फऱ्या रोग : (एकटांगी रोग ब्लॅक क्वार्टर). प्रामुख्याने गाईगुरे, म्हशी व कधीकधी मेंढ्यांमध्ये आढळणारा आणि त्यांच्या फऱ्यावर (खांद्यावर) सूज येणारा संक्रामक (संसर्गजन्य) रोग. रेनडियर व उंट या प्राण्यांतही हा आढळून आला आहे. स्नायुशोथ (स्नायूंची दाहयुक्त सूज) व विषरक्तता [रक्तामध्ये जंतुविष मिसळले जाणे ⟶ जंतुविषरक्तता] ही या रोगाची विशिष्ट लक्षणे आहेत. रोगाची लागण झालेल्यांपैकी शेकडा ९० च्यावर जनावरे मृत्युमुखी पडतात. क्लॉस्ट्रिडियम शोव्होई या सूक्ष्मजंतूमुळे हा रोग होतो. काही वेळा क्लॉ. शोव्होई व क्लॉ. सेप्टिकम या दोन्हीही सूक्ष्मजंतूंमुळे हा झाल्याचे आढळून आले आहे परंतु क्लॉ. सेप्टिकम या सूक्ष्मजंतूमुळे हा रोग होतो, याविषयी अजून शंका आहे. दोन्ही सूक्ष्मजंतू दंडाकार असून अनॉस्किजीवी (ऑक्सिजनविरहित वातावरणात जगणारे) आहेत व बीजाणू (प्रजोत्पादनक्षम सुप्त अवस्थेच्या) स्वरूपात जमिनीवर ते अनेक वर्षे जिवंत राहू शकतात. बीजाणू स्वरूपातील जंतू १००° से. तापमानामध्ये किंवा सामान्य जंतुनाशकामुळे लवकर मरत नाहीत मात्र वरील तापमानात १० मिनिटे राहिल्यास, तसेच जंतुनाशकाचा ५ ते १० मिनिटे संपर्क आल्यास त्यांचा नाश होतो.
जगातील सर्व देशांमध्ये हा रोग आढळून आला आहे. भारतामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र या रोगाचे प्रमाण बरेच आहे. या राज्यांतील उष्ण व दमट भागात, विशेषतः पूर येऊन गेलेल्या दलदलीच्या पाणथळ जमिनीवर चरणाऱ्या जनावरांमध्ये हा रोग पशुस्थानिक (रोगजंतूंच्या अस्तित्वामुळे एखाद्या भागातील जनावरांत वारंवार उद्भवणाऱ्या रोगाच्या) स्वरूपात दिसून येतो. रोगोद्भव झाल्यावर थोड्या दिवसांच्या अवधीत अनेक जनावरांना याची लागण होते. वर उल्लेखिलेल्या राज्यांमध्ये सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीस या रोगाच्या साथी उद्भवतात. सहा महिने ते दोन वर्षे वयाच्या, विशेषतः सुदृढ जनावरांमध्ये रोगाची लागण जास्त प्रमाणात होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्व वयांच्या गाईगुरांना हा रोग होतो. म्हशींना हा रोग सौम्य प्रमाणात होतो. मेंढ्या अधिक रोग-ग्रहणशील आहेत व त्या जमिनीलगत चरत असल्यामुळे त्यांच्यात या रोगाचे प्रमाण अधिक असावयास हवे परंतु ते तसे असत नाही. भारतामध्ये तर मेंढ्यांना हा रोग तुरळक स्वरूपात होतो. गाईगुरांमध्ये रोगजंतूंचे बीजाणू बहुधा दुषित अन्नावाटे शरीरात प्रवेश करतात परंतु जखमांवाटेही रोगसंसर्ग होऊ शकतो. मेंढ्यांमध्ये मात्र बव्हंशी वितांना किंवा लोकर कापताना होणाऱ्या जखमांद्वारे रोगसंसर्ग झाल्याचे दृष्टोत्पत्तीस आले आहे. आंत्रविषबाधेवरील (क्लॉ. परफ्रिंजन्स या सूक्ष्मजंतूमुळे उत्पन्न झालेल्या विषाचे आंत्रमार्गामध्ये रक्तात शोषण होऊन होणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या विषबाधेवरील) लस टोचल्यामुळे मेंढ्यांमध्ये क्वचित या रोगाच्या साथी उद्भवल्याचे दिसून आले आहे. बहुधा लसींमध्ये असलेल्या फॉर्मॅलीनमुळे टोचलेल्या ठिकाणी त्वचेच्या खालील ऊतकाचा (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाचा) नाश झाल्यामुळे तेथे अनॉक्सी अवस्था निर्माण होऊन त्वचेवर असणाऱ्या सुप्तावस्थेतील–बीजाणू रूपातील-जंतूंच्या संसर्गामुळे रोगोद्भव होत असावा, असा कयास आहे. मेंढ्यांना जास्त प्रमाणात प्रथिनयुक्त अन्न दिल्यास त्यांची या रोगाबाबतची ग्रहणशीलता वाढते, असे आढळून आले आहे.
