उत्तर प्रदेश १,०४,०००; ओरिसा ८२,०००; महाराष्ट्र ७४,२००; कर्नाटक ६६,०००; आसाम ५३,२००; मध्य प्रदेश ४१,२००; गोवा, दीव व दमण ४१,२००; गुजरात ३८,०००; पंजाब आणि हरियाणा २६,०००; त्रिपुरा २५,२००; पश्चिम बंगाल १२,०००; जम्मू व काश्मीर ८,०००; हिमाचल प्रदेश ४,०००.  

हवामान : फळझाडांच्या लागवडीत जमीन व हवामान या दोन बाबींना फार महत्त्व आहे व त्यांतही हवामानाला विशेष महत्त्व आहे. तापमान, आर्द्रता, पाऊस व वारा हे हवामानाचे मुख्य घटक आहेत. प्रत्येक फळझाडाच्या वाढीसाठी विशिष्ट तापमान लागते. सफरचंदाला थंड हवामान व आंबा, केळी, फणस या फळांना उष्ण हवामान लागते. फणस व केळी यांसारख्या फळांना मुबलक प्रमाणात हवेतील आर्द्रता लागते. उलटपक्षी जास्त आर्द्रतेमुळे काही फळांचा रंग बिघडतो व त्यांचा टिकाऊपणा कमी होतो. तसेच दमट हवेत कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) आणि सूक्ष्मजंतू यांपासून होणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढते. थंड हवामानात कीटकांचा उपद्रव कमी प्रमाणात असतो. विशिष्ट प्रदेशात कोणत्या फळझाडाची लागवड करावयाची हे ठरविताना एकूण पर्जन्यमान आणि त्याची वर्षभरातील विभागणी यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. सपाटीच्या प्रदेशात फार पावसामुळे झाडांच्या मुळांशी पाणी साठते आणि फूल व फलधारणेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. फार कमी पावसाच्या प्रदेशात विहिरी अगर कालव्याची सोय असेल तेथेच फळझाडांची लागवड करता येते. उष्ण वारे, चक्री वादळे, वालुका वादळे आणि गारा यांपासून झाडांचे व फळांचे फार नुकसान होते. फळबागेसाठी क्षेत्राची निवड करतेवेळी या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. पूर्वीच्या अनुभवावरून कोणत्या हवामानात कोणत्या फळाची लागवड यशस्वी होते, हे सर्वसाधारपणपणे ठरविता येते.

उष्ण प्रदेशीय, उपोष्ण प्रदेशीय आणि समशीतोष्ण प्रदेशीय अशा तीन प्रकारच्या हवामानांत वाढणारी फळे आणि स्थूलमानाने त्यांच्या लागवडीस अनुकूल असे भारतातील प्रदेश पुढीलप्रमाणे आहेत.

उष्ण प्रदेशीय हवामानातील फळे : आंबा, केळी, काजू, चिकू, अननस, पपई आणि फणस या फळांना उन्हाळ्यात उष्ण व दमट आणि हिवाळ्यात सौम्य हवामान लागते. उष्ण हवामानामुळे फळातील शर्करा वाढण्यास मदत होते. प. बंगाल व मध्य प्रदेशाचा दक्षिण भाग आणि महाराष्ट्र, ओरिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू व केरळ राज्याच्या संपूर्ण भागात या फळांची विशेष प्रमाणात लागवड होते. या सर्व प्रदेशांत सर्वसाधारणमानाने कडाक्याची थंडी पडत नाही.

उपोष्ण प्रदेशीय हवामानातील फळे : संत्री, मोसंबी आदीकरून लिंबू गटातील फळे, लिची, फालसा, अंजीर, खजूर, द्राक्षे, पेरू, डाळिंब ही खऱ्या अर्थाने उपोष्ण प्रदेशीय हवामानातील फळे आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबचा सखल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि प. बंगालचे उत्तरेकडील जिल्हे आणि राजस्थान व आसाम या राज्यांत सर्वत्र या फळांची लागवड विशेष प्रमाणात होते. या प्रदेशांत तापमान पाण्याच्या गोठणबिंदूच्या खाली क्वचित प्रसंगी जाते; परंतु, ते -४° से.च्या खाली सहसा जात नाही. उन्हाळ्यात गरम व कोरडे हवामान असते.

समशीतोष्ण प्रदेशीय हवामानातील फळे : यांत सफरचंद, नासपती, अक्रोड, बदाम यांसारखी १,५०० ते २,४०० मी. उंचीच्या प्रदेशात वाढणारी आणि पीच, अलुबुखार, जरदाळू व स्ट्रॉबेरी यांसारखी कमी उंचीच्या (१,२०० मी.) प्रदेशात वाढणारी फळे येतात. सर्वसाधारणपणे असे म्हणता येई की, हिवाळ्यातील तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते, अशा प्रदेशात या फळझाडांची लागवड यशस्वी रीत्या होते. या फळझाडांची पाने हिवाळ्यात झडतात व झाडे विश्रांतीच्या अवस्थेत जातात. ही अवस्था संपविण्यासाठी गोठणबिंदूखालील तापमानाची आवश्यकता असते. काश्मीर, कुलू, कांग्रा खोऱ्याचा भाग, हिमाचल प्रदेशातील कोटगड आणि नहान भाग आणि उत्तर प्रदेशातील कुमाऊँ टेकड्या हे अशा प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीचे मुख्य प्रदेश आहेत.

