प्लॉव्हदिव्ह : बल्गेरियातील याच नावाच्या प्रांताचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३,०९,२४२ (१९७५). हे सोफियाच्या आग्नेयीस १२८ किमी. मरित्स नदीकाठी वसले आहे. थ्रेसियन लोकांच्या सत्तेखाली असताना ते ’पल्पदेव्ह’ किंवा ’युमालपीअस’ नावाने ओळखले जात असे. इ.स.पू. ३४१ मध्ये मॅसिडोनियाच्या दुसऱ्या फिलिपने हे जिंकल्यावर याचे ’फिलपापलस’ असे नामकरण झाले. ख्रि. पू. पहिल्या शतकात हे रोमन अंमलाखाली आले. इ. स. १३६४ मध्ये ते शहर तुर्कांनी घेतले. १८७८ च्या बर्लिन काँग्रेसनंतर हे तुर्कांच्या पूर्व रूमील्या प्रांताची राजधानी होते. १८८५ मध्ये ते बल्गेरियात समाविष्ट झाले. पहिल्या महायुद्धानंतरच अधिकृतपणे प्लॉव्हदिव्ह या नावाने हे ओळखले जाऊ लागले. बेलग्रेड-सोफिया-इस्तंबूल या लोहमार्गांवरील हे प्रमुख प्रस्थानक आहे. अन्नप्रक्रिया, यंत्रसामग्री, यंत्रसामग्री,रसायने, अलोह धातुनिर्मिती, खते, वस्त्रनिर्मिती इ. आधुनिक उद्योग विकसित झालेले आहेत. शहराचा आसमंत सुपीक असून शहरात प्रामुख्याने तंबाखू, तांदूळ, मद्ये आणि पशुधन यांचा व्यापार चालतो. येथे आंतरराष्ट्रीय द्विवार्षिक व्यापार जत्रा भरते. या शहराला अनेक वेळा भूकंपाचे तडाखे बसले असून त्यांपैकी १८१८ व १९२८ मधील भूकंप अत्यंत हानिकारक ठरले. रोमनकालीन वास्तूंचे तसेच मध्ययुगीन गढ्यांचे अवशेष येथे आढळतात. येथील वस्तुसंग्रहालयात थ्रेसियनकालीन सुवर्णपात्रांचा संग्रह आहे. यांशिवाय येथे चर्च, मशिदी, उद्याने, राष्ट्रीय ग्रंथालय इ. असून विद्यापीठ व सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा आहेत.

चौधरी, वसंत