लक्षणे : याचा रोग परिपाक काल (रोगजंतूंचा शरीरात प्रवेश झाल्यापासून रोगलक्षणे दिसू लागेपर्यंतचा काळ) काही तास ते ५ दिवसांचा आहे. रोग बहुधा अतितीव्र किंवा तीव्र स्वरूपात होतो. अतितीव्र स्वरूपात जनावर एकाएकी मेल्याचे आढळते. त्याच्या नाकातोंडावाटे रक्तमिश्रित फेस व गुदद्वारातून रक्त आल्याचे दिसते. ही लक्षणे संसर्गजन्य काळपुळी [⟶ काळपुळी, संसर्गजन्य] या रोगाशी मिळतीजुळती असल्यामुळे याला ‘आभासी संसर्गजन्य काळपुळी’ असे नाव आहे. तीव्र स्वरूपात गुरांच्या एका फऱ्यावर किंवा खांद्यावर सूज आलेली दिसते. सूज हाताला गरम लागते आणि थोडीशी दाबली, तर जनावराला असह्य वेदना होत असल्याचे कळून येते. काही तासांनंतर ही थंड लागते व तिच्यातील दुखरेपणाही कमी होऊ लागतो. दुखऱ्या सुजेमुळे जनावर लंगडत चालते. काही वेळा अशी सूज मान, पाठ व जिभेचा बुंधा किंवा शरीराच्या इतर भागांवरही आढळते. भूक अजिबात न लागणे, ४१° से.पर्यंत ताप येणे, जलद श्वासोच्छ्वास इ. लक्षणे सुरुवातीस दिसून येतात परंतु ही लक्षणे लक्षात येण्याआधीच सूज वाढत जाऊन तेथील कातडे काळे व कोरडे पडून सुरकुतते व त्यावर भेगा पडलेल्या दिसतात. मांसल भागावरील-मांडीवरील वा स्नायूवरील-सूज आत हवा भरल्यासारखी असते व हाताने दाबली असता स्पष्टपणे चरचर अस आवाज ऐकू येतो. कारण तेथे रोगजंतूची वाढ होत असताना उत्पन्न झालेला वायू असतो. ही सूज फोडली अगर फुटली, तर तीतून बुडबुडे मिश्रित काळसर दुर्गंधीयुक्त द्रव बाहेर येतो. सूज येते त्या ठिकाणी रोगजंतू स्थानिक स्वरूपात असतात व त्या ठिकाणी त्यांचे गुणन (संख्या वाढ) होते व त्यांच्यापासून उत्पन्न झालेले जंतुविष रक्तात मिसळले जाऊन विषरक्तता होऊन रोगलक्षणे दिसू लागल्यापासून १२ ते ३६ तासांत जनावर मरण पावते. या रोगाचे सूक्ष्मजंतू रक्ताभिसरणात आढळत नाही.
मेंढ्यांमध्ये दूषित जखमांच्या अवतीभोवती सूज दिसून येते. सूज दाबली असताना चरचर आवाज सहसा होत नाही. लंगडणे, ताप, भूक न लागणे, डोक्यावर सूज असल्यास नाकावाटे रक्त येणे इ. लक्षणे दिसतात.