कडाक्याच्या थंडीपासून फळझाडांचे रक्षण करण्यासाठी बागेच्या पश्चिम आणि उत्तरेच्या बाजूंना वारा अडविण्यासाठी उंच झाडे लावणे, वेळेवर खत, पाणी देऊन झाडे जोमदार स्थितीत ठेवणे, बागेला पाणी भरणे व जागोजागी पालापाचोळा जाळून धूर करणे आणि लहान वयाच्या झाडांना तीन बाजूंनी ज्वारीचा कडबा अगर गवताच्या साहाय्याने झाकणे हे उपाय आहेत.

उन्हाळी हंगामात जास्त तापमान, कमी प्रमाणातील हवेतील सापेक्ष आर्द्रता व जोराने वाहणारे वारे यांमुळे झाडातील पाण्याचा अंश बाष्पोत्सर्जनाने कमी होऊन फांद्या, पाने व फळे वाळतात. शेवरीसारखी झाडे सावलीसाठी लावणे, लहान वयांच्या झाडांवर गवताचे छप्पर करणे, बागेस कमी अंतराने पाण्याच्या पाळ्या देणे, गरम वारा अडविण्यासाठी बागेच्या पश्चिमेच्या बाजूला उंच झाडे लावणे आणि झाडांच्या खोडांना चुन्यात झिंक सल्फेट १२ : १ या प्रमाणात मिसळून सफेती करणे या उपायांनी उन्हाळ्यात फळझाडांवर होणारे अनिष्ट परिणाम कमी करता येतात.

जमीन व पाणीपुरवठा : फळबागांच्या जमिनी कमीत कमी २ मी. खोल, चांगल्या निचऱ्याच्या आणि त्यात हवा चांगल्या प्रकारे खेळती राहील अशा असाव्यात. तळजमीन नमर मुरमाची व सच्छिद्र असणे आवश्यक आहे. फार भारी अगर फार रेताड जमीन फळबागेसाठी योग्य नाही. मातीचे pH  मूल्य [→ पीएच मूल्य] ६ व ७ च्या दरम्यान असावे. जमिनीतील पाण्याची कायम पातळी जमिनीच्या पृष्ठभागापासून सु. ३ मी. खोलीवर असावी आणि ही पातळी वर्षातून फार वरखाली होणारी नसावी, कारण तशी असल्यास त्याचा झाडांच्या वाढीवर व आयुर्मानावर प्रतिकूल परिणाम होतो. तळजमीन क्षारीय (pH मूल्य ७ पेक्षा जास्त असलेली) असल्यास मुळांची वाढ नीट होत नाही.

फळबागेसाठी तळी अगर कालव्यासारख्या नियमित व खात्रीशीर पाणीपुरवठ्याची सोय असणे आवश्यक आहे.  

जागेची निवड व आखणी :  हवामान, जमीन व पाणीपुरवठा या गोष्टींचा एकत्र विचार करून बाजारपेठेपासून शक्य तितक्या नजीक फळबागेची जागा पसंत करावी. झाडे लावण्यासाठी बागेच्या आखणीच्या (मांडणीच्या) चार पद्धती प्रचलित आहेत : (१) चौरस, (२) षट्‌कोणी, (३) कर्णाकृती व (४) समपातळी. झाडांच्या वाढीची पद्धत, झाडांना पुरेसा प्रकाश मिळण्याची आवश्यकता आणि सुलभ आंतर मशागत या गोष्टींचा विचार करून झाडांच्या मांडणीची पद्धत निवडतात. चौरस पद्धतीची झाडांची मांडणी सर्वत्र प्रचलित व लोकप्रिय आहे. यात चौरसाच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक झाड लावतात. षट्‍कोणी पद्धतीतील षट्‍कोणाच्या सहा कोपऱ्यांवर सहा व मधोमध एक याप्रमाणे झाडे लावतात. चौरस पद्धतीत चार कोपऱ्यांवर संथपणे वाढणाऱ्या झाडांच्या मधोमध एक थोड्या मुदतीत व जलद वाढणाऱ्या प्रकाराचे झाड लावतात व संथपणे वाढणाऱ्या झाडांची पूर्ण वाढ झाल्यावर हे मधले झाड कापून टाकतात. या प्रकारच्या मांडणीला कर्णाकृती पद्धत असे नाव आहे. टेकडीवर व जास्त उताराच्या जागेत समपातळी पद्धतीने झाडे लावतात.

