प्लेसिओसॉर : सागरी सरीसृपांच्या (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) सॉरोप्टेरिजिया या नामशेष झालेल्या प्राण्यांच्या गणातील एक प्राणी. हा जुरासिक (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) व क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळांत जगातील सर्व समुद्रांत अस्तित्वात होता. याचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) क्रिटेशस व जुरासिक कालीन खडकांत सापडले आहेत. त्यामुळे जगाच्या जवळजवळ सर्व भागांत याचे जीवाश्म आढळतात.
याची लांबी सु. १० मी. होती. सर्वसाधारणपणे यांचे शरीर निमुळते, मान लांब व डोके लहानसे होते. पायांचे वल्ह्यांसारख्या अवयवांमध्ये रूपांतर झालेले होते. यांच्या साहाय्याने हे प्राणी पाण्यात उत्तम प्रकारे पोहू शकत असत. हे अवयव खूपच मजबूत असत. दात खूप मजबूत व त्यांतील काही प्राण्यांमध्ये अनैसर्गिक रीत्या पुढच्या बाजूला टोकदार झालेले असत. कशेरुकांचे काय (पाठीच्या कण्यातील मणक्यांचे पुढील भाग) दोन्ही बाजूंनी अंतर्गोल व खूपच चपटे होते आणि त्यांची रचना व एकमेकांतील गुंतवणूक मान बरीच लांबवता येईल अशी होती. काही प्लेसिओसॉर आखूड मानेचे देखील होते. लांब मानेच्या प्राण्यांमध्ये मानेचे कशेरुक सु. ७६ होते, तर आखूड मानेच्या प्राण्यांमध्ये १३ पर्यंत कशेरुक होते. अंस मेखला (हाडांच्या सांगाड्याच्या ज्या भागाशी पुढील पायांसारख्या अवयवांची जोडी सांधलेली असते तो भाग) व श्रोणी मेखला (हाडांच्या सांगाड्याच्या ज्या भागाशी मागील पायांसारख्या अवयवांची जोडी सांधलेली असते तो भाग) खूपच रूपांतरित झालेल्या व शरीराच्या खालच्या बाजूकडे जास्त मजबूत असत. यांनाच वल्ह्यांसारख्या अवयवांचे स्नायू जोडलेले होते. पायांची हाडे अगदी आखूड होऊन हे अवयव तयार झाले होते. शेपटी आखूड, मजबूत व टोकदार होती. हिचा उपयोग पोहताना दिशा बदलण्याच्या कामी होत असे. या वल्ह्यांसारख्या अवयवांच्या व शेपटीच्या मदतीने हे प्राणी पुढे तसेच मागच्या दिशेनेही सारख्याच गतीने पोहू शकत असत. आखूड मानेच्या प्लेसिओसॉरांचा जबडा खुपच मोठा व लांब असे. प्लेसिओसॉरांच्या खाद्यात मृदुकाय प्राणी, बेलेम्नॉइड्स, मासे अशा प्राण्यांचा समावेश होता. यांचे अवशेष जीवाश्मरूप प्लेसिओसॉरांच्या पोटात आढळून आलेले आहेत.
प्लेसिओसॉर हे ट्रायासिक कालीन (सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या) नोथोसॉरिया या गणातील प्राण्यांचे वंशज होत. नोथोसॉरिया गणातील प्राणी आकारमानाने लहान व सागरी जीवनाला कमी सरावलेले होते. त्यांच्यापासून पुढे प्लेसिओसॉर हे राक्षसी आकारमानाचे व सागरी जीवनाकरिता संपूर्णपणे यशस्वी झालेले प्राणी निर्माण झाले. प्लेसिओसॉर मध्यजीव काळाच्या शेवटी (सु. नऊ कोटी वर्षांपूर्वी) नामशेष झाले.
जोशी, लीना
“