रक्तनिदान : वरील लक्षणांवरून रोगनिदान करणे कठीण नसते. तरीसुद्धा रोगलक्षणांतील साम्यामुळे संसर्गजन्य काळपुळी, तिवा व गळसुजी यांपासून व्यवच्छेदक (वेगळेपणा दर्शविणारे) निदान करणे कधीकधी जरूर असते. संसर्गजन्य काळपुळी या रोगातील सूज पोकळ असत नाही कारण तिच्यात वायू साचलेला नसतो, तर तिवा या रोगामध्ये जरी जनावर लंगडत चालते व त्याला ताप असतो, तरी त्याच्या अंगावर सूज नसते. गळसुजी रोगात येणारी सूज मुख्यत्वे गळ्यावर असते व जंतुविषरक्तता हे त्या रोगाचे प्रमुख लक्षण [⟶ गळसुजी] आहे. तथापि खात्रीलायक निदान सुजेमधील निस्त्रावाची (ऊतकातून पाझरून साचलेल्या द्रवाची) सूक्ष्मदर्शकाने तपासणी करून त्यात रोगजंतू अगर त्यांची बीजाणुरूपे दिसून आल्यानेच होऊ शकते.
उपचार : रोगोद्भव व जनावराचा मृत्यू यांमध्ये फारच थोडा अवधी असल्यामुळे रोगोपचार करण्यास सहसा वेळ मिळत नाही. रोगाची सुरुवात झाल्याबरोबर पेनिसिलिनासारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे अगर रोगावरची लस किंवा दोन्हीही टोचल्याने जनावरे बरी होतात. लसीने येणारी प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक शक्ती) तात्पुरत्या स्वरूपाची असून ती फक्त चौदा दिवस टिकते.
प्रतिबंधक उपाय : ज्या भागामध्ये रोग पशुस्थानिक स्वरूपात होतो त्या ठिकाणी तो ठराविक मोसमात उद्भवतो. अशा भागातील, विशेषतः चार वर्षांच्या आतील गुरांना मोसम सुरू होण्यापूर्वी रोगप्रतिबंधक लस टोचतात. भारतातील बहुतेक राज्यांमध्ये ही लस उत्पादन करणाऱ्या संस्था आहेत व राज्याच्या पशुसंवर्धन खात्यामार्फत ती टोचण्याची व्यवस्था केलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील अशी संस्था–पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था-पुणे येथे आहे. ही हतजंतू लस (रसायनाने रोगजंतू मारून तयार केलेली) असून रोगजंतूच्या स्थानिक पण तीव्र विकृतिजनक (रोग उत्पन्न करणाऱ्या) विभेदापासून (प्रकारापासून) तयार केलेली असते. लस टोचल्यापासून १४ दिवसांनी प्रतिरक्षा निर्माण होते व ती एक वर्षापर्यंत टिकते. एक वर्ष वयाच्या आतील मेंढ्यांना लस टोचल्यास तितकीशी चांगली प्रतिरक्षा निर्माण होत नाही, असा अनुभव आहे. म्हणून ज्या ठिकाणी पशुस्थानिक स्वरूपात मेंढ्यांमध्ये हा रोग होतो, त्या ठिकाणच्या मेंढ्यांना विण्याच्या ३ आठवडे आधी लस टोचतात. यामुळे विताना होणाऱ्या जखमांतून रोगसंसर्ग होऊ शकत नाही. याशिवाय कोकरांना मातेपासून परार्जित (दुसऱ्याच्या रक्तातील आयती प्रतिपिंडे म्हणजे शरीरात शिरलेल्या हानिकारक बाह्य पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी रक्तद्रवात तयार होणारी प्रथिने टोचून मिळणारी) प्रतिरक्षा मिळून नाळ कापताना किंवा शेपटी कापताना होणाऱ्या जखमांतून रोगसंसर्ग होत नाही. मात्र लोकर कातरण्याच्यापूर्वी २ ते ३ आठवडे कोकरांना पुन्हा लस टोचावी लागते.
ज्या भागात क्लॉ. सेप्टिकम या जंतूमुळे रोगोद्भव होतो, त्या भागात वापरावयाची लस क्लॉ. शोव्होई व क्लॉ. सेप्टिकम या दोन्ही रोगजंतूंपासून तयार केलेली असणे जरूर आहे. रोगाने मेलेली जनावरे खोलवर पुरणे जरूर असते कारण त्यामुळे रोगजंतूंनी जमीन दूषित होत नाही. रोगी जनावरापासून निरोगी जनावरे अलग ठेवणे, जंतुनाशक औषधांचा वापर करून दूषित गोठे स्वच्छ करणे इ. उपायांनीही रोगप्रसारास आळा बसतो.
संदर्भ : 1. Boold, D. C. Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1973.
2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, Livestock Supplement Including Poultry, New Delhi, 1970.
3. I. C. A. R. Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1967.
4. Miller, W. C. West, G. P. Black’s Veterinary Dictionary, London, 1962.
खळदकर, त्रिं. रं.