पाळीव जनावरे, जंगली प्राणी, माकडे व चोर यांपासून फळांचे रक्षण करण्यासाठी बागेभोवती कुंपण करणे आवश्यक असते. काटेरी तार व काटेरी झाडे अशा दोन्हींचा उपयोग करून केलेले कुंपण सर्वांत फायदेशीर असते.

बागेत फळझाडे किती अंतरावर लावावीत हे फळाचा प्रकार, जमिनीची प्रत, पाणीपुरवठा आणि मांडणीची पद्धत यांवर अवलंबून असते. एकाच फळझाडाच्या निरनिराळ्या प्रकारांची झाडे आणि एकाच प्रकाराची निरनिराळ्या खुंट-झाडांवर केलेली कलमे कमीअधिक विस्ताराची असू शकतात, ही गोष्ट लक्षात घेऊन दोन झाडांमधील अंतर निश्चित करावे लागते; परंतु, दाटीने झाडे लावणे कटाक्षाने टाळले पाहिजे, कारण त्यामुळे झाडे उंच वाढून जोराच्या वाऱ्याने ती मोडून पडतात. शिवाय अशा प्रकारच्या झाडांना लागणारी फळे कमी दर्जाची व लहान आकारमानाची असतात. रोग व किडीचे प्रमाण वाढते व आंतर मशागतीची कामे सुलभ होत नाहीत.

अभिवृद्धी : फळझाडांची अभिवृद्धी बिया लावून अथवा शाकीय (दुसऱ्या झाडाची फांदी, खोड वा अन्य भाग लावण्याच्या) पद्धतीने करतात. व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या बहुतेक सर्व फळझाडांची अभिवृद्धी शाकीय पद्धतीने करतात. प्रत्येक पद्धतीत काही फायदे व तोटे आहेत [→  वनस्पतींची अभिवृद्धि]. पपई, फालसा, कागदी लिंबू, जांभूळ, काजू या झाडांची लागवड निवडक झाडांच्या बिया लावूनच करतात. कागदी लिंबाच्या एका बीपासून ३ ते ४ रोपे उगवतात. त्यांतील एक रोप लैंगिक पद्धतीने तयार झालेले व इतर रोपांच्या मानाने खुरटे असते. इतर रोपे अलैंगिक पद्धतीने तयार झालेली असल्यामुळे मातृ झाडाचे सर्व गुणधर्म तसेच्या तसे त्यात उतरलेले असतात. यासाठी लैंगिक पद्धतीने तयार झालेली रोपे ओळखून ती उपटून टाकतात.

बियांपासून लागवड करण्यासाठी जोमाने वाढणाऱ्या झाडांची पक्व, निरोगी व आकारमान, रंग, चव, स्वाद वगैरे गुणधर्मांत सरस असणारी फळे निवडून त्यांच्या बिया स्वच्छ पाण्यात धुवून सावलीत २-३ दिवस वाळवितात. पपई, आंबा व कागदी लिंबू यांच्या बिया काढल्यापासून एक आठवड्यात रुजत घालणे आवश्यक असते. वाळविलेल्या बियांची उगवणक्षमता फार दिवस टिकत नाही. बिया पुष्कळ कालावधीसाठी ठेवावयाच्या असल्यास त्या स्वच्छ धुवून सावलीत २-३ दिवस वाळवून त्यांत कोळशाची पूड मिसळून बंद डब्यात ३° ते १०° से. तापमानात ठेवतात.

कलमे खरेदी करावयाची असल्यास ती खात्रीशीर पन्हेरी बागांतूनच घेणे आवश्यक असते. भारतात रोपे अगर कलमे पावसाळ्यात (जून-ऑगस्ट) अथवा वसंत ऋतूत (फेब्रुवारी-मार्च) लावतात. महाराष्ट्रासाठी सर्वसाधारणपणे पावसाळी हंगाम या कामासाठी योग्य ठरला आहे. वाफ्यातून खणून काढलेली कलमे कायम जागी लावण्यासाठी त्यांच्या मुळांच्या गोळ्याच्या दुप्पट मोठा खड्डा करतात. आखणी करताना मारलेल्या खुंटीच्या जागीच सदर झाड येत आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी विशेष प्रकारच्या लाकडी तक्त्याचा उपयोग करतात. झाड लावल्यावर त्याची योग्य दिशेने वाढ होण्यासाठी त्याच्या शेजारी एक खुंट रोवून त्याला झाड बांधतात. खुंटामुळे लावलेल्या झाडाचे वाऱ्यापासून संरक्षण होते.

