फलसान : (लॅ. स्पॅथोलोबस रॉक्सबर्घाय कुल-लेग्युमिनोजी). ह्या काष्ठयुक्त मोठ्या वेलीचा प्रसार प. हिमालयाच्या पायथ्याच्या सखल भागात आणि मलबार, कारवार, साष्टीच्या व कोकणातील इतर टेकड्या व श्रीलंकेपर्यंत झालेला आहे. पाने संयुक्त, एकाआड एक व त्रिदली दले मोठी, अंडाकृती बाजूची दले तिरपी [→ पान] फुले लहान, पांढरी किंवा लाल असून जानेवारी- फेब्रुवारीत परिमंजरीवर (शाखायुक्त फुलोऱ्यावर) येतात. शिंबा (शेंग) मखमली आच्छादनाची, गर्द लाल-तपकिरी, ७-१५ सेंमी. लांब व ५ सेंमी. रुंद असून तिच्यात एकच बी असते. [→ लेग्युमिनोजी].
फलसानच्या सालीचा काढा जलोदर, कृमी, पचनाच्या तक्रारी वगैरेंवर गुणकारी असून तो सर्पविषावर उपयुक्त आहे, असे म्हणतात. मुळांमध्ये रोटेनॉन हे कीटकनाशक संयुग एक टक्का असते. सालीपासून चांगला बळकट धागा मिळतो व तो लाकडाच्या मोळ्या बांधण्यासाठी वापरतात. मलबारात त्याचा उपयोग सामान्यपणे भाताच्या पेंढ्या बांधण्यासाठी करतात. त्याच्यापासून दोर व दोऱ्या बनविता येतात.
जमदाडे. ज. वि.
“