आंतर पिके, आच्छादनाची पिके व हिरवळीची पिके : बागेतील कायमची झाडे लहान असताना त्यांच्यामधील मोकळ्या जागेत गाजरे, मुळे, कोबी, फुलकोबी, टोमॅटो ही भाजीपाल्याची पिके बरसीम, लसूणघास यांसारखी चाऱ्याची पिके अथवा पपई, केळी, अननस यांसारखी थोड्या अवधीत फळे देणारी फळझाडे आंतर पिके म्हणून लावतात.  त्यामुळे मुख्य फळझाडे मोठी होईपर्यंत त्यांच्यामधील जागेचा वापर होतो आणि त्या काळात उत्पन्नही मिळते. मात्र अशी पिके लावताना मुख्य फळझाडांना खत, पाणी योग्य प्रकारे मिळत राहील याकडे लक्ष पुरविणे आवश्यक असते. जमिनीची धूप थांबविण्यासाठी झाडांच्या रांगांमधून लावण्यात येणाऱ्या पिकांना आच्छादनाची पिके अशी संज्ञा आहे. ताग, चवळी, धैंचा या पिकांचा हिरवळीच्या खतासाठी आणि आच्छादनासाठी असा दुहेरी उपयोग होतो. या पिकांमुळे तणांची वाढ होत नाही. आच्छादनांची अथवा हिरवळीची पिके न लावल्यास मशागतीने तणांचा नाश करणे आवश्यक असते; परंतु, ते फार खर्चाचे असते. तणनाशकांचा वापर करून अथवा पॉलिएथिलिनाच्या काळ्या रंगाच्या पातळ चादरी शेतात पसरून तणांना पायबंद घालता येतो. तण नसेल, तर प्रत्येक पाण्याची पाळी दिल्यानंतर जमिनीची मशागत करण्यापासून कोणताही फायदा होत नाही; उलट तोटाच होतो. जमीन धुपून जाण्याची क्रिया वाढते, नांगराच्या तळाखालची जमीन घट्ट होते आणि त्यामुळे मुळांची वाढ मर्यादित होते व ती दुखावली जातात. तथापि अशा प्रकारची निर्मळ मशागत कोरड्या प्रदेशात अथवा कोरड्या हंगामात अगदी कमी प्रमाणात केल्यास फायदेशीर असते.

खत : फळझाडांची खताची गरज जमीन, हवामान आणि मशागतीच्या पद्धतीवर अवलंबून असते. भारतात फळबागांतून शेणखत हे सर्वांत जास्त वापरले जाणारे सेंद्रिय खत आहे. त्या खालोखाल हिरवळीच्या पिकांचा वापर केला जातो. शेतपिकापेक्षा फळझाडांची नायट्रोजनाची गरज जास्त असते. झाडांची जलद गतीने वाढ होत असता व ती फुलावर येण्याच्या सुमारास नायट्रोजनाची विशेष आवश्यकता असते. अमोनियम सल्फेटाचा वापर नायट्रोजनासाठी सर्वात जास्त होतो. अमोनियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट, अमोनियम फॉस्फेट व यूरिया ही इतर नायट्रोजनयुक्त खते वापरली जातात. सुपरफॉस्फेट, डबल सुपरफॉस्फेट, कॅल्शियम फॉस्फेट, हाडांची भुकटी (बोनमील) व अमोनियम फॉस्फेट ही फॉस्फरसयुक्त खते आणि म्युरिएट ऑफ पोटॅश व पोटॅशियम सल्फेट ही पोटॅशियमयुक्त खते वापरली जातात. सूक्ष्ममात्रिक (अल्प प्रमाणात आवश्यक असलेल्या) मूलद्रव्यांत मँगॅनीज, बोरॉन, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम ही महत्त्वाची आहेत. काही विशिष्ट मात्रेपेक्षा ही मूलद्रव्ये जमिनीत जास्त प्रमाणात असल्यास त्यांचा फळझाडांवर प्रतिकूल परिणाम होतो. देशातील पुष्कळ भागांत, विशेषतः लिंबू वर्गातील फळबागांत, जस्ताचा अभाव आढळून येतो. यासाठी झिंक सल्फेट व चुना यांचे सारख्या प्रमाणातील मिश्रण १:२५० या प्रमाणात पाण्यात मिसळून झाडांवर फवारतात.

शेणखतासारखी भरखते बागेच्या सर्व क्षेत्रात पसरून मातीत मिसळतात. वरखते लहान वयाच्या झाडांना देते वेळी ती झाडांची मुळे जेथपर्यंत पसरलेली असतात, त्या जागेत पसरून मातीत मिसळतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडांच्या बागांत ती संपूर्ण क्षेत्रांत अथवा झाडांच्या फांद्यांच्या विस्ताराच्या पुढे १ ते १·२५ मी. अंतरापर्यत पसरून मिसळतात.

पाणी देण्याच्या पद्धती : फळझाडांना पाणी देताना ते त्यांच्या सर्व मुळापर्यंत पोहोचेल एवढ्याच मर्यादेपर्यंत देणे इष्ट असते. यापेक्षा जास्त पाणी दिल्यास ते वाया जाते, हे लक्षात घेऊन पाणी देण्याच्या पद्धतीचा अवलंब करणे इष्ट असते. पुढील तीन पद्धती भारतात प्रचलित आहेत : (१) मोकार पद्धत, (२) वाफे पद्धत व (३) आळे पद्धत. या सर्व पद्धतींत पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर उंच पातळीवरून कमी पातळीवर सोडण्यात येते. मोकार पद्धतीत पाणी बागेच्या जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर समप्रमाणात दिले जाते. या पद्धतीचा वापर सपाट शेतात व पाणी मुबलक असेल तेथेच करता येतो. यासाठी शेताचे २५ आर पेक्षा जास्त क्षेत्र नसलेले तुकडे करतात. सर्व जमीन समपातळीत नसल्यास काही पाणी वाया जाते व ज्या झाडांच्या बुंध्याशी जास्त पाणी साचून ते फार दिवस राहते त्या ठिकाणी निरनिराळे रोग उद्‍भवतात. या पद्धतीत फेरफार केलेली पद्धत म्हणजेच वाफे पद्धत आहे. वास्तविक दोन्ही पद्धतींत मूलभूत तत्त्व एकच आहे ते म्हणजे सबंध शेतभर एकसारख्या प्रमाणात पाणी भरणे. वाफ्याचे आकारमान त्यात लावलेले पीक व जमिनीचा प्रकार यांवर अवलंबून असते. भारी प्रकारच्या व सपाट जमिनीत वाफे मोठ्या आकारमानाचे आणि हलक्या व उंचसखल जमिनीत ते लहान आकारमानाचे असतात. लहान वाफ्यातील जमीन सपाट करून घेतात. यात भरण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण फार असते म्हणून आंबा, पेरू या फळझाडांशी तुलना करता कमी अंतरावर लावण्यात येणाऱ्या झाडांना (उदा., केळी, द्राक्षे, पपई) पाणी देण्यासाठी या पद्धतीचा सामान्यपणे उपयोग करतात. त्याचप्रमाणे पूर्ण वाढ झालेल्या व ज्यांनी जमिनीचा पृष्ठभाग संपूर्णपणे व्यापून टाकलेला आहे, अशा इतर फळझाडांच्या बाबतीतही वाफे पद्धतीचा उपयोग करतात. कोवळ्या झाडांच्या बाबतीत ही पद्धत उपयोगी नाही.

आळे पद्धत ही सर्वात जास्त प्रचलित पद्धत आहे. या पद्धतीत झाडाभोवती वाटोळे अगर चौकोनी आळे करून त्यात झाडांच्या दोन रांगांमधून वाहत असलेल्या पाटातून पाणी भरतात. या पद्धतीमध्ये पाण्यात पुष्कळ बचत होते. झाडे लहान असताना आळ्याचा घेर लहान ठेवून नंतर झाड वाढत जाईल त्याप्रमाणे झाडांच्या विस्ताराच्या घेरापलीकडे तो ३० ते ६० सेंमी. जाईल अशा तऱ्हेने ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. झाडांची वाढ पूर्ण झाल्यावर आळी काढून मोकार अगर वाफे पद्धतीने पाणी देतात.

झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर बांगडीसारख्या गोल आकाराचे आळे करून त्यात पाणी भरतात. या पद्धतीला बांगडी आळे पद्धत असे नाव आहे. झाडाच्या बुंध्याभोवती मातीचा उतरता ढीग १ ते १·२५ मी. उंचीचा करतात. या पद्धतीत पाणी प्रत्यक्ष खोडाला लागत नाही. त्यामुळे संत्री-मोसंबीसारख्या फळझाडांसाठी व पपईसाठी ही पद्धत विशेष उपयोगी आहे. कारण या झाडांच्या बुंध्यापाशी पाणी साचून राहिले, तर कवकजन्य रोगांचा प्रादुर्भाव लवकर होतो. जमिनीला फार उतार असल्यास आळ्यांचा घेर वाढविणे इष्ट नसते.

फवाऱ्याने पाणी देण्याची पद्धत यूरोप व अमेरिकेत वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. विशेषतः चढउताराच्या जमिनीत ही पद्धत फार उपयुक्त आहे; परंतु, त्यासाठी भांडवली खर्च फार येतो व रुक्ष हवामानात बाष्पीभवनामुळे फवाऱ्यातून बाहेर पडणारे बरचे पाणी वाया जाते. [→ सिंचाई].

फळझाडांना आकार देणे व छाटणी :  काही फळझाडांची छाटणी न केल्यास त्यांची वाढ अमर्याद होते आणि त्यांना जास्त प्रमाणावर फळे धरत नाहीत. याउलट आंबा, फणस, चिकू यांसारख्या सदाहरित व उष्ण हवामानातील झाडांच्या वाळलेल्या फांद्या काढण्यापलीकडे कोणतीही छाटणी करावी लागत नाही व केल्यास ती त्यांना नुकसानकारक ठरते. स्ट्रॉबेरी, अननस व पपई या झाडांचीही छाटणी करावी लागत नाही. सफरचंद, नासपती, पीच व द्राक्षे या पानझडी फळझाडांची नियमितपणे छाटणी करावी लागते व त्यांना आकारही द्यावा लागतो. लिंबू गटातील फळे, डाळिंब व पेरू या झाडांना इच्छित आकार देण्यासाठी सुरुवातीला थोडीफार छाटणी करावी लागते. ‘आकार देणे ’ यात झाडाला खांबावर अथवा तारेच्या जाळीवर अथवा मांडवावर वाढू देणे अथवा झाडाच्या काही फांद्या छाटून त्याची विशिष्ट मर्यादेत वाढ होऊ देणे यांचा अंतर्भाव होतो. द्राक्षवेलींना जाळीवर, खांबावर अथवा मांडवावर वाढविण्यात येते. सफरचंदासारख्या उंच झाडांच्या शेंड्याकडील काही फांद्या छाटून उंची कमी करण्यात येते व त्यामुळे फळे काढणे सोपे जाते. आकार देताना थोडी फार छाटणी करावी लागते. झाडांना वाढीच्या प्रथमावस्थेत आकार दिल्यामुळे सर्व झाडाला भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळते, त्यामुळे झाडे जोमदार व दीर्घायुषी बनतात, रोग व कीडींचे प्रमाण कमी राहते व त्यांचा प्रादुर्भाव झाल्यास औषधे फवारणे सोपे जाते.

ज्या वेळी झाडाची वार्षिक वाढ काढून टाकण्यात येते त्याला छाटणी असे नाव आहे. छाटणीमध्ये झाडाच्या आकाराला बाधा येत नाही. छाटणी दोन प्रकारांनी केली जाते. पहिल्या प्रकारात झाडाच्या काही फांद्या संपूर्णपणे छाटल्या जातात व त्याला ‘विरळणी’ असेही म्हणतात. दुसऱ्या प्रकारात झाडाच्या सर्व फांद्यांचे फक्त शेंड्याकडील भाग छाटले जातात. विरळणीमुळे झाडावरील इतर फांद्या जोमान वाढतात व फळेही जास्त प्रमाणात धरतात. शेंडे छाटण्यामुळे छाटलेल्या जागेच्या खालच्या बाजूला डोळे फुटून येतात आणि त्यातून निघालेल्या नवीन फांद्यांवर पाने आणि फुले येतात. काही फळझाडांत विरळणी फायदेशीर असते (उदा., संत्री, मोसंबी, पेरू) व द्राक्षासारख्या झाडात शेंड्याकडील वाढ छाटणे फायदेशीर असते. यासाठी प्रत्येक फळझाडासाठी अनुभवाने चांगली ठरलेली छाटणीची पद्धत अमलात आणणे इष्ट असते.

पूर्ण वाढ झालेल्या झाडांची वार्षिक छाटणी किती व केव्हा करावयाची हे त्या त्या फळझाडावर अवलंबून असते; परंतु, रोगट आणि मोडलेल्या अथवा वाळलेल्या फांद्या काढून टाकणे सर्वच झाडांच्या बाबतीत आवश्यक असते. मात्र रोगट फांद्यांची संख्या फार असल्यास त्या सर्व एकच वेळी न छाटता विभागून छाटतात. एकाच वेळी छाटल्यास झाड वठण्याचा संभव असतो [→ छाटणी, झाडांची].

फलधारणा : फळझाडांची फळे धरण्याची क्षमता बाह्य परिस्थिती (हवामान, जमिनीचा प्रकार, पाणीपुरवठा, खते, मशागत, छाटणी, रोग व किडी वगैरे) आणि त्यांचे आंतरिक गुणधर्म यांवर अवलंबून असते. हवेचे तापमान, पाऊस, वारा आणि फुलांवर पडणारे रोग व किडी यांचा फुलांतील  ⇨ परागण आणि फळे धरणे यांवर अनुकूल अगर प्रतिकूल परिणाम होतो. फार पावसामुळे फुलोरा धुऊन जातो. पुष्कळ प्रकारच्या फुलांचे परागण कीटकांद्वारे हाते. वाऱ्यामुळे कीटकांच्या उड्डाणाला प्रतिबंध होतो व त्यामुळे परागणात व्यत्यय येतो. झाडाची पालेवाढ वाजवीपेक्षा जास्त अगर कमी होणे या दोन्ही बाबी फलधारणेला प्रतिकूल आहेत. पालेवाढ फार कमी प्रमाणात असल्यास झाडांना सूर्यप्रकाश, पाणी व खते (विशेषतः नायट्रोजन) यांचा पुरवठा वाढवून आणि ती जास्त प्रमाणात असल्यास पाणी व खते (विशेषतः नायट्रोजन) यांचा पुरवठा कमी करून झाडांना अनुकूल तापमानात फुले व फळे धरण्यास मदत होते. व्यापारी प्रमाणावर फळबाग यशस्वी होण्यासाठी झाडाच्या निरनिराळ्या अवस्थांचा सूक्ष्म अभ्यास करून मशागत, पाणीपुरवठा, खते या बाबतींत योग्य ते फेरबदल करून झाडामधील कार्बोहायड्रेटाचे उत्पादन व संचय वाढवून त्याचा फुले व फळे यांच्या उत्पादनासाठी जास्त उपयोग कशा तऱ्हे ने करून घेता येईल याकडे लक्ष पुरविणे आवश्यक असते. दक्षिण भारतात संत्री व मोसंबी या फळझाडांना फक्त इच्छित हंगामात फुले व फळे धरण्यासाठी फुले येण्याच्या अगोदर दोन महिने हलके हलके पाणी बंद करून मुळे उघडी करतात व झाडाला विश्रांती देतात. तंतुमय मुळे छाटून टाकतात. याला ‘जारवा छाटणे’ असेही म्हणतात. सर्व पाने वाळल्यावर (सु. १० दिवसांनंतर) खत व मातीने मुळे झाकून घेतात आणि ताबडतोब पाणी देतात. हे काम फक्त कोर ड्या हंगामातच करता येते. झाडाला विश्रांती मिळाल्यामुळे फांद्या व अंकूर यांमध्ये अन्नसंचय होतो व शारीरिक वाढ पुन्हा सुरू झाल्यावर सर्व डहाळ्यांवर मोठ्या प्रमाणावर फुले येऊ लागतात. प्रयोगावरून असे सिद्ध झाले आहे की, संत्री व मोसंबी या झाडांचा जारवा छाटण्यामुळे झाडांच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. केवळ पाणी तोडले असता झाडांना पुरेशी विश्रांती मिळते. भारी जमिनीत केवळ पणी तोडल्यामुळे झाडांची शारीरिक वाढ थांबली नाही, असे आढळून आल्यास थोड्या प्रमाणात जारवा छाटणे इष्ट असते.

दख्खन भागात पेरूच्या फळांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरळ वाढणाऱ्या झाडांच्या मोठ्या फांद्या कमानीप्रमाणे वाकवून एकमेकींना बांधून ठेवतात. असे केल्याने फक्त शेंड्याच्या भागावर फळे न धरता मोठ्या फांद्यांवर फुटून येणाऱ्या आडव्या फांद्यांवरही फळे धरतात.

जी फळझाडे फले धारण न करता नुसती जोमदार शारीरिक वाढच करीत राहतात त्यांना फळे आणण्यासाठी खोडाच्या किंवा मुख्य फांदीच्या सभोवारचा ०·६० ते १·५ सेमी. रुंदीचा सालीचा आंगठीसारखा गोल भाग कापून काढतात अथवा सालीला चीर पाडतात. कापलेल्या जागेच्या वरच्या भागात झालेल्या अन्नसंचयामुळे त्या झाडाला फुलांचा बहर येतो. भारतात अशा प्रकारचा प्रघात कमी प्रमाणांत फळे लागणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या बाबतीत केलेला आढळून येतो. द्राक्ष बागांतूनही, विशेषतः थॉम्पसन सीडलेससारख्या प्रकारात, या पद्धतीचा अवलंब केला जातो.

पुष्कळ वेळा झाडांना पुष्कळ फुले येऊनही फळे धरण्याचे प्रमाणे फार कमी असते. याला अनेक कारणे असतात. हवामान अनुकूल असतानाही स्वयंवंध्यत्व (अंगचा वांझपणा), एकलिंगत्व, द्विभक्त लिंगत्व (नर व मादी झाडे वेगळी असणे), फुलाची सदोष संरचना वगैरे कारणांमुळे परागणात व्यत्यय येतो. झाडे फुलावर असताना जमिनीत पुरेशी ओल नसल्यास अगर झाडात त्या वेळी अन्नसंचयाची कमतरता असल्यास फलधारण योग्य प्रमाणात होत नाही.

फुलांची व फळांची विरळणी : काही फळझाडांना एका वर्षी बहुसंख्येने फुले व फळे येतात व पुढील वर्षात शाकीय वृद्धी (पालेवाढ) कमी होऊन फळेही कमी धरतात. ज्या वर्षी फुले व फळे जास्त धरतात त्या वर्षी एकतृतीयांश अथवा निम्मी फुले काढून टाकल्यास फलधारणेच्या कामी खर्च होणाऱ्या शक्तीचा काही भाग शाकीय वृद्धीकडे खर्च होतो व पुढील वर्षी जास्त प्रमाणात फळे धरतात. अशा पद्धतीचा वापर सदाहरित झाडांच्या बाबतीत करीत नाहीत. अलुबुखारासारख्या पानझडी वृक्षांच्या बाबतीत तो केला जातो.

फळांच्या विरळणीमध्ये फळांचे आकारमान लहान असताना पुष्कळ फळे धरलेल्या घोसांतील काही फळे काढतात अथवा फळांचे संपूर्ण घोस अगर घोस असलेल्या काही फांद्या काढतात. त्यामुळे राहिलेल्या फळांना प्रकाश, हवा व पोषण योग्य प्रमाणात उपलब्ध होऊन त्यांचे आकारमान, रंग व प्रत याबाबतींत सुधारणा होते. सफरचंद, नासपती, पीच व अलुबुखार या फळांमध्ये अशी विरळणी नेहमीच करतात. पपईची काही फळे काढल्यास राहिलेल्या फळांचे आकारमान मोठे हाते.

रोग व किडींचे नियंत्रण :  याकरिता वनस्पततिरोगविज्ञान, कीटकनाशके व कवकनाशके तसेच त्या त्या फळांवरील नोंदी पहाव्यात.

वृद्धी नियंत्रकाचा फलसंवर्धनात उपयोग : वृद्धी नियंत्रकांत झाडांतील ⇨ हॉर्मोने तसेच झाडाची वाढ आणि विकास यांवर अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम करणारी संश्लेषित (कृत्रिम रीत्या तयार केलेली) रसायने यांचा समावेश हातो. फलसंवर्धनात वृद्धी नियंत्रकांचा उपयोग पुढील उद्दिष्टांसाठी करतात : (१) फळझाडांची अभिवृद्धी, (२) झाडांच्या वाढीचे नियंत्रण अथवा उद्दीपन (यात फुलांचे नियंत्रण अथवा उद्दीपन यांचा समावेश होतो), (३) फलधारणा (यात फलनाशिवाय फळांच्या उतपादनाचा समावेश होतो), (४) फळांची गळ थांबविणे (उदा., संत्री, सफरचंद, नासपती.), (५) फळे लवकर (उदा., सफरचंद) अगर उशीरा (उदा., वॉशिंग्टन नॅव्हल संत्री) पिकण्यावर नियंत्रण (६) तणनाश [→  तण]. महाराष्ट्रात द्राक्षाच्या थॉम्पसन सीडलेस प्रकारात जिबरेलिनाचा उपयोग फळांचे आकारमान वाढविण्यासाठी वाढत्या प्रमाणावर केला जात आहे. फाट्यांना मुळे चांगल्या प्रकारे फुटावीत यासाठी इंडॉल ब्यूटिरिक अम्लाचा भुकटीच्या स्वरूपात वापर करतात.

फळांची तोडणी, साठवणी व विक्री : फळांची तोडणी केव्हा करावयाची हे फळाच्या प्रकारावर आणि कोणत्या स्वरूपात त्याचा वापर करावयाचा यावर अवलंबून असते. पक्व होण्याच्या सुमारास बहुतेक फळांचा रंग बदलतो. नासपतीसारखी फळे झाडावर पिकू दिल्यास ती लवकर खराब होतात. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी फळे थोडीफार कच्च्या स्थितीत तोडतात. तोडणीमध्ये फळांचे देठ फळावर राहू दिल्यास करंड्यांत फळे भरल्यावर देठांमुळे इतर फळांचे नुकसान होते.

फळे तोडल्यावर विक्रीला पाठविण्यापूर्वी त्यांतील फार पिकलेली व कच्ची फळे बाजूला काढतात. भारतात ⇨ गमार्क पद्धतीने फळांची प्रतवारी लावण्याची शिफारस केली जाते.

शीतगृहात फळे साठविल्यास बाजारात ती जास्त दिवस मिळू शकतात. मात्र निरनिराळी फळे कोणत्या तापमानात साठविल्यास ती चांगली टिकतात याचा विचार करणे आवश्यक असते. आंबा व केळी अनुक्रमे ७·५° ते १५° सें. पेक्षा कमी तापमानाखाली ठेवल्यास त्यांवर विपरीत परिणाम घडून येतो.

संदर्भ : 1. Gardner, V. R.; Bradford, F. C.; Hooker, H. D. Jr. Fundamentals of Fruit Production, New York, 1952.

2. Janick, J. Horticultural Science, San Fransisco, 1972.

3. Schneider, G. W.; Scarbourgh, C. C. Fruit  Growing, Englewood Cliffs, N. J. 1960.

4. Shoemaker, J. S. Small  Fruit Culture, New York, 1965.

5. Singh Ranjit, Fruit, New Delhi, 1969.

6. Singh Shyam; Krishnamurthi, S.; Katyal S. L. Fruit Culture in India, New Delhi, 1963.

7. नागपाल, रघबीरलाला अनु. पाटील, ह. चिं. फळझाडांच्या लागवडीची तत्त्वे आणि फळे टिकवून ठेवण्याची तत्त्वे आणि  पद्धती, मुंबई, १९६३.

पाटील, अ. व्यं.; गोखले, वा